वेगात एकत्र येणारं जग आणि निरनिराळ्या प्रकारच्या लोकांशी जमवून घेणं, आदान-प्रदान करणं त्यांना कठीण, नकोसं आणि थोडं भितीदायकही वाटतं. अशा वेळी लागणारं सिक्युरीटी ब्लॅंकेट हे त्यांना आपापल्या टोळीत, जातीत किंवा धर्मातच दिसतं. मग आपापल्या धार्मिक, वांशिक किंवा जातीय कवचात जाणंच जास्त सुरक्षित वाटतं, कम्फर्टेबल वाटतं.
जागतिक व्यवस्था उदारमतवादी लोकशाही, सेक्युलॅरिझम आणि जागतिकीकरण या त्रिसूत्रीवर उभारली आहे. पण ही व्यवस्था सध्या भर रस्त्यात अचानक बंद पडलेल्या गाडीप्रमाणे ठप्प झालीय. अमेरिका, ब्रिटन, पूर्व युरोप, टर्की, फिलिपिन्स, ब्राझील इत्यादी देशप्रदेशांतले लोक या गाडीतले सहप्रवासी. यात नुकतीच भारताचीही भर पडली आहे असं वाटतं.
या उदारमतवादी लोकशाहीची जागा धर्म, वंश किंवा टोळीवर आधारित राष्ट्रवाद घेत आहे. तो आक्रमक आणि ‘आपण’ विरुद्ध ‘ते’ या मूलतत्त्वावर आधारित आहे. द्वेष, घृणा आणि हिंसक कृती ही त्याची शस्त्रं आहेत. लोक आपल्या आर्थिक हितावर आधारित मतं देतात. इट्स इकॉनॉमी स्ट्युपिड! किंवा पीपल वोट देअर पॉकेट या अमेरिकेतील म्हणी. मात्र आता ही संकल्पनाचा आता खोटी ठरली आहे.
ट्रायबलिझम किंवा टोळीवादच खरा प्रमुख असतो आणि लोक स्वत:च्या आर्थिक हिताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून टोळी, जमाव आणि ‘आपण’ या संकल्पनेत ‘त्यांच्या’ विरुद्धची सुरक्षितता अधिक महत्त्वाची मानतात हेही स्पष्ट झालंय.
हेही वाचा: धर्माची नव्यानं व्याख्या करण्याची गरजः सयाजीराव महाराज
तंत्रज्ञानाची भरारी, जागतिकीकरणाची लाट आणि त्यातील आदान-प्रदान यांमुळे जिव्हाळा, उदारमतवाद वाढतो. जग एक बनेल आणि विश्वबंधुत्व, ‘वसुधैव कुटुंबकम्’ या मूल्यावर आधारित एक सर्वसमावेशक, शांततापूर्ण आणि समंजस जग निर्माण होईल. पण असं काही झालं नाही आणि ही एक भाबडी आशाच ठरली. प्रत्यक्षात समोर येणारे जग साशंक, थोडं भेदरलेले आणि द्वेषावर आधारित दिसतं.
फक्त भारतातच नाही, तर अमेरिकेसारख्या प्रगत आणि दोनशे वर्षे लोकशाही राबवलेल्या देशातसुद्धा एथनिक नॅशनॅलिझमची लाट आली आहे. युरोपातही तेच. आता निमप्रगत देशांतही तसंच वातावरण दिसतंय. याचं दर्शनी स्वरूप म्हणजे उदार लोकशाही आणि सेक्युलॅरिझम यांचा निवडणूक मार्गाने पराभव.
हेही वाचा: भारतात आपण हिंदू, मुस्लिम एकत्र का राहतो?
प्रत्येक जागी स्ट्राँगमॅन कल्चर अगदी एकाधिकारी किंवा हुकूमशहाप्रमाणे लोक निवडणुकीच्या मार्गाने राज्यावर आलेत. मग अमेरिकेत ट्रम्प, तर ब्राझील, टर्की इत्यादी अनेक देशांत त्यांच्या प्रतिकृती राज्यावर आल्या. या साऱ्यांचा पूर्वजाहीर अजेंडाच संकुचित वंशाधारित किंवा धर्माधारित राष्ट्रवाद हाच होता. म्हणजे लोकांनाही हेच हवं, असं चित्र निर्माण झालंय.
