कोरोनानं कांद्याचा बाजार बंद झाला, मग शेअर बाजार बंद का होत नाही?

०४ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


भाजीपाला, कापड बाजार असतो तसा गुंतवणूकीचाही बाजार असतो. आपण त्याला शेअर बाजार म्हणतो. इथं शेअरचे भाव ठरतात, कमी होतात, वाढतात. खरेदी विक्री होते. सध्या लॉकडाऊनमुळे जगातले सगळे बाजार बंद आहेत. पण हा शेअर बाजार मात्र बंद झाला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लासलगावच्या कांदा बाजारासारखं शेअर बाजार का बंद होत नाही?

कांद्या बटाट्याची, कपड्यांची, वस्तूंची एक बाजारपेठ असते. तिथे जाऊन आपण खरेदी करतो. घासाघासी करतो, बार्गेन करतो. पण गुंतवणुकीचीही अशीच एक बाजारपेठ असते. या बाजारपेठेला आपण शेअर बाजार किंवा शेअर मार्केट म्हणतो. वस्तू आणि इतर मालाप्रमाणे इथंही शेअरची खरेदी-विक्री होते, मालाचा भाव ठरतो, कोणत्या मालाचा भाव घटतो, कशाचा वधारतो.

कोरोनानं साऱ्या जगालाच कुलुपबंद केलंय. त्याचा मार्केटला मोठा फटकाही बसतोय. त्यामुळे अनेक मार्केट बंद करण्यात आलेत. पण हा शेअर मार्केट काही बंद झाला नाही. शेअर मार्केटमधे व्यवहार करणाऱ्यांना गर्दीमुळे कोरोना वायरसची लागण होत नाही का?

हेही वाचा : कोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ?

शेअर बाजार म्हणजे नेमकं काय?

शेअर मार्केट म्हणजे गुंतवणुकीचा बाजार! अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा भागल्यावरही काही जणांकडे मुबलक पैसा शिल्लक राहतो. त्या जास्तीच्या पैशाची ते गुंतवणूक करू शकतात. त्यातून त्यांना आणखी फायदा होणार असतो. तर काहींना आपल्या उद्योगासाठी, फॅक्टरीसाठी प्रचंड मोठ्या भांडवलाची गरज असते. असं भांडवल एकट्या माणसाकडून घेता येणं शक्य नसतं. बॅंकही एवढं मोठं कर्ज एकाच माणसाला देऊ शकत नाही.

अशावेळी ही दोन्ही प्रकारची लोक एकाच छताखाली एकत्र येतात आणि गुंतवणूकीच्या संसाधनाची देवाण घेवाण करतात. अशा बाजाराला म्हणतात गुंतवणुकीचा बाजार. गुंतवणूकदार आपले पैसे एखाद्याच्या उद्योगात भांडवल म्हणून वापरायला देतो तेव्हा त्या उद्योगातून मिळणाऱ्या नफ्याचा काही भाग त्याला देण्याचे मालक काबुल करतो. याने खरेदीदार आणि विक्रेता दोघांचाही फायदा होतो. गुंतवणूकदाराला आपल्या पैसे मिळतात आणि उद्योगधंद्यांच्या मालकाला भांडवल मिळतं.

पण याला शेअर मार्केट का म्हणतात? गुंतवणूकीची खरेदी विक्री होते, तर गुंतवणूक बाजार किंवा इनवेस्टमेंट मार्केट असं का म्हणत नाहीत? कारण गुंतवणुकीची देवाणघेवाण एका स्वरूपात होत असते आणि त्या स्वरूपाला ‘शेअर’ असं म्हणतात. थोडक्यात, उद्योगाचा काही भाग गुंतवणूकदार पैसे देऊन विकत घेतो. म्हणजेच, त्याची ही गुंतवणूक त्या उद्योगात भांडवल म्हणून वापरली जाते. उद्योगाच्या या थोड्या भागालाच शेअर असं म्हटलं जातं. उद्योगाच्या मालकीचा ‘भाग’, ‘वाटा’ किंवा ‘शेअर’. म्हणून हा बाजार शेअरच्या खरेदी विक्रीचा शेअर बाजार असतो.

