शंभूराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत?

१९ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ८ मिनिटं


शिवाजी महाराजांप्रमाणेच आता संभाजी राजांच्या कर्तृत्वाबद्दलही बरंच बोललं जातंय. झी मराठीवर सुरू असलेल्या 'स्वराज्य रक्षक संभाजी' सिरियलमधेही आता संभाजीराजांच्या अटकेचा भाग सुरू आहे. पण सगळ्यांमधे एक गोष्ट मिसिंग आहे. ती म्हणजे, शंभूराजांना संगमेश्वरवरून अहमदनगरला नेलं जात असताना दीड महिन्यांच्या काळात त्यांची सुटका करण्याऐवजी मराठी सैन्य काय करत होतं?

इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने मुद्दाम मौन बाळगलेलं असतं. पण खरंतर या मौनातच उत्तरंही दडलेली असतात. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मराठी इतिहास असाच मौन पाळून बसलाय. मुकर्रबखानाने १ फेब्रुवारी १६८९ ला संगमेश्वरमधे बेसावध संभाजीराजांना पकडलं आणि ११ मार्च १६८९ ला संभाजीराजांची हत्या झाली.

पण १ फेब्रुवारी ते ११ मार्च या काळात मराठे नेमकं काय करत होते? या प्रश्नाचं उत्तर शोधताना ढोबळ आणि संक्षिप्त माहितीशिवाय हाती काहीही लागत नाही. एका सार्वभौम राजाची अटक ते निघृण हत्या घडल्याची अपवादात्मक घटना इतिहासात घडलीय.

राजाराम महाराजांना गादीवर बसवणं आक्षेपार्ह

शिवाजी महाराजांचा ३ एप्रिलला मृत्यू झाल्यानंतर संभाजी महाराजांना पन्हाळगडावरच कैद करण्याची रायगडावरच्या मुत्सद्यांची योजना होती. पण ती यशस्वी झाली नाही. शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी शंभूराजांना देण्यात आली नाही. शिवाजी महाराजांचे अंत्यसंस्कारही परस्पर उरकले. राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा म्हणजेच मंचकारोहणाचा कार्यक्रमही झाला. १८ जूनला शंभूराजे रायगडावर आले. कार्यभार हाती घेत त्यांनी राजारामास प्रथम नजरकैदेत टाकलं. मोरोपंत, अण्णाजी आणि अन्य अनेक मंत्र्यांनाही कैदेत टाकलं.

सत्तासंघर्षातला एक अपरिहार्य भाग म्हणून याकडे पाहता येतं. संभाजीराजांच्या अनुपस्थितीत राजाराम महाराजांचं मंचकारोहण हेच मुळात आक्षेपार्ह आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता तेव्हाच संभाजी महाराजांचा युवराज्याभिषेक केला गेला होता. त्यामुळे तेच स्वराज्याचे उत्तराधिकारी होते. असं असतानाही राजारामांचा मंचकारोहण समारंभ होतो.

संभाजी महाराजांना अगदी पित्याच्या मृत्यूची खबरही लागू न देता परस्पर राजाराम महाराजांचा मंचकारोहण समारंभ उरकला जातो. संभाजी महाराज छत्रपती असू नयेत असं मानणारा मोठा गट अस्तित्वात होता असाच याचा अर्थ होतो. दुर्दैवाने हा गट नंतरही कार्यरत राहिला.

हेही वाचा : राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याचा आधारवड

शंभूराजांच्या अटकेनंतर लगेचच राजाराम नवे राजे

रियासतीनुसार, १ फेब्रुवारी १६८९ ला छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशास शेख निजाम यांना संगमेश्वर जवळच्या खटोले गावी पकडण्यात आलं. त्यानंतर लगेचच आठ दिवसांत म्हणजे ९ फेब्रुवारीला रायगडावर राजाराम महाराजांचं मंचकारोहण झालं. १५ फेब्रुवारीला शेख निजाम याने संभाजी महाराजांना अहमदनगरमधल्या बहादुरगडावर औरंगजेबासमोर उपस्थित केलं. 

