पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित करताना एका संकटाचा उल्लेख केला. भारतीयांनीच नव्या शतकाच्या सुरवातीला उद्भवलेल्या Y2K संकटातून जगाला बाहेर काढलं, असं पंतप्रधान म्हणाले. पण साऱ्या जगाचं झोप उडवलेलं हे संकट अस्तित्वातच नव्हतं, असं १ जानवारी २००० च्या सकाळी कळालं. आणि इथूनच जगात फेक न्यूजला सुरवात झाली. या फेक संकटाची आणि माणसांच्या फसवणुकीची ही कहाणी.
कोरोना संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी १२ मेला एका आर्थिक पॅकेजची घोषणा केली. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत २० लाख कोटी रुपयांचे हे पॅकेज जाहीर करण्यात आलं. कोरोनामुळं साऱ्या जगात उलथापालथ झालीय. या उलथापालथीत भारताला मोठी संधी आहे. भारत या संकटात जगाला मार्ग दाखवेल, असं सांगत पंतप्रधानांनी वायटूके संकटाचा उल्लेख केला. नवं शतक सुरू झाले तेव्हा साऱ्या जगाला वायटूकेनं संकटात टाकलं होतं. तेव्हा भारतीय इंजिनिअर्सनीच जगाला या संकाटातून बाहेर काढलं, असा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला.
पण पंतप्रधानांनी उल्लेख केलेलं हे संकट म्हणजे, अगा जे जहालेची नाही, या प्रकारात मोडणारं आहे. एका अफवेतून या संकटाची हवा तयार झाली आणि वायटूकेनं साऱ्या जगाला डोक्यावर घेतलं. या सर्व प्रकारावर रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार आणि एनडीटीवी इंडियाचे मॅनेजिंग एडिटर रवीश कुमार यांनी प्रकाश टाकलाय. त्यांनी आपल्या लेखवजा फेसबूक पोस्टमधे वायटूके संकट आणि त्यामगचं पॉलिटिक्स उलगडून दाखवलंय. मूळ हिंदीत असलेल्या त्या पोस्टचा मराठी अनुवाद इथे देत आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ मेला देशाला संबोधित करताना म्हणाले, ‘या शतकाच्या सुरवातीला जगात Y2K संकट आलं होतं. तेव्हा भारताच्या इंजिनिअर्सनी त्या संकटातून मार्ग काढला होता.’ पंतप्रधानांनी कळत-नकळतपणे कोरोना संकटाच्या वैश्विकतेची तुलना Y2K सारख्या एका बनावटी संकटाशी तुलना केली. एका अशा संकटाशी जे संकटच नव्हतं, असं नंतर कळालं. ज्यांनी याबद्दल ऐकलंय ते लोक आता याची सारी कहाणी विसलेत. आणि १ जानेवारी २००० नंतर जन्मलेल्या लोकांना कदाचित याबद्दल माहीत नसेल. Y2K म्हणजे YEAR 2000.
हेही वाचा : रघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन
Y2K ही या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज होती. ही फेकन्यूज पेरण्यात मीडियाच्या अनेक बड्या प्लॅटफॉर्म्सनी महत्त्वाची भूमिका निभावली. याच्या विळख्यात सापडून जगभरातल्या सरकारांनी जवळपास ६०० अब्ज डॉलरहून अधिक रकमेची नासाडी केली. या रकमेचा आकडा पत्रकारांनी आपापल्या हिशोबानं वेगवेगळा दिलाय. कुणी ८०० अब्ज म्हटलं, तर कुणी ४०० अब्ज लिहिलंय.
तेव्हा फेकन्यूज ही गोष्ट चलनात नव्हती. आत्ता आपण ज्याला फेकन्यूज म्हणून ओळखतो, त्याला तेव्हा हॉक्स म्हणजे अफवा म्हटलं जायचं. Y2K संकटावर ब्रिटीश पत्रकार निक डेविस यांनी अनेक गोष्टींचा शोध घेऊन एक चांगलं पुस्तक लिहिलीय. फ्लॅट अर्थ न्यूज असं या पुस्तकाचं नाव असून ते २००८ मधे बाजारात आलं होतं.