कंपनीवर ठरते शेअरची किंमत

कंपनीचे शेअर विकत घेतले की गुंतवणूकदार संबंधित कंपनीच्या काही भागाचा मालक होतो. म्हणजे आपल्या रोजच्या भाषेत सांगायचं झालं तर कंपनीचा वाटेकरी होतो. प्रत्येक उद्योगाचे शेअर त्या उद्योगाच्या दर्जावर, नफा कमवण्याच्या क्षमतेवर आणि उद्योग किती प्रसिद्ध आहे त्यावर अवलंबून असतात. कमी नफा कमवणाऱ्या, फारशा प्रसिद्ध नसणाऱ्या कंपनीचे शेअर स्वस्त असतात. तर इतरांचे महाग असतात. उद्योगावर काही संकट आलं किंवा अर्थव्यवस्थेत उलथापालथ झाली तर उद्योगाच्या शेअरचे भाव कमी जास्त होतात. 

उद्योगाचा नफा तो गुंतवणुकदाराचा फायदा असतो. तशीच उद्योगाच्या नुकसानाची झळ गुंतवणूकदाराला बसते. असे अनेक गुंतवणूकदार आणि भांडवलाची गरज असणाऱ्या अनेक कंपन्या, उद्योग एकाच छताखाली येतात आणि स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजार तयार होतो.

देशातलीच नाही तर जगभरातले शेअर मार्केट याआधी अनेकदा बंद झालेत. युद्ध, दंगल, राष्ट्रपतींचा मृत्यू, बॉम्बस्फोटासारख्या मानवनिर्मित किंवा इतर नैसग्रिक आपत्ती अशा अनेक कारणांमुळे शेअर बाजारावर काही काळ टाळं लावावी लागलीत.

पहिल्या महायुद्धाच्यावेळी तर सगळ्यात जास्त म्हणजे ४ महिने शेअर मार्केट बंद होतं. आपला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजही १९९३ च्या बॉम्बस्फोटामुळे काही दिवस बंद ठेवावा लागला होता. आत्ताही मोठी जागतिक आपत्ती आलीय. त्यात अर्थव्यवस्थेचीही दुर्दशा होतेय आणि साधारणतः आर्थिक आपत्ती चालू असताना शेअर मार्केट बंद केलं जातं नाही.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

एखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं?

महाराष्ट्राचे एक मंत्री कोरोना संशयित बनतात तेव्हा

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

पंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे

लॉकडाऊनः कोकणात हापूस घरातच पडून, युरोपात फळं खायला मिळेनात

कोरोनामुळे शेअर बाजाराला लागलं ग्रहण 

लॉकडाऊनमुळे मजूर सापडत नाहीत. आणि कोरोनाच्या भीतीनं व्यापारी व्यवहार करायला धजावेनात म्हणून आपला लासलगावचा कांदा बाजार काही दिवस बंद करावा लागला. स्वतः बाजार समितीनंच त्यासाठी पुढाकार घेतला. भाजीपाला किंवा कपड्यांच्या बाजारासारखा शेअर मार्केट कुठल्याशा जागेत वसलेला नसतो. दुकानाच्या फळीवर उद्योगांचे मालक शेअर सजवून, ताजे दिसावे म्हणून त्यावर पाणी मारून वगैरे ठेवत नाहीत. इथं तर उलट, जुन्या शेअरमधे म्हणजे जुन्या कंपनीत जास्त गुंतवणूक होते. ही सगळी गुंतवणूक ऑनलाईन होत असते. मोबाईलच्या एका क्लिकवर शेअर खरेदी विक्रीचा व्यवहार चालतो. त्यामुळे कपड्यांच्या मार्केटसारखी लोकांची गर्दी होण्याचा इथं फारसा संबंध नसतो. म्हणूनच सगळे बाजार बंद झाले तरी शेअर बाजार सहसा बंद होत नाही.

