भाजप प्रवेशावेळी ज्योतिरादित्य शिंदे बोलले त्याचा अर्थ काय?

१२ मार्च २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


मध्य प्रदेशात काँग्रेसच्या सत्तेचं गणित बिघडवणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी शेवटी आज ११ मार्चला भाजपमधे प्रवेश केला. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर भाजपप्रवेशाची निव्वळ औपचारिकताच उरली होती. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीतल्या पक्षप्रवेशावेळी शिंदे यांनी राजीनाम्यामागचं कारण सांगितलंय. काँग्रेसवर, त्यांच्या नेतेमंडळीवर टीका केली. त्यांच्या या टीकेचा हा राजकीय अर्थ.

कालपर्यंत काँग्रेसमधले दिग्गज नेता म्हणून ओळखले जाणारे ज्योतिरादित्य शिंदे आज भाजपमधे गेलेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी दिल्लीत भाजपमधे प्रवेश केला. शिंदे यांनी मंगळवारी १० मार्च २०२० ला सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं पत्र शिंदे यांनी सोशल मीडियावर टाकत आपला राजीनामा जगजाहीर केला.

या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने शिंदे पहिल्यांदाच मीडियापुढं बोलले. आपलं मनोगत व्यक्त केली. पत्रकारांचे प्रश्न घेणं टाळलं. आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच ज्योतिरादित्य शिंदे यांनी नड्डा, मोदी आणि शाह यांचे आभार मानले. आणि आपल्या आयुष्यात दोन तारखांना खूप महत्त्व असल्याचं सांगितलं.

ते म्हणाले, 'आयुष्यात अनेक वळणं येतात ज्यामुळे व्यक्तीचं संपूर्ण आयुष्यचं बदलून जातं. माझ्या आयुष्यात असेच दोन दिवस आले. असा पहिला दिवस होता ३० सप्टेंबर २००१. या दिवशी माझ्यावरचं वडलांचं छत्र हरवलं. आणि दुसरा दिवस १० मार्च २०२०. या दिवशी माझ्या वडिलांचा ७५ वा वाढदिवस होता. याच दिवशी मी जीवनात नवं वळण घेण्याचा निर्णय घेतला.'

हेही वाचाः शंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला!

कोण हे शिंदे?

ज्योतिरादित्य हे गांधी घराण्याचे आणि अजून खोलात जाऊन सांगायचं तर राहुल गांधीचे एकदम खासमखास म्हणून ओळखले जायचे. अनेकदा तर राहुल गांधींना कुठं काय बोलायचे हे ज्योतिरादित्यच सांगतात, असंही म्हटलं गेलं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ज्योतिरादित्य यांचा गुणा मतदारसंघातून पराभव होईपर्यंत राहुल गांधी संसदेत ज्योतिरादित्य यांचा सल्ला घेताना दिसले होते.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दोन्ही मंत्रीमंडळात ते मंत्री राहिले. २००७ मधे शिंदे यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान खात्याचा कारभार होता. २००९ मधे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय देण्यात आलं. २०१४ मधे म्हणजे मनमोहन सरकारच्या अखेरच्या मंत्रीमंडळ विस्तारात शिंदेंना ऊर्जा मंत्री बनवण्यात आलं.

ज्योतिरादित्य यांचे वडील माधवराव शिंदे हे राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचे विश्वासू म्हणून ओळखले जायचे. गांधी घराण्यासोबतच्या याच कनेक्शनचा ज्योतिरादित्य यांनाही खूप फायदा झाला. १८ वर्षांपूर्वी २००२ मधे माधवरावांचा एका विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर गुणा मतदारसंघातली पोटनिवडणूक लढवत ज्योतिरादित्य हे राजकारणात आले. आणि बघताबघता काँग्रेसच्या टॉपच्या नेतेमंडळीत सामील झाले. वडलांसारखंच मुलगाही गांधी घराण्याचा विश्वासू झाला.

शिंदेंनी मोकळं व्हावं: नड्डा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सलग दुसऱ्यांदा दारूण पराभव झाला. त्यानंतर काँग्रेसमधे नवा अध्यक्ष नेमण्याची चर्चा सुरू झाली. तेव्हा ज्योतिरादित्य यांचं नावही त्यासाठी चर्चेत आलं. आता ज्योतिरादित्य यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. त्यामुळेच ज्योतिरादित्य आता नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

वीसेक मिनिटांच्या या पक्षप्रवेशाच्या आजच्या कार्यक्रमात १५ मिनिटं नड्डा आणि शिंदे यांनी भूमिका, मनोगत मांडलं. शिंदे यांच्या पक्षप्रवेशाविषयी बोलताना नड्डा म्हणाले,  ‘पक्षासाठी राजमाता विजयाराजे शिंदे यांचं योगदान मोलाचं आहे. त्यांनी पक्षाला दिशा दिली. जनसंघ आणि नंतर भाजपसाठी अविरत योगदान दिलं.’ 

‘आमच्यासाठी आजचा दिवस मोलाचा आहे. त्यांच्या नेतृत्वाची आम्हाला कल्पना आहे. त्यांचं पक्षात मनापासून स्वागत. भारतीय जनता पक्षाच्या मुख्य प्रवाहात काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल याची खात्री वाटते. भाजप हा लोकशाही मूल्यं जपणारा पक्ष आहे,’ अशा शब्दांत जेपी नड्डा यांनी शिंदेंचं स्वागत केलं. तसंच इथल्या मोकळ्या वातावरणात मोकळं व्हावं, असं म्हणत शिंदेंकडे माईक दिला.

