आपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'?

२२ सप्टेंबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


बिहारमधल्या सत्ताधाऱ्यांना सुशांत सिंग राजपूतचा त्याच्या मृत्यूनंतर बिहारी म्हणून पुळका आलाय. पण तो जिवंत असताना त्यांनी त्याची कधीच दखल घेतली नाही. मुळात सुशांतही आपली बिहारी ही ओळख लपवतच राहिला. एका ज्येष्ठ पत्रकाराने आपल्या अनुभवांवर आधारित या विषयावरचा अगदी वेगळा वेध मराठीत मांडणं महत्वाचं होतं.

काही दिवसांपूर्वी मी माझ्या गावच्या शाळकरी दोस्ताशी बोलत होतो. सुशांत सिंग प्रकरणात रिया चक्रवर्ती पूर्णपणे दोषी आहे आणि सीबीआयकडे केस जाण्याआधी महाराष्ट्र पोलिस प्रकरणाचा नीट तपास करत नव्हते, हे टीवी आणि पेपरमधल्या बातम्यांनी त्याच्या मनात भरवून दिलं होतं. 

तो खूप वेळ मला समजावत होता. ते सगळं एका प्रचाराचा भाग असल्याचं मला माहीत होतं. त्यामुळे मी त्याच्याशी सहमत होत नव्हतो. हे कळल्यानंतर शेवटी तो मला म्हणाला, ‘अरे अजइया, सुशांत बिहारी होता. कमीत कमी बिहारी असल्याच्या नात्याने तरी त्याच्या बाजूने बोल, त्यासाठी न्याय मिळवून दे,'

बिहारी असल्याचं जगाला उशिरा कळलं

इथे सांगायला हवं, माझं शालेय शिक्षण बिहारच्या सुपौल जिल्ह्यातल्या वीरपूर गावात झालं. सुशांत सिंग राजपूतची बिहारी ओळख त्याच्या संशयास्पद मृत्यूनंतर सर्वदूर पोचली. त्यापूर्वी तो बिहारी आहे हे फारच कमी लोकांना माहीत होतं. इंटरव्यूमधेही त्याने कधीही आपल्या बिहारी भूतकाळाचा उल्लेख केला नाही.

मनोज वायपेयी बिहारच्या बेतिया जिल्ह्यातल्या बेलवा गावांतले आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहितीय. त्याचप्रमाणे पंकज त्रिपाठी गोपालगंजच्या बेलसंड गावातले आहेत. शत्रुघ्न सिन्हा तर बिहारी बाबूच्या नावानेच जगप्रसिद्ध आहेत. शेखर सुमन यांनीही आपली बिहारची ओळख नेहमीच उघड केलीय. 

सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत तो पाटणाचा होता इतकीच माहिती उपलब्ध होती. साधारणपणे प्रत्येक बिहारी माणसाचं एखादं गाव किंवा खेडं असतं. सुशांत सिंग राजपूतच्या गावाबद्दल २०१९ मधे सगळ्यांना कळलं. तो पूर्णिया जिल्ह्यातल्या मलडिहा गावात १७ वर्षानंतर गेला होता. बिहारच्या स्थानिक पेपरात ही बातमी आली होती.

हेही वाचा : सुशांत सिंगला न्याय की राजकारण ?

मी पाटण्याचा ते लिहू नका

२०१३ मधे ‘काय पो छे’ हा त्याचा सिनेमा रिलीज झाला. तेव्हापासून त्याने आपला पीआरओ ठेवला होता. तेव्हा हिंदी आणि इंग्लिश मीडियातल्या ज्येष्ठ पत्रकारांना त्याने इंटरव्यू दिले होते. मला आठवतंय, मी माझ्या सवयीप्रमाणे त्याला त्याचं गाव विचारलं होतं. तेव्हा त्याने दिल्ली असं सांगितलं होतं. 

नंतर एका पत्रकार मित्राकडून तो बिहारी असल्याचं समजलं. मी पुढच्या भेटीवेळी त्याला विचारलं, ‘काय सुशांत, तुम्ही बिहारचे आहात? बिहारमधले कुठले?’ थोडं लाजत आणि हसत म्हणाला, 'मी पाटण्याचा आहे. पण लिहू नका.'
 
'एम एस धोनी' हा सिनेमा रिलीज होणार होता. तेव्हा काही तरुण पत्रकारांनी सुशांतला विचारलं की तो पाटणाचाच असल्यानं धोनीची भाषा पकडणं त्याला अवघड गेलं नसेल. त्यावर तो म्हणाला, ‘मी पाटण्याचा नाही. मी तर दिल्लीत शिकलोय.’ आता त्याच्याविषयी बरंच काही लिहिलं गेलंय. त्यात त्याचं शिक्षण पाटण्यातच झाल्याचं असं लिहिलं होतं.

एक लोकप्रिय अभिनेता जिवंत असताना का आणि  कोणत्या पूर्वग्रहांमुळे आपली मूळ ओळख लपवतो,  हे आपल्याला मानसशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ सांगतील. पण तोच अभिनेता त्याच्या मृत्यूनंतर त्याच लपवलेल्या ओळखीचं प्रतिक बनतो, ही फारच मजेशीर गोष्ट आहे.

अचानक सुशांत आपला का वाटतोय?

बिहार सरकारच्या सांगण्यावरून सीबीआयने सुशांत सिंग प्रकरण आपल्या हातात घेतलं. ५ ऑगस्टला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्वीट केलं होतं - ‘स्वर्गीय सुशांत सिंग राजपूतच्या वडलांनी पाटण्यात नोंदवलेल्या गुन्हाची सीबीआय चौकशी करण्याची राज्य सरकारची मागणी केंद्राने मंजूर केलीय. त्यासाठी केंद्र सरकारला धन्यवाद! आता चांगली चौकशी होईल आणि न्याय मिळेल अशी आशा आहे.’ 

