कोरोनाची लक्षणं असतानाही टेस्ट निगेटिव कशी येते?

०७ मे २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


कोरोनाची सगळी लक्षणं दिसत असतानाही पेशंटची आरटीपीसीआर टेस्ट अनेकदा निगेटिव येते. यालाच फॉल्स निगेटिव असं म्हणतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अशी फॉल्स निगेटिव रिझल्ट येणाऱ्यांची संख्या फार वाढलीय. निगेटिव रिझल्टमुळे पेशंटना उपचार मिळायलाही उशीर होतोय. 

कोरोना वायरसची सगळी लक्षणं दिसतात. ताप येतो, सर्दी, घसा दुखी जाणवत असते. डोकं दुखतं, चव लागत नाही, वास येत नाही. अगदी घरातल्या, सतत संपर्कात असणारं माणूस कोरोनानं आजारी आहे आणि आपल्यालाही अशी लक्षणं दिसतायत. याचा अर्थ आपल्यालाही कोरोनाची लागण झालेली असणार म्हणून अनेकजण लगबगीनं कोरोना वायरसची आरटीपीसीआर टेस्ट करायला जातात. दोन दिवस आजार अंगावर काढून टेस्टच्या रिपोर्टची वाट पाहिली जाते. आणि रिपोर्ट निगेटिव येतो.

अशावेळी आश्चर्याचा धक्काच बसतो. एवढी लक्षणं दिसत असून, संसर्ग झालेल्याच्या इतक्या संपर्कात असूनही कोरोनाची टेस्ट निगेटिव कशी आली हे काही आपल्याला कळत नाही. रिपोर्ट पॉझिटिव असल्याशिवाय कोरोनाचे उपचार सुरू होणार नसतात. शिवाय, अशा पेशंटला कोरोना वॉर्डमधे ठेवावं तरी पंचाईत आणि नाही ठेवावं तरी पंचाई. म्हणून हॉस्पिटलमधे ऍडमिशनही मिळत नाही. आजार वाढत राहतो आणि नेमकं काय करावं या संभ्रमात माणसं राहतात.

कोरोनाचा सामना केलेल्यांकडून असल्या स्टोऱ्या आपण अनेकदा ऐकल्या असतील. कोरोना वायरसच्या दुसऱ्या लाटेत तर अशा प्रकरणांमधे भरपूर वाढ झाली. टेस्ट फॉल्स निगेटिव येण्याचं प्रमाण दुसऱ्या लाटेत भरपूर वाढलं असल्याचं म्हटलं जातंय.

कोरोनाची लक्षणं दिसत असतील तर टेस्ट पॉझिटिव येण्याची वाट पाहू नका, लगेच उपचार सुरू करा असं एआयआयएसएसचे अध्यक्ष डॉ. रणदीप गुलेरिया यांनी यांनी सांगितलं होतं. ४ मेला कर्नाटक सरकारनेही कोरोनाची लक्षणं दिसणाऱ्या पेशंटची कोरोना टेस्ट निगेटिव आली असेल तरी पेशंट गंभीर असल्यास हॉस्पिटलमधे भरती करून घेण्याच्या सूचना दिल्यात.

हेही वाचा : डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

आरटीपीसीआरची विश्वासार्हता

अमेरिकेतल्या जॉन हॉपकिन्स युनिवर्सिटीकडून झालेल्या एका संशोधनानुसार प्रत्येक ५ पैकी एक आरटीपीसीआर टेस्टचे फॉल्स निगेटिव रिझल्ट येतात. भारतातही हाच ट्रेण्ड सध्या दिसतोय. दुसऱ्या लाटेत लागण झालेल्यांपैकी जवळपास २० टक्के लोकांची टेस्ट फॉल्स निगेटिव येतेय.

