कोरोनाच्या काळात रक्त कमी का पडतंय?

११ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


रक्ताचा तुटवडा हा भारतातला कळीचा प्रश्न आहे. भारतातल्या २० टक्के लोकांचा वेळेत रक्त न मिळाल्यामुळे मृत्यू होतो. कोरोनाच्या काळात तर रक्ताची फारच चणचण भासू लागलीय. शिवाय, कोरोनाची लस घेतल्यानंतर जवळपास २ महिने रक्तदान करता येत नाहीय. देशाचे नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी विशेषतः तरुणांनी लस घेण्याआधीच रक्तदान करायला हवं.

सिनेमातला हिरो आपल्याला आवडतो. फायटिंग करुन किंवा खूप मेहनत घेऊन लोकांचा जीव तो वाचवत असतो. पण कसलीही इजा करून घेता, शरीराला त्रास न देताही एकावेळी कित्येक लोकांचे जीव वाचवणारे खऱ्या आयुष्यातले हिरोही आपल्या आसपास असतात त्यांना ‘रक्तदाते’ असं म्हणतात.

कोरोनाच्या काळात या रक्तादात्या हिरोंची फार गरज भासू लागलीय. कोरोनाची लस घेतल्यानंतर जवळपास २ महिने रक्तदान करता येत नाही. भारतात सध्या फक्त ४५ वर्षांच्या पुढच्या लोकांना लस दिली जात असली तरी लवकरच तरुणांचंही लसीकरण सुरू होईल. आणि एकदा लस घेतली की आधीच आटत चालेल्या रक्ताचा पुरवठा संपूर्णच संपून जाईल, अशी भीती तज्ञांकडून व्यक्त केली जातेय.

रक्तदान कोण करू शकतं?

माणसाच्या संमतीने त्याच्या शरीरातलं रक्त काढून गरज असलेल्या पेशंटसाठी त्याचा वापर करणं म्हणजे रक्तदान. जवळच्या रक्तपेढीत किंवा रक्तदान शिबीरात रक्तदान करता येतं. दाते अनेकदा संपूर्ण रक्ताचं दान करतात. तर कधीकधी प्लाझ्मा, प्लेटलेट्स, पांढऱ्या पेशी असे रक्तातले फक्त काही घटकच दान केले जातात.

रक्तदान पूर्णतः ऐच्छिक असायला हवंय. म्हणजे पैशासाठी, मोबदल्यासाठी, कुटुंबातल्याच व्यक्तीसाठी किंवा स्वतःलाच भविष्यात वापरता यावं यासाठी रक्तदान करणं ही संकल्पना पुसट होऊन शक्य असेल त्याने सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करायला हवं, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून जगभरात प्रयत्न चालू आहेत.

१८ ते ६५ वयोगटातली कोणतीही व्यक्ती रक्तदान करू शकते. अशा व्यक्तीचं वजन निदान ५० किलोग्रॅमपेक्षा जास्त असेल, हिमोग्लोबिनही १२.५ ग्रॅम पेक्षा असेल, नाडीचे ठोके ८० ते १०० प्रतिमिनिट, शरीराचं तापमान ३७.५ सेल्सियस असेल आणि व्यक्तीला कोणताही आजार नसेल तर ते दर तीन महिन्यांनी रक्तपेढीत किंवा रक्तदान शिबीरात आपलं रक्त जमा करू शकतात. एचआयवी, मलेरिया, गुप्त रोग असे आजार असणाऱ्या, अगदी दाताची ट्रिटमेंट चालू असणाऱ्या व्यक्तीलाही रक्तदान करता येत नाही.

हेही वाचा : कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

रक्ताविना होतात २० टक्के मृत्यू

एकूणातच जगात रक्ताची कमतरता पडणाऱ्या देशांत भारत अव्वल आहे, असं द लान्सेंट या जर्नलमधे २०१९ ला प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात सांगितलंय. भारतात फक्त ०.६ लोक रक्तदान करतात. एकावेळी व्यक्तीच्या शरीरातून फक्त ३०० ते ४०० मिली रक्त काढता येतं. हे साठवलेलं रक्त जास्तीत जास्त ३५ दिवस टिकतं. दोन रक्तदानाच्या मधे तीन महिन्यांचा कालावधी ठेवावा लागतो.

