महिलांच्या आत्मसन्मानाच्या लढाईला पाठबळ देणाऱ्या सिनेनायिका

०८ मार्च २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


भारतीय सिनेसृष्टीत नायिकाप्रधान सिनेमांची कमतरता नाही. सध्याचा महिलावर्ग अबला नसून सबला आहे हे या सिनेमांच्या माध्यमातून ठामपणे ठसवलं जातंय. नायकासोबतचं स्त्रीपात्र म्हणजेच नायिका ही संकुचित व्याख्या आता बदलत चाललीय. या महिला दिनाच्या निमित्ताने, नायिका असण्याची ही नवी सिनेमॅटीक व्याख्या आपण समजून घ्यायलाच हवी.

गेल्या काही वर्षांत आलेल्या सिनेमांमधून नायिकेचं केलं जाणारं चित्रण बऱ्याच अंशी कौतुकास्पद आहे. अर्थात, दिवसरात्र नायकासाठी झुरणारी, तन-मन-धनाने नायकाला समर्पित होणारी, नायकासाठी स्वत्वाचा आणि सर्वस्वाचा त्याग करणारी नायिका अजूनही भारतीय सिनेसृष्टीत दिसतेच. पण त्याही पलीकडे काही भूमिका अशा आहेत ज्या स्त्रीवादी मानसिकतेला काही प्रमाणात पाठबळ देताना दिसतात.

२०२२ हे वर्ष अशा सिनेमांच्या दृष्टीकोनातून खासच म्हणावं लागेल. एकीकडे ‘सामी सामी’ म्हणत नवऱ्याच्या पुरुषी अहंकाराला सुखावणारी श्रीवल्ली सुपरहिट होतीच, तर दुसरीकडे वेश्यांना ‘डरने का नही’ म्हणणाऱ्या गंगुबाईलाही बॉक्स ऑफिसने खणखणीत सलाम ठोकला होता. एका रात्रीच्या ओळखीवर नायकाच्या मागे ‘शिवा शिवा’ करत फिरणारी इशा सगळ्यांनाच आवडली, पण प्रेमापेक्षा आपला स्वाभिमान जपणारी रेने पचवणं मात्र प्रेक्षकांना जडच गेलं.

२०२२बद्दल बोलायचं झालं तर, नायिका म्हणजे नायकाचं प्रेमप्रकरण दाखवण्यासाठी निर्माण केलेलं पात्र हा साचेबद्ध नियम सांगणाऱ्या सिनेमांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. पण हा नियम तोडून वेगळी मांडणी करणाऱ्या सिनेमांना मात्र संमिश्र प्रतिसाद लाभला. त्यातल्या काहींना तर थियेटरऐवजी ओटीटीवरच समाधान मानावं लागलं. आज महिला दिनाच्या निमित्ताने २०२२मधल्या या सिनेमांबद्दल जाणून घेणं गरजेचं ठरतं.

सहनशील नाही, सणसणीत नायिका!

‘थप्पड’ या २०२०च्या सिनेमाचं वेगळं रुप म्हणजे ‘जय जय जय जय हे’ हा मल्याळम सिनेमा. यात दर्शना राजेंद्रनने साकारलेली जया नवऱ्याकडून मार खाल्ल्यानंतर गुपचूप तायक्वांदो शिकून त्यालाही चांगलाच धडा शिकवते. त्यानंतर नवऱ्याच्या मारहाणीला समर्थन देणारा घरच्यांचा दबाव, फसवणुकीतून आलेलं बाळंतपण, अपुऱ्या शिक्षणामुळे होणारी आर्थिक परवड या सगळ्याला जया कशाप्रकारे तोंड देते, हे पाहण्यासारखं आहे.

