...तर मी नक्कीच नोबेल स्वीकारला असता

२३ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


स्वीडिश अकादमीतर्फे देण्यात येणारा नोबेल पुरस्कार लेखक जाँ-पॉल सार्त्र यांनी नाकारला होता. या नकारामागची भूमिका त्यांनी १९६४ मधे आजच्याच दिवशी अकादमीला पत्र लिहून कळवली. आजही हे पत्र अनेक अर्थांनं औचित्याचं म्हणता येईल असं...

मला एक पुरस्कार देण्यात आला आणि तो मी नाकारला. एवढ्यापुरताच मुद्दा असताना त्याच्याकडं एखाद्या घोटाळ्यासारखं बघितलं जातंय, याचं मला खूप वाईट वाटतंय.

मला नोबेल पुरस्कार दिला जातोय, याबद्दल मला काहीही कळवण्यात आलं नव्हतं. १५ ऑक्टोबरला फ्रान्समधल्या ‘फिगारो लिट्रेरिया’त एका पत्रकाराचा लेख आला. त्यात साहित्याच्या नोबेलसाठी स्वीडिश अकादमी माझ्या नावाचा विचार करतेय, पण अजून नाव ठरलं नाही, असं म्हणण्यात आलं होतं. हे वाचून ही चर्चा इथंच थांबली पाहिजे म्हणून स्वीडिश अकादमीला एक पत्र लिहावं, असं मला वाटलं. दुसऱ्याच दिवशी मी तसं पत्र पाठवलंसुद्धा.

हे सगळं करताना मला माहीत नव्हतं, की नोबेल पुरस्कारासाठी संबंधित लेखकाची परवानगी घेतली जात नाही. स्वीडीश अकादमीनं एकदा निर्णय घेतला की, तो रद्द केला जात नाही, याची मला नंतर पूर्ण कल्पना आली.

नकारामागची दोन कारणं

अकादमीला लिहिलेल्या पत्रात मी एक गोष्ट स्पष्ट केलीय. माझ्या नकारामागं अकादमी किंवा नोबेल पुरस्काराशी संबंधित कुठल्याही घटनेचा काहीएक संबंध नाही. 

यात मी दोन कारणांचा उल्लेख केलाय. त्यातलं एक कारण वैयक्तिक तर दुसरं वस्तुनिष्ठ.

वैयक्तिकपैकी पहिलं कारण म्हणजे, माझ्या नकारामागं कुठलाही आवेश नाही. वैयक्तिक पातळीवर मी कुठलाही औपचारिक सन्मान नेहमीच नाकारत आलोय. युद्धानंतर १९४५ मधे मला ‘लिजन ऑफ ऑनर’ (Legion of Honor) हा सन्मान जाहीर झाला होता. तत्कालीन सरकारचा सहानुभूतीदार असूनही मी तो पुरस्कार नाकारला. अनेक मित्रांनी सुचवल्यानंतरही मी ‘कॉलेज द फ्रान्स’चा सदस्य झालो नाही.

या सगळया गोष्टींकडं बघण्याचा माझा एक स्वतंत्र दृष्टीकोन आहे. हा दृष्टीकोन लेखक वेळोवेळी जे धोके पत्करतो, त्यावर आधारलेला आहे. एखादा लेखक राजकीय, सामाजिक आणि साहित्यिक व्यासपीठांवर आपली भूमिका मांडतो, तेव्हा त्यानं स्वतःसाठी सर्वाधिक मुल्यवान असलेल्या माध्यमाचाच वापर केला पाहिजे. ते माध्यम म्हणजे ‘लिखित शब्द’! एखाद्या सन्मानामुळं त्याच्या वाचकांवर अनावश्यक दबाव येत असेल, तर ते धोक्याचं आहे. मी माझी सही जाँ-पॉल सार्त्र अशी करणं किंवा नोबेल विजेता जाँ-पॉल सार्त्र अशी करणं यात मोठाच फरक आहे.

