आपल्याला अग्निवेश यांच्यासारखे 'स्वामी' का नको असतात?

१४ सप्टेंबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


सामाजिक न्यायासाठी सातत्याने लढा देणाऱ्या स्वामी अग्निवेश यांचं नुकतंच निधन झालं. वेठबिगारी, बालमजुरी, स्त्रीभ्रूणहत्या अशा अनेक विषयांवर त्यांनी काम केलं. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते धार्मिक सलोख्यासाठी प्रयत्नशील राहिले. सध्याच्या धर्माधारीत राजकीय ध्रुवीकरणाच्या काळात त्यांची सर्वधर्मसमभावाची भूमिका अनेकांना पचणारी नव्हती. त्यासाठी त्यांना हिंदूविरोधी ठरवून ट्रोल करण्यात आलं. त्यांच्यावर हल्ले झाले.

आर्य समाजाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते केवळ एवढीच ओळख स्वामी अग्निवेश यांची नव्हती. त्यांनी त्यापलीकडे जाऊन सामाजिक न्यायाच्या तत्वाकडे पाहिलं. भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांशी ते कायम प्रामाणिक राहिले आणि म्हणूनच राज्यघटनेला अपेक्षित असलेलं न्यायाचं तत्व त्यांनी जोपासलं. वाढवलं. कोणत्याही कार्यक्रमात त्यांच्या अंगावरचं भगवं वस्त्र उठून दिसायचं. कारण त्यात संयम होता. शांतता होती. त्यामागे एक भूमिका होती. मानवी हक्कांचा विचार होता. हीच खरी तर या देशाची ओळख आहे. पण धर्माच्या ठेकेदारांना ती खुपणारी होती.

कायदा शिकले आणि मॅनेजमेंटही

२१ सप्टेंबर १९३९ मधे छत्तीसगडमधे स्वामी अग्निवेश  यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव वेपा शाम राव असं होतं. घरच वातावरण रूढी, परंपरा यांचा पगडा असलेलं होतं. लहानपणीच वडलांचं निधन झाल्यामुळे त्यांचं पालनपोषण आजोबांनी केलं. आताच्या छत्तीसगडमधल्या गोंड राजांच्या सक्ती संस्थानात त्यांचे आजोबा दिवाण होते. अग्निवेश यांनी कोलकात्यात कायदा आणि बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं. त्यानंतर कोलकात्याच्याच सेंट झेंवियर्स कॉलेजमधे शिक्षक म्हणून जॉइन झाले.

पुढे भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलेल्या सब्यसाची मुखर्जी यांच्या हाताखाली त्यांनी ज्युनियर म्हणून वकिलीचे धडे घेतले.  कोलकात्याच्या सेंट झेंवियर्स कॉलेजमधे शिक्षक म्हणून नोकरी करत असताना आर्य समाजाच्या विचारांनी ते प्रभावित झाले.

हेही वाचा : केशवानंद भारतीः संविधान रक्षणाला कारण ठरलेले धर्मगुरू

आर्य समाजाने नाकारलं तरीही

अग्निवेश १९७० मधे संन्यास घेऊन आर्य समाजामधे सामील झाले. तेव्हा ते ३१ वर्षांचे होते. संन्यास घेतल्यावर वेपा शाम राव हे स्वामी अग्निवेश या नावाने ओळखले जाऊ लागले. ज्या आर्य समाजात ते सामील झाले ती हिंदू धर्मातली एक सुधारणावादी चळवळ होती. १८७५ मधे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. 

स्वामी अग्निवेश यांनी आर्य समाजातल्या पुरोगामी विचारप्रवाहाचं प्रतिनिधित्व केलं. त्यांनी वैदिक समाजवाद नावाचं पुस्तकही त्यांनी लिहिलं होतं. आर्य समाजाच्या जागतिक परिषदेचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. या समाजाचा वैदिक परंपरेवरही विश्वास होता. तो विश्वास ठेवताना त्यांनी मूर्तीपूजा, अवतार, हिंसा, जातिभेद, कर्मकांड आणि अंधश्रद्धा यांना मात्र नकार दिला. 

आर्य समाजाच्या मुख्य प्रवाहाने त्यांच्या पुरोगामी विचारांमुळे त्यांना नाकारलं. तरी अग्निवेश यांनी ही सगळी परंपरा आपली मानली. समाजातले वेगवेगळे प्रवाह समजून घेताना त्यांच्यावरचा वैदिक आणि गांधीवादी तत्वज्ञानाचा प्रभाव मात्र ओसरला नाही. मनात खोलवर हे सगळं होत. वैदिक धर्माचा पुरस्कार केला असला तरी स्वामी अग्निवेश जातिव्यवस्था, शोषण, अन्याय अत्याचारा विरोधात ठामपणे उभे राहिले. 

वेठबिगारांसाठी मंत्रिपदाचा राजीनामा

स्वामी अग्निवेश यांनी आर्य सभा नावाचा पक्ष स्थापन केला होता. जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनानं देशातल्या तरुणांची फळी भारावून गेली होती. त्यांनी उभ्या केलेल्या आंदोलनात स्वामी अग्निवेशही होते. आर्य समाजाच्या विचारांवर काम करणारा राजकीय पक्ष असावा या उद्देशानं त्यांनी १९६८ मधे आर्य सभा हा पक्ष स्थापन केला. 

आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. १४ महिन्याची शिक्षा झाली. पुढच्या निवडणुकीत इंदिरा गांधी पायउतार झाल्या. १९७७ मधे अग्निवेश पहिल्यांदा हरयाणाच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले. तत्कालीन चौधरी भजनलाल सरकारमधे शिक्षणमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. 

मंत्री पदावर असतानाही त्यांनी समाजातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर काम केलं. आवश्यक तिथं आवाज उठवला. वेठबिगारांच्या प्रश्नावर १९८१ मधे बंधुआ मुक्ती मोर्चा नावाची एक संघटना काढली. आजतागयत ते या संघटनेचे अध्यक्ष होते. मंत्री पदावर काम करताना फरीदाबादमधे या वेठबिगार कामगारांवर पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला होता. त्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीय हे दिसताच राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडले. राजकारण सोडून त्यांनी लोकांना सोबत घेतलं आणि जन आंदोलन उभं केलं. 

२०१६ मधे नितीश कुमार यांच्या बिहारमधल्या नशाबंदी कार्यक्रमामुळे ते प्रभावित झाले होते. त्यातूनच त्यांनी जेडीयुत सामील होण्याचा निर्णय घेतला. राजकारणातली ही त्यांची दुसरी एंट्री होती. पण या दलदलीच्या राजकारणातही ते फारसे रमले नाहीत.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

बाळासाठी सुरक्षित असेल का कोरोनाग्रस्त आईचं दुध?

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

वेठबिगार, सतीविरोध ते नर्मदा बचाव

१९८० च्या दरम्यान त्यांनी बंधुआ मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून वेठबिगारीच्या प्रश्नावर काम केलं. कोर्टात जनहित याचिका दाखल केली. वेठबिगारीच्या प्रश्नावर लोक चळवळ उभी करताना त्यांना तुरुंगातही जावं लागलं. बालमजुरी आणि स्त्रीभ्रूणहत्येच्या विरोधातही त्यांनी मोहीम उघडली होती. जगन्नाथ पुरीच्या मंदिरात बिगरहिंदूंना प्रवेश मिळावा अशी मागणी त्यांनी लावून धरली. धर्माचा ठेका घेतलेल्यांना ही गोष्ट पचणारी नव्हती. आपल्या सामाजिक, धार्मिक सुधारणावादी भूमिकेवर स्वामी अग्निवेश कायम ठाम राहिले.

१९८७ मधे राजस्थानात सती प्रथेचं एक उदाहरण समोर आलं होतं. ही घटना धक्कादायक होती. त्याला विरोध आणि घटनेचा निषेध म्हणून त्यांनी दिल्ली ते राजस्थान अशी १८ दिवसांची पदयात्रा काढली. धार्मिक दंग्यांच्या विरोधात सर्वधर्मीय मोर्चा काढला. ठिकठिकाणी व्याख्यानं दिली. धार्मिक कट्टरतावादाला उत्तर म्हणून 'रिलिजन फॉर सोशल जस्टीस' या नावानं एक मंच उभा केला.

नक्षलवाद्यांशी हितसंबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर सातत्याने होत राहिले. नक्षलवाद्यांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यासाठी राज्यकर्त्यांशी संवाद घडवणं हा त्यांचा त्यामागचा उद्देश होता. त्यासाठी त्यांना विरोध सहन करावा लागला. किंमत मोजावी लागली. नर्मदा बचाव आंदोलनात मेधा पाटकर यांच्या बरोबरीने त्यांचा सक्रिय सहभाग होता. २००४ मधे नोबेलच्या तोडीचा ‘राइट लाइवलीहूड अवार्ड’ हा आंतरराष्ट्रीय मानाचा पुरस्कार मिळणं ही त्यांच्या कामाची पोचपावती होती.

जनलोकपाल आंदोलनात सहभाग

२०११ मधे अण्णा हजारे यांचं भ्रष्टाचारविरोधी आंदोलन देशभर ऐन भरात होतं. जनलोकपाल कायद्याची मागणी केली जात होती. त्यासाठी वातावरणही तयार केलं जातं होतं. अण्णा हजारेंची एक स्वतःची टीम होती. यात अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, प्रशांत भूषण, किरण बेदी यांच्या बरोबरीनं स्वामी अग्निवेश यांचाही समावेश होता. 'टीम अण्णा' म्हणून हे सगळे ओळखले जायचे. अण्णा हजारेंच्या या काळातल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांमधे या सगळ्यांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची होती. तत्कालीन यूपीए सरकारच्या विरोधात वातावरण तयार करायला या आंदोलनामुळे मदत झाली.

देशभर भ्रष्टाचार हा मुद्दा चर्चेत राहिला. 'टीम अण्णा' हे त्यावेळी न्यूज चॅनेलसमोरचे चेहरे होते. दिल्लीतल्या जंतरमंतरवरच्या आंदोलनात स्वामी अग्निवेश यांचा सक्रिय सहभाग असायचा. पण हे सगळं घडत असताना पंतप्रधान आणि न्यायपालिकेला लोकपालच्या कार्यकक्षेत आणावं की नाही यावरून स्वामी अग्निवेश यांचे मतभेद निर्माण झाले. त्याचवेळी तत्कालीन सरकारमधे मंत्री असलेल्या कपिल सिब्बल आणि स्वामी अग्निवेश यांच्यातली एक कथित ऑडियो क्लिप समोर आली. त्यावरून वाद निर्माण झाला. शेवटी टीम अण्णामधून स्वामी अग्निवेश बाहेर पडले.

हेही वाचा : सगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात?

अग्निवेश कायम चर्चेत राहिले

सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस या रिएलिटी शोमधे स्वामी अग्निवेश यांनी सहभाग घेतला होता. २०११ मधे स्पर्धक म्हणून या शोमधे ते सामील झाले. पण या धांगडधिंग्यात ते जास्त काळ रमले नाहीत. तीन दिवसानंतर ते या शोमधून बाहेर पडले.

धार्मिक विषयांवरची त्यांची अनेक विधानं वादग्रस्त ठरली. विशेषतः अमरनाथमधे भगवान शंकर नसून फक्त बर्फाचा गोळा आहे, हे त्यांचं वक्तव्य हिंदुत्ववाद्याना पचलं नाही. खरं तर ते आर्य समाजाच्या मूर्तिपूजाविरोधी तत्त्वांना अनुसरुनच होतं. पण त्यांना हिंदूविरोधी ठरवण्यात आलं. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर त्यांनी राजभवनावर मोर्चा काढला होता. त्यामुळे या विरोधात भर पडली होती. 

ते जात तिथं त्यांना या विरोधाचा सामना करावा लागला. २०१८ मधे झारखंडमधल्या एका कार्यक्रमाच्या वेळी त्यांना मारहाण करण्यात आली. हॉटेलमधून बाहेर येताना भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे कपडे फाडले गेले. त्याचा विडीयोही वायरल झाला. महिन्याभरात अशीच घटना दिल्लीत घडली. 

म्हणून हे स्वामी वेगळे होते

माजी सीबीआय डायरेक्टर एम. नागेश्वर राव यांनी अग्निवेश यांच्या मृत्यूनंतर एक वादग्रस्त ट्विट केलंय, 'बरी सुटका झाली. स्वामी अग्निवेश, तुम्ही भगव्या पोशाखातले हिंदूविरोधी होता. तुम्ही हिंदुत्ववादाचं मोठं नुकसान केलंय. तुमचा जन्म तेलुगू ब्राह्मण म्हणून झाला याची मला लाज वाटते.' 

सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारचा विखार पसरवला जाणं यात नवीन काहीच नाहीय. हा विखार समाजाचा भाग बनत जातोय ही काळजी करायला लावणारी गोष्ट आहे. स्वामी अग्निवेश अखेरपर्यंत या विखाराच्या विरोधातच लढत राहिले. त्यामुळे या विखारावर जगणाऱ्यांनी त्यांना आयुष्यभर त्रास दिला.

वेगवेगळ्या रंगांना घट्ट करू पाहणारी देशातली सर्वसमावेशकता ही आपल्या लोकशाहीची गरज आहे. हीच आपली ओळख बनायला हवी. अग्निवेश यांच्यासारख्या 'स्वामीं'मुळे ही ओळख अधिक घट्ट बनलीय. असा स्वामी कोणत्या एका धर्माचा नसतो तर तो सर्व धर्मियांचा असतो. त्याला धर्माच्या विशिष्ट रंगात पाहता येणार नाही. समाजातल्या अनिष्ट प्रथा परंपरांवर अग्निवेश यांनी हल्ले करणं हा इथल्या सुधारणावादी चळवळीचा एक भाग आहे. आपण त्याच्याकडे सोयीनं पाहतो. ते तसं पाहणं हेच खरंतर आपल्या सोयीचं असतं. 

सध्याच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या काळात त्यांची सर्वधर्मसमभावाची भूमिका म्हणूनच अनेकांना पचणारी नव्हती. रुचणारी नव्हती. त्यासाठी त्यांना हिंदू विरोधी ठरवून ट्रोल करण्यात आलं. भारतीय राज्यघटनेची मूल्य त्यांच्या आचार विचारांचा भाग होती. त्यांची परखड, थेट समाजाला आरसा दाखवणारी पण तितकीच संयमी मांडणी समजून न घेणं याला समाज म्हणून आपण सगळेच जबाबदार आहोत. भगवं वस्त्र घालून लोकांना नादाला लावण्याच्या, मानसिक गुलाम बनवण्याच्या काळात अग्निवेश यांच्यासारखा 'स्वामी' श्रद्धेच्या बाजारात म्हणूनच वेगळा ठरतो.

हेही वाचा : 

संत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती

नाहीतर आपल्या अर्थव्यवस्थेचं खरं नाही!

कोरोनाकाळात टाळायच्या सहा आर्थिक चुका

वारी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे 

ऑनलाईन शिक्षणाचा ध्यास घेणाऱ्या शिक्षकांना ‘नितळी’च म्हणायला हवं

या बाळंतपणाने सरकारी आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास जन्माला घातलाय