११ मार्च १६८९ ला कोरेगावच्या छावणीत संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली. २५ मार्चला झुल्फिकार खानाने रायगडाला वेढा घातला. ५ एप्रिलला राजाराम महाराज रायगड सोडून प्रतापगडाकडे रवाना झाले. पुढे ऑगस्ट १६८९ मधे ते प्रतापगड सोडून पन्हाळ्याच्या किल्ल्यावर गेले. 

संभाजी महाराजांविषयी जेधे शकावली आणि करिनामधेही काहीसा असाच घटनाक्रम दिसतो. या घटनाक्रमांवरून ठळक नजरेत भरणारी गोष्ट म्हणजे इकडे संभाजी महाराज अटकेत पडले होते. असं असतानाही मंत्री आणि अन्य सरदारांनी नजरकैदेत असलेल्या राजाराम महाराजांची तात्काळ सुटका करुन ९ फेब्रुवारी रोजी त्यांचं मंचकारोहण केलं. राजाराम महाराज हा नवा राजा असा मंचकारोहणाचा सरळ अर्थ होतो.

शंभूराजांना वाचवण्याचा हुकूम का दिला नाही?

संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा राजाराम महाराजांना नवा राजा म्हणून घोषित करण्यात मंत्र्यांना आणि सरदारांना रस होता. राजाराम महाराजांनी सिंहासनावर बसताच येसाजी आणि सिदोजी फर्जंद या संभाजी महाराजांच्या समर्थकांचा कडेलोट करण्यात आला.

हे सगळं चालू असताना संभाजी महाराज हयात होते. कैदेत असले तरी औरंगजेबाच्या गोटात त्यांना पोचवण्यात आलं नव्हतं. संगमेश्वर ते अकलुज या मार्गावरून ते अहमदनगरला जात असतानाच हे सगळं चाललं होतं. यावेळी मुकर्रबखानाकडे फक्त तीन हजार सैनिकांची सेना होती. तो संभाजी महाराजांना घेऊन मराठ्यांच्या मुलुखातूनच चालला होता. रायगडावर मात्र धामधुम होती ती संभाजी महाराजांचे विश्वासू अधिकारी संपवायची आणि संभाजी महाराजांनी कैदेत टाकलं होतं त्यांना सोडवायची.

९ दिवसांत राज्यकारभाराचा, कडेलोटाचा निर्णय पटापट घेणाऱ्या राजाराम महाराजांनी संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी सरदारांना कसलाही हुकूम दिला नाही. त्याची कसलीही नोंद नाही. झुल्फिकारखानाचा रायगडास वेढा पडण्यापूर्वीच संभाजी महाराजांची हत्या झाली होती. त्यामुळे मुघलांच्या कोकणातल्या प्राबल्यामुळे मराठ्यांना हालचाल करायला अवधी मिळाला नाही, असं म्हणण्यात काही तथ्य नाही.

युद्ध नाही तर तहाचा मार्ग?

दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मुकर्रबखान संभाजी महाराजांना घेऊन औरंगजेबाकडे निघाला होता. तेव्हा वाटेत सह्याद्रीच्या रांगांतले अनेक किल्ले मराठ्यांकडे होते. प्रत्येक किल्ल्यावर सैन्य होतं. हा प्रदेश मराठ्यांच्या पायतळी भिनलेला. मराठे गनिमी काव्यासाठी प्रसिद्ध. तरीही संगमेश्वर ते घाटमाथा या वाटेत मराठ्यांनी संभाजी राजांच्या सुटकेसाठी मुकर्रबखानावर एकही हल्ला चढवला नाही?

एक-दोन अयशस्वी हल्ल्यांचे दावे केले जातात. पण त्याला एकाही पुराव्याचा आधार आजतागायत मिळालेला नाही. शिवकाळापासून असे अनेक अनपेक्षित प्रसंग मराठ्यांनी अनुभवले होते. खुद्द शंभूकाळातही मराठ्यांनी अनेक तातडीच्या मोहिमा करुन शत्रूला माती चारली होती. त्यामुळे शंभूराजांच्या अटकेमुळे मराठ्यांची मती गुंग झाल्याने त्यांना काही सुचेना झाले या दाव्यात अर्थ नाही. संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी मराठ्यांची मती गुंग झाली होती आणि राजारामांचा मंचकारोहण समारंभ लगेच उरकरायची मती मात्र होती!