लेखकानं अखंड सावध रहावं

खरंतर एखादा लेखक असे पुरस्कार स्वीकारतो, तेव्हा तो स्वतःचं रुपांतर निव्वळ एखाद्या संस्था किंवा संघटनेत करतो. व्हेनेझुएलाच्या क्रांतीकारकांबद्दल मला वाटणारा जिव्हाळा वैयक्तिक पातळीवरचा आहे. मात्र, मी नोबेल विजेता जाँ-पॉल सार्त्र म्हणून व्हेनेझुएलाच्या लढ्याकडं बघतो, तेव्हा ती सहानुभूती नोबेलच्या माध्यमातून एका संस्थेची बनते. एका लेखकानं अशा रूपांतरणाला नेहमीच विरोध करायला हवा. अगदी सन्मानानं घडत असलं तरी लेखकानं सावध राहायलं पाहिजे.
एखाद्या मुदद्यावर निर्णय घेण्याची माझी म्हणून एक पद्धत आहे. यात दुसऱ्या विजेत्यांना कमी लेखण्याचा कोणताच हेतू नाही. उलट, माझं भाग्य की अशा दिग्गजांशी माझी ओळख आहे. या सगळ्यांकडं मी आदरानं बघतो.

काही कारणं वस्तुनिष्ठ आहेत. जसं, की सांस्कृतिक आघाडीवर आज केवळ एकाच पद्धतीची लढाई शक्य आहे, असं मला वाटतं. ती म्हणजे दोन संस्कृतींच्या शांततापूर्ण सहअस्तित्वासाठीची लढाई. एकीकडं पूर्व तर दुसरीकडं पश्चिम. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही, की दोन्ही संस्कृतींनी गळ्यात गळे घालून वागावं. मला माहितीय, की त्यांचं स्वरुप परस्परविरोधी आहे. कितीही नाकारलं, तरी त्यांच्यात संघर्ष होणारच. पण हा संघर्ष व्यक्ती आणि संस्कृतीतला असून यामधे कुठल्याही संस्थेनं हस्तक्षेप करण्याची गरज नाही.

शेवटी सर्वोत्तम जिंकणार!

दोन संस्कृतीतल्या या विरोधाभासामुळं मी कमालीचा प्रभावित झालोय. अशाच विरोधाभासांमधून मीही घडलो. मी समाजवादाचा हितचिंतक आहे, हे नक्की! ही पूर्वेकडची संस्कृती म्हणून ओळखली जाते. मी एका पांढरपेशी (बुर्झ्वा) कुटुंबात आणि संस्कृतीत वाढलोय. या सगळ्यामुळेच मी दोन संस्कृतींच्या मिलापाचा प्रयत्न करू शकतो. आणि शेवटी मला वाटतं, की ‘जे सर्वोत्तम आहे, तेच जिंकेल.’ आणि ते सर्वोत्तम म्हणजे समाजवाद!

त्यामुळं एका विशिष्ट संस्कृतीचं प्रतिनिधीत्व करणारा पुरस्कार मी घेत नाही. मग तो पूर्वेच्या लोकांनी दिलेला असो की पश्चिमेच्या. मी समाजवादाचा हितचिंतक आहे म्हणून मला लेनिनच्या नावाचा पुरस्कार दिला, तरी तो मी घेणार नाही. दोन्ही गोष्टींचा परस्पर संबंध नसला तरी.

मला माहितीय की नोबेल हा काही पाश्चात्य गटाचा पुरस्कार नाही. पण मला हे नीट माहितीय की या पुरस्काराला मोठं करण्यामागं कोण आहे. एवढंच नाही, तर स्वीडिश अकादमीच्या चौकटीबाहेर या पुरस्काराला घेऊन जे राजकारण घडतंय, तेही मी जाणतो. त्यामुळं सध्याच्या परिस्थितीत एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे नोबेल पुरस्कार पूर्व आणि पश्चिमेत दरी निर्माण करण्यासाठी एकतर पश्चिमेकडच्या लेखकांना दिला जातो किंवा पूर्वेकडच्या बंडखोरांसाठी राखून ठेवला जातो.

मग नेरूदांना पुरस्कार द्यायचा ना!

उदाहरणच द्यायचं झालं, तर हा पुरस्कार कधीच पाब्लो नेरूदा यांना देण्यात आला नाही. नेरूदा हे दक्षिण अमेरिकेतले एक थोर कवी. शिवाय लुई अरागोन यांनाही हा पुरस्कार देण्याबाबत कुणी गांभीर्यानं विचार केला नाही. ते तर याचे प्रबळ दावेदार म्हणता येतील. शोलकोव यांच्याजागी पास्टरनक यांचा गौरव करणं, खरंच निराशाजनक आहे. शोककोव यांचं साहित्य परदेशात नावाजलं गेलं, मात्र मायदेशात रशियामधेच त्याच्यावर बंदी घालण्यात आली.