Y2K ला मिलेनियम बग म्हटलं गेलं. अफवा पसरली की मिलेनियम बगमुळे ३१ डिसेंर २००० च्या रात्री १२ वाजता कॉम्प्यटरची गणना आपोआप शून्यामधे बदलेल. आणि मग जगभरातल्या कॉम्प्युटरवर चालणाऱ्या गोष्टींवर कंट्रोल सुटेल. त्या अनियंत्रित होतील. दवाखान्यातले पेशंट मरून जातील. घरातली लाईट जाईल. अणूऊर्जा केंद्रात स्फोट होईल. आकाशात उडत असलेल्या विमानांचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटेल आणि अपघात होतील. मिसाईल आपोआप सुरू होतील. अमेरिकेनं तर आपल्या नागरिकांसाठी प्रवास सूचना जारी केल्या होत्या.
भारतातल्या हिंदी चॅनेलमधे अशीच एक अफवा पसरली होती, की जग २०१२ मधे संपेल. असं काही झालं नाही. पण लोकांना काळजीत टाकून चॅनल्सनी टीआरपी जमवला आणि भरपूर कमाई केली. याची किंमत मात्र पत्रकारितेला चुकवावी लागली. तेव्हापासून हिंदी टीवी पत्रकारितेचा गाडा पटरीवरून घसरायला सुरवात झाली. मंकी मॅनचं संकटही टीवी चॅनल्सनीच पेरलेलं होतं. कैरानाचं काश्मीर होईल, अशी फेक न्यूजही पेरली होती.
अनेक सरकारांनी Y2K संकटाशी लढण्यासाठी टास्क फोर्सचीही स्थापना केली. भारतानंही तसं केलं. आऊटलूक मॅगझिनमधल्या स्टोरीनुसार, भारतानं १८०० कोटी रुपये खर्च केले होते. Y2K वर अनेक पुस्तकं आली आणि ती बेस्ट सेलर झाली. या संकटाला भिडण्यासाठी मोठमोठ्या कंपन्यांनी बनावट कंपन्या तयार केल्या आणि सॉफ्टवेअर किट विकून बक्कळ कमाई केली. नंतर कळालं की असं काही संकट नव्हतं. मग या कंपन्यांनी कशाचं सोल्यूशन दिलं?
भारतातल्या सॉफ्टवेअर कंपन्यांनी काही या संकटावर उत्तर शोधून काढलं नव्हतं. तर या अफवेच्या जोरावर बाजारातून पैसा कमावला. जसं जगातल्या अनेक कंपन्यांना फेक आजाराची खोटारडी औषधं विकून पैसे कमावता. गंडा, ताविज विकून पैसे कमावतात, तसाच हा प्रकार आहे. बेस्ट सेलर पुस्तकं लिहून लेखकांनी पैसे कमावले होते. मीडियाही एका बातमीच्या आसपास तयार झालेल्या गर्दीच्या कचाट्यात सापडला. आणि सत्याचा खुराक देण्याऐवजी खोटारडेपणाचा चारा देऊ लागले. कारण गर्दी कायम आपल्या बातम्यांच्या कचाट्यात राहील म्हणून.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?
किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण
कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट
कोरोनापेक्षा खरा धोका आहे तो आपल्या आतल्या वायरसचाः युवाल नोवा हरारी
कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय
३१ डिसेंबर १९९९ च्या रात्री जग श्वास रोखून कॉम्प्युटरच्या तावडीतून सुटून अनियंत्रित होणाऱ्या मशीनच्या बातम्या प्रत्यक्षात येण्याची वाट बघत होतं. पण १ जानेवारी २००० च्या सकाळीच प्रसिडेंट क्लिंटन काउंसिल ऑन इयर २००० कंवर्जनचे चेयरमन जॉन कोस्किनेन यांनी जाहीर केलं की, अजूनपर्यंत असं काही घडताना दिसत नाही. Y2K मुळं सिस्टम ठप्प पडल्यात अशी कुठलीच माहिती आपल्यापर्यंत आली नाही. Y2K सारखा काही प्रकारच नव्हता. असं कुठलं संकटच नव्हतं. २१ व्या शतकाचं स्वागत सुरवातीलाच खोटारडेपणानं झालं होतं. त्या दिवशी सत्याचा पराभव झाला होता.