आताच्या लोकसभा निवडणुकीने तर जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाला धार्मिक राष्ट्रवाद हवा आहे असं अधोरेखित झालं. म्हणजे जीडीपी ग्रोथ सर्वांत कमी, तरुणांची बेकारी सर्वांत जास्त, वित्तीय घोटाळे आणि पलायने, शेती आणि रियल इस्टेट इत्यादी व्यवसाय बंद.
लोकांना या सर्व गोष्टी माहीत असूनही लोकांनी ‘ते’ विरुद्ध ‘आपण’ अशा संकुचित जहाल धार्मिक राष्ट्रवादाला कवटाळलं. एकीकडे वसुधैव कुटुंबकम् म्हणायचं आणि दुसरीकडे मॉब लिंचिंग आणि प्रज्ञा ठाकूरचं समर्थन करायचं. या वरकरणी विसंगत वर्तनाचे कारण काय?
या ग्लोबल फेनामेनाचे एक मुख्य कारण जागतिकीकरण, तंत्रज्ञान आणि लोकसंख्या वाढीचा वेग यात दडलेलं आहे. वरकरणी हव्याश्या वाटणाऱ्या ग्लोबलायझेशनचा आणि तंत्रज्ञानाचा फायदा, उत्तम उपयोग करूनही त्याच वेळी त्याच्याशी कोप-अप करण्याची भीती, शंका आणि ‘स्वत्व’ गमावण्याची धास्ती हे सर्व लोकांना बेचैन, कातर करणारं वाटतं.
वेगात एकत्र येणारं जग आणि निरनिराळ्या प्रकारच्या लोकांशी जमवून घेणं, आदान-प्रदान करणं त्यांना कठीण, नकोसं आणि थोडं भितीदायकही वाटतं. अशा वेळी लागणारं सिक्युरीटी ब्लॅंकेट हे त्यांना आपापल्या टोळीत, जातीत किंवा धर्मातच दिसतं. मग आपापल्या धार्मिक, वांशिक किंवा जातीय कवचात जाणंच जास्त सुरक्षित वाटतं, कम्फर्टेबल वाटतं.
हेही वाचा: चला, आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होऊया!
‘आपल्या’ लोकांबरोबर सुरक्षित आणि ‘परक्या’ किंवा ‘उपऱ्या’ लोकांबरोबर असुरक्षित अशी मानसिकता प्रबळ होतेय. अगदी अमेरिकेतल्या कित्येक उच्चशिक्षित एनआरआय बंधूसुद्धा अमेरिकेत कडक सेक्युलॅरिझमचा तर भारतात कडव्या धार्मिक राजवटीचा पुरस्कार एकाच वेळी करताना दिसतात. कारण आपल्या ‘स्वत्वाची’ ही लढाई असल्याची मानसिकता आहे.
तंत्रज्ञानाच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाढीबरोबरच जगाची अफाट वाढणारी लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने होणारी घुसळण आपोआपच ‘आपण’ विरुद्ध ‘ते’ असं जग विभागण्यास कारणीभूत होतं. पुन्हा एकदा, ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणायचं आणि आपापल्या वंशाच्या किंवा जातीच्या टोळीत किंवा गल्लीत सुरक्षित समजायचं ही विसंगती पावलोपावली दिसू लागते.
हेही वाचा: जेसिंडा अर्डेन, यू आर माय लीडर
अशा असुरक्षित, अनिश्चित आणि दोलायमान अवस्थेतले लोक आणि समाज एका ‘त्रात्या’कडे झुकतात. अशामुळे स्ट्राँगमन कल्चर फोफावतं. अशा भेदरलेल्या किंवा अस्थिर समाजाची मानसिकता कशी एक्सप्लॉइट करायची हे कौशल्य त्यांच्याकडे असतं. आणि त्या जोडीला मार्केटिंग आहेच.
‘ते’ किंवा ‘परके-उपरे’ यांचं भयानक आणि भडक चित्रण करून बहुसंख्य ‘आपण’च कसे ‘बिच्चारे’ आहोत आणि ‘त्यांच्या’ शारीरिक, सांस्कृतिक, आर्थिक आक्रमणाचे कसे बळी ठरणार आहोत अशी हवा हे स्ट्राँगमन आणि त्यांच्यामागची कडव्या संस्थांची सायलेंट आणि इनविजीबल आर्मी शिताफीने तयार करत असतात.