समजा मराठ्यांना युद्ध करुन संभाजी राजांना सोडवणं अशक्य होतं. पण तरीही तडजोडीचा मार्ग उपलब्ध होता. ‘सर्वनाशे समुत्पन्ने’ हा शिवरायांनी जयसिंगाच्या वेळी घालून दिलेला आदर्श मावळ्यांसमोर होताच. शंभूराजेही कदाचित तोच मार्ग अवलंबत काव्याने आपली सुटका करुन घेऊ शकत होते. पण तहाची बोलणी ते कुणाच्या जीवावर करणार होते?

९ फेब्रुवारीला राजाराम महाराज स्वत:च सत्ताधीश बनल्यामुळे औरंगजेबाशी तह करण्याचा अधिकार सरळ राजाराम महाराजांकडे आला होता. संभाजी महाराज राजेच नसल्याने त्यांच्या हाती काहीच उरलं नव्हतं. शंभूराजे राजेच नव्हते तर स्वत:साठी किंवा स्वराज्यासाठी ते काय बोलणी करणार आणि केली तरी औरंगजेब काय ऐकून घेणार?

हेही वाचा : लोकशाही मुल्यांमुळेच रयतेला शिवशाही हवीहवीशी

महाराजांकडे एवढं अल्प सैन्य कसं?

औरंगजेबाचं हेरखातं प्रबळ होतं. मराठ्यांच्या गोटातली सगळी माहिती त्याच्याकडे असायची. काही मराठा सरदारही त्याचे हेर म्हणून काम करत होते. संभाजी महाराजांच्या अटकेआधी रायगडावरून संभाजी महाराज शिर्क्यांसोबतचा तंटा मिटवायला गेलेत ही बातमी त्याला फारच वेगाने समजली असणार.

औरंगजेब संभाजी महाराजांच्या हालचालींची प्रत्येक खबर ठेवत होता. जेधे शकावलीनुसार खेम सावंत, शिर्के, नागोजी माने इत्यादी मंडळी औरंगजेबाला सामील झाली होती आणि तेच संभाजी महाराजांची वित्तंबातमी औरंगजेबाला पुरवत होते.

साधारण १ फेब्रुवारीला किंवा त्याच्या तीन दिवस आधी खेळणा किल्ल्यावरून शंभूराजे संगमेश्वराला पोचले. उपलब्ध माहितीनुसार त्यांच्या सोबत ४०० ते ५०० भालाईत होते. मुकर्रबखान अवघ्या ६०-७० मैलांवर कोल्हापुरात आहे हे संभाजी महाराजांना माहीत असावं. पण तरीही एवढ्या अल्प सैन्यासह ते कसे आले हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मुघल इथपर्यंत येणार नाहीत एवढे गाफिल संभाजी महाराज राहतील असं वाटत नाही. शिवाजी महाराजांच्या निधनापासून अनेक कटकारस्थानांचा त्यांना सामना करावा लागला होता.

कोकणात महाराजांचे शत्रू कमी नव्हते. अचानक हल्ला कुठुनही आणि कुणाकडूनही झाला असता. त्यात त्यांच्यासोबत फक्त भालाईतांची तुकडी होती. मोठ्या लढाईला त्याचा काही उपयोग नाही. त्यांच्यासोबत सरसेनापती म्हाळोजी आणि संताजी घोरपडे हे पितापुत्र आणि खंडोजी बल्लाळही होते. मग सोबत सैन्य कमी ठेवण्याचा निर्णय कोणाचा होता? स्वत: राजांचा की सेनापतींचा?

मुकर्रबखानाला अडवण्याचा प्रयत्न कुणी केला?

मुकर्रबखान आज्ञा मिळताच पन्हाळ्यावरून संगमेश्वरला एक हजार पायदळ आणि दोन हजार घोडदळ घेऊन निघाला. मुकर्रबखानाने एवढं सैन्य घेऊन १२२ किमी अंतर तीन दिवसांत पूर्ण केलं. मुकर्रबखानाच्या वेगाला दाद दिली पाहिजे. पण या अंतरात कित्येक मराठी किल्ले होते. पण त्याला अडवण्याचा प्रयत्न कुठेच झाला नाही?

