पहिल्या, दुसऱ्या लाटेनंतर आता कोरोना वायरसच्या तिसरी लाटेची शक्यता वर्तवली जातेय. लहान मुलं या लाटेचं लक्ष्य असतील असं म्हटलं जातंय. त्यामुळेच सरकारसोबतच पालकांचं टेंशनही वाढायला लागलंय. अशातच केंद्रीय आरोग्य खात्याने लहान मुलांच्या लसीकरणाचे संकेत दिलेत. कॅनडा, अमेरिकेनं तर लहान मुलांना लस द्यायला सुरवातही केलीय.
कोरोनाची पहिली, दुसरीच नाही तर अगदी चौथ्या, पाचव्या लाटांचा अनुभव जगभरातले अनेक देश घेतायत. पहिल्या लाटेनं धडकी भरवली होती. दुसऱ्या लाटेत थोडंस हायस वाटलं. कारण तोपर्यंत लसीकरण, औषधांवरच्या चर्चा प्रत्यक्षात येत होत्या. दुसरीकडे कोरोनाच्या पहिल्या लाटेतून काहीना काही शिकत उपाययोजना सुरू होत्या.
लसीकरण हा कोरोना साथरोग थोपवायचा बेस्ट पर्याय असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळेच भारतात सुरवातीच्या एक, दोन लाटांमधे ज्यांना सगळ्यात जास्त धोका होता त्यांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. त्यासाठी वेगवेगळ्या कॅटेगरीही करण्यात आल्या. सध्या जगभर जास्तीत जास्त लोकसंख्येचं लसीकरण करण्यावर भर दिला जातोय.
भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झालीय. यावेळी त्याचा धोका १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना बसेल असं म्हटलं जातंय. हा धोका लक्षात घेऊनच केंद्रीय आरोग्य खात्याने लहान मुलांच्या लसीकरणाचे संकेत दिलेत.
हेही वाचा : लस असतानाही आपल्याला वायरसवरच्या औषधांची गरज पडेल?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपच्या खासदारांची एक बैठक २७ जुलैला पार पडली. या बैठकीदरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी काहीच आठवड्यांमधे १२ ते १७ वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाचे संकेत दिले होते. त्यामुळे देशभरात हे लसीकरण लवकर सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरू लागलीय. शाळा, कॉलेज सुरू करायची चर्चाही चालुय. महाराष्ट्रात काही ठिकाणी कमी क्षमतेनं शाळा सुरू झाल्या आहेत. अशावेळी शाळेतल्या मुलांसाठी कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे ज्या मुलांना लस दिली जाईल त्यांना शाळेत जायची परवानगी दिली जावी अशीही एक चर्चा सुरू झालीय.
कोरोना वायरसच्या तिसऱ्या लाटेच्या आधीच आरोग्य क्षेत्रातली अनेक तज्ञ मंडळी लहान मुलांसाठी लसीकरण गरजेचं असल्याचं म्हणतायत. सरकारने त्यादिशेनं टाकलेलं पाऊल त्यामुळेच महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा प्रत्यक्षातल्या लसीकरणाची आहे.
केंद्र सरकारने मागच्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाला भारतातल्या लसींसंदर्भात माहिती दिलीय. त्यावेळी केंद्र सरकारने झायडस कॅडिलाची 'झायकोव-डी' ही लस जुलै-ऑगस्टमधे लहान मुलांसाठी उपलब्ध होईल असं म्हटलंय. दिल्ली हायकोर्टानेही लहान मुलांच्या लसीकरण कार्यक्रमाचं योग्य नियोजन करायचे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत.
त्याचा भाग म्हणून भारतात सध्या भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सिन' आणि झायकोव-डीच्या ट्रायल सुरू आहेत. २८ हजार लोकांवर 'झायकोव-डी' लसीच्या क्लिनिकल ट्रायल करण्यात आल्या. त्यात १२ ते १८ वयोगटातली मुलं आहेत. मुलांमधे रोगप्रतिकारक शक्ती कितीय याचा विचार करून या लसीचे तीन डोस मुलांना दिले जातील. त्यासोबतच मॉडर्नाची लसही १२ ते १७ वयोगटातल्या मुलांसाठी उपलब्ध होईल. रशियाची स्पुतनिकचीही १२ ते १७ वयोगटातल्या मुलांवर ट्रायल सुरू आहे.
