गेल्यावर्षी उसळी मारणारं शेअर मार्केट यावर्षी संकटात?

१९ मे २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


गुंतवणूकदारांसाठी शेअर मार्केट हा उत्तम पर्याय असतो. काळजीपूर्वक गुंतवणूक केली तर त्यातून मिळणारा परतावा हमखास फायद्याचा ठरतो. गेल्यावर्षी अर्थव्यवस्थेची घसरण होत असताना शेअर मार्केट तेजीत होतं. कंपन्यांच्या नफ्यात कित्येक पटीने वाढ होत होती. यावर्षी मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला फटका बसताना इतर देश यातून हळूहळू बाहेर पडतायत. या सगळ्याचा फटका शेअर मार्केटला बसतोय.

कोरोना वायरसचा फटका जगभरातल्या अर्थव्यवस्थांना बसलाय. वेगवेगळी क्षेत्रं संकटात सापडली. लोकांच्या नोकऱ्या गेल्या. असलेल्या नोकऱ्यांवरची टांगती तलवार कायम आहे. आर्थिक महामंदीची परिस्थिती असतानाही बड्या उद्योगांची मात्र चांदी झाली. आर्थिक संकटाच्या काळातही शेअर मार्केटचा सुसाट वेग त्यामागचं खरं कारण होतं.

गुंतवणूकदारांसाठी शेअर मार्केट हा उत्तम पर्याय असतो. काळजीपूर्वक गुंतवणूक केली तर त्यातून मिळणारा परतावा हमखास फायद्याचा ठरतो. त्यासाठी मार्केटमधले चढउतार लक्षात घेऊन पैशाची गुंतवणूक करायला हवी. गेल्यावर्षी अर्थव्यवस्थेची घसरण होत असताना कंपन्यांच्या नफ्यात कित्येक पटीने वाढ होत होती.

कोरोना वायरसच्या संकटातून जग हळूहळू बाहेर येतंय. जिथं कोरोना कमी झालाय असे देश आता ऍक्टिव होतील. भारत मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. अशावेळी २०२१ हे वर्ष शेअर मार्केटसाठी फायद्याचं ठरेल का याचं ज्येष्ठ पत्रकार ऑनिंद्यो चक्रवर्ती यांनी 'न्यूजक्लिक' या पोर्टलवर विश्लेषण केलंय. या वीडियोचं अक्षय शारदा शरद यांनी केलेलं हे शब्दांकन.

शेअर मार्केटनं उसळी मारायची दोन कारणं आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे शेअर मार्केटमधल्या कंपन्यांच्या नफ्यात जास्तीत जास्त वाढ होणं. नफा वाढतो म्हणजेच जास्तीत जास्त फायदा होतो तेव्हा शेअरच्या किंमतीही वाढतात. समजा तुमच्याकडे व्यक्ती म्हणून एक शेअर असेल तर त्याचे मालक तुम्ही स्वतः असता.

कंपनीनं शेअर खरेदी केले तर त्याचे मालकही तुम्हीच असता. कंपनीला नफा झाला तर त्या एका शेअरचा अधिकार तुमच्याकडे असतो. या नफ्यामुळे शेअरची किंमत वाढते. मागच्या वर्षी मार्केटमधल्या कंपन्यांना रेकॉर्डब्रेक फायदा झाला. एकीकडे आपल्या अर्थव्यवस्थेची घसरण होत होती. त्याचवेळी कंपन्यांच्या नफ्यात कित्येक पटीने वाढ झाली.

मंदीतही शेअरच्या किंमती वाढल्या

कोरोना वायरसमुळे गेल्यावर्षी लॉकडाऊन लावावं लागलं. बाजारपेठा बंद होत्या. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. पगार कमी झाले. अर्थव्यवस्थेवरच्या संकटामुळे जगभर आर्थिक मंदी आली. त्यामुळे आपल्याकडे खरेदी करण्याची क्षमता घटली. मोठमोठ्या कंपन्यांच्या वस्तू विकण्यावर मर्यादा आल्या.

आता विक्रीच कमी असेल तर नफाही कमीच व्हायला हवा ना? वस्तूंची विक्री कमी होते आणि खर्च तेवढाच राहतो किंवा वाढतो तेव्हा नफ्यात घट होते. पण त्याचबरोबर आर्थिक संकटामुळे कंपन्यांना वस्तू बनवण्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल, कंपन्यांचा ऑफिसला येणारा खर्च, पेट्रोल-डिझेलचा खर्च असा सगळाच खर्च कमी झाला.

जगभर कच्च्या मालाच्या किंमती घटल्या. कंपन्यांचा एक मोठा खर्चही कमी झाला. दुसरा खर्च असतो मजुरी किंवा वेतन म्हणजेच पगाराचा. हा खर्चही मागच्या वर्षी वाढला नाही. कंपन्यांची विक्री कमी झालीच शिवाय खर्चातही घट झाली. त्यामुळे मागच्या वर्षी त्यांचा नफा वाढला. कंपन्यांच्या शेअर मार्केटमधल्या त्यांच्या शेअरच्या किंमतीतही वाढ झाली.

हेही वाचा : कोरोनानं कांद्याचा बाजार बंद झाला, मग शेअर बाजार बंद का होत नाही?