हिटलरच्या गोबेल्स नावाच्या प्रचारमंत्र्याने हे तंत्र पूर्णत्वास नेलं. आणि आज त्याला ‘व्हॉटस्ॲप आणि ट्रोल’ आर्मीची जोड, म्हणजे हा विषारी वेलू किती जोमाने जगभर फोफावला आहे याची कल्पना येईलच.
खरे म्हणजे टोळी, जमाव, जमात यांत सुरक्षितता आणि परके-उपरे यांपासून धोका ही संकल्पना माणसाच्या आदिकालापासून आहे. त्यामानाने उदारमतवादी लोकशाही, सेक्युलॅरिझम या संकल्पना गेली दोन शतकंच राबवल्या गेल्या. तेव्हा माणूस कितीही सुधारला, सुशिक्षित किंवा सुसंस्कृत झाला तरी मूळ प्रवृत्ती उफाळून वर यायला एखादा धक्का किंवा व्हॉटसॲप मार्केटिग कॅम्पेनही पुरतं. हे जगभरात दिसतंय.
हेही वाचा: डॉ. पायल तडवीः मेडिकल कॅम्पसमधल्या जातीव्यवस्थेचा बळी!
अमेरिकेसारख्या लोकशाही मूल्यं आणि सेक्युलॅरिझमचा उदोउदो करणारा देशही, ट्रम्प नावाचा स्ट्राँगमन व्हाईट नॅशनॅलिझमच्या नशेत बुडवतो. तेव्हा भारत, ब्राझील, टर्की इत्यादी निमप्रगत देशांचं काय सांगावं? म्हणूनच भारतात आलेली ‘आपण, भूमिपुत्र, देशभक्त’ विरुद्ध ‘ते, परके, उपरे, देशद्रोही’ ही लाट आलीय.
अगदी सुशिक्षित वर्गाचासुद्धा व्हॉटस्ॲपवर अतिउजव्या, कडव्या, हिंसक, धर्माधिष्ठित राष्ट्रवादाचा उन्माद हा केवळ भारतापुरता मर्यादित नसून, एका जागतिक फेनामेनाचा भाग आहे हे लक्षात घेतलं, तर यावर उपाय आणि इलाज सुचतील.
उदार लोकशाहीवादी लोकांच्या केवळ सदिच्छा आणि महात्मा गांधींसारखी प्रतिकं इत्यादी पुरेसं नाही. टेक्नॉलॉजी हे एक दुधारी शस्त्र आहे. ते कोणीही वापरू शकतो, त्यावर उजव्या किंवा कडव्या लोकांची मक्तेदारी नाही.
आता जुन्या पठड्या किंवा पोथ्या सोडून, नवीन सोशल मीडिया तंत्रज्ञानाचा हिरीरीने वापर करून तरुण पिढीला समजेल, भावेल अशा शैलीने पोचणं फार महत्त्वाचं आहे. निराशा आणि आपापसातील भांडणं या रोगांवरही उपाय शोधणं आवश्यक. ध्येयवादी तरुण कार्यकर्ते तयार करणं, त्यांचं तात्त्विक आणि तांत्रिक प्रशिक्षण करणं हे पायाभूत काम आहे, नुसती भाषणं ठोकणं नाही. हेही कधी लक्षात आल्यास लोकशाही पुरस्कर्त्यांचं भलं होण्याचा संभव आहे.
अर्थात, सारेच काही अंधारमय किंवा निराशाजनक आहे असं अजिबात नाही. आशेचे किरण आत्ताच दिसत आहेत. पश्चिम युरोपने वंशाधारित राष्ट्रवादाची लाट नुकतीच परतवली आहे. अमेरिकेतही डेमॉक्रॅटिक पक्षाने मरगळ झटकून वांशिक राष्ट्रवादाचा प्रतिकार करायला सुरुवात केली आहे.
आम्ही उदारमतवादी आणि सेक्युलर आहोत, असं अभिमानाने सांगणारी तरुणांची आणि स्त्रियांची मोठी फळी अमेरिकेत पुढे सरसावली आहे. याचे परिणाम पुढील निवडणुकीत दिसतील अशी आशा करू या. आता भारताचे काय?
हेही वाचा: माणुसकीचे धागे मजबूत करणारी गडहिंग्लजची सलोखा परिषद
(लेखक अमेरिकेत राहणारे उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्र फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातही काम करतात. त्यांचा लेख साप्ताहिक साधनातून साभार.)