महिला क्रिकेटला वादाचं ग्रहण का लागलंय?

२२ मे २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


भारतीय महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची पुन्हा एकदा निवड झाली. त्यासोबतच त्यांच्या आणि माजी कॅप्टन मिताली राज यांच्यामधल्या वादाची चर्चाही सुरू झाली. चांगली कामगिरी करूनही याआधीचे प्रशिक्षक वी. वी. रमण यांना नाकारून रमेश पोवार यांची निवड करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतलाय. रमेश पोवार यांची वापसी एकच संकेत देते. इथून पुढे हरमनप्रीतची टीमवर एकहाती पकड राहणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची पुन्हा एकदा निवड झाली. या निवडीनंतर रमेश पोवार यांनी क्रिकेट अ‍ॅडवायजरी कमिटी अर्थात सीएसी आणि बीसीसीआयचे आभार मानले. रमेश पोवार यांनी प्रशिक्षकपदाची सूत्रं ही भारताचे दिग्गज फिरकीपटू वी. वी. रमण यांच्याकडून स्वीकारली.

रमण यांनीही रमेश पोवार यांना ट्विट करून शुभेच्छा दिल्या. आता हा सगळा औपचारिक ट्विटर सोहळा पार पडल्यानंतर यात वाद कुठं उरतो? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण, वाद आताचा नाही तर तो जुना आहे. या वादामुळेच रमेश पोवार यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा करारबद्ध करण्यात आलं नव्हतं. हा वाद झाला होता भारतीय महिला क्रिकेट टीमच्या अव्वल स्टार, माजी कॅप्टन, बॅट्समन मिताली राज बरोबर.

रमेश पोवार यांच्यानंतर रमण यांनी भारतीय महिला क्रिकेट टीमचं प्रशिक्षकपद भूषवलं. त्यांच्या कार्यकाळात टीमने २०२०ला टी २० वर्ल्ड कपच्या फायनलपर्यंत धडक मारली. पण रमेश पोवार यांच्याप्रमाणेच चांगली कामगिरी करूनही त्यांना पुन्हा प्रशिक्षक करण्यात आलं नाही. आता त्यांची जागा रमेश पोवार घेणार आहेत.

रमेश पोवार पुन्हा प्रशिक्षक होणार म्हटल्यावर त्यांच्या आणि मिताली राज यांच्या वादाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. २०१८ च्या टी २० वर्ल्डकपमधल्या सेमी फायनलनंतर रमेश पोवार आणि मिताली राज यांच्यातला वाद चव्हाट्यावर आला होता.

हेही वाचा : लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'

‘द’ मिताली राज प्रकरण

मिताली राजला सेमी फायनलच्या टीममधून वगळण्यात आलं होतं. या मॅचमधे भारताची बॅटिंग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती. यानंतर मितालीने बीसीसीआयला मेल पाठवत सीएसी सदस्या डायना एडुल्जी यांच्यावर पक्षपातीपणाचे आरोप केले होते. तर प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर वाईट वागणूक दिल्याचा आरोप केला होता.

या आरोपांना रमेश पोवार यांनीही उत्तर देत मितालीने सलामीला खेळायला दिलं नाही तर निवृत्ती घेण्याची धमकी दिली होती. हा सगळा पत्रव्यवहार माध्यमांमधे फुटला. मग मितालीने हा आपल्या जीवनातला काळा दिवस असल्याचं सांगत माझ्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं ट्विट केलं.

आता वरकरणी हा मिताली राज आणि रमेश पोवार यांचा वाद वाटत असला तरी अनेक घटक आतल्या अंगाने काम करतात. ज्यावेळी रमेश पोवार आणि मिताली राज यांचा वाद चव्हाट्यावर आला, त्यावेळी या वादात टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांनी रमेश पोवार यांची बाजू उचलून धरली होती. त्यामुळे टीममधे वरिष्ठ आणि ज्युनिअर असा वाद सुरू आहे का, असं चित्र निर्माण झालं होतं. शेवटी या वादात रमेश पोवार यांची विकेट पडली.

विराट - कुंबळे वादाचीही किनार

प्रशिक्षक आणि टीमचा कॅप्टन, वरिष्ठ खेळाडू यांच्यातला हा वाद काही पहिला वाद नाही. यापूर्वी सौरभ गांगुली कॅप्टन असताना प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्याबरोबरही मोठा वाद झाला होता. त्यानंतर २०१७ ला विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातही वादाची ठिणगी पडली होती.

बरं, हा वाद काही टीम वाईट कामगिरी करत आहे यासाठी झाला नव्हता. कुंबळे यांच्या प्रशिक्षणाखाली भारताची कामगिरी अव्वलच झाली होती. पण, त्यावेळी कुंबळे यांची स्टाईल आणि विराटची स्टाईल मॅच होणारी नव्हती. शेवटी स्टार कॅप्टनची सरशी झाली आणि त्याला पाहिजे तसा प्रशिक्षक मिळाला.