एवढं सैन्य कुठेतरी चालून जातंय हे मराठ्यांच्या एरवी तरबेज मानल्या गेलेल्या हेरखात्याला तर सोडा पण सामान्य गावकऱ्यांच्याही लक्षात आलं नाही? कितीही आडवळणाच्या बिकट मार्गाने मुकर्रबखान संगमेश्वरपर्यंत पोचला असला तरी कुणाच्याही लक्षात कसं आलं नाही? शंभूराजांना सावध केलं जात नाही याचा अर्थ काय होतो?

पळून जाणं आधीच ठरलं होतं!

मुकर्रबखानाने संभाजी महाराजांच्या तळावर अचानक हल्ला चढवला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे राजांचे अल्पसे सैन्य फारसा प्रतिकार करू शकलं नाही. आता संभाजी महाराज मद्याच्या किंवा कवी कलशाच्या अनुष्ठानाच्या नादात पकडले गेले हे बखरकारांचं म्हणणं मान्य करताच येत नाही. मुकर्रबखान एवढ्याजवळ आलाय ही माहिती सेनानींना, भालाईतांनाही कशी कळाली नाही?

दुसरी बाब अशी की राजांच्या सैन्याने कितपत प्रखर प्रतिकार केला? एकंदरीत उपलब्ध माहितीवरून कसलाही प्रतिकार झाल्याचं दिसत नाही. राजांचे सैनिक लगोलग पळून गेल्याचं दिसतं. अगदी संताजीसारखा पुढे नांवारुपाला आलेला योद्धाही पळून गेला. सारं सैन्य डोळ्यादेखत पळून गेल्यावर संभाजी राजे हतबल झाले असणं स्वाभाविक होतं.

मुकर्रबखानाच्या इखलासखान या मुलाने संभाजीराजांना हवेलीत घुसून पकडलं. केस धरून ओढत महाराजांना मुकर्रबखानासमोर आणलं गेलं अशी माहिती तिथं हजर असलेला लेखक साकी मुस्तैदखान देतो. म्हणजे संभाजी राजांच्या रक्षणाचा, त्यांना लगोलग सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा कसलाही प्रयत्न केला गेला नाही. मग पळून जायचं आधीच ठरलं होतं की काय?

हेही वाचा : शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?

राजारामांसोबत येसूबाई आणि शाहूराजे का नाही निसटले?

संभाजी महाराज पकडले जावेत हीच सरदार आणि मंत्र्यांची इच्छा होती. म्हणून हा घटनाक्रम घडवण्यात आला असं समजायला बराच वाव आहे. घटकाभर मान्य केलं की संभाजी महाराज नशेच्या अंमलामुळे बेसावध राहिले. पण त्यांचं हेरखातं किंवा सरदार किंवा अगदी भालाईतही अचानक हल्ला होईपर्यंत बेसावध होते, असं मुळीच म्हणता येत नाही.

राजाराम महाराजांनी तात्काळ सिंहासनावर बसणं, अधिकार वापरायला सुरवात करणं पण संभाजी राजांच्या सुटकेसाठी एकही युद्धाची आज्ञा जारी न करणं, औरंगजेबाकडे एकही मुत्सद्दी आणि वकील तडजोड किंवा तहासाठी न पाठवणं या गोष्टी काय सुचवतात? 

राजाराम महाराज झुल्फिकारखानच्या वेढ्यातुन निसटतात. पण महाराणी येसूबाईं आणि शाहू महाराज मात्र झुल्फिकारखानाने रायगड जिंकल्यावर ३ नोव्हेंबरपर्यंत रायगडावरच अडकुन पडतात आणि शेवटी मुघलांचे कैदी होतात. राजाराम महाराजांप्रमाणे त्यांना  किल्ल्याबाहेर काढलं जात नाही किंवा तसा एकही प्रयत्न होत नाही याचाही अर्थ कसा लावायचा?

संभाजी महाराज प्रजेत अप्रिय होते?

