खरंच कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरेल का?

२८ नोव्हेंबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


जानेवारी फेब्रुवारीत महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येणार असं म्हटलं जातंय. लाट रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करणं आपल्याला परवडणारं नाही. आणि लॉकडाऊन नसेल तर या दुसऱ्या लाटेमुळे जास्तीचं नुकसान व्हायची शक्यता आहे. ही लाट साधीसुधी नाही तर त्सुनामी सारखी येईल अशी भीती वाटू लागलीय.

सप्टेंबर महिन्यात केरळमधे ओणम नावाचा सण झाला. या सणानंतर तिथली कोरोना पेशंटची संख्या खूप वाढल्याचं दिसून आलं. आपल्या महाराष्ट्रातही गणपती उत्सवाच्या काळात आणि त्यानंतर पेशंटची संख्या खूप वाढली होती. सणाच्या काळात अनेक लोक एकमेकांना भेटतात, खरेदीसाठी बाहेर जात असतात. त्यामुळेच ही संख्या वाढल्याचं म्हटलं जातं.

सप्टेंबरनंतर पेशंटचा हा वाढता आलेख कमी होत गेला. ऑक्टोबर महिन्यातही साथरोगाचा प्रसार थंडावला होता. पण आता दिवाळी होऊन गेल्यावर पुन्हा एकदा पेशंटची संख्या वाढू लागलीय. दिवाळी आणि त्यात थंडीचं निमित्त साधून कोरोनाची दुसरी लाट येईल अशी चर्चा सगळीकडे सुरूय. मुख्य म्हणजे ही लाट एक भयानक त्सुनामी ठरू शकते असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलाय.

रविवारी २२ नोव्हेंबरला जनतेशी संवाद साधताना त्यांनी याचा उल्लेख केला. पहिल्या लाटेपेक्षा ही दुसरी लाट भयानक ठरू शकते असं ते म्हणाले. ‘कोरोनाचं संकट नाहीसं झालेलं नाही. तर पाश्चिमात्य देशात बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन लावले गेलेत. दिल्लीत दुसरी, तिसरी लाट आलीय. गुजरातमधे रात्रीची संचारबंदी लावलीय. ही नुसती लाट नाही तर त्सुनामी आहे की काय असं वाटतंय.’ असं ते म्हणाले.

दुसरी लाट आली?

खरंतर ऑक्टोबरपासूनच कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची चर्चा सुरू झालीय. पहिल्यांदा सिंगापूर, साऊथ कोरिया या आशियाई देशांत कोरोनाचा प्रसार सुरू झाला होता. नंतर कोरोना अमेरिका, युरोपात पोचला. त्यानंतर साधारण दोन तीन महिन्यांनी भारताने लॉकडाऊन जाहीर केला.

आता दुसऱ्या लाटेबाबतही हाच क्रम दिसून येतोय. आशियाई देशांनी दुसऱ्या लाटेतून आपली नौका बाहेर काढलीय. तिथे दुसरी लाटही ओसरल्याचं चित्रं आहे. त्यानंतर युरोपात दुसऱ्या लाटेनं प्रवेश केलाय. आता मागच्या अनुभवाप्रमाणे कोरोनाची दुसरी लाट अनुभवण्याचा भारताचा नंबर असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

अचानक वाढलेल्या पेशंटच्या संख्येमुळे ही लाट आलीच आहे, असे संकेत प्रशासनाकडून दिले जातायत. पंजाब, मध्य प्रदेश अशा राज्यांत आणि अहमदबादसारख्या शहरात पुन्हा निर्बंध घातले गेलेत. दिल्लीत तर कोरोनाची दुसरी ओसरून तिसरी लाट आल्याचं प्रशासनाने जाहीर करून टाकलं. कोरोनाची दुसरी लाट भारताच्या किनाऱ्यावर धडकलीय.

हेही वाचा : कॉण्टॅक्ट ट्रेसिंगने लॉकडाऊनसोबतच कोरोनाची दुसरी लाटही रोखता येईल!

प्रशासनाची सतर्कता

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या पेशंटची संख्याही वाढताना दिसतेय. विशेषतः पुण्या मुंबईतला पेशंटचा आलेख उंचावलाय. महाराष्ट्रात दररोज ४ हजार नवे पेशंट येतायत. इन्फेक्शन पसरण्याची टक्केवारीही जास्त दिसतेय. असं असलं तरी महाराष्ट्रात जानेवारी – फेब्रुवारीमधे कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्यता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलीय. या लाटेपासून बचावासाठी टास्कफोर्स आणि डेथ ऑडिट कमिटीच्या सदस्यांशी झालेल्या चर्चेनंतर राजेश टोपे यांनी एक नियमावलीही जाहीर केलीय.

कोरोना चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा सक्षमपणे सुरू ठेवाव्यात. दर दिवशी १० लाख लोकसंख्येमागे किमान १४० तपासण्या कराव्यात. जिल्हा आणि पालिका क्षेत्रात चाचणी केंद्र सुरु करावीत. याची माहिती जनसामान्यांना द्यावी. 'फ्लू' असलेल्या रुग्णांचा शोध घ्यावा. फिवर क्लिनिकच्या माध्यमातून लोकांच सर्वेक्षण करावं. सूपर स्पेडर म्हणजे अनेक लोकांशी दिवसात ज्यांचा संपर्क येतो त्यांची वैद्यकीय तपासणी करावी, अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी या नियमावलीत सांगितल्यात. सरकारकडून बरीच तयारी झालीय.

दुसरी लाट थांबवायची असेल तर अर्थातच लोकांना एकमेकांच्या संपर्कात येण्यापासून थांबवावं लागेल. यासाठी लॉकडाऊन हा पर्याय असू शकेल. पण पुन्हा लॉकडाऊन करणं हे राज्यालाच काय देशालाही परवडणारं नाही. त्यामुळेच कोरोनाची दुसरी लाट आपल्यासाठी त्सुनामी ठरू शकेल.

पुरेसं टेस्टिंग गरजेचं

लाटेची त्सुनामी होण्यामागे चार कारणं असू शकतील असं वारंवार सांगण्यात येतंय. वाढती थंडी हे त्यातलं प्रमुख कारण. कोणत्याही साथरोगाचा वायरस थंडीमधे जास्त सक्रिय होतो. सूर्याकडून येणारे युवी रे म्हणजे अल्ट्रा वॉयलेट किरणं थंडीच्या दिवसात कमी प्रमाणात येतात. अशा वातावरणात वायरस जास्त वेळ जिवंत राहतो. शिवाय, थंडीच्या दिवसात साधी सर्दी आणि फ्लू सारख्या आजारांचाही प्रसार होत असतो. असं वातावरण कोरोनाला पुरक ठरतं.

दुसरं कारण म्हणजे सणवार. सण साजरे करण्यासाठी अनेक लोक एकमेकांना भेटतात. सुट्ट्यांमुळे आपापल्या गावी परत जातात. या स्थलांतरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होतो. शिवाय, कोण कुठे गेलंय आणि त्यातल्या कुणाला कोरोनाची लक्षणं आहेत याची नोंद करण्यासाठी लागणारी कॉण्टॅक्ट ट्रेसिंगची चांगली यंत्रणा भारतात उपलब्ध नाही हे तिसरं कारण ठरू शकतं.

निती आयोगाकडून करण्यात आलेल्या स्वॉट ऍनॅलेसीसमधूनही ही गोष्ट स्पष्ट झालीय. झपाटल्यासारखं कॉण्टॅक्ट ट्रेसिंग करायची गरज आहे. पेशंटची संख्या वाढली तर ते शक्य होत नाही. ‘आत्तापर्यंत भारताने १२ कोटी कोविड १९ च्या टेस्ट केल्या आहेत. पण यात रॅपिड टेस्ट करणाऱ्या लोकांची संख्या जास्त दिसून येतेय. लक्षणं नसणाऱ्या पण कोरोनाची लागण झाल्याची शक्यता असणाऱ्या लोकांची आरटीपीसीआर टेस्ट आपल्याकडे केली जात नाही. त्यामुळे नेमके रिझल्ट्स मिळत नाहीत. आपण अजूनही पुरेसं टेस्टिंग करत नाही,’ असं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरच्या साथरोग विभागाचे माजी प्रमुख ललीत कांत यांनी म्हटलंय.

हेही वाचा : थंडीच्या दिवसात कोरोनाला कसं ठेवायचं दूर?

स्पॅनिश फ्लूचा महत्त्वाचा धडा

कोणताही साथरोग पहिल्या लाटेवर समाधान मानत नाही. दुसरी, तिसरी लाट आल्यावरच तो आपल्यातून जातो हे इतिहासाने दाखवलंय. १०० वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूचा प्रसार झाला होता. मार्चमधे या साथरोगाची पहिली लाट आली. त्यावेळी काही लोकांना संक्रमण करून, काहींचे जीव घेऊन ही लाट ओसरली. पेशंटची संख्या कमी झाल्यानंतर लोक निवांत झाले. आता फ्लू गेला असा त्यांचा समज झाला. पुन्हा पहिल्यासारखं आयुष्य सुरू झालं. भेटीगाठी, सणवार, उत्सव, सभा वगैरे सुरू झालं. आणि लगेचच आधीपेक्षा दुप्पट नुकसान करणारी स्पॅनिश फ्लूची दुसरी लाट वेगाने धडकली.

तेव्हा स्पॅनिश फ्लू दिसतो कसा, पसरतो कसा आणि हात धुतल्यामुळे तो थांबवता येऊ शकतो याची कोणतीही माहिती शास्त्रज्ञांना नव्हती. आता मात्र आपल्याकडे सगळी माहिती आहे. नुसती माहितीच नाही तर स्पॅनिश फ्लूने दिलेला धडाही आहे.

त्यामुळे लॉकडाऊन करणं शक्य नसलं तरी आपण कोरोनाची सवय करून घ्यायला नकोत. सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टिन्सिंग म्हणजेच एसएमएस या तीन सुत्राचा वापर आपण चालू ठेवायला हवा. कोरोना राहणारच आहे, आयुष्य आहे तसं चालू ठेवलं पाहिजे असं म्हणून या तीन गोष्टी आपण टाळत राहिलो तर कोरोनाची दुसरी लाट खरोखरच त्सुनामी ठरू शकेल.

हेही वाचा : 

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कॉर्पोरेट घराण्यांच्या हातात बँकेच्या चाव्या देणं धोक्याचं?

संत नामदेवांच्या अभंगवाणीत भारतीय संविधानातल्या मूल्यांचा जागर

कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!