पत्रकार निक डेविस हे आपल्या पुस्तकात लिहितात, पत्रकारितेच्या नावावर भाट, दलाल, खुशमस्करे, तळवे चाटणाऱ्या पत्रकारांनी निर्लज्जपणे ही या संकटाची कहाणी पेरली, यात काही विशेष नाही. विशेष हे, की चांगले पत्रकारही या कचाट्यात सापडले आणि Y2K बद्दल जे वातावरण तयार झालं होतं, त्यापुढं सत्य सांगण्याचं धाडस त्यांना झालं नाही.
निक डेविस यांनी या संकटाच्या निमित्तानं मीडियाची अंतर्गत रचना किती खिळखिळी झालीय आणि मालकी स्वरूप कसं बदलंलय याची खूप रोचक चर्चा केलीय. कसं एखाद्या ठिकाणी छापलेली गोष्ट कशी अनेक ठिकाणी उगवू लागते आणि मग कॉलम लिहिणाऱ्यांपासून ते पत्रकारांपर्यंत सारे आपल्या लेखणीला धार देऊ लागतात.
Y2K ची सुरवात कॅनडामधे झाली. १९९३ च्या मे महिन्यात टोरंटो शहरातल्या फायनान्शिअल पोस्ट नावाच्या पेपरमधे एक बातमी आली. आता २० वर्षांनी मे महिन्यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शतकातल्या पहिल्या ग्लोबल फेक न्यूजची आठवण काढलीय. तेव्हा कॅनडाच्या त्या पेपरमधे ३७ व्या पानावर ही बातमी आली होती. सिंगल कॉलम बातमीमधे टेक्नॉलॉजी कन्सल्टंट पीटर जेगर यांचा इशारा होता. २१ व्या शतकाच्या सुरवातीला मध्यरात्री अनेक कॉम्प्युटर सिस्टम ठप्प होतील.
१९९५ साल उजाडता उजाडता ही सिंगल कॉलम बातमी अनेक रूपं घेत उत्तर अमेरिका, युरोप आणि जपानपर्यंत पसरली. १९९७-९८ येईपर्यंत या सिंगल कॉलम बातमीनं जगातल्या सर्वांत मोठ्या बातमीची जागा घेतली होती. मोठमोठे जाणकार याबद्दल इशारे देऊ लागले आणि एका ग्लोबल संकटाची हवा तयार झाली.
Y2K संकटानं मीडियाला नेहमीसाठी बदलून टाकलं. आज आपण फेक न्यूज म्हणतो ती अनेक रूपांमधून प्रवास करत इथपर्यंत आलीय. कॉर्पोरेट्सकडून मीडियाचा वापर करून लोकमत निर्मितीचा खेळ खेळला जाऊ लागला. फेक न्यूजच्या तंत्रानं लाखो लोकांच्या हत्या केल्या. खोटारडेपणाच्या आधारावरच इराक युद्धाची कहाणी लिहिली गेली. यात १६ लाख लोक मेले. तेव्हा मीडियानं मोठ्या प्रमाणात अमेरिकी सैन्यदलाचं मुख्यालय असलेल्या पेंटागॉन आणि सैन्याच्या नावानं इराकशी संबंधित अपप्रचाराला हवा दिली. हत्येच्या जागतिक खेळात मीडियाही सहभागी झाला. त्याचमुळे मी म्हणतो, मीडियापासून सावध रहा. मीडिया आता लोक आणि लोकशाही यांचा साथीदार राहिला नाही. आपल्याला समजावं म्हणून इथं आणखी एक उदाहरण सांगतो.
हेही वाचा : कोरोना संकटाशी तुलना होत असलेली १९३०ची जागतिक महामंदी कशी होती?
ब्रिटनच्या संसदेनं एक कमिटी बनवली. सर जॉन चिल्कॉट हे या कमिटीचे अध्यक्ष होते. या कमिटीचं काम होतं, २००१ ते २००८ या काळात ब्रिटीश सरकारनं इराक युद्धात सामील होण्याचा जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाचा आढावा घेणं. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच ब्रिटननं एखाद्या युद्धात सहभाग घेतला होता. ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी या कमिटीसमोर साक्ष दिली. २०१६ मधे द इराक इनक्वायरी नावानं या समितीचा अहवाल आला. ६००० पानांचा हा अहवाल आहे.