समतोल साधण्याचे प्रयत्न वेगळ्या प्रकारेही करता आले असते. अल्जेरियाच्या मुक्तीसंग्रामात आम्ही सगळ्यांनी ‘१२३ जाहीरनाम्या’वर सह्या केल्या. त्यावेळीच मला हा सन्मान मिळाला असता, तर मी तो मोठ्या कृतज्ञतेनं स्वीकारला असता. कारण, तो त्यावेळी माझा नाही, तर अख्ख्या मुक्तीसंग्राम लढ्याचा गौरव ठरला असता. मात्र, त्यावेळी असं काही झालं नाही.

स्वीडिश अकादमीनं मला नोबेल देताना कमीत कमी आपण ज्याला ‘स्वातंत्र्य’ म्हणतो त्या शब्दाचा तरी उल्लेख करायला हवा होता. पश्चिमेकडं हा शब्द केवळ वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संकल्पनेपुरता वापरला जातो. यामधे हवे तेवढे बूटाचे जोड वापरण्याचा आणि दुसऱ्याचंही अन्न हडप करण्याचा अधिकार मिळतो. शेवटी मला एकच वाटलं, की सन्मान नाकारण्यापेक्षा ते स्वीकारणंच जास्त धोक्याचं आहे. हा पुरस्कार स्वीकारणं म्हणजे जणू मी स्वतःच माझे संकल्प मोडीत काढणं.

वादग्रस्त राजकीय भूतकाळ

‘फिगारो लिट्रेरिया’तल्या लेखात एक मुद्दा होता. ‘माझा भूतकाळ राजकीयदृष्ट्या वादग्रस्त नाही.’ लेखातले मुद्दे म्हणजे काही स्वीडिश अकादमीचं मत नव्हतं. मला हेही माहितीय, की मी हा पुरस्कार स्वीकारला असता, तर उजव्या वर्तुळात याबद्दल काय काय वावड्या उठवल्या असत्या. बहुतांश लोक ‘वादग्रस्त राजकीय भूतकाळा’ला नाकं मुरडत असले, तरी मला त्यात काही वावगं वाटत नाही. भूतकाळात माझा एखादा कॉम्रेड चूकला असेल, तर त्याची कबूली मी कधीही देईन.

या सगळ्या गोष्टींचा कुणी असा अर्थ लावायला नको, की ‘नोबेल पुरस्कार’ मध्यमवर्गीय मानसिकतेनं प्रेरित आहे. पण काही लोक हे करतीलच. अर्थात, हे करणाऱ्या गटातटांना मी चांगलंच ओळखून आहे.

शेवटी काय, तर मला पुरस्कारासोबत मिळणाऱ्या रकमेबद्दल बोललं पाहिजे. स्वीडिश अकादमीकडून पुरस्कारासोबत विजेत्याला मोठी रक्कम दिली जाते. त्याखाली साहजिकच पुरस्कृत व्यक्ती दबून जाते. ही मला मोठीच अडचण वाटते. काहीजण ही रक्कम आपापल्या संस्था-आंदोलनांना देतात. किंवा एक तत्त्व म्हणून ती नाकारतातसुद्धा. पण माझ्या मते ही काही खरी अडचण नाही. पुरस्काराच्या रुपात मिळणाऱ्या २५०,००० क्राऊंसवर मी पाणी सोडू शकतो. मला स्वतःच रुपांतर एका संस्थेत होऊ द्याचं नाही, हे त्याचं कारण. यावर कुणी असं म्हणू शकतं, की ही केवळ माझे नसून यावर माझ्या विचारधारेसह सगळ्या कॉम्रेड्सचाही हक्क आहे. पणं असं म्हणण्याचा कुणालाच अधिकार नाही!
त्यामुळं पुस्कार घेणं किंवा नाकारणं, या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी वाईटच आहेत. 

शेवटी एवढं नक्की सांगतो, की मी स्वीडिश जनतेच्या भावनांचा आदर करतो. मी नेहमीच त्यांच्यासोबत आहे.