अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं?

०५ ऑगस्ट २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


महात्मा गांधींचा हिंदू धर्म सांप्रदायिकता न मानणारा, संमिश्र-बहुविविध संस्कृतीचा पुरस्कार करणारा होता. उल्लेखनीय म्हणजे आपल्या मृत्यूवेळी त्यांनी उच्चारलेला शब्द हा एका हिंदू देवतेचं- रामाचं नाव होतं. कारण ही हिंदू देवता त्यांच्या विशेष आवडीची होती.

१९३२ मधे वेरियर एल्विन नामक एका तरुण ख्रिश्चन धर्मोपदेशकास त्याच्या चर्चमधून हाकलून लावण्यात आलं. ‘ऑक्सफर्ड’मधे शिक्षण घेतलेल्या या तरुणाने पुढे जाऊन मध्य भारतातल्या गोंड जमातीमधे आपलं बस्तान बसवलं. आदिवासींच्या परंपरा-चालीरीतींचा आदर असल्यामुळे त्यांच्यापर्यंत येशूची शिकवण पोचवण्यापेक्षा शिक्षण आणि आरोग्यसेवा घेऊन जाणं वेरियरने पसंत केलं. आणि याच कारणामुळे वेरियरची धर्मोपदेशकपदापासून बिशपने हक्कालपट्टी केली.

चर्चची येशूचा संदेश पोचवण्यापासून फारकतच

वेरियर एल्विन गांधींविषयी जाणून आणि आदर राखून होते. चर्चमधून झालेल्या हकालपट्टीविषयी त्यांनी गांधींना पत्र लिहिल्यानंतर, गांधींनी उत्तरादाखल एल्विन यांना लिहिलं. ‘निळं आकाश हेच तुझ्या चर्चचं छत आहे आणि अवघी पृथ्वी तुझं व्यासपीठ आहे.’ एल्विन यांना सहानुभूती देत गांधींनी पुढे लिहिलं, ‘आणि तसंही, इंग्लिश चर्च असू की रोमन चर्च, कुठल्याही चर्चने येशूचा खरा संदेश पोचवण्यापासून फारकतच घेतलीय.’

ख्रिश्चन व्यक्तीस किंवा तसं पाहिलं तर कुठल्याही धर्माच्या स्त्री पुरुषास आपल्या धर्माचं पालन करण्यासाठी अतिभव्य अथवा सुंदर अशा वास्तूची गरज लागत नाही. गांधी स्वतःला धर्मपरायण हिंदू मानीत. पण आपल्या दृढ हिंदू धर्मश्रद्धेचं प्रदर्शन स्वतःसमोर किंवा दुसर्‍यांसमोर करणंदेखील त्यांना नापसंत होतं. त्यामुळेच अहमदाबादमधल्या प्रदीर्घ वास्तव्यादरम्यान शहरातल्या कोणत्याही मंदिरात ते गेले नाहीत.

साबरमती नदीकिनारी असणार्‍या झोपडीसमोरच्या अंगणात बसून ते प्रार्थना करत. सेवाग्रामच्या आश्रमात स्थायिक झाल्यानंतरही तिथल्या खुल्या वातावरणातच प्रार्थना करणं त्यांनी पसंत केलं.

गांधींचा हिंदू धर्म कसा आहे?

गांधींचा हिंदू धर्म सांप्रदायिकता न मानणारा, संमिश्र-बहुविविध संस्कृतीचा पुरस्कार करणारा होता. इतर धर्मांच्याविषयी त्यांना तितकाच आदर होता आणि म्हणून आपलं अवघं जीवन त्यांनी धार्मिक सलोखा निर्माण करण्यासाठी व्यतित केलं. उल्लेखनीय म्हणजे आपल्या मृत्यूवेळी त्यांनी उच्चारलेला शब्द हा एका हिंदू देवतेचं- रामाचं नाव होतं.

हेही वाचा : गांधीजींना तुकोबा भेटले होते

कारण ही हिंदू देवता त्यांच्या विशेष आवडीची होती. समतावादी समाज त्यांच्या दृष्टीने ‘रामराज्या’समान होता. अध्यात्मिक कल असणार्‍या मित्रांसोबत चर्चा करताना गांधी त्यांना एकाग्र चित्ताने आणि भक्तीभावाने रामनामाचा जप करण्याचे फायदे सांगत असत.

गांधींचं मंदिरात जाणं क्वचितच होई. त्यांचा हिंदू धर्म विविध प्रकारे आणि वेगवेगळ्या जागी प्रतीत होत. मंदिरात जाणं हा गांधींसाठी धर्मातला महत्त्वाचा मुद्दा कधीच नव्हता. त्याचबरोबर प्रसिद्ध तीर्थस्थळी त्यांना आलेला अनुभवदेखील फार सुखद नव्हता. १९०२ मधे वाराणसीतल्या काशी विश्वनाथ मंदिराला दिलेल्या पहिल्या भेटीने महात्मा गांधी फार प्रभावित झाले नाहीत.

वाराणसीतल्या मंदिरात देव मिळाला नाही

त्या वाराणसी भेटीचं वर्णन करताना गांधी लिहितात, ‘घोंगावणार्‍या माश्या, यात्रेकरू आणि दुकानदारांचा गोंगाट हे सर्व माझ्यासाठी असह्य होतं. जिथे शांत चित्ताने मन एकाग्र करता येईल आणि जिथे जिव्हाळ्याचं वातावरण असेल अशी अपेक्षा होती, तिथे सर्व काही अगदी विरुद्ध घडत होतं.’ पुढे ते लिहितात, ‘या मंदिरात, देवाच्या शोधार्थ मी सर्वत्र फिरलो, मात्र या अस्वच्छतेने परिसरात देव मला काही मिळाला नाही.’

१९१६ मधे भारतात परतल्यानंतर गांधींनी काशी विश्वनाथ मंदिराला पुन्हा भेट दिली. तेव्हा त्यांना तो परिसर पूर्वीपेक्षाही जास्त अस्वच्छ आणि बकाल वाटला. आणि यामुळेच वाराणसीमधल्या या अनुभवाने त्यांची खात्री पटली की, हिंदू धर्मातल्या देव-देवता या मंदिरांमधे असूच शकत नाहीत.

पुढच्या तीन दशकांत गांधींनी पायी चालत अथवा रेल्वेने देशभर प्रवास केला. या प्रवासादरम्यान महत्त्वाची हिंदू मंदिरं असणार्‍या जवळपास सगळ्या शहरांना त्यांनी भेटी दिल्या. पण या पुरातन मंदिरांच्या आत प्रवेश न करता ही मंदिरं त्यांनी बाहेरून पाहणंच पसंत केलं. याला एक अपवाद आहे.

मंदिरात जाण्याची दोन कारणं

गांधींची मंदिराच्या आत जाऊन प्रार्थना न करण्यामागे दोन कारणं होती. एक तर त्यांची अशी धारणा होती की देव मानवाच्या हृदयात वास करतो आणि मानवाचा देवावरचा विश्वास किंवा देवावरचं प्रेम हे प्रार्थना, कर्मकांड, तीर्थयात्रा, समारंभ यांच्यापेक्षाही जास्त वर्तणुकीतून प्रतित होत असतं. दुसरं कारण म्हणजे, हिंदू मंदिरांमधे स्त्रियांविरुद्ध कठोरपणे लिंगआधारित केला जाणारा भेदभाव आणि दलितांच्या विरुद्ध निर्दयतेने जाती आधारित केला जाणारा भेदभाव त्यांनी जवळून पाहिला होता.

काशी विश्वनाथ मंदिरास दिलेल्या सुरवातीच्या भेटींमधे आलेल्या काहीशा वाईट अनुभवांमुळे गांधींनी त्यानंतर मात्र, वाराणसीमधे अनेक वेळा येऊनदेखील या मंदिरास पुन्हा भेट दिली नाही. पुरी शहरालादेखील भेट दिल्यानंतर त्यांनी जगन्नाथ मंदिरात प्रवेश करण्यास नकार दिला. तंजावर इथेसुद्धा त्यांनी बृहदेश्वर मंदिरात प्रार्थना करण्यास नकार दिला होता. परंतु, वीस वर्षे स्थानिकांनी केलेल्या अथक संघर्षानंतर 1946 साली दलितांना मदुराईमधील मिनाक्षी मंदिरात प्रवेश देण्यास सुरवात झाली. तेव्हा हिंदू धर्मातल्या या रुढीवादी परंपरेला मंदिराने फाटा दिला. या कृतीस समर्थन दर्शवण्यासाठी गांधींनी या मंदिराला भेट दिली.

अयोध्येला एकदाच भेट

१९२१ मधे गांधींनी अयोध्या शहराला पहिली आणि शेवटची भेट दिली. शहरातल्या इतर मंदिरांना भेट देण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. तिथे दिलेल्या एका भाषणात, त्यांनी कोणताही मुलाहिजा न बाळगता हिंसेची निर्भत्सना कठोरपणे केली, आणि ‘हिंसेला ईश्वर आणि मानवाविरुद्ध केलं गेलेलं पाप’ असं संबोधलं. या भाषणाच्या काही दशकानंतर अयोध्येत जन्म झालेल्या किंवा अशी मान्यता असलेल्या देवतेचं नाव घेणार्‍या जमावाकडून भारताच्या उत्तर आणि पश्चिमेत हिंसाचाराची एक भयानक लाट पसरवली गेली.

१९८० आणि १९९० च्या दशकात रामाचं नाव घेऊन पसरवण्यात आलेली धार्मिक कट्टरता आणि द्वेष पाहून महात्मा गांधी फार अस्वस्थ झाले असते. मी वरील विधान फक्त गांधींचा एक चरित्रकार म्हणूनच नाही तर ही हिंसा अनुभवलेल्या काळाचा साक्षीदार म्हणून आणि याचा प्रत्यक्ष अभ्यास केलेला एक नागरिक म्हणून करतोय. मी स्वतः याची साक्ष देऊ शकतो की, ही बाब हिंदूंची, हिंदू धर्माची आणि भारताची मान शरमेने झुकवणारी आणि एकप्रकारे या सर्वांचा अपमान करणारी होती. काय आपल्याला पुन्हा त्या भयानक काळाची पुनरावृत्ती आणि पुन्हा तेच सर्व अनुभवयाचे आहे?

धर्मश्रद्धेसाठी स्मारकाची गरज कितपत

१९९० पासून ते आजतागायत अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्याच्या भावनिक आणि धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणणार्‍या मुद्याऐवजी अनेक पर्यायी प्रस्ताव समोर ठेवण्यात आलेले आहेत. त्यात सर्वच जातीधर्माच्या व्यक्तींना सेवा पुरवणारे रुग्णालय किंवा विद्यापीठ यासारखे प्रस्ताव आहेत. स्वतः महात्मा गांधींचे नातू आणि तत्त्वज्ञ रामचंद्र गांधी यांनी सर्वांत पुरातन अशा आंतरधर्मीय अध्यात्मिक परंपरेच्या ‘सन्मानार्थ’ राम-रहीम चबुतरा निर्माण करण्याचा पर्यायी प्रस्ताव ठेवलाय.

यातला कोणता पर्याय महात्मा गांधींना सर्वात उचित वाटला असता हे आपणास सांगता येणार नाही. आपण हे मात्र खात्रीने सांगू शकतो, ‘आपल्या धार्मिक श्रद्धेसाठी किंवा राष्ट्राच्या आणि संस्कृतीच्या गौरवाकरिता अतिभव्य अशा स्मारकाची गरज असते,’ या भावनेला गांधींचा विरोध होता. याबाबतीत कोणताच संदेह नाही की, सध्या चालवली जात असलेली अयोध्येतली भव्य राममंदिराची चळवळ गांधींना हिंदूंची आणि हिंदू धर्माची ऊर्जा अनावश्यकरीत्या खर्ची घालणारी शोकांतिका वाटली असती.

हेही वाचा :

खऱ्या गांधींच्या विसरत चाललेल्या आठवणी

७० वर्षांपासून भरणाऱ्या गांधीबाबांच्या यात्रेला जायचंय?

(साप्ताहिक साधनामधे छापून आलेल्या या लेखाचा अनुवाद साजिद इनामदार यांनी केलाय.)