या अहवालात स्पष्टपणे लिहिण्यात आलं, ‘इराककडे रासायनिक शस्त्रं असल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही. ब्रिटिश पंतप्रधान ब्लेअर यांनी संसद आणि देशाशी खोटं बोलले.’ त्यावेळी या युद्धाविरोधात ब्रिटनमधे दहा लाख लोकांनी आंदोलन केलं होतं. पण मीडियाचं सद्दाम हुसेनविरोधात हवा तयार करणं सुरू होतं.
टोनी ब्लेअर यांची प्रतिमा एक प्रामाणिक व्यक्ति अशी होती. त्यामुळे त्यांच्या या प्रतिमेपुढे असं कुठलंच आंदोलन टिकू शकलं नाही. त्याचा निभाव लागला नाही. सगळ्यांना वाटतं होतं, की आपला तरुण पंतप्रधान खूप प्रामाणिक आहे. तो काही चुकीचं करू शकत नाही. मात्र त्यानं आपल्या प्रामाणिकपणाची माती केली. धूळफेक केली. इराकमधे लाखो लोक मेले.
पण एक वृत्तपत्र होतं, डेली मिरर. यात २००३ मधे टोनी ब्लेअर यांचे दोन्ही हात रक्तानं माखलेला फोटो पहिल्या पानावर छापण्यात आला होता. बाकी सारी वृत्तपत्रं गुणगान गाण्यात दंग होती. आणि जेव्हा चिल्काट कमिटीचा रिपोर्ट आला तेव्हा गुणगाण गाणाऱ्या याच वृत्तपत्रांनी ब्लेअर यांचा उल्लेख खूनी असा केला. ज्या प्रेस कॉन्फरन्समधे हा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला तिथं इराक युद्धात शहीद झालेल्या सैनिकांचे कुटुंबियसुद्धा उपस्थित होते. त्यांनीही ब्लेअरला खूनी म्हटलं. तुम्ही पुलवामातल्या शहीदांच्या कुटुंबियांना विसरला असाल. त्यांना तर कुठल्या सरकारी कार्यक्रम बघितलाही नसाल.
तर सांगायचा मुद्दा असा की आता मीडियानं कटकारस्थान्यांसोबत हातमिळवणी केलीय. इराक युद्धानंतरही अजून लाखो लोक वेगवेगळ्या कारणांमुळे मरतच आहेत. Y2K संकट नकळतपणे पसरलं. या संकटानं कॉम्प्युटर सिस्टम नाही, तर मीडिया सिस्टमला उद्धवस्त केलं. तुम्हा, प्रेक्षक आणि वाचकांना मीडियाचा हा बदलेला खेळ नीट समजला नाही. आणि जोपर्यंत तुम्ही बर्बाद होणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो समजणारही नाही.
भारतात आता मीडियामधे फेक न्यूज आणि प्रोपगेंडा हीच सिस्टम झालीय. पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा ही सिस्टम कोण जास्ती चांगलं समजू शकेल. गोदी मीडिया आपल्याहून चांगलं कोण समजू शकेल. जगासाठी Y2K संकट ही अफवा १ जानेवारी २००० ला संपली होती. पण मीडियासाठी आणि विशेषतः भारतीय मीडियासाठी आजही Y2K संकट सुरूच आहे. आजही त्यांचं आपल्याला खोटारडेपणाच्या जाळ्यात फसवणं सुरूच आहे.
हेही वाचा :
विमान कंपन्यांना भवितव्य नाही : वॉरेन बफे
‘सुपर स्प्रेडर’कडे कुठून येते कोरोना पसरवायची सुपरपॉवर?
तर भारत चीनपेक्षा भारी मॉडेल उभं करू शकेलः थॉमस पिकेटी
मोदी सरकारने एलआयसी विकल्यावर आपल्या पॉलिसींचं काय होणार?
डब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरूय?
कोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ?
विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?
भारतामुळेच जगात मंदी, असं आयएमएफच्या गीता गोपीनाथ का म्हणाल्या?
जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी
१९९१ मधे भारताला कर्जही मिळत नव्हतं, पण आजचा भारत त्या संकटातून उभा झालाय