टोमॅटो फ्रिजमधे ठेवणं योग्य नाही, असं शास्त्रज्ञ का म्हणतात?

२० मे २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


लॉकडाऊन असला तरी खाणं कुणाला चुकलंय. उलट आता लोक जास्तीचं साठवून ठेवत आहेत. फ्रिजचा वापर वाढलाय. मंडईतून आणलेली प्रत्येक गोष्ट आपण फ्रिजमधे कोंबतो. फळं, भाज्या सारंकाही फ्रीजमधेच ठेवायला हवं, नॉर्मल वातावरणात ते खराब होतात, असा आपला त्यामागं समजही असतो. काही गोष्टींसाठी हा समज खराय. पण टोमॅटोच्या बाबतीत हा गैरसमज आहे. टोमॅटो फ्रिजमधे ठेवणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे.

लॉकडाऊन असो वा नसो आपण सगळेच आठवड्यातून एकदातरी भाजीपाला घ्यायला घराबाहेर जातो. रोजच्या भाज्यांसोबतच कांदा, बटाटा, टोमॅटो अशा मुख्य भाज्यांना चव देणाऱ्या, आधार देणाऱ्या फळभाज्या आणि कंदमुळंही आपण आणतो. बाजारातून घरी आल्यावर या भाजीचं काय होतं? सगळ्यात पहिले ही भाजी पिशवीतून मोठ्या परातीत किंवा भांड्यात येते. त्यानंतर कांदे आणि बटाटे सोडले तर उरलेल्या सगळ्या भाज्या आपण स्वच्छ धुवून घेतो आणि मग त्याचं वर्गीकरण सुरू होतं.

कांदे, बटाट्याची वेगळी टोपली पाणी लागणार नाही अशा भागात ठेवलेली असते. लसणालाही तिथेच आसपास जागा मिळते. निवडायच्या भाज्या वेगळ्या काढल्या जातात. पालेभाज्या वेगळ्या, कोथिंबीर वेगळी, वाटाणे वेगळे, मिरच्या वेगळ्या असं सगळं वेगवेगळ्या भाड्यांत किंवा कापडी पिशवीत भरून आपण फ्रिजमधे खाली असणाऱ्या डब्ब्यात भरून ठेवतो. साहजिकच, टोमॅटोही आपल्याकडून सगळ्यांसोबत फ्रिजमधे भरडले जातात. भाज्यांवर असणाऱ्या जिवाणूंची वाढ होऊन भाज्या लवकर कुजू नयेत, खराब होऊ नयेत म्हणून आपण फ्रिजमधे ठेवतो.
 
कुणी म्हणेल, हे इतकं साधं सोपं तर आहे. कांदे बटाटे सोडून सगळं फ्रिजमधे टाकायचं. पण टोमॅटो ही फळभाजी फ्रिजमधे ठेवणं अत्यंत चुकीची गोष्ट आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? उलट, फ्रिजमधे म्हणजे थंड हवामानात ठेवण्यापेक्षा गरम हवामानात किंवा भारतासारख्या उष्ण देशात नेहमीसारख्या नॉर्मल वातावरणात टोमॅटो ठेवायला हवेत. त्यामुळे ते चांगले टिकतील हे आपल्याला आजपर्यंत कुणी सांगितलं तरी होतं का? पण हे खरं आहे.

हेही वाचा : कोलंबसने नेलेल्या साथरोगांनीच संपवली मूळ अमेरिकी संस्कृती

टोमॅटोनं हृदय चांगलं राहतं

वनस्पतिशास्त्रानुसार, टोमॅटो हे फळ मानलं जातं. आपण मात्र टोमॅटोचा वापर भाजीसारखाच करतो. भारतात तर त्याला फळभाजी म्हणूनच ओळखलं जातं. कच्च्या टोमॅटोची भाजी, किंवा टोमॅटोचं सूप, कोशिंबीर, टोमॅटो भात, प्यूरी असे अनेक पदार्थ भारतात बनवले जातात. 

या टोमॅटोत अँटीऑक्सिडंट लाइकोपीन नावाची एक गोष्ट भरपूर प्रमाणात सापडते. अँटीऑक्सिडंट म्हणजे ऑक्सिडंटविरोधी आणि ऑक्सिडंट हा शरीरासाठी घातक असा एक पदार्थ असतो. याशिवाय, शरीराला पोषण देणारे असे पोटॅशियम, फोलेट, विटॅमिन के आणि विटॅमिन सी असेही घटक टोमॅटोत असतात. त्यामुळेच नियमितपणे टोमॅटो खाल्ल्याने हृदयरोग, कॅन्सर यांपासून संरक्षण होतं.

टोमॅटोचं जन्मगाव कुठलं?

इतिहासात अनेक ठिकाणांहून वेगवेगळी माणसं भारतात रहायला आल्याचे पुरावे सापडतात. ही माणसं आली तेव्हा नुसतीच आली नाहीत तर येताना आपापलं अन्नही सोबत घेऊन आली. अगदी सुरवातीला आर्य आले तेव्हाही त्यांनी स्वतःसोबत एक विशिष्ट प्रकारचं पीक आणल्याचं म्हटलं जातं. त्यानंतरही अनेक राजे भारतात आले आणि त्यांच्या त्यांच्या खाद्य संस्कृतीचा प्रभाव भारतावर पडत राहिला. त्यात भारताची जमीन इतकी मस्त सुपीक, इथलं वातावरण इतकं मस्त की कुठूनही कुठलंही झाड, रोप आणा ते इथल्या मातीशी नाळ सांगत इथं रूजतंच आणि भरभरून वाढतंच.

अशाच प्रकारे आपल्याकडे डच आले तेव्हा त्यांनी येताना बटाटा आणला. त्याआधी भारतात बटाटाच नव्हता. डचांनी सोबत साबुदाणाही आणला असल्याचं इतिहासात दिसतं. मग डच येण्यापूर्वी लोक उपवासाला काय खात असतील, असा प्रश्न पडतो. अशाच प्रकारे टोमॅटोची ओळख भारताला पोर्तुगीज लोकांनी करून दिली. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन म्हणजेच इस्रोद्वारे प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या मासिकाच्या एका अंकात या टोमॅटोचा सगळा इतिहास सांगितलाय.

इस्रोमधल्या लेखात सांगितल्याप्रमाणे, पोर्तुगीजांना हा टोमॅटो मिळाला तो अमेरिकेत. उत्तर आणि मध्य अमेरिकेच्या काही भागात म्हणजे आत्ताच्या मॅक्सिकोमधे हे पीक नैसर्गिकरित्या उगवत होतं. १५ व्या शतकात कोलंबस अमेरिकेला गेल्यावर युरोपियन लोकांना हे फळ मिळालं. पृथ्वीच्या मध्यभागी, उष्ण वातावरणात उगवणारं हे फळ त्यांना महत्त्वाचं वाटलं. तिथले लोकही टोमॅटो खात होते. त्यामुळेच कोलंबसच्या वाटेनं टोमॅटो युरोपात दाखल झाला.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

गोरगरीब जनतेचा सफरचंद

पण सगळ्या युरोपियांनी या फळाला लगेच स्वीकारलं नाही. कारण याची पानं इंग्लडमधल्या एका विषारी झाडासारखी दिसायची. त्यामुळे हे फळ विषारी आहे अशी भीती त्यांना वाटत होती. शिवाय, या फळामुळे लोक मरतात अशीही युरोपियांची समजूत झाली होती. युरोपियन अँरिस्टोक्रॅट म्हणजे जमीनदार लोक लीडच्या भांड्यात जेवायचे. टोमॅटो अशा भांड्यात वाढला तर त्याची केमिकल रिऍक्शन झाल्यामुळे लोकांना त्रास होतो, हे नंतर लक्षात आलं.

याउलट युरोपातली गरीब माणसं साध्या लाकडापासून बनवलेल्या ताटातून जेवत होती. त्यामुळे त्यांना टोमॅटो रुचकरही लागत होता आणि त्याचे चांगले परिणाम त्यांच्या आरोग्यावरही दिसत होते. म्हणूनच युरोपात टोमॅटो स्वीकारला गेला ते ‘गरीबांचं सफरचंद’ या नावाने.

भारतात टोमॅटो कसा आला?

टोमॅटोला टोमॅटो हे नाव स्पॅनिश भाषेतून मिळालं. भारतात पोर्तुगीजांनी टोमॅटोची आयात करायला सुरवात केली. पण ब्रिटीश आले तेव्हा त्यांनी टोमॅटो भारतातच उगवायला सुरवात केली. आजरोजी भारत जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा टोमॅटो उत्पादक देश आहे. दरवर्षी सुमारे १२० लाख टन एवढं उत्पादन भारतात होतं. देशात सर्वाधिक टोमॅटो उत्पादन आंध्र प्रदेशमधे घेतलं जातं.

आता तर भारतीय सिनेमातही टोमॅटो झळकू लागलाय. जिंदगी ना मिलेगी दोबारा या सिनेमात दाखवलेला स्पेनमधला टोमॅटिनो उत्सव आपण सगळ्यांनीच पाहिला असेल. ही टोमॅटोची रंगपंचमी खेळायला आपल्यालाही आवडेल.

हेही वाचा : वाचा मटका किंग रतन खत्रीची सगळी कुंडली

टोमॅटोविषयीचं संशोधन काय सांगतं?

असा रसरशीत इतिहास असणारं हे फळ फ्रीजमधे ठेवलं तर त्याच्या आतल्या रसाची म्हणजेच गराची सगळी चवच जाते, असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. सोप्या शब्दात सांगायचं, तर फ्रिजमधे ठेवल्याने टोमॅटोच्या पेशी गारठतात आणि आकुंचन पावतात. अगदी ५४ डिग्रीपेक्षा कमी वातावरणात टोमॅटो ठेवले तरीही टोमॅटोची अशी अवस्था होऊ लागते.

सीबीएसएन न्यूजच्या एका लेखात सांगितल्याप्रमाणे, फ्लोरिडा युनिवर्सिटतल्या संशोधक डेनिस टायमॅन आणि चीनमधल्या कॉर्नेल युनिवर्सिटीतल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी टोमॅटोवर संशोधन केलं. २०१६ मधे नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स पुढे हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं.

टोमॅटो १२ डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात साठवून ठेवले तर त्याचा वास आणि चव तयार करणाऱ्या केमिकल साखळ्या बनवण्याची त्याची ताकद कमी होते. फ्रिजमधे ठेवलेले टोमॅटो हे बेचव लागतात, असं त्यांना या संशोधनातून दाखवायचं होतं. त्यासाठी त्यांनी संपूर्ण पिकलेले असे लालचुटूक टोमॅटो ५ डिग्री सेल्सिअस या वातावरणात ठेवले. काही टोमॅटो एक दिवसासाठी, काही तीन तर काही सात दिवसांसाठी.

म्हणून नॉर्मल वातावरणातच ठेवा टोमॅटो

दिवस पूर्ण झाले की हे टोमॅटो बाहेर काढून साध्या वातावरणात ठेवले जात होते. आता यातले एक आणि तीन दिवस ५ डिग्री सेल्सिअसमधे काढलेल्या टोमॅटोला आपला वास आणि चव राखून ठेवता आली. पण आठवडाभर फ्रिजसारख्या वातावरणात राहिलेल्या टोमॅटोमधे वॉयलेट म्हणजे हालचाल करणाऱ्या कंपाउंडची पातळी झपाट्याने कमी झाल्याचं आढळलं. हे वॉयलेट कंपाउंड म्हणजे चव आणि वास देणाऱ्या गोष्टी.

काही टोमॅटोमधे ही पातळी ६५ टक्क्यांनी कमी झाल्याचं लक्षात आलं. त्यामुळेच सात दिवस फ्रिजमधे ठेवल्यानंतर पुन्हा साध्या वातावरणात टोमॅटो ठेवले तरी त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शिवाय, या सगळ्या टोमॅटोची चव लोकांना घ्यायला लावली तेव्हा एक किंवा तीन दिवस फ्रिजमधे ठेवलेल्या टोमॅटोपेक्षा सात दिवस ठेवलेले टोमॅटो जास्त बेचव असल्याचं ७६ लोकांनी सांगितलं.

टोमॅटो हे फळ किंवा फळभाजी मध्य अमेरिकेसारख्या उष्ण भागात उगवलेली आहे. त्यामुळेच फ्रिजमधल्या थंड वातावरणात त्याची वाढ नीट होत नसावी, असं टायमॅन यांनी केलेल्या संशोधनातून सिद्ध झालं. त्यानंतर आता फ्रिजमधे किंवा थंड वातावरणात ठेऊनही आपली चव आणि वास टिकवून ठेऊ शकेल अशा संकरीत किंवा हायब्रिड टोमॅटोचा टायमॅन शोध लावतायत. पण तोपर्यंत टोमॅटो फ्रिजमधे न ठेवता कांद्या बटाट्यांप्रमाणे बाहेर साध्या वातावरणातच ठेवावेत असा सल्ला त्यांनी दिलाय.

हेही वाचा : 

लठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार का बनलाय?

संत कोरोना आणि कोरोना वायरसचा काही संबंध आहे का?

महर्षी शिंदेंच्या डायऱ्या सांगतात, ११० वर्षांपूर्वीच्या प्लेगचा कहर

किम जोंग उन गेले, तर उत्तर कोरियाचा वारसदार कोण होणार?

कोरोनाला आपल्याला अंगाला न खेटू देता सुरक्षित शॉपिंग कसं करायचं?

WHOनं सांगितलेल्या खाण्यापिण्याबद्दलच्या पाच टिप्स भिंतीवर चिकटवा

लॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्प पाठिंबा का देताहेत?