आता त्यापुढे जाऊन बिहारमधे सत्तेत सहभागी असलेल्या भाजपच्या कला आणि संस्कृती आघाडीने नुकतेच सुशांतसाठी ‘ना भूले है! ना भूलने देंगे!’चे स्टिकर आणि पोस्टर छापून वाटले. पण २०१३ मधे सिनेमाच्या जगात आल्यापासून त्याच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत कधी बिहार सरकारने सुशांत सिंग राजपूतची कधी साधी दखलही घेतली नव्हती. त्याला कधी कोणता सन्मान किंवा पुरस्कार दिला नाही. किंवा कधी कुठल्या योजनेचा ब्रँड अँबेसेडर केलं नाही. 

आता अचानक त्याच्या मृत्यूनंतर तो बिहारचा होता हे सगळ्यांना आठवलं. आता हे प्रकरण जिवंत ठेवण्याचा जास्त फायदा भाजप आणि जेडीयूमधल्या कुणाला झाला हे बिहारच्या निवडणुकांचे निकाल आल्यावर कळेल.

हेही वाचा : अमर्याद सुरूय प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं

आजवर सिनेमात रस नव्हता

बिहार सरकारला सिनेमात रस नाही, हे जगजाहीर आहे. गेल्या काही वर्षांपासून रडत खडत चालणारा फिल्म फेस्टिवल अखेर बंद पडलाय. पुन्हा पुन्हा घोषणा करूनही बिहारमधे फिल्म सिटी उभारण्यावर ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. 

अगदी मूकपटांच्या जमान्यापासून बिहारी कलाकार सिनेमाशी जोडलेले आहेत. तरीही बिहार सरकार कोणत्याही बिहारी कलाकारांना कोणताही सन्मान आणि पुरस्कारही देत नाही. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकारांना आणि दिग्दर्शकांना आमंत्रित करण्याची आणि सन्मानित करण्याची औपचारिकताही मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या सरकारनं कधीही पार पाडली नाही. पण आता सुशांत सिंग राजपूत हा बिहारी असल्याबद्दल ते भावनिक होत आहेत. 

मला बिहारी म्हणून बोलावू नका

मला आठवतंय, पाटणामधे होत असलेल्या एका फिल्म फेस्टिवलसाठी मी स्वतः आणि फेस्टिवलचे अधिकारी प्रशांत कश्यप यांनी सुशांत सिंग राजपूतला बोलवण्याचे अनेक प्रयत्न केले होते. तो प्रत्येकवेळी टाळत होता. मला नाही पण प्रशांत कश्यप यांना त्याने सांगितलं की  बिहारी म्हणून मला पाटण्यात बोलवू नका अशी त्याने मला नाही पण प्रशांत कश्यप यांना विनंती केली होती. मी पुन्हा दुसऱ्या कोणत्यातरी कार्यक्रमाला येईन.

आत्ता काही महिन्यांपूर्वी फेब्रुवारी २०२० मधे बिहारच्या पूर्णिया जिल्हाचा २५० वा वर्धापन दिन होता. सुशांत पूर्णियाच्या मलडिहा गावाचा मूळ रहिवासी. त्याच्या  लोकप्रियतेमुळे पूर्णिया महोत्सवाचे आयोजक त्याला बोलावत होते. पण त्यांना त्यात यश मिळालं नाही. पुन्हा पुन्हा आग्रह करूनही सुशांत पूर्णियाला जायला तयार झाला नाही. 

हेही वाचा : संघर्ष करायचा की शरणागती पत्करायची, हे ठाकरे कुटुंबाला ठरवावं लागेल

प्रमाण भाषेत बोलण्याचा नियम आहे

खरंतर ही एकट्या सुशांतची गोष्ट नाही. बिहारच्या मागासलेपणाकडे बघून आपण बिहारचे असल्याची ओळख लपवली जाते, हे सगळ्यांनाच माहितीय. मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीतल्या कलाकारांसाठी तर आपली भाषा आणि तिचा हेल सोडण्याचा, प्रमाण भाषा बोलण्याचा अलिखित नियमच आहे. सगळ्या हिंदी भाषिक प्रदेशातून येणारे कलाकार या समस्येला तोंड देतात.

बिहारचे बहुतेक कलाकार भोजपुरी, मैथिली आणि मगही या आपल्या मातृभाषांमधे बोलताना आढळत नाहीत. अनुभव सिन्हा आणि मनोज वायपेयी यांनाही भोजपुरी ऑडियो विज्युअल माध्यमात काही करण्यासाठी २० वर्षांपेक्षा जास्त काळ लागला. त्यांचा ‘बंबई में का बा?’ हा भोजपूरी रॅप नुकताच तर आलाय.

हेही वाचा : 

भल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी

कॅगने दाखवलंय जलयुक्तमधलं झोलयुक्त शिवार (भाग १)

सोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ

ऑन ड्युटी ठाण्यात बसून पांडेजी नेमकी कुणाची शिट्टी वाजवतायत?

बेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र

(लेखक हिंदीतले ज्येष्ठ फिल्मी पत्रकार असून नवभारत टाइम्समधे प्रसिद्ध झालेल्या लेखाचा रेणुका कल्पना यांनी अनुवाद केला आहे. आभार: नवभारत टाइम्स.)