‘डार्लिंग्ज’ या हिंदी सिनेमात मुसलमान कुटुंबातल्या महिलांचं भावविश्व उलगडताना दिग्दर्शिका जसमीत रीनने त्याला डार्क कॉमेडीचा तडका दिलाय. आपल्याला दारूच्या नशेत मारहाण करणाऱ्या नवऱ्याला बद्रून्निसा तिच्या आईच्या मदतीने नामोहरम करते. प्रेमातला समर्पण भाव आणि अधिकार यातला फरक सांगणारा हा सिनेमा स्त्रीद्वेष्ट्या मानसिकतेला कुठल्याही धर्माचं बंधन नसल्याचं अधोरेखित करतो.

पोन्नी ही दलित महिला कॉन्स्टेबल आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला कसा घेते, हे ‘सानी कायीदम’ या तमिळ सिनेमात आपल्याला दिसतं. पोन्नीच्या नवऱ्याला आणि मुलीला जिवंत जाळून तिच्यावर अत्याचार केलेले सवर्ण धनदांडगे आपल्या वशिल्याचा वापर करत कायद्याच्या कचाट्यातून सुटतात. पण आपल्या भावाच्या मदतीने जातव्यवस्थेने लादलेलं गुलामगिरीचं जोखड भिरकावून लावत पोन्नी आपला सूड पूर्ण करते.

हेही वाचा: प्रिया रमानी खटला : बाईचा सन्मान जपणारं कोर्टाचं जजमेंट

चौकटी मोडणाऱ्या नायिका

‘गट्टा कुश्ती’ या तमिळ सिनेमात ऐश्वर्या लक्ष्मीने कुस्तीपटू किर्तीची भूमिका साकारलीय. हा सिनेमा बघताना हिंदीतल्या ‘सुलतान’ची आठवण येणं साहजिकच आहे, पण ‘गट्टा कुश्ती’चं वेगळेपण हे त्याच्या नायिकाप्रधान कथानकात दडलंय. लग्नानंतर कुस्ती सोडलेली किर्ती जेव्हा पुरुषी अहंकार जपणाऱ्या तिच्या नवऱ्याला गुंडांच्या तावडीतून वाचवण्यासाठी पुन्हा एकदा आखाड्यात उतरते, तेव्हा तिच्या मर्दानी अवताराचे आपणही चाहते होऊन जातो.

‘गंगूबाई काठियावाडी’ हा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बायोपिक कामाठीपुरा वेश्यावस्ती आणि तिथल्या एकंदर व्यवस्थेवर भाष्य करतो. पुरुषांनी पुरुषांच्या सोयीसाठी चालवलेल्या या दलदलीत गंगूलाही फसवून आणलं जातं. गंगूचा एका साधारण वेश्येपासून ते गंगूबाई काठियावाडी या कामाठीपुराची मालकीण बनेपर्यंतचा हा प्रवास अनेक प्रश्न मनात उपस्थित करून जातो.

दिल्लीच्या सीमेवरचं फतेपूर असोला हे बाऊन्सरचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. दिल्लीतल्या शेकडो बारमधे काम करणारे बहुतांश बाऊन्सर याच गावचे आहेत. ‘बबली बाऊन्सर’मधे तमन्ना भाटियाने साकारलेली बबलीही याच गावाची आहे. सुरवातीला नाईलाज म्हणून बाऊन्सर बनलेली बबली कालांतराने स्वतःचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण आणि नोकरी ही तारेवरची कसरत कशी पार पाडते, हे जाणून घेण्यासाठी ‘बबली बाऊन्सर’ बघणं गरजेचं आहे.

आर्थिकदृष्ट्या सक्षम नायिका

कंडोम हा शब्द उच्चारला तरी स्वतःला सभ्य, सुसंस्कृत म्हणवून घेणारे लोक कावरेबावरे होताना दिसतात. अशाच लोकांच्या भाऊगर्दीत सापडलेल्या मनोकामना उर्फ मन्नूला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायची इच्छा आहे. त्यासाठी कष्टाची तयारी असलेल्या मन्नूवर नेमकी जबाबदारी येते ती कंडोम विकायची. ‘जनहित में जारी’ या सिनेमाची ही कथा कधी आपल्याला खळखळून हसवते, तर कधी अंतर्मुख व्हायला भाग पाडते.