कोरोना वायरसच्या सुरवातीपासूनच आरटीपीसीआर टेस्ट ही संसर्गाचं निदान करण्यासाठी सगळ्यात विश्वासार्ह चाचणी मानली गेलीय. नाही म्हणायला अँटीजन टेस्टचीही मदत घेतली जाते. पण अँटीजन टेस्ट संपूर्णतः विश्वासार्ह नाही, हे स्वतः डॉक्टरही सांगतात. म्हणूनच तर अँटीजन टेस्ट निगेटिव आली असेल तरी आरटीपीसीआर टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. अँटीजन टेस्ट पॉझिटिव आली तर कोरोनाचे उपचार सुरू केले जातात. पण त्यानंतरही अनेकदा हॉस्पिटलमधे ऍडमिट झालेल्या पेशंटची आरटीपीसीआर टेस्ट केलीच जाते.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेनुसार, आरटीपीसीआर टेस्टची वायरसचं निदान करण्याची क्षमता ९५ टक्के असल्याचं सांगितलं गेलंय. म्हणजेच, ही चाचणी विश्वासार्ह असली तरी ५ टक्के चुकीचे रिझल्टही येऊ शकतात. आरटीपीसीआर टेस्टची क्षमता नसणं यासोबतच इतरही काही गोष्टी फॉल्स निगेटिवला कारणीभूत ठरतात.

टेस्टिंगची वेळ महत्त्वाची

पहिली गोष्ट म्हणजे, टेस्ट करायची वेळ. जॉन हॉपकिन्स युनिवर्सिटीकडून झालेल्या संशोधनातून फॉल्स निगेटिव येणाऱ्या काही टेस्ट या वायरसचा संसर्ग झाल्यानंतर लगेचच केल्या आहेत, असं समोर आलं. संसर्ग झाल्यानंतर लगेचच वायरस टेस्ट केली तर वायरसचं निदान होत नाही. या संशोधनानुसार, संसर्ग झाल्यानंतरच्या पहिल्या दिवशी टेस्ट केली तर टेस्ट १०० टक्के फॉल्स निगेटिवच येते.

संसर्ग झाल्यानंतर ४ ते ५ दिवसांनी टेस्ट केली तर रिपोर्ट निगेटिव येण्याचं प्रमाण ३३ टक्केच असतं, असंही या संशोधनात सांगितलंय. एकदा का हे ४-५ दिवस उलटले की कोरोनाची लक्षणं दिसू लागतात. ही लक्षणं दिसू लागल्यावर साधारण दोन दिवसांनी म्हणजेच संसर्ग झाल्यानंतर ७-८ दिवसांनी टेस्ट केली तर फॉल्स निगेटिव येण्याचं प्रमाण २० टक्केच उरतं.

हेही वाचा : १०२ वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धात धुमाकूळ घातलेल्या वायरसचा धडा काय?

म्युटेटेड वायरस

टेस्टिंगची वेळ हा फॉल्स निगेटिव येण्यामागचं महत्त्वाचं कारण नसून वायरस म्युटेशन हे आहे, असंही म्हटलं जातंय. आरटीपीसीआर टेस्ट करताना स्वॅबमधे संपूर्ण वायरस तपासता येत नाही. तर त्या वायरसचे काही भाग किंवा जीन्स आहे की नाही हे पाहिलं जातं. वायरसचं म्युटेशन झालं असेल आणि नेमकं आरटीपीसीआरमधे सापडणाऱ्या जीन्समधे बदल झाले असतील तर वायरसचा संसर्ग नाही असा निष्कर्ष निघतो आणि टेस्ट फॉल्स निगेटिव येते.

भारताततल्या आरटीपीसीआरमधे वायरसचे अनेक जीन्स शोधले जातात. त्यामुळे या टेस्टला वायरसनं चकवा देणं थोडी अवघडच गोष्ट आहे. शिवाय, आरटीपीसीआर टेस्टमधून युके, ब्राझील, साऊथ आफ्रिका असं कोणतंही वेरियंट सुटत नाही असं भारत सरकारच्या १६ एप्रिलच्या प्रेस नोटमधे सांगण्यात आलंय. पण तरीही वायरसच्या म्युटेशनकडे फॉल्स निगेटिवची एक शक्यता म्हणून पाहिलं जातंय.