दुसरं म्हणजे, देशांतर्गत किंवा जागतिक पातळीवर घडणारी कोणतीही घटना देशाच्या आर्थिक व्यवहारांवर आपले पडसाद उमटवते. मग ते देशांतर्गत युध्द असेल किंवा कोरोनासारखा जागतिक साथरोग. कोणत्याही आर्थिक, सामाजिक, राजकीय घटनांची प्रतिक्रिया शेअर बाजारावर बघायला मिळते. सध्याच्या जगात माहिती सर्वांसाठी आणि तत्काळ उपलब्ध झाल्याने टीवीवर, मोबाईलवर बातमी पाहताच नफ्याचा अंदाज लावून गुंतवूकदार तात्काळ आपला मोबाईल काढून शेअर खरेदी किंवा विक्री करतात.

शेअर बाजारातले बदल असे तत्काळ आणि ‘प्रतिक्रियात्मक’ म्हणजेच रिएक्टिव असतात. त्यामुळे या बाजारात अस्थिरता अर्थात वोलटॅलिटी सर्वाधिक असते.

चीनमधे कोरोनाचं थैमान सुरू झालं तेव्हा त्याचा परिणाम सर्वात आधी चीनच्या शेअर बाजारावर झाला. त्यानंतर क्रमाक्रमाने आशियातल्या बाजारात घसरण पाहायला मिळाली. आता अमेरिका आणि युरोपचे बाजारदेखील कोसळले आणि भारताचाही नंबर लागला. सध्या जगभरातल्या बाजारपेठांमधे सरासरी २५ ते ३० टक्क्यांची घसरण पाहायला मिळते.

विक्रीसाठी बाजार सुरू नको?

आपत्तीच्या काळात कोणतीही अर्थव्यवस्था सुरळीतपणे चालत नाही. आपत्तीचं स्वरूप जितकं गंभीर तितका आर्थिक नुकसानाचा धोका वर्तवला जातो. एखाद्या देशाची अर्थव्यवस्था संकटांचा सामना करते त्यावेळी देशातल्या कंपन्यांमधे गुंतवणूक करून तोट्याचे वाटेकरी होण्यासाठी गुंतवणूकदार अजिबात तयार नसतात. आपत्तीकाळ हा असा काळ असतो ज्यावेळी सगळे गुंतवणूकदार आपला पैसा बाजारात गुंतवण्याच्या बाबतीत निराश असतात. 

कोरोनामुळे भारतात २१ दिवसाचं लॉकडाऊन जाहीर केलंय. म्हणजे देशातल्या सर्व उत्पादनाला आणि वस्तूंच्या खरेदी-विक्रीला ब्रेक दिलाय. शेअर बाजारात आपण उद्योगांच्या भागाची विक्री करत असलो तरी हे उद्योग वस्तू आणि उत्पादनांचे असतात. त्यामुळे लॉकडाऊनमुळे उद्योगांचं उत्पादन बंद झाल्यावर त्याचा परिणाम शेअर बाजारावर होणारच.

शेअर बाजार बंद करण्याची रिस्क

सध्या देशातले व्यवहार धीम्या गतीने चाललेत. काहीतर बंदच पडलेत. तेव्हा अशा अनयुजूअल किंवा असाधारण परिस्थितीत शेअर बाजारात नफा कमावण्याची शक्यता नगण्य होते. तोट्याच्या भीतीने लोक मोठ्या प्रमाणावर आपले शेअर विकून टाकतात. यालाच आपण बाजार कोसळणं, असंही म्हणतो. कंपन्या आणि त्यांचे आकडे नीट पाहिले तर लक्षात येईल की सध्या जवळपास सगळ्याच कंपन्याचे शेअर्स घसरतायत. 

असं असलं तरी सिप्लासारख्या औषध उत्पादन कंपन्यांना त्याचा फटका बसलेला नाही. लॉकडाऊनच्या काळातही औषध उत्पादन कंपन्या सुरू ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे हा परिणाम पाहायला मिळतो. पण बाकी सर्व कंपन्यांच्या बाबतीत येत्या काळात कंपन्या तोट्यात असतील, अशी भीती लोकांच्या मनात असते. त्यामुळे ते आपले शेयर्स विकायला काढतात आणि अशा विक्री करणाऱ्या लोंध्याच्या अवस्थेला म्हणतात ‘बिअर मार्केट’. त्यामुळे ही विक्री करण्यासाठी तरी शेअर बाजार सुरूच राहतो.

गेल्या काही वर्षांत शेअर बाजारातल्या व्यवहारावरून अर्थव्यवस्थेची स्थिती जोखली जातेय. म्हणजे शेअर बाजार हा अर्थव्यवस्थेचा निर्देशांक बनलाय. अशात शेअर बाजाराला टाळं ठोकल्यास अर्थव्यवस्थेबद्दल उलटसुलट चर्चा होईल आणि आपण देशोधडीला लागू, अशी भीती देशोदेशीच्या सरकारांना असते. त्यामुळे शेअर बाजार बंद करण्याची रिस्क कुणी घेत नाही.

हेही वाचा : कोरोनाने शेअर बाजार पावसासारखा कोसळतोय, १२ वर्षांतला वाईट दिवस

दुष्काळात तेरावा महिना

कोरोनाच्या आगमनाआधीही गेले काही महिने भारताची अर्थव्यवस्था मंदीच्या भोवऱ्यातच होती. बेरोजगारी, उत्पादन क्षेत्रातली घसरण, टेलिकॉम क्षेत्रातलं नुकसान, बँका आणि बॅंकेतर आर्थिक संस्थांची अवस्था या सगळ्या गोष्टींचा विचार करता सध्या देशांच्या शेअर मार्केट घसरणीला केवळ कोरोना जबाबदार नाही हे लक्षात येतं.

इतर देशांसाठी कोरोनामुळे कोसळलेला शेअर मार्केट ही तात्पुरती फेज आहे. अर्थात यालाही काही देश अपवाद आहेत. पण अनेक देशांची परिस्थिती काही महिन्यानंतर पूर्ववत होईल. तेव्हा त्यांचा बाजारही पूर्वस्थितीत येईल, अशी त्यांना अपेक्षा आहे. पण कोरोना आपल्यासाठी ‘दुष्काळात तेरावा महिना’ झालाय. त्यामुळे त्याचे पडसाद दूरगामी आणि पूर्वीच्या परिस्थितीपेक्षा गंभीर स्वरूपाचे असतील, अशी भीती व्यक्त केली जातेय.

२००३ मधला सार्स असेल किंवा २००८ मधला स्वाइन फ्लू अशा आजारांनी देशाचे शेअर मार्केट आणि अर्थव्यवस्था दणाणून सोडलीच होती. पण कोरोनाचं गांभीर्य आणि त्या पार्श्वभूमीवर जगाची झालेली वाताहत पाहता यावेळचं संकट गंभीर आहे इतकं नक्की!

या संकटातून बाहेर पडण्यासाठी रिझर्व बॅंकेने महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरवात केलीय. हे रोगाचं थैमान संपल्यानंतर परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी कोणती धोरणं आखली जावीत, भारतीय बाजारपेठ गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यास यशस्वी ठरेल का, आर्थिक नुकसान भरून काढण्यास किती काळ लागेल यावर देशाच्या अर्थव्यवस्थेची पुढील वाटचाल अवलंबून आहे.

हेही वाचा : 

आपण आधीच दिवे लावलेत, आतातरी डोकं लावूया

महाराष्ट्राचे एक मंत्री कोरोना संशयित बनतात तेव्हा

जुने फोटो आणि रामायणः दोन पिढ्यांचा नॉस्टॅल्जिक ट्रेंड

दिवेलावणीवरील फेबु-वॉट्सपगिरीः वाचा, हसा, विचारही करा

दिल्लीच्या तबलिगी प्रकरणात नेमकं खरं काय आणि खोटं काय?

१९४७ मधेच कोरोनासारख्या रोगाचं तंतोतंत वर्णन करणारी कादंबरी