फायजर बायोएनटेकच्या लसीची अमेरिकेतल्या १२ ते १७ वयोगटाततल्या मुलांवर ट्रायल घेण्यात आलीय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाईझेशनच्या 'स्ट्रॅटेजीक ऍडवयजरी ग्रुप ऑफ एक्सपर्ट'ने फायजर ही लस सुरक्षित असल्याचं म्हटलंय. त्याला मंजुरी मिळाल्यामुळे तीही भारतात येण्याची शक्यता आहे. ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाच्या लसीवर इंग्लंडमधल्या ६ ते १७ वयोगटातल्या लहान मुलांवर ट्रायल सुरू असल्याची माहिती बीबीसीवर वाचायला मिळते. तर जॉन्सन अँड जॉन्सनही १२ ते १८ वयोगटातल्या मुलांवर सध्या ट्रायल सुरूय.
हेही वाचा : आपण सारखं चेहऱ्याला हात का लावतो? ही सवय कशी मोडायची?
१२ ते १५ वयाच्या मुलांना लस देणारा कॅनडा हा जगातला पहिला देश ठरलाय. इस्रायल, चीनमधेही लहान मुलांच्या लसीकरणाची घोषणा झालीय. तर अमेरिकेतही १२ ते १५ वयोगटातल्या मुलांना फायजरची लस देण्यात आलीय. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आलेत. मुंबईतल्या एका सिरो सर्वेमधे ५० टक्क्यांपेक्षा अधिक मुलांमधे अँटिबॉडी आढळून आल्या होत्या. त्यामुळे लस फार परिणामकारक ठरू शकेल असं म्हटलं जातंय.
कोरोना वायरसचं तांडव तसंच सततच्या लाटांमुळे शाळा, कॉलेजपासून जगभरातली कोट्यवधी मुलं वंचित आहेत. लसीकरण झालं तर मुलांवरचं संकट कमी होईल. भविष्यात लहान मुलांमधे कोरोना संसर्गामुळे त्यांच्या जीवाला निर्माण होणारा धोकाही टळू शकेल. त्यामुळेच लसीकरणाच्या आधी मुलांच्या शाळा सुरू करायला दिल्ली सारखी राज्य विरोध करतायत.
गेल्यावर्षी जग लसीच्या प्रतीक्षेत असताना चीनच्या सिनोवॅक बायोटेकनं आपली लस बाजारात आणली होती. सध्या लहान मुलांसाठी इतर लसींबरोबर सिनोवॅकच्या 'कोरोना वॅक' या लसीची चर्चाही फार होतेय. 'लॅन्सेट' या जगप्रसिद्ध आरोग्यविषयक मॅगझिननं त्याची दखल घेतलीय. मॅगझिनमधे एक रिसर्चही आलाय. त्यात 'कोरोना वॅक'चे दोन डोस लहान मुलांसाठी सुरक्षित असल्याचं म्हटलंय.
५५० जणांवर या लसीची ट्रायल घेण्यात आली. यात ३ वर्ष ते १७ वर्ष वयोगटातल्या मुलांचा समावेश होता. गेल्यावर्षी ३१ ऑक्टोबर ते २ डिसेंबरमधे ७२ मुलांवर पहिली ट्रायल झाली. तर १२ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान ४८० मुलांवर दुसरी ट्रायल घेण्यात आली. २८ दिवसाच्या अंतराने त्यांना लसीचे दोन डोस देण्यात आले.
पहिल्या ट्रायलमधल्या १०० टक्के मुलांमधे अँटिबॉडी आढळून आल्या. तर दुसऱ्या टप्प्यातल्या ९६ टक्क्यांपेक्षा अधिक मुलांमधे कोरोनाविरुद्धच्या अँटिबॉडी आढळून आल्यात. लसीचे डोस घेतल्यानंतर त्याचे फार काही गंभीर परिणाम या मुलांवर दिसलेले नाहीत. तसंच लहान मुलांमधली रोगप्रतिकारक शक्तीही वयस्कर लोकांच्या तुलनेत अधिक असल्याचं लॅन्सेटमधला रिसर्च सांगतोय. त्यामुळेच या लसीचीही चर्चा होतेय.
हेही वाचा :
ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
आजारी पडण्यापूर्वी कुठे कुठे जातात कोविड १९ चे पेशंट?
ताप मोजणाऱ्या बंदुकीनं कोरोना वायरसवर अचूक निशाणा साधता येईल?