प्रशिक्षित स्टाफची कमतरता

प्रशिक्षित स्टाफची कमतरता हाही फॉल्स निगेटिव येण्यामागचा महत्त्वाचा मुद्दा मानला जातोय. कोरोना विरोधातल्या युद्धाचा चेहरा मानले जाणारे आयसीएमआरचे साथरोगतज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर न्यूज १८ डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, ‘आरटीपीसीआरच्या नजरेतून सुटणारा वायरसचा एखादा वेरियंट आला आहे की नाही याबाबत आत्तापर्यंत पुरेशी माहिती आणि संशोधन झालेलं नाही. पण स्वॅब घेण्याच्या चुकीच्या पद्धतीचा टेस्टवर परिणाम होऊ शकतो याबद्दल काही पुरावे आपल्याकडे आहेत.’ 

पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनाची लक्षणं दिसणाऱ्यांची संख्या दुसऱ्या लाटेत फारच जास्त आहे. त्यामुळेच आरटीपीसीआर टेस्ट करणाऱ्या खासगी लॅब आणि सरकारी केंद्रांचीही संख्या वाढवायला लागलीय. वेळेअभावी टेस्टचं सॅम्पल गोळा करायला येणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचं नीट प्रशिक्षण झालेलं नाहीय. नाकाच्या किंवा तोंड्याच्या नेमक्या  भागातून पुरेसं सॅम्पल गोळा न झाल्यानंही घोळ होऊ शकतो, असं डॉ. गंगाखेडकर याचं म्हणणं आहे.

हेही वाचा : जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

एका टेस्टवर विसंबायला नको

कोरोनाचा वाढता आलेख आणि टेस्टची अचानक वाढलेली मागणी यामुळे आरटीपीसीआर टेस्टचं नियोजन करणाऱ्या व्यवस्थेवरही प्रचंड ताण आलाय. बहुतेक प्रायवेट पॅथोलॉजी लॅबमधेही टेस्टचं सॅम्पल घ्यायला दोन दोन दिवसांचं वेटिंग सांगतात. स्वॅब सॅम्पल गोळा करणारी सरकारी केंद्रात चाचणी लगेच होत असली तरी प्रायवेट लॅबप्रमाणेच इथंही रिपोर्ट यायला दोन तीन दिवसांचा वेळ जावाच लागतो.

लक्षणं दिसू लागल्यानंतर दोन दिवसांनी टेस्टिंग, त्यानंतर जवळपास तीन दिवसांनी रिपोर्ट अशात आजाराचे महत्त्वाचे सात ते आठ दिवस निघून जातात. एवढा महत्त्वाचा वेळ निघून गेल्यानंतरही टेस्ट निगेटिव आली तर पेशंटला उपचार मिळत नाही. अनेकदा, आपली टेस्ट निगेटिव आहे म्हणजे आपल्याला कोरोना झालेला नाही या समजात पेशंट क्वारंटाईनचे नियमही पाळत नाहीत. त्यामुळे प्रसार व्हायलाही मदत होऊ शकते.

हे सगळं टाळण्यासाठी कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर लगेचच उपचार सुरू करणं हाच आत्ताच्या परिस्थितीतला सोपा मार्ग आहे. लक्षणं दिसत असतील तर ऑक्सिजन लेवल चेक करत राहायला हवी. सगळ्यात महत्त्वाचं, एकाच टेस्टवर विसंबून राहणं योग्य नाही. पुन्हा टेस्ट करणं, एचआरसीटी किंवा थेट फुफ्फुसात किती संसर्ग आहे हे शोधणारी ब्रांचोस्कोपीसारखी टेस्ट डॉक्टरांच्या सल्ल्यानं करून घ्यायला हवी. एका टेस्टचा रिपोर्ट निगेटिव आला म्हणून बिनधास्त राहणं आपल्याला महागात पडू शकतं.

हेही वाचा : 

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोनाशी धर्माचा संबंध लावणाऱ्यांचं काय करायचं बरं?

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया