कोरोनावरचा उपाय म्हणून वायरल होणाऱ्या ५ गोष्टींमागचं अर्धसत्य

०५ मे २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


अमुक केल्याने कोरोना बरा होतो किंवा तमुक केल्याने कोरोना बरा होतो, या अफवा वाचून, त्याच्यावर भरपूर चर्चा करून त्या खोट्या आहेत हेसुद्धा आपल्याला कळालंय. आता या खोट्या किंवा फसव्या उपायांचं नवं वर्जन आलंय. अर्धवट वैज्ञानिक माहितीच्या आधारावर ही सारी फिरवाफिरवी सुरू आहे. त्यामुळे हे वायरल उपाय खरंच कामाचे आहेत का, हे एकदा नीट तपासून बघायला हवं.

आपल्याकडे आजीबाईचा बटवा ही संकल्पना फार वापरली जाते. जगात फर्स्टटेड म्हणजेच प्रथोपचारपेटीचा शोध लागण्यापूर्वीपासून हा आजीबाईचा बटवा प्रसिद्ध आहे. ताप, सर्दी, खोकला, थोडसं दुखणं अशा अनेक आजारांवर या बटव्यात औषधं असतात. पण म्हणून आजीबाईचा बटवा कोरोनासारख्या मोठ्या आजारावरही काम करेल, हे म्हणणं चुकीचंच ठरेल.

तरीही कोरोनानं भारतात प्रवेश करायच्या आधीच आजीच्या बटव्यातल्या या गोष्टी कोरोना बरा करतात अशी अफवा भारतात आली होती. गोमुत्रामुळे, लसणामुळे कोरोना बरा होतो, गरम पाणी पिल्याने कोरोना वायरस घशातच मरतात, अशा एक ना अनेक अफवा उठवल्या गेल्या.

आता या अफवांचं दुसरं वर्जन समोर आलंय. मुख्य म्हणजे, हे वर्जन आजीबाईच्या बटव्यांतल्या उपायांवर अवलंबलेलं नाही. तर आपण पटकन विश्वास ठेवावा अशा वैज्ञानिक ज्ञानावर अवलंबलेलं आहे. कोरोना वायरसपासून बचाव व्हावा यासाठी जगभरातले अनेक देश प्रयत्न करतायत. लसी आणि नव्या उपचारपद्धतीसाठी संशोधन होतंय. जर्मनीतल्या क्यूरबॅक या कंपनीत एक लस विकसित केली जातेय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ती मिळवण्यासाठी या कंपनीला मागच्या दारानं थेट ऑफरही दिली.

एकंदर, कोरोनाचा सामना करायचा तर काही जुन्या औषधांचा वापर करता येईल का यावरही विचार होतोय. त्यासाठीही संशोधनही चालू आहे. आता या पूर्ण न झालेल्या किंवा पूर्णपणे सिद्ध न झालेल्या संशोधनालाच लोकांनी कोरोना वायरसचा जालीम उपाय म्हणणं सुरू केलंय. हे उपाय वरवर कितीही वैज्ञानिक आणि विश्वसनीय वाटत असले तरी त्यावर विश्वास ठेवण्याआधी आपण त्यामागची सत्यता एकदा नीट तपासायला हवी.

हेही वाचा : कोरोनाला आपल्याला अंगाला न खेटू देता सुरक्षित शॉपिंग कसं करायचं?

१) शंभरी पार केलेली बीसीजी लस

क्षयरोग म्हणजेच टीबीची लागण होऊ नये यासाठी बीसीजी नावाची प्रतिबंधात्मक लस आहे. टीबीवरच्या या लसीची सध्या कोरोना विरुद्धच्या लढाईत बरीच चर्चा होतेय. इतर अनेक आजारांमधेही या लसीचा वापर केला जातो. ही लस १९२१ मधे पहिल्यांदा वैद्यकीय पद्धतीने वापरली गेली. तेव्हापासून अनेक मोठ्या संकटात या लसीने आपल्याला साथ दिलीय. नुकतीच या लसीनं शंभरीही पार केलीय.

कोरोना प्रमाणेच टीबीचे वायरसही माणसाच्या श्वसनसंस्थेवर हल्ला करतात. बीसीजीचं महत्त्व ओळखून जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओनेही या लसीला अत्यावश्यक औषधांच्या यादीत टाकलंय. त्यामुळेच ही लस घेतलेल्या लोकांची प्रतिकारशक्ती चांगली होते आणि त्यांना कोरोनाचा धोका कमी होतो, असं म्हटलं जातं. भारतातल्या प्रत्येकानेच लहानपणी ही लस घेतलेली असणार.

ही लस कोरोना वायरसपासून बचाव करण्यासाठी कामात येऊ शकते असं म्हटलं जातं. पण बीसीजीची लस ही कोरोना वायरसपासून बचाव केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं डब्ल्यूएचओने स्पष्ट केलंय. त्यामुळे सध्यातरी ही केवळ चर्चाच आहे.

२) भारतीय जेनेटिक्स कोरोनावर भारी?

कोणत्याही वायरसचा सामना करायचा तर त्यासाठीचे अशा वायरसना संपवणारे नैसर्गिक किलर सेल्स हे आपल्यात असावे लागतात. जगात भारतीयांमधे असे निसर्गतःच किलर सेल्स सर्वाधिक आहेत, असा दावा केला जातो. त्यासाठी संदर्भ दिला जातो. हा दावा ज्या संशोधनाचा आधार घेत केला जातो ते संशोधन मुळात २००८ चं आहे. भारत आणि अमेरिकेतल्या काही संशोधकांनी ते केलंय. या संबंधीची माहिती स्क्रोल डॉट इन या साईटवर वाचायला मिळते. 

नेचर इंडिया या साईटवर या संशोधनातले काही महत्वाचे मुद्दे मांडण्यात आलेत. त्यानुसार हे संशोधन तोकडे नमुने आणि कृत्रिम वातावरणाचा आधार घेऊन करण्यात आलंय. मुळातच कोरोना वायरसच्या अँटिबॉडीज आजपर्यंत जगातल्या कुठल्याही व्यक्तींच्या शरीरात तयार झालेल्या नाहीत, हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. त्यामुळे अशा तोकड्या संशोधनाचा आधार घेऊन हवेत तीर मारणं योग्य नाही. कोरोना साथीचा सामना करण्यासाठी भारतीयांमधले जेनेटिक्स जगातले सर्वोत्तम आहेत हा दावाही पोकळ ठरतो.

३) सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेलं औषध

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासोबतच जगभरात आरोग्यविषयक सुविधांची कमतरता जाणवतेय. अमेरिकेसारखी महासत्ताही याला अपवाद नाहीय. एप्रिल महिन्याच्या सुरवातीचा आठवडा चर्चेत राहिला तो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिलेल्या धमकीमुळे. ही धमकी चर्चेचा विषय ठरली ती क्लोरोक्विन या मलेरियावरच्या औषधामुळे. ट्रम्प यांनी स्वतः मार्चच्या अखेरीला हे औषध कोरोना वायरसवरचा इलाज असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळेच हे औषध जगभर चर्चेत आलं. त्याची मागणीही वाढली.

क्लोरोक्विन हे मलेरियावरचं एकदम सुरवातीला तयार केलेलं औषध. १९३४ नंतर बेयर नावाच्या एका कंपनीनं ते बनवलं. क्लोरोक्विनचं ऍडवांस वर्जन म्हणजेच सध्या चर्चेत असलेलं हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन. अमेरिकेच्या 'अन्न आणि औषध प्रशासन' आणि भारताच्या 'भारतीय विज्ञान आणि संशोधन परिषद' अर्थात आयसीएमआर यांनी याच हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाला मंजुरी दिलीय.

आता हे नवं औषध बाजारात आलं म्हणजे ते सरसकट कोरोनाच्या सगळ्या पेशंटसाठी वापरलं जाईल, असा एक समज होता. पण भारताच्या आयसीएमआरने मात्र हे औषध केवळ कोरोना वायरसची लागण झालेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांपैकी ज्यांना अधिक धोका आहे अशांना दिलं जावं, असं स्पष्ट केलं.

हे कोरोना स्पेशलही वाचाः 

कोरोनाचा प्रादुर्भाव ही माणसाचीच चूक आहे!

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

भारताची इटली बनणाऱ्या राजस्थाननं तर कोरोनाविरुद्ध भिलवाडा मॉडेल बनवलं

कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

४) वाढत्या तापमानात कोरोना मरतो?

संपूर्ण जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदरात तफावत दिसतेय. त्या त्या देशांमधलं कोरोनाचं वाढतं प्रमाण, आरोग्य सुविधा, उपाययोजना या सगळ्या गोष्टीही आकडेवारीमधे महत्त्वाच्या ठरतात. त्यातच सध्या तापमान हा एक मुद्दाही पूढे येतोय. सध्या कोरोना वायरसमुळे झालेल्या मृत्युदराचं प्रमाण हे ०.२ ते १५ टक्के इतकं आहे. अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस हे देश सध्या मृतांच्या आकडेवारीत आघाडीवर आहेत.

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण जास्त असे देश उत्तर गोलार्धात येतात जो थंड प्रदेश आहे. दक्षिण गोलार्ध अर्थात पृथ्वीचा अर्धा भाग असलेल्या देशात कोरोना वायरसच्या संसर्गाचं प्रमाण कमी आहे. त्यावरूनच कोरोना वायरस हा उष्ण प्रदेशात टिकू शकत नाही आणि तापमान वाढेल तसा संसर्ग कमी होईल, असं म्हटलं जातंय.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन अर्थात डब्ल्यूएचओनं मात्र थंड आणि उष्ण तापमान असलेल्या दोन्ही प्रकारच्या देशांमधे कोरोनाच्या संसर्गाचा वेग सारखं असल्याचं म्हटलंय. यापूर्वी २००३ ला कोरोनाच्या सख्ख्या भावाचा सार्स वायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत होता. सार्स हा वायरसही थंड आणि उष्ण अशा दोन्ही प्रदेशात जास्त वेगाने पसरत होता. त्यामुळेच भारतात उन्हाळा वाढला तरी कोरोना संपेल असं म्हणता येणार नाही.

हेही वाचा : डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

५) रोगप्रतिकारक शक्ती अधिक पण

कोरोना संसर्गाच्या धोक्यांशी संबंधित एक थिअरी असं सांगते की, भारतीयांची रोग प्रतिकारक शक्ती इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे देशातली कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची आकडेवारीही इतर देशांच्या तुलनेत कमी आहे.

मूळातच, भारतातल्या सोयीसुविधांचा दर्जा अतिशय खराब आहे. आपल्याकडचे रस्ते पाश्चात्य देशांइतके स्वच्छ नाहीत आणि त्यातल्या त्यात रस्त्यावरचं फास्ट फूड खाण्याचं प्रमाण आपल्याकडे अधिक आहे. त्यामुळे लोकांना वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या आजारांचा सामना करावा लागतो. ते करण्याची क्षमताही तुलनेने अधिक असते. यालाच हायजीन हायपोथेसिस म्हणतात.

ही गोष्ट खरंच बरोबर असेल तर भारतीय हे जगातले सगळ्यात जास्त सुदृढ व्यक्ती असल्या पाहिजेत. पण तसं नाहीय. आपला भारत हा 'लाईफ एक्सपेक्टंसी इंडेक्स' अर्थात आयुर्मान निर्देशांकात १२८ व्या क्रमांकावर आहे. डायबिटीस असलेल्या रुग्णांमधे आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. जगातल्या सर्वाधिक प्रदूषित अशा १० शहरांपैकी सात शहरं भारतातली आहेत. या तथ्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती अधिक असल्याने आपल्याला कोरोना वायरसचा धोका कमी असेल ह्या भ्रमात आपण रहायला नकोय. भारतात कोरोना वायरसमुळे जे मृत्यू होताहेत त्यातल्या अनेकांना इतर आजार असल्याचंही समोर आलंय.

हेही वाचा : 

बाहेरून आणलेलं सामान वायरस फ्री करण्याचं साधंसोप्पं प्रॅक्टिकल

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

हमीद पर उम्मीद : कोरोनाचं औषध सिप्ला शोधेल असं जगाला का वाटतं?

अजून अर्धा विजयही मिळाला नाही आणि आकाशातून फुलं वाहणं सुरू आहे

लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक

फरीद झकेरिया सांगतात, लॉकडाऊनची संधी न हेरल्यास भारताचा अमेरिका होईल