गुंतवणूक फायद्याची ठरली कारण

मार्केटमधे नेमका किती पैसा आलाय हे शेअरच्या किंमती वाढण्याचं अजून एक कारण आहे. शेअर मार्केटमधे पैसा गुंतवायचा तर बँकेच्यामानाने इथं टॅक्स कमी आहे. तसंच गुंतवणूक टॅक्सही सामान्य टॅक्सपेक्षा कमी आहे. त्यामुळे बँकेत पैसा गुंतवून त्यावर टॅक्स देऊन केवळ ५ ते ६ टक्के व्याज मिळत असेल तर शेअर मार्केट परवडलं असं लोक म्हणतात. त्याचं कारण शेअर मार्केटमधे ७ ते ८ टक्के व्याज मिळतं. शिवाय टॅक्सही कमी आहे.

लोक बँकेकडून कर्ज घेतात. तो सगळा पैसा शेअर मार्केटमधे गुंतवतात. पैसा येतो तसं लोक जास्त शेअर खरेदी करायला लागतात. समजा मार्केटमधे एखाद्या कंपनीचे १ लाख शेअर आहेत आणि खरेदीदार केवळ ७० हजार आहेत. अशावेळी किंमत कमी होईल आणि शेअरही सहज मिळू शकतील. पण १ लाख शेअर विकत घेणारे १ लाख १० हजार लोक असतील तर? कंपनीचा नफा वाढेल न वाढेल पण शेअरच्या मागणीसोबत त्याच्या किंमतीत वाढ होईल.

त्यामुळे इथं दोन गोष्टी आहेत. एकतर कंपनीच्या नफ्यात वाढ होणं आणि दुसरं शेअरची मागणी वाढणं. लोकांच्या हातात पैसा येतोय. बँकेतला, म्युच्युअल फंडातला पैसा शेअर मार्केटकडे वळवला जातोय. शिवाय बँकेतून कर्ज घेऊनही मोठमोठे गुंतवणूकदार शेअर मार्केटमधे पैसा गुंतवत होते. त्यामुळे गेल्यावर्षी मंदीतही पैसे गुंतवणं जास्त फायद्याचं होतं.

शेअरच्या किमतीवर परिणाम

जगभर कोरोना वायरस हळूहळू कमी होतोय. आपल्याकडे कोरोनाची दुसरी लाट आहे. जून-जुलैपर्यंत ती कमी होईल, असं म्हटलं जातंय. शिवाय लसीकरणाचा वेगही फार कमी आहे. लसीकरण पूर्ण होईपर्यंत पुढच्या वर्षीचा मार्च-एप्रिल महिना उजाडेल.

लसीकरणात मोठमोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी वेग पकडलाय. जिथं कोरोना कमी झालाय असे देश आता ऍक्टिव होतील. मार्केट, रेस्टॉरंट, शाळा-कॉलेज, ऑफिस उघडतील. इतर देशांमधे हे सगळं हळूहळू सुरळीत होतंय. त्यामुळे उत्पादन वाढेल. त्याबरोबर कच्च्या मालाची मागणीही वाढायला लागेल.

कच्च्या मालाची मागणी वाढली की त्याच्या किंमतीही वाढतील. त्यामुळे देशातल्या मोठमोठ्या उद्योगपतींचा खर्चही वाढेल. पण लॉकडाऊन वाढला, नोकऱ्या जात राहिल्या तर खरेदीदारांची मागणी घटेल. उद्योगपतींचा खर्च वाढेल पण ते किंमती वाढवू शकणार नाहीत. विक्री तशीच राहील. त्यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर त्याचा परिणाम होईल. नफा कमी झाला तर त्याचा शेअरच्या किंमतीवरही परिणाम होईल.

हेही वाचा : कोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ?

काळजीपूर्वक गुंतवणूक

तुमच्याकडे पैसा आलाच तर एकाचवेळी तो गुंतवण्यापेक्षा गुंतवणूक हळूहळू वाढवा. मार्केटमधले चढउतार लक्षात घेऊन पैश्याची गुंतवणूक करावी.  बाहेरच्या देशांची गुंतवणूक आली. पैसा वाढला तर शेअरच्या किंमती वाढतील. पण शेअरमधे पैशाची गुंतवणूक करताना थंड डोक्याने विचार करायला हवा. सल्ला घेताना सेबीकडे नोंदणी केलेली व्यक्ती किंवा नोंदणीकृत सल्लागारांकडूनच सल्ला घ्या.

म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमधे गुंतवणूक करताना एका वर्षाचा विचार न करता पुढची ५ ते १० वर्ष समोर ठेवून गुंतवणूक करावी. भविष्याचा विचार करून शेअर मार्केटमधे गुंतवलेला पैसा चांगला परतावा मिळवून देतो. कारण सगळ्या देशांमधे शेअर मार्केटच्या फेवरमधे टॅक्सविषयीचा कायदा बनवलेला आहे. त्यामुळे बँकेपेक्षा चांगला परतावा आपल्याला यातून मिळत असतो.

लगेच वर्षभरात नाही तर पाच एक वर्षात याचा नक्कीच परिणाम आपल्याला दिसून येईल. शेजारच्याने सांगितलंय म्हणून गुंतवणूक करू नका. काळजीपूर्वक गुंतवणूक करावी कारण इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाची सध्याची आर्थिक स्थिती फार नाजूक आहे.

हेही वाचा : 

पंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे

कोलंबसने नेलेल्या साथरोगांनीच संपवली मूळ अमेरिकी संस्कृती

तू देवमाणूस आहेस, की खराखुरा देवच, एका कोरोना योद्ध्याला पत्र

१९४७ मधेच कोरोनासारख्या रोगाचं तंतोतंत वर्णन करणारी कादंबरी

अमेरिकेला हवं असणारं मलेरियाचं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट