भारताच्या किनाऱ्यावर धडकेल का कोरोनाची दुसरी लाट?

२९ ऑक्टोबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


युरोपात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं जग धास्तावलंय. सणावरांचा उत्साह आणि वाढत जाणारा थंडीच्या कडाक्यात अशी दुसरी लाट भारतातही येऊ शकेल अशी भीती तज्ञांकडून व्यक्त केली जातेय. पण काळजी करायचं कारण नाही. ‘जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही’ हा मंत्र पंतप्रधान मोदींनीही आपल्याला दिलेलाय. 

सोशल मीडियावर एक वीडियो सध्या खूप वायरल होतोय. भारतातल्या कुठल्यातरी रस्त्यावर भरपूर गर्दी जमलीय. फुलं विकणारे, भाजी विकणारे आणि ती विकत घेणारे यांची धावपण चालीलय आणि वीडियो सोबत लिहिलंय ‘दसरा दिवाळीनिमित्त कोरोना पुढे ढकलण्यात आला आहे.’

हे जोक म्हणून मस्तच आहे. पण खऱ्या आयुष्यात कोरोना असा पुढे ढकलता येत नाही. सध्या कोरोनाचे पेशंट कमी झालेत. पण तरी पुढच्या काही दिवसांत आपल्या सणांसोबत कोरोना पुन्हा उलटून येण्याची भीती तज्ञांकडून वर्तवली जातेय. शिवाय पुन्हा आला तर तो साधासुधा येणार नाही. आधीपेक्षा दुप्पट वेगाने आणि आधीपेक्षा जास्त भयानक होऊन येईल. युरोपातल्या देशात सध्या तेच होतंय आणि त्यालाच कोरोना वायरसची दुसरी लाट आलीय, असं म्हटलं जातंय.

कोरोनाची सुरवात झाली तेव्हा अनेक युरोपियन देशांनी आणीबाणीची परिस्थिती फारच चांगल्या पद्धतीने हाताळली. कोरोनाला अर्थव्यवस्थेचं फारसं नुकसान करू दिलं नाही. पेशंटची संख्या, कोरोनाचा प्रसारही मर्यादेत ठेवला. त्यामुळेच या देशांना लवकर लॉकडाऊन संपवता आला. आत्ता आत्ता अनेक देश पूर्वपदावर येऊ लागले होते. पण पुन्हा कोरोना साथरोगाच्या दुसऱ्या लाटेमुळे तिथली परिस्थिती बिघडू लागलीय.

हेही वाचा : कॉण्टॅक्ट ट्रेसिंगने लॉकडाऊनसोबतच कोरोनाची दुसरी लाटही रोखता येईल!

दुसरी लाट जास्त धोकादायक

वैद्यकीय भाषेत एखाद्या साथरोगाची दुसरी लाट म्हणजे वायरसचा प्रसार अचानक वाढण्याची घटना असं म्हटलं जातं. एखाद्या साथरोगाचा पहिल्यांदा उद्रेक होतो तेव्हा काही लोकांच्या एका गटाला याची लागण होते. त्यानंतर प्रसार कमी झालाय असं आपल्याला वाटतं. आणि मग लोकसंख्येच्या दुसऱ्या गटाला याची लागण सुरू होते. तेव्हा आपण वायरसची दुसरी लाट आली, असं म्हणतात.

साथरोगाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त धोकादायक ठरते याचे अनेक पुरावे आपल्याला इतिहासात सापडतात. मध्ययुगातला प्लेग असो किंवा १०० वर्षांपूर्वी आलेला स्पॅनिश फ्लू पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेनं जास्त लोकांचे जीव घेतलेत. दुसऱ्या लाटेत प्रसाराचा वेगही जास्त असतो. त्यामुळे अचानक खाली गेलेला पेशंटचा आलेख एकदमच वर जातो.

पुन्हा लॉकडाऊन?

युरोपातल्या कोरोनाच्या प्रसाराच्या आलेखात आपल्याला हेच दिसतं. ३१ मार्चपर्यंत फ्रान्समधे दररोज ७,५०० नव्या पेशंटची नोंद होत होती. तर १० ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार आता तिथे २४ तासात २६ हजार नव्या पेशंटना लागण झाल्याचं समोर आलंय. हेच इंग्लडच्या बाबतीतही दिसून येतं. एप्रिलदरम्यान तिथे एका दिवसात ७, ८६० कोरोना पेशंट होते. मागच्या आठवड्यात देशाने कोरोना प्रसाराचं टोक गाठलं. ८ ऑक्टोबरला एकाच दिवसात १७ हजार पेशंट तर आता दिवसाला २० हजार पेशंट इंग्लडमधे कोरोनाने आजारी पडतायत.

स्पेनच्या ईएल पाईस या स्थानिक न्यूजपोर्टलने २७ ऑक्टोबरला दिलेल्या बातमीनुसार तर स्पेनमधे आठवड्यात ६० हजार नवीन पेशंटची नोंद झालीय. तिथल्या अर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मादरिद शहरातच एका दिवसात २० हजार पेशंटना कोरोना होतोय. चेक रिपब्लिक, पोलंड, जॉर्जिया या देशातही पहिल्या लाटेपेक्षा जास्त पेशंटना लागण होतेय. महत्त्वाचं म्हणजे, ही आकडेवारी टेस्ट केलेल्या पेशंटची आहे. लक्षणं न दिसणाऱ्या पेशंटची नोंद सरकारकडे जमा झालेली नाही.

अजून कोणत्याही युरोपियन देशाने लॉकडाऊन जाहीर केलेला नाही. पण धोका आणखी वाढण्याआधी त्यांनी नागरिकांवर बंधनं घालायला सुरवात केलीय. फ्रान्समधे रात्री कर्फ्यू जाहीर केलाय. रोममधेही संध्याकाळी ६ नंतर दुकानं, हॉटेल्स उघडायला परवागनी नाहीय. स्पेनमधल्या मादरिदमधे जायला किंवा तिथून परत यायला परवानगी नाहीय. जर्मनीमधलं बर्लिन हे शहर तर त्याच्या नाईट लाईफसाठी प्रसिद्ध आहे. तिथेही गेल्या ७० वर्षांत पहिल्यांदा बंद ठेवण्यात आलंय. 

हेही वाचा : खरंच, भारतात कोरोनाची दुसरी लाट जूनमधे येणार आहे?

ढिलाईमुळेच कोरोना

कोरोना मुक्त आयुष्याची स्वप्न पाहत असताना तिथल्या नागरिकांना अचानक निर्बंधासकट जगावं लागतंय. आपल्याच हलगर्जीपणामुळे ही दुसरी लाट आल्याची हळहळ नागरिक व्यक्त करतायत. युरोपातला उन्हाळा म्हणजे साधारण जून ते ऑगस्ट - सप्टेंबरपर्यंतचा काळ तिथल्या पर्यटनासाठी चांगला काळ असतो. या काळात आपल्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बहुतेक युरोपियन देशांच्या सरकारनं आपल्या देशाच्या सीमा उघडल्या होत्या.

लॉकडाऊन संपल्यामुळे देशातल्या नागरिकांमधेही आपलं स्वातंत्र्य परत मिळाल्याची भावना जागृत झाली होती. मास्क घालणं, शारीरिक अंतर पाळणं याची आता काहीही गरज नसल्याचं त्यांना वाटू लागलं. लॉकडाऊनचा एकप्रकारे कंटाळा आल्याने लोकांकडून फारच कमी मर्यादा पाळल्या जात असल्याचं लंडनच्या इम्पेरिअल कॉलेजच्या एका सर्वेन समोर आलंय. या ढिलाईमुळेच तिथे कोरोनाची दुसरी लाट आल्याचं या सर्वेमधे सांगितलंय.

कोरोनाची पहिलीच थंडी

साधारण अशीच परिस्थिती आपल्याला भारतातही दिसतेय. ‘आपल्यासमोर आता दोन गोष्टी आहेत. दिवाळी, ख्रिसमससारखे सण येतायत. अशा सणांत लोकांच्या भेटीगाठी वाढतात. सुट्टीमुळे लोक इकडून तिकडे प्रवास करतात. त्यात भारतात पुढचे चार महिने थंडीचा ऋतू असतो. कोरोनाची ही पहिलीच थंडी असली तरी आधीच्या साथरोगांच्या अनुभाववरून कोरोनाचा विषाणू थंडीत जास्त प्रबळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात भारतातही कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे,’ असं राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी सांगितलंय.

२१ ऑक्टोबरला पंतप्रधानांनी देशाला उद्देशून संबोधित केलं तेव्हाही ही भीती बोलून दाखवली होती. २१ ऑक्टोबरच्या आपल्या भाषणात मोदींनी ‘जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही’ हा महत्त्वाचा सल्ला त्यांनी आपल्याला दिला. गेल्या काही दिवसांत सणांच्या उत्साहात असणार आहोत. यावेळी कोरोनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हेच ते वारंवर सांगत होते.

खरंतर लॉकडाऊन संपल्यापासूनच कोरोना थांबवण्यासाठीचे नियम फारसे पाळले जात नाहीयत. ईद, श्रावणाचा महिना, गौरी गणपती या सणांच्या उत्साहात तर शारीरिक अंतर वगैरे पाळणं आपण पार विसरूनच गेलो होतो. गणपतीच्या काळात महाराष्ट्रातल्या कोरोना पेशंटचा आलेखही वर गेला होता. आता ही संख्या कमी होतेय. आपला कोरोनाच्या पेशंटचा आलेख खाली गेलेला दिसतोय. त्यामुळे युरोपप्रमाणेच तो पुन्हा उफाळून वर येण्याची, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : कोविड १९ च्या टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत करायच्या तीन गोष्टी

आपली जबाबदारी काय

‘युरोपात कोरोनाची दुसरी लाट आलीय हे खरं आहे. पण सुदैवाने तिथली पेशंटची संख्या वाढत असली तरी पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनाचा मृत्यूदर फार कमी आहे. साधा सर्दी ताप होऊन लोक लवकर बरे होतायत ही सकारात्मक गोष्ट म्हणावी लागेल,’ असंही आवटे यांनी सांगितलं. शिवाय, युरोप आणि भारताचं वातावरणात अनेक गोष्टींचा फरक पडतो. आपण उष्णकटिबंधात राहणारे लोक आहोत. त्यामुळे भारतात कोरोनाची दुसरी लाट आली तरी य़ुरोपात जे होतंय तसंच्या तसं आपल्याकडे होईल असं ठामपणे सांगता येणार नाही. दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी असू शकते, असंही ते म्हणाले.

सुदैवाने ही लाट थांबवण्याचे उपायही आपल्याला माहीत आहेत. लोकांची चाचणी करणं, पॉझिटिव आलेल्या पेशंटच्या संपर्कात कोण आलं होतं याचा शोध घेणं आणि त्यांनाही क्वारंटाईन करून पुढचा प्रसार थांबवणं या तीन महत्त्वाच्या गोष्टी सरकारच्या पातळीवर केल्या जातीलच. पण आपण सामान्य नागरिकांनी आपल्या पातळीवरही काही गोष्टी पाळणं गरजेचं असल्याचं आवटे यांचं म्हणणं आहे.

‘त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हात धुणं, मास्कचा वापर आणि शारीरिक अंतराचे नियम पाळणं ही त्रिसूत्री. या तीन गोष्टी व्यवस्थित पाळल्या गेल्या तर कोरोनाची दुसरी लाट येण्याचं दुसरं काहीही कारण नाही,’ असं आवटे यांनी सांगितलं.

‘गेल्या काही महिन्यात कोरोनामुळे देशातल्या भरपूर लोकांना न्यूमोनिया आणि श्वासाचे इतर त्रास झालेत. त्यामुळे दिवाळीत आपण किती फटाके उडवतो याकडे लक्ष द्यायला हवंय. फटाक्याच्या धूरामुळे आणखी त्रास होऊ शकतो. तेच सिगरेट, बिडी, तंबाखूलाही लागू होतं. धुरामुळे किंवा तंबाखू थुंकल्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याचं प्रमाण वाढतं. सराकरसोबतच कोरोना ही आपलीही जबाबदारी आहे.’ असं ते म्हणाले.

हेही वाचा : 

कोविडनंतर जग कसं विभागलं गेलंय?

आपण सारखं चेहऱ्याला हात का लावतो? ही सवय कशी मोडायची?

ईबोलापासून नायजेरियाला वाचवणाऱ्या डॉक्टरच्या सन्मानाबद्दल अबोला

ताप मोजणाऱ्या बंदुकीनं कोरोना वायरसवर अचूक निशाणा साधता येईल?