संभाजी महाराज आणि कवी कलश प्रजेत अप्रिय होते म्हणून मराठ्यांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला नाही, अशा मतितार्थाचं एक वाक्य १८८५ च्या ग्यॅझेटर ऑफ बोम्बे - पूना या पुस्तकात दिलंय. अलीकडच्या इतिहासकारांना हे सहसा मान्य होणार नाही. संभाजी महाराज हे प्रजाहितदक्ष होते आणि अगदी संगमेश्वरीही त्यांनी निवाडे केल्याचे सज्जड पुरावे आहेत. संभाजी महाराजांच्या नैतिक वर्तनावरही उभी केली गेलेली प्रश्नचिन्हे आता समाजमनातून पुसली गेलीयत. त्यामुळे संभाजी महाराज प्रजेत अप्रिय असतील असं वाटत नाही. मग असं का?

राजाराम महाराजांचे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर काही काळातच मंचकारोहण झाले होते. त्यावेळी अनेक सरदारांचा त्यांना पाठिंबा होता, असं म्हणता येतं. त्यावेळी राजारामांचं वय अवघं दहा वर्ष होते. ते त्यामुळे आपल्या मर्जीत राहतील असा कयास मुत्सद्दी आणि सरदारांचा असू शकेल. मराठा सरदारांना जहागिरदारी किंवा वतनदारीचे पुनरुज्जीवन हवे होते, त्यासाठी ते राजारामांच्या गोटात गेले की अन्यही कारणे होती?

शंभूराजे पकडले गेले तेंव्हा राजारामांचे वय होते १९ वर्ष. म्हणजे ते स्वतंत्र निर्णय घेण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचले होते. सर्वांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कल आपल्या बाजूने आहे हे समजल्यावर कोणताही राजकीय मुत्सद्दी जी हालचाल करील तीच त्यांनी केली असली तर नवल नाही. संभाजी महाराज विषप्रयोग करुनही मारले गेले नाहीत म्हटल्यावर संधीची वाट पहात त्यांना संपवणं हेच कटकर्त्यांचं ध्येय असणार हे उघड आहे.

आपली सुटका होणार नाही हे शंभूराजांना कळालं होतं?

शंभूराजांना मारण्याची आयती संधी त्यांना औरंगजेब आणि शिर्क्यांमुळे मिळाली. राजाराम महाराजांना हा कट माहीत नसेल का? किंबहुना त्याला मूक संमती असेल का? नसती तर मंचकारोहण होताच त्यांचे राजादेश वेगळे झाले नसते का? १ फेब्रुवारी ते ११ मार्च एवढा काळ हाती असतांना सर्व मराठी फौजा एकत्र होत विविध बाजुंनी औरंगजेबाच्याही छावणीवर हल्ला चढवू शकत होत्या. संताजी-धनाजी यांनी नंतरच्या काळात तसे यशस्वीरित्या करुन दाखवलंच आहे. 

पण एकूण घटनांवरून संभाजी राजांची अटक आणि हत्या ही गोष्ट मराठ्यांनी अत्यंत सहज घेतल्याचं दिसतं. संभाजी महाराजांच्या क्रूर हत्त्येने समग्र मराठे पेटून उठले आणि स्वातंत्र्याचा लढा सुरू  केला या आपल्याला हव्याशा वाटणाऱ्या मतांनाही अर्थ नाही. कारण राजाराम महाराज सुरक्षितपणे जिंजीला पोचेपर्यंत औरंगजेबाशी मराठ्यांनी लढा सुरू केला नाही. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर तब्बल एक वर्षांनी म्हणजे मार्च १६९० मधे संताजी-धनाजीने हा लढा सुरू केला.

आपल्याला सगळ्यांनी त्यागल्याचं संभाजी महाराजांना अटकेच्या काही दिवसांतच समजून आलं असावं. म्हणूनच ते मृत्युला धीरोदात्तपणे सामोरे जायला सज्ज झाले. कोणाला प्रिय वाटो किंवा अप्रिय, एक निधड्या छातीचा मनसोक्त जीवन जगत अतीव धैर्याने मृत्यूला सामोरा जाणारा असा पुरुष झालेला नाही.

हेही वाचा : 

शिवरायांच्या डच चित्राच्या दंतकथांचा पर्दाफाश

तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?

या शिवजयंतीला प्रबोधनकारांचा `दगलबाज शिवाजी` वाचायलाच हवा

अफजलखानाचा कोथळा काढला यात दगलबाज शिवरायाचं काय चुकलं?

(संजय सोनवणी हे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आहेत. हा मूळ लेख त्यांच्या ब्लॉगवर उपलब्ध आहे. )