दात्यांची कमी संख्या, त्यात कमी रक्त काढता येणं, कमी दिवस साठवता येणं यासगळ्या कारणांमुळे भारतात सतत रक्ताचा तुटवडा जाणवतो. अगदी पेशंट बेडवर मरणाच्या दारात उभा असताना नातेवाईकांना रक्ताच्या पिशव्यांसाठी पळापळ करावी लागते. अनेकदा रक्त मिळालं नाही म्हणून पेशंटचा मृत्यूही होतो. अशा मृत्यूचं देशातलं प्रमाण १५ ते २० टक्के आहे.

रक्तदानाविषयी जागृती गरजेची

आता रक्त काढणं आणि ते साठवणं या गोष्टींवर येणाऱ्या मर्यादा ओलांडणं अशक्य आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त लोकांना, विशेषतः तरूण मुलामुलींनी रक्तदानासाठी पुढे येणं गरजेचं आहे. पण रक्तदानाविषयी असलेल्या वेगवेगळ्या गैरसमजांमुळे तरुण रक्तदानाकडे पाठ फिरवतात.

त्यातही भारतातल्या बहुतांश महिलांचं हिमोग्लोबीन कमी असतं. अहवालानुसार भारतातल्या ५०.४ टक्के गरोदर महिला आणि ५३.२ टक्के महिलांमधे रक्ताची कमतरता दिसून येते. त्यामुळे महिला रक्तदात्यांची संख्या मुळातच कमी असते. त्यात रक्तदान केल्याने पुरूषांची ताकद कमी होते, शरीर कमजोर होतं अशा अनेक चुकीच्या समजुती आपल्या मनामधे असतात.

‘रक्तदानाची भीती आणि गैरसमज तर असतातच. पण बहुतांश लोकांचं रक्तदान न करण्याचं कारण म्हणजे त्याबद्दलची माहिती नसणं. एखादी रक्तपेढी जवळपास आहे, तिथे रक्त जमा होतं याची जाणीवच लोकांना नसते. मला कुणी बोलावलं नाही, मला कुणी सांगितलंच नव्हतं, अशी कारण नेहमी ऐकायला मिळतात. ते आपलं कर्तव्य आहे, ही जाणीव कमी दिसते,’ असं पुण्यातल्या जनकल्याण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी संदीप अंगोळकर कोलाजशी बोलताना म्हणाले.

हेही वाचा : तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

लॉकडाऊनचा इफेक्ट रक्तदानावर

त्यामुळे रक्ताचा तुटवडा ही भारतातली नेहमीचाच प्रश्न आहे. या प्रश्नात आता साथरोगाची भर पडलीय. लॉकडाऊन, कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती यांमुळे रक्तदान करणाऱ्यांची आधीच कमी असलेली संख्या आणखी मंदावलीय.

अंगोळकर  सांगतात, ‘दरवर्षी आम्ही जवळपास २५ हजारपेक्षा जास्त रक्तपिशव्या गोळा करतो. यात रक्तपेढीमधे येऊन रक्तदान करणाऱ्यांची संख्या तशी कमी आहे. २५ हजारापैकी  साधारत तीन ते साडेतीन हजार पिशव्या इनहाऊस म्हणजे रक्तपेढीत येऊन रक्तदान केलेल्यांच्या असतात. तर उरलेल्या २२ हजार पिशव्या वेगवेगळ्या ठिकाणी भरलेल्या रक्तदान शिबिरांमधून जमा होतात.’ 

‘कोरोनामुळे २०२० मधे आम्ही १७ हजार पिशव्या गोळा करू शकलो. सात ते आठ हजार पिशव्यांची कमतरता राहिली. त्यातही मागच्या वर्षात ६ हजार पिशव्या तर दात्यांना वेळोवेळी रक्तपेढीत येण्याची विनंती करून जमवल्या. पण, २३२ शिबीरांमधून फक्त ११ हजार पिशव्याच जमा झाल्या. जवळपास ५० ट्क्के संकलन कमी झालं’ अशी माहिती अंगोळकर यांनी दिली.