‘हवाहवाई’ या सिनेमातून निमिषा साजयन या मल्याळम अभिनेत्रीने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलंय. रस्त्यावर वेगवेगळे खाद्यपदार्थ विकणाऱ्या एका मध्यमवर्गीय महिलेची ही कथा. आपलं घर आणि हा व्यवसाय सांभाळताना निमिषाची धावपळ होते खरी, पण एक पत्नी आणि एक आई या दोन साचेबद्ध भूमिका काही काळापुरत्या बाजूला ठेवून व्यावसायिकेच्या भूमिकेत शिरलेली निमिषा आत्मविश्वासाचा स्त्रोत म्हणून आपल्यासमोर येते.

हेही वाचा: डॉ. स्वाती मोहन : मंगळावर रोवर लँड करणारी भारताची लेक

न्याय-हक्क जपणाऱ्या नायिका

‘नक्षत्रम नगरगिरदू’ हा पा. रंजित या तमिळ दिग्दर्शकाचा गेल्यावर्षी आलेला सिनेमा लिंगभेद आणि जातभेदापलीकडचं प्रेम या संकल्पनेवर आधारित आहे. दुसारा विजयनने साकारलेली रेने ही युवती ‘नक्षत्रम नगरगिरदू’च्या मध्यवर्ती पात्रांपैकी एक आहे. रेने ठामपणे स्वतःला आंबेडकरवादी म्हणवून घेते. रंजितसारख्या वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असलेल्या लेखकाने लिहलेलं हे स्वाभिमानी पात्र परिवर्तनाची कास धरू पाहणाऱ्या युवतींसाठी एक प्रेरणास्थान ठरू शकतं.

‘गार्गी’ या तमिळ सिनेमात साई पल्लवीने प्रमुख भूमिका साकारलीय. आपल्या बापावर बाल लैंगिक अत्याचाराचा ठपका लागल्यानंतर त्याच्या सुटकेसाठी धडपड करणारी लेक, मीडिया ट्रायलमुळे समाजाचा रोष ओढवून घेतल्यानंतर घरच्यांच्या संरक्षणासाठी हिमतीने उभी राहणारी मोठी बहीण आणि खऱ्या आरोपीला गजाआड पाठवून नीतीमूल्यांची वीण घट्ट करणारी शिक्षिका ही गार्गीची तिन्ही रूपं साई पल्लवीने उत्तम वठवली आहेत.

अस्तित्व सिद्ध करणाऱ्या नायिका

२०२२मधे आपल्या भेटीला आलेल्या या सर्व नायिकांची कौटुंबिक, सामाजिक पार्श्वभूमी वेगवेगळी असली तरी त्यांच्यातला लढाऊ बाणा हे सगळ्यांमधलं एक मोठं साम्यस्थळ म्हणून ठळकपणे समोर येतं. या नायिका कौटुंबिक हिंसेला ‘भारतीय नारी’सारखं सोशिकपणे सामोरं जात नाहीत, तर त्या थेट समोरच्याची कॉलर पकडून जशास तसं उत्तर द्यायला काम तयार असतात.

अमुक प्रकारची कामं पुरुषांनीच करावीत अशी मनाची समजूत घालत चूल आणि मुलापुरतं स्वतःला संकुचित करून घेणं या नव्या नायिकांना पटत नाही. त्या कधी कुस्तीपटू होतात तर कधी बाऊन्सर. कधी त्या स्वतःच्या आर्थिक प्रगतीला महत्त्व देतात, तर कधी आपल्या ठोस वैचारिक भूमिकांच्या माध्यमातून स्वतःचं स्वतंत्र, सबल आणि सक्षम अस्तित्व अधोरेखित करत असतात.

हेही वाचा: 

कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का?

चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषीपणाचा वायरस मारून टाकूया

गोझी ओकोन्जो : आर्थिक सत्तेच्या चाव्यांनी विकासाची दारं उघडणाऱ्या ‘आजीबाई’