हेही वाचाः कमलनाथः इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा

‘आजची काँग्रेस पूर्वीसारखी नाही’

मीडियासमोर आपलं मनोगत व्यक्त करताना शिंदे म्हणाले, ‘आपलं लक्ष्य हे जनसेवा असायला हवं, असं मी नेहमीच म्हणत आलोय. राजकारण हे जनसेवेसाठी असलं पाहिजे. मी आणि माझ्या वडलांनी काँग्रेस पक्षात राहून देश आणि राज्याच्या सेवेसाठी नेहमीच प्रयत्न केलेत. पण मी आज एक गोष्ट सांगू शकतो. ती म्हणजे आज या पक्षासोबत राहून जनसेवेचं हे व्रत पूर्ण होऊ शकत नाही. तसंच आजची काँग्रेस ही पूर्वीसारखी राहिली नाही.’

मध्य प्रदेश सरकारला भ्रष्टाचारानं ग्रासलंय, असा आरोप करतानाच शिंदेंनी 'काँग्रेसमधे नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही' असा आरोपही केला. आज निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मन दु:खी आहे. जनसेवेचं लक्ष्य आज काँग्रेसकडून पूर्ण होऊ शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं.

‘काम करणं अवघड झालंय’

शिंदे म्हणाले, ‘२०१८ मधे मध्य प्रदेशात सत्ता आली तेव्हा आम्ही एक स्वप्नं पाहिलं होतं. पण १८ महिन्यात सगळी स्वप्नं धुळीस मिळालीत. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं अजूनही पूर्ण करू शकलो नाही. शेतकऱ्यांची कर्ज नीट माफ झाली नाहीत. अवकाळी पावसाची नुकसानभरपाई मिळालेली नाही. मंदसौर इथे शेतकऱ्यांवरच्या गोळीबार प्रकरणात मी सत्याग्रह केला होता. राज्यातली तरुणाई अस्वस्थ आहे. जाहीरनाम्यात तरुणांना भत्ता देण्यात येईल, असं सांगण्यात आलं होतं. भ्रष्टाचार, रेतीमाफिया फोफावलेत.’

‘वास्तवाला नाकारणं, नव्या विचारांना जागा न देणं, नव्या नेतृत्वाला मान्यता न मिळणं या वातावरणात काम करणं अवघड बनलंय. राष्ट्रीय स्तरावर हीच स्थिती आहे. तीच स्थिती माझ्या राज्यात मध्य प्रदेशात आहे.’

आपल्या ११ मिनिटांच्या मनोगतात शिंदे यांनी मध्य प्रदेशातलं कमलनाथ सरकार, काँग्रेस पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलले. मध्य प्रदेश सरकार आणि काँग्रेस पार्टीबद्दल बोलताना त्यांनी कुणाचंही नाव घेणं टाळलं. तसंच कोणतेही टोकाचे आरोप केले नाहीत. गांधी घराण्याचा एवढा विश्वासू माणूस भाजपमधे येऊन आता काँग्रेसची पोलखोल करेल ही शक्यता ज्योतिरादित्य यांनी फोल ठरवली.

हेही वाचा : भोपाळमधे लागणार सॉफ्ट हिंदुत्व विरुद्ध हार्ड हिंदुत्वाचा निकाल

‘मोदींच्या हाती देश सुरक्षित’

भाजपबद्दल बोलताना शिंदे म्हणाले, ‘राज्य पातळीवर वेगळीचं शोकांतिका आहे, तर देशातच्या पातळीवरही अजून वेगळी परिस्थिती आहे. आज भारत माता आणि देशाला पुढं न्यायचंय. आणि अमित शाह, पीएम मोदी आणि जेपी नड्डा यांनी मला ती संधी दिली, हे मी माझं भाग्य समजतो. पंतप्रधान मोदींना २०१९ मधे मिळालेला जनादेश ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. पीएम मोदी यांच्यामधे योजना राबवण्याची अद्भूत क्षमता आहे. भाजपसोबत काम करायला मी उत्सुक आहे.’

‘देशाच्या इतिहासात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेला जनादेश आजवर कुणालाही मिळालेला नाही. भारताचं भविष्य नरेंद्र मोदींच्या हाती सुरक्षित आहे. त्यांनी भारताचं नाव जगात पोचवलं. मोदींनी मला देशाची सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांचे आभार.’

काँग्रेस पूर्वीसारखी राहिली नाही असं म्हणताना पूर्वी काँग्रेस कशी होती हे त्यांनी सांगितलं नाही. तसंच भाजपमधे प्रवेश कशासाठी केला हेही सांगितलं नाही. महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीबद्दलही एकही शब्द बोलले नाहीत. जे काही बोलले ते पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलले. त्यांना मिळालेल्या जनादेशाबद्दल बोलले. भाजप प्रवेशानंतर तीनेक तासांतच ज्योतिरादित्य शिंदे यांना राज्यसभेचं तिकीट देण्याची घोषणा झाली.

दुसरीकडे काहीतरी टीआरपीवाला मसाला मिळेल या अपेक्षेनं आलेल्या मीडियाची पंचाईत झाली. त्यामुळे मीडियाला दिवसभर मध्य प्रदेशातलं कमलनाथ सरकार पडेल की टिकेल याविषयीच्याच घडामोडी दाखवाव्या लागल्या.

हेही वाचा : 

रश्मी ठाकरेः श्रद्धा, सबुरी आणि बरंच काही

महापोर्टलचा महाव्यापम घोटाळा सुनियोजित होता?

आपले आमदार महिलांविषयी सात तास काय बोलत होते? 

दिल्लीवाली आतिशी: सावित्रीमाईलाही वाटलं असतं हीच माझी लेक