नागरिकांनी पुढाकार घ्यावा

शिवाय, कोरोना वायरसची लागण झाल्यानंतरही २८ दिवसांपर्यंत रक्तदान करता येत नाही. त्यामुळे देशभरात रक्ताची कमतरता जाणवत होतीच. त्यातच आता लसीकरणाची भर पडणार आहे. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर २८ दिवसांपर्यंत रक्तदान करता येणार नाही, असं राष्ट्रीय रक्त संचरण परिषदेनं जाहीर केलंय.

‘क्वारंटाईनचे १४ दिवस आणि त्यानंतर २८ दिवस म्हणजे जवळपास कोरोनानंतर ४२ दिवस रक्तदान करता येत नाही. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही २८ दिवसांनी रक्तदान करून घ्यावं अशा सूचना आम्हाला सरकारकडून मिळाल्यात. शरीरात अँटीबॉडी तयार होण्यासाठी प्रत्येक लसीला वेळ लागतो. प्रत्येक लसीचे वेगवेगळे निकष असतात. टीटीचं इंजेक्शन घेतलं की १५ दिवस रक्तदान करता येत नाही,’ असं अंगोळकर म्हणाले.

कोरोनाच्या दोन लसीत आधी साधारण दोन महिन्यांचं अंतर असावं, असं केंद्र सरकारने सांगितलंय. त्यामुळे आता लस घेतल्यानंतर जवळपास तीन ते चार महिने कुणालाही रक्तदान करता येणार नाहीय. त्यामुळेच लस घेण्याआधी रक्तदान करावं, अशी विनवणी रक्तपेढ्यांकडून केली जातेय. नेहमीच्या दात्यांना बोलावणं, शारीरिक अंतर पाळून शिबीरांचं आयोजन करणं असे सगळे प्रयत्न केले जातायत. पण देशाचे नागरिक म्हणून आपण स्वतःहून पुढे येण्याची वेळ आहे.

हेही वाचा : कोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात?

आधी रक्तदान आणि मग लसीकरण

‘आपल्या रक्तदानामुळे कित्येक जणांचे प्राण वाचणार आहेत. त्यामुळे मनात कोणती भीती न ठेवता आपलं सामाजिक कर्तव्य लक्षात घेऊन, स्वतःहून पुढे येऊन आपल्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत रक्तदान करावं,’ अशी विनंती अंगोळकर यांनी केली आहे.
 
कणकण, सर्दी, खोकला नसेल तर लस घेण्याआधी शक्य त्या सगळ्यांनी रक्तदान करायला हवं. रक्तदानाला जाताना अर्थातच मास्क गरजेचा आहेत. पण त्यासोबतही काही काळजी घ्यावी लागेल. रक्तदान केल्यानंतर एक दिवस आराम करून अगदी दुसऱ्या दिवशी लगेचच लस घेता येईल. पण रक्तादानाला येण्याआधी काही गोष्टी पाळाव्या लागतील.

अंगोळकर सांगतात, ‘रक्तदान करायचं आहे त्याच्या आदल्या रात्री व्यवस्थित झोप घ्यायला हवी. आधी तीन ते चार दिवस भरपूर पाणी प्यायला हवं. शक्यतो सकाळी नाष्टा करून रक्तदानाला आलं तर ते दात्यासाठी सोयीचं पडतं. पण दुपारी येणार असाल तर जेवणानंतर तास दीड तासांनी रक्तदान करता येईल. पण रक्ताचं काम अन्नाचं पचन करणं असतं. ते मधेच थांबलं तर दात्याला उलट्या होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो सकाळच्या वेळेत रक्तदान करून जावं,’ अशा सूचना त्यांनी केल्यात.

लसीकरणानंतर रक्ताचा पुरवठा कमी पडू नये, यासाठी सगळ्याच रक्तपेढ्या भरपूर प्रयत्न करतायत. ‘आधी रक्तदान आणि मग लसीकरण’ हे ब्रीदवाक्यच त्यांनी स्वीकारलंय. पण आपणही आपली जबाबदारी ओळखून रक्तदानासाठी पुढे यायला हवं.

हेही वाचा : 

कोरोना वायरसच्या वेगवेगळ्या टेस्ट कोणत्या?

कोरोनाची लागण झालेल्याच्या संपर्कात आल्यावर काय करायचं?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!