या प्रकरणानंतर वर्षभरातच महिला क्रिकेट टीममधे याच वादाची पुनरावृत्ती घडली. यामधेही प्रशिक्षकाला टी २० क्रिकेट फॉरमॅटच्या अनुषंगाने संथ बॅटिंग करणारी बॅट्समन नको होती. त्यावेळी प्रशिक्षक आणि नवखी कॅप्टन यांच्यात या मुद्द्यावर एकमत होतं. पण, बीसीसीआयने मिताली राजची बाजू उचलून धरली. याला अनेक कारणं होती. मितालीची प्रसिद्धी, महिला क्रिकेट टीमचा असलेला एकमेव ब्रँड. त्यामुळे बीसीसीआयने मितालीला दुखावलं नाही.

हेही वाचा :  स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

रमेश पोवार वापसीचा संदेश

महिला क्रिकेट टीममधे पोवार, मिताली वादानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. त्यावेळी नवखी असलेल्या हरमनप्रीत आणि स्मृतीने टीमवरची आपली पकड मजबूत केली आहे. अनेक नवे खेळाडू आता चमकू लागलेत. दुसर्‍या बाजूला मिताली राजचं वलयही आता कमी होऊन ती निवृत्तीच्या उंबरठ्यावर पोचलीय.

आता शेफाली, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा यांचीही नावं प्रकाशझोतात आली आहेत. आता टी २० बरोबरच वन डे टीमचंही नेतृत्व करायला हरमनप्रीत तयार झाली आहे. मितालीनेही २०२२ चा वुमेन्स वर्ल्डकप हा आपल्या कारकिर्दीचा अंत असेल, याचे संकेत दिलेत.

नेतृत्वात बदल होणार असेल तर नेतृत्वाला जसा हवा तसा सपोर्ट देण्याचं बीसीसीआयचं आतापर्यंतचं धोरण आहे. त्यामुळे रमेश पोवार यांची वापसी एकच संकेत देते. इथून पुढे हरमनप्रीतची टीमवर एकहाती पकड राहणार आहे. रमेश पोवार आणि रवी शास्त्री यांचा किस्सा हा थोड्याफार फरकाने एकसारखाच आहे. दोघेही आपापल्या कॅप्टनचे लाडके प्रशिक्षक आहेत.

रमण यांचा लेटर बॉम्ब

भारतीय महिला क्रिकेट टीमची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे २०२० च्या टी २० वर्ल्डकपमधे झाली होती. त्यांनी इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली. आता भारतीय टीम इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या तगड्या टीमनाही आव्हान देत आहे. ही कामगिरी प्रशिक्षक रमण यांच्या कारकिर्दीत झालीय. 

रमण हे जुन्या जमान्यातले क्रिकेटर आहेत. आताचं क्रिकेट आणि ड्रेसिंग रूममधलं कल्चर फार बदललंय. त्यामुळे टीमचं आणि त्यांचं ट्युनिंग जमणं अवघडच होतं. अनिल कुंबळेंची शिस्त सैराट मनाच्या विराटला भावली नाही. त्याचप्रमाणे महिला क्रिकेटमधलं स्टार खेळाडूंनाही त्याच धाटणीतले रमण डोईजडच होणार याची शक्यता होती.

रमण यांनी वरकरणी ट्विट करून सगळं कसं आलबेल असल्याचं भासवलं. पण, त्यांनी जाता जाता एक लेटर बॉम्ब टाकला. त्यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक राहुल द्रविड यांना पत्र लिहिलं. यात महिला क्रिकेटमधे स्टार कल्चर रुजलंय असं म्हणत नाव न घेता बाण मारला. आता जो स्टार आहे, ज्याची टीममधे चलती आहे, त्याला हा बाण लागणार आहे.

हेही वाचा : कॉमेंट्रीटर असे अतिशहाण्यांसारखे का वागतात?

रमेश श्रेष्ठ की रमण

दोन प्रशिक्षकांमधला एक प्रशिक्षक निवडायचा म्हटलं की प्रत्येकाची गुणवत्ता तपासली पाहिजे. गुणवत्तेच्या बाबतीत रमण आणि रमेश पोवार दोघेही कमी नाहीत. रमेश पोवार यांच्या काळात महिला क्रिकेट टीम टी २० वर्ल्डकपच्या सेमी फायनलपर्यंत पोचला होता. तर रमण यांनी टीमला टी २० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोचले. त्यामुळेच रमण यांना डावलून रमेश पोवार यांना प्रशिक्षक केल्याची चर्चा जोर धरू लागली.

रमेश पोवार यांनीही मध्यंतरीच्या काळात आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं होतं. त्यांनी मुंबई टीमचं प्रशिक्षकपद भूषवलं. याच टीमने यंदाची विजय हजारे ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे गुणवत्तेच्या बाबतीत दोघांमधेही उजवं-डावं करता येणार नाही.

प्रशिक्षक निवडीच्या याआधीचा इतिहास पाहता बीसीसीआय स्टार कल्चरला नख लावेल असं दिसत नाही. कारण बीसीसीआयला मनोरंजनाचा डोलारा सांभाळायचा आहे. त्यासाठी त्यांना एक तगडा स्टार, हिरो टाईप चेहरा लागणारच. मग ते क्रिकेट पुरुषांचं असो की महिलांचं. स्टार तो स्टार होता हैं!

हेही वाचा : 

क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट

महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’

आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी

अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी