आज पतेती. पारशी नववर्ष. इराणमधून परागंदा होऊन पारशी भारतात आले. देशाच्या उभारणीत मोठं योगदान दिलं. देशाला टाटा ब्रँड दिलं. पण आता देशातली पारशांची लोकसंख्या घटून लाखाच्या घरात गेलीय. मोदी सरकारने नुकताच नव्याने लोकसंख्या नियंत्रणाचा नारा दिला असला तरी आपल्याला पारशी वाचवा म्हणावं लागणार आहे.
सध्या वाघ वाचवा अशी ओरड सुरु आहे. ती योग्यच आहे. पण गंमत म्हणजे माणसांपैकी ‘पारशी वाचवा’ अशीही मोहीम आखायची वेळ आलीय. खेळकर, दिलदार आणि मस्त स्वभावाचे असं पारशांचं वर्णन केलं जातं. पारशी एका विशिष्ट प्रकारचे हेल काढून हिंदी किंवा मराठी बोलतात. ते गंमतशीर असतं म्हणून मध्यंतरी प्रत्येक हिंदी, मराठी नाटकात आणि सिनेमात विनोदनिर्मितीसाठी पारशी व्यक्तिरेखा आणली जायची. गमत्या पारशी असं आपण धरून चाललो तर आज त्यांची स्थिती ‘जोकर’ म्हणजे विदुषकासारखी झालीय.
‘शो मस्ट गो ऑन’ हे ब्रीद अंगीकारत हे पारशी जगलेत. पण त्यांची संख्या जेमतेम लाखभर आहे. आणखी काही वर्षांनी कदाचित पारशी उरणारच नाहीत. पारशी नववर्षाच्या निमित्ताने काही पारशांनी म्हणूनच इंटरनेटचा वापर करून एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केले. आपण जेवढे केवढे आहोत ते एकमेकांना धरून, सांभाळून राहुया हा संदेश ते एकमेकांना देताहेत.
एक बरंय. पारशांमधे नाना जाती, पंथ नाहीत म्हणजे एकमेकांचा दुस्वास करणं आणि मारामाऱ्या करणं नाही. शिवाय पारसी माणूस ‘जन्मावा’ लागतो. त्यांच्या धर्मात ‘धर्मांतर’ करून पारसी होण्याला मान्यता नाही. मुला-मुलींच्या जन्माचं प्रमाण व्यस्त आहे. त्यामुळे त्यांच्यात अपरिहार्यता म्हणून अविवाहित राहण्याची वृत्ती बळावलीय. आणि शेवटी ‘हम दो, हमारा एक’ हे आजचं चलन. या सगळ्या कारणांमुळे जगभरातल्या पारशांची संख्या रोडावलीय. त्याबद्दल त्यांच्यातल्या धार्मिक आणि सामाजिक नेत्यांमधे काळजीचं वातावरण आहे.
हेही वाचा : वाजपेयींचे सहकारी दुलत म्हणतात, ३७० हटवल्यामुळे काश्मीरमधे वाढू शकतो दहशतवाद
तसं पारसी शांत आणि निरुपद्रवी. ते सुमारे बाराशे वर्षांपूर्वी भारतात आले. अगदी नेमकं सांगायचं झालं तर ९३६ मधे इराणमधून त्यांना परागंदा व्हावं लागलं. बहुतेक पारशी भारतात आले ते पश्चिम किनारपट्टीवर! तिथे स्थायिक होण्याआधी त्यांच्या प्रमुखाने तिथल्या राजाकडे वाडगाभर दूध पाठवून राहण्याची आज्ञा मागितली.
राजाने दुधात साखर मिसळून, ‘इथे राहायचे असेल तर इथल्या लोकांच्यात दुधातल्या साखरेसारखे विरघळून जा,’ असा संदेश पाठवला. हा संदेश पारशांनी प्रामाणिकपणे शिरोधार्ह मानला. इतका की, त्यांची बोलीभाषा म्हणून त्यांनी गुजराती भाषेला आपलंसं केलं. गुजरात आणि अर्थात मुंबईत पारशी अधिक वसले.
हाडाने कष्टाळू, आपलं कौशल्य वापरत शेतीबाडी करण्यापासून ते फर्निचर बनव, घड्याळं दुरुस्त कर, गाड्या चालव, कारकुनी कर असे धंदे करत ते जिवाला सांभाळत राहिले. पूर्वी त्यांच्या अग्याऱ्याही फारशा नव्हत्या. अगदी अलीकडे दहा वर्षांपूर्वी मलबार हिलला गोदरेज बागमधे एक नवीन अग्यारी सुरु केली. त्याचंही त्यांना मोठं कौतुक आहे.
जशी हिंदूंची देवळं, मंदिरं, खुंट्या आणि मुसलमानांच्या मशिदी गल्लोगल्ली आपल्या आसपास दिसतील तशा पारशांच्या अग्यारी दिसणार नाहीत. या अग्यारीत ते अग्नी प्रज्वलित ठेवतात. त्या अग्नीच्या भोवती ‘गाभारा’ असतो. तिथे ठराविक पारशीच जाऊ शकतात. काही जुन्या अग्यारी आहेत. विशेषकरून गुजरातमधे, तिथला अग्नी म्हणे कैक वर्षे प्रज्वलित आहे. या अग्नीला हे पारशी चंदन अर्पण करतात. त्यांना चंदन अस्सल लागतं. अग्नीचा प्रवास रात्रीचाच केला जातो.
नवरोज किंवा पतेती म्हणजे यांचं नववर्ष. या दिवशी ते सकाळी अग्यारीत जाऊन प्रार्थना करतात. मग सगळा कुटुंबकबिला एकत्र जेवण करतो. यात त्यांच्या खास पारशी पदार्थांची रेलचेल असते. त्यात काय काय असतं? बहुतेक मांसाहारी पदार्थ.
केळीच्या पानात वाफवलेली पातरानी मच्छी. विशिष्ट भाज्यांमधे बनवलेलं धानसाक मटण. बटाट्याच्या चकत्या घातलेलं साकी मुर्गी चिकन. तसंच जेवणात जर्दाळू सालीबोटी बोनलेस मटण असतं. यासाठी कांदा आणि टोमॅटोची ग्रेवी वापरली जाते. शिवाय अक्रोड, जर्दाळू वगैरेचाही वापर केलेला असतो.
दुधी भोपळ्याची चटणी, मुरांबा, जिलेबी हेही त्यांचे आवडते पदार्थ. पारशी कुटुंबंही बऱ्यापैकी मोठी असतात. सगळेजण एकत्रितपणे सण साजरा करतात. आपला एक्टर बोमन इराणी आहे ना, त्याचं कुटुंब २४ जणांचे आहे. तर ते असे एकत्र जेवतात. मग संध्याकाळी मस्तपैकी एखादं गुजराती नाटक नाही तर सिनेमा बघतात आणि संपूर्ण दिवस आनंदाने घालवतात.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
पारशी स्वच्छता खूप राखतात. ते चिवट आणि कंजूषही मानले जातात. त्यांचे फर्निचर, त्यांच्या गाड्या ते वर्षानुवर्षे टिकवतात. डोक्यावर गोल टोपी आणि बंद गळ्याचा कोट, खाली सुरवार असे पारशी घरात बाराबंदी सारखे ढिले शर्ट चढवतात आणि पायात लेंगा. त्यांच्यातल्या स्त्रिया फ्रॉक किंवा स्कर्टमधे राहतात. सणासुदीला किंवा एरवी गारा म्हणजे साडी नेसतात. त्यांच्या गारावरची एम्ब्रोयडरीही खास असते.
१९ व्या शतकात पारशी चीनमधे कापडाचा धंदा करायला गेले. तिथून त्यांनी चीनी एम्ब्रॉयडरी शिकून घेतली. काहींनी तशा चीनी एम्ब्रॉयडरी करणाऱ्यांना भारतातही आणलं. ती विशिष्ट एम्ब्रॉयडरीच त्यांच्या गारावर असते.
पारशी तसं कुणाच्या अध्यात मध्यात नसतात. पण त्यांनी विविध क्षेत्रांत आपला ठसा जरूर उमटवला. उद्योगधंद्यातील टाटा, गोदरेज घराणी, राजकारणातील फिरोज गांधी घराणं, नाट्यक्षेत्रातील पदमसी घराणं यांच्याबद्दल वेगळं काही सांगायची गरज आहे के? आज रतन टाटांनी नॅनोसारखी मिडल क्लासलाही परवडेल अशी गाडी बाजारात आणली. त्यांच्या आधीच्या पिढ्यांनी केलेली औद्योगिक भरभराट सांगायचं ठरवलं तर आपल्याला एक पुस्तकच लिहावं लागेल.
इंदिरा गांधी या जवाहरलाल नेहरूंच्या कन्या. त्यांनी फिरोज गांधींशी लग्न केल्याने पारशी बनल्या. त्यांनी पाकिस्तान तोडून बांगलादेशची निर्मिती केली आणि पाकिस्तानला कायमची भळभळती जखम दिली. नाट्यक्षेत्रात पर्ल पदमसी आणि अलेक पदमसी यांनी क्रांती घडवली. त्यांनी अनेक चांगली नाटकं, कलाकार पुढे आणले.
डान्सिंगमधे शामक दावर, शिल्पकलेत अर्झान खंबाटा, एक्टिंगमधे बोमन इराणी, पेरिझाद हे आजचे काही कलाकार यांची कामगिरी मोठी आहे. विज्ञान क्षेत्रात होमी भाभांना मान आहे. जात्याच गमतीशीर असणाऱ्या पारशांचे अनेक विनोद आणि किस्से प्रसिद्ध आहेत. शीख किंवा सरदारजींवरून सरळसोट बिनडोकपणाचे विनोद निर्मिले गेलेत. पण पारशांबाबत तसं नाहीये.
बऱ्याच मोठ्या पारशी व्यक्तीचे वागणं, त्यांची कामंही तेव्हा विनोद निर्माण करून गेलीत. काही छोटे किस्से त्या दृष्टीने सांगता येतील. फील्ड मार्शल ठरलेले सॅम माणेकशॉ यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे भारताने १९७२ च्या युद्धात पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केलं. ते लष्करात होते तरी गमत्या स्वभावाचे होते. त्यांचे पंतप्रधान इंदिरा गांधींशी उंदीर मांजरासारखे खेळ चालायचे.
माणेकशॉ हे पाकविरुद्धचं युद्ध १९७१ च्या डिसेंबरमधेच सुरु करायच्या निर्णयावर ठाम होते. त्यांचा हा निर्णय इंदिराजींना पसंत नव्हता. पण शेवटी माणेकशॉच बरोबर असल्याचे स्पष्ट झालं. असं असलं तरी इंदिराजी माणेकशॉ कुठे कचाट्यात सापडतात का ते पहायच्या.
एकदा दिल्लीतच एका क्लबमधे एका तरुणीबरोबर माणेकशॉ नाचत होते अशी गुप्तवार्ता इंदिराजींना कळली. त्यांनी दुसऱ्या दिवशी माणेकशॉना विचारलं, ‘काय फील्ड मार्शल. काल रात्री काय करत होतात?’ पण माणेकशॉनी जराही शरमल्यासारखं केलं नाही की ते घाबरलेही नाहीत. ते सरळ म्हणाले, ‘हो, काल मी माझ्या मुलीबरोबर क्लबमधे नाचत होतो.’ लगेचच इंदिराजींनी विषय बदलला.
हेही वाचा : पाकिस्तानात जन्मलेल्या कलाकारांच्या आठवणींचा सन्मान तिथे होतो का?
असाच गमत्या क्रिकेटपटू होता तो भारताचा यष्टिरक्षक फारूक इंजिनिअर. ग्राऊंडवर त्याच्या खूप गमतीजमती चालायच्या. तो चांगला बॅट्समनही होता. त्याचा एक १९७२ मधला किस्सा आहे. तेव्हा तो आणि सुनील गावस्कर ऑस्ट्रेलियामधे शेष विश्वसंघाकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत होते. ऑस्ट्रेलियाचा डेनिस लिली भन्नाट बॉलिंग टाकायचा. तेव्हा आजच्यासारखे हेल्मेट आणि इतर कवचकुंडलं आली नव्हती.
लिलीच्या एका बॉलवर गावस्करने जोरदार शॉट मारला. ग्राऊंड मोठं असल्याने त्या फटक्यावर गावस्करला तीन धावा सहज मिळणार होत्या. दुसरी धाव पूर्ण करून गावस्कर तिसरी धाव काढायला वळला, पण पहातो तर इंजिनिअर त्याच्याकडे पाठ फिरवून होता आणि तो तिसरी धाव निघणार नाही अशा तऱ्हेने थांबला होता. म्हणून गावस्करने तिसरी धाव काढायचा विचार सोडला.
मग गावस्कर खेळपट्टीवर, इंजिनिअरशी थोडं बोलायला गेला तेव्हा त्याला म्हणाला, ‘फारूक अरे, तिसरी धाव सहज निघाली असती, तू बघितलंच नाहीस.’ यावर इंजिनिअर एवढंच म्हणाला, ‘अरे, त्या लिलीला मला खेळावं लागलं असतं ना!’ तिसरी धाव काढली गेल्यावर स्ट्राईक अर्थातच इंजिनिअरकडे येणार होता. तर असे या गमतीशीर पारशांचे नमुने.
पारशी वैतागले, रागावले की मात्र शिव्यांची लाखोली वाहतात. त्यांचा हा असा जिभेचा पट्टा सुटलेले ऐकायलासुद्धा अनेकांना गंमत वाटते. म्हणून काहीवेळा त्यांना मुद्दाम भडकवलं जातं. ‘ए काकडाखाव’ असं म्हटलं की ‘बारा बजे’ म्हटल्यावर शीख भडकतो तसा पारशी संतापलाच पाहिजे.
मुंबईच्या भुलेश्वर, पायधुनी, कुलाबा, परळ, दादर अशा दक्षिण भागात पारशीवाडे, चाळी, हवेल्या अद्याप आहेत. तिथे पारशी कुटुंबं आजही वास्तव्य करून आहेत. महाराष्ट्र, गुजरात सीमेवरच्या संजाण, डहाणू, बिलिमोरिया इथे बरेच पारशी आहेत. पण मुंबई सर्व जातीधर्मांची म्हटली जाते. मुंबईच्या विकासात पारशांचा सिंहाचा वाटा आहे. ते खरोखरच दुधातल्या साखरेसारखे इथे विरघळून गेलेत. या साखरेला दुधातून वेगळं काढणं आता शक्य नाही. म्हणूनच असं वाटतं की, पारशी वाचले पाहिजेत. झरतृष्टाची तेवढी पुण्याई नक्कीच असणार!
हेही वाचा :
भारतात बॉलिवूडसारखे आणखी किती वूड आहेत?
वारी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे
रमजान ईद दिवशी अमर हबीब यांची वाचायला हवी अशी कथा
पॉलिटिकल इस्लामप्रणित इस्लामी समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज
गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला
जनजागृतीमुळे कंडोम स्वीकारला, तशीच जातही संपवता येऊ शकेल
जवाहरलाल, विजयालक्ष्मीः भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे बहीणभाऊ