मानसिक ताणतणावांकडे दुर्लक्ष करणं आपल्याला परवडणारं नाही

१० ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आज १० ऑक्टोबर. जागतिक मानसिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक मानसिक आरोग्य संघटना यांच्या वतीने यंदाच्या जागतिक मानसिक रोग दिनाचं घोषवाक्य ‘आत्महत्या रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणं’ असं आहे. मानसिक आजारांबाबतचे पुर्वग्रह सोडून त्याविषयी जागरूकता वाढवण्याचं काम तातडीनं हाती घेतलं पाहिजे. 

गोथाम शहरात राहणारा आर्थर फ्लेक. गर्दीतही एकटा राहणारा. त्याला मधूनच कधीही हसू येतं. तसं हसण्याचा मानसिक आजार त्याला आहे. जोकर म्हणून हॉटेलात, पार्टीत किंवा लहान मुलांच्या हॉस्पिटलमधे तो काम करतो. त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्याची आणि त्याच्या आईची गुजराण चालते खरी.

पण त्याला व्हायचंय स्टँडअप कॉमेडीयन! मानसिक आजाराशी झगडत आयुष्याचे वेगवेगळे चढउतार आर्थर अनुभवतो. ‘मानसिक आजार असण्यातली सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे लोक आपल्याकडून चांगलं वागायची अपेक्षा ठेवता. जसं की आपण कधी चांगलं वागलेलंच नसतो,’ असं त्याचं याबाबतीतलं मत. मानसिक अस्थैर्यामुळे शेवटी हा जोकर गुन्हेगार बनतो. ही 'जोकर'ची कथा.

जोकर साकारणारे मानसिक रुग्ण

पडद्यावर जोक्विन फिनिक्सने साकारलाला जोकर आणि त्याचा अभिनय बघणं जास्त उत्कंठावर्धक ठरतं. गेली कित्येक दशकं बॅटमॅनमधील खलनायक असलेलं हे पात्र आजवर जॅक निकोलसन, मार्क हॅमिल, जेरेड लेटो, कॅसर रोमेरो, रॉजर स्टोनबर्नर, हिथ लेजर आणि जोक्विन फिनिक्स या सात नामवंत अॅक्टर्सनी रंगवलंय.

यापैकी जोक्विन फिनिक्स वगळता इतर सर्व अॅक्टर जोकर साकारल्यानंतर मानसिक रुग्ण झाले. त्यातले तिघेजण म्हणजे जेरेड लेटो, कॅसर रोमेरो, रॉजर स्टोनबर्नर हे अॅक्टर्स उपचारानंतर या मानसिक आजारातून बाहेर आले. पण इतरांची अभिनय कारकीर्द या भूमिकेमुळे कायमची संपली. भूमिकेचा सखोल अभ्यास केल्याने मानसिक आरोग्य गमावून बसलेल्या हिथ लेजरने तर आत्महत्या केली.

भारतात दोन लाख आत्महत्या

हे सगळं आज लिहायचं कारण म्हणजे दहा ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक मानसिक आरोग्य संघटना यांच्या वतीने यंदाच्या जागतिक मानसिक रोग दिनाचं घोषवाक्य ‘आत्महत्या रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणं’ असं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार २०२० पर्यंत हृदयरोगानंतर नैराश्य हा मनोविकार दुसऱ्या क्रमांकावर असेल. वाढत्या ताणतणावांमुळेच याचं प्रमाण येत्या काही वर्षांत वाढत जाणार आहे. २०१६ मधे भारतात सुमारे २ लाख ३० हजार ३९४ व्यक्तींनी आत्महत्या केल्याचं हा अहवाल सांगतो.

हेही वाचा : गांधी विरोधकांचा पंथ निर्माण करताना

कसं ओळखावं नैराश्य?

एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत असल्यानं त्या रोखणं खरंच एक आव्हान आहे. आत्महत्येचा विचार करणाऱ्यांच्या वागण्यात, स्वभावात, रोजच्या सवयीत बदल होतो आणि तो जवळच्या माणसांना सहज टिपता येऊ शकतो. असे विचार येणाऱ्या व्यक्ती दु:खी दिसतात. अबोल बनतात आणि कुठल्याही कामात रस घेत नाहीत.

एवढंच नाही तर स्वत:ची काळजीसुद्धा घेत नाहीत. व्यसनांच्या आहारी जातात. कधीकधी तर आत्महत्येचे विचार बोलून दाखवतात. जगण्याचा कंटाळा आल्याची भाषा करतात. अशा व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्नदेखील केलेला असतो. असे इशारे आपण गांभीर्याने आणि तातडीने लक्षात घ्यायचे असतात.

आत्महत्या करण्याची अवस्था ही नैराश्यग्रस्ततेची परिसीमा आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ८० टक्के आत्महत्या या कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमधे होतात आणि ९० टक्के आत्महत्यांमागे नैराश्य असल्याचं स्पष्ट झालंय.

हेही वाचा : द्वेषावर हिंसेने विजय मिळवायचा की प्रेमाने?

वीसपैकी एका माणसाला नैराश्य

अलीकडच्या काळात अनेक कारणांमुळे मानसिक विकारांचे प्रमाण वाढलंय. फक्त शहरं, महानगरांमधील नागरिकांमधेच असे आजार दिसतात असं नाही. ग्रामीण भागातही झपाट्याने यात वाढ होतेय. नैराश्यावर वेळीच उपाय केला नाही तर अशी व्यक्ती स्वत:साठी किंवा इतरांसाठी धोकादायक ठरू शकते. आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकते.

नैराश्य हा वेळीच आणि योग्य उपचारांमुळे बरा होणारा आजार आहे. सध्या जगातील ३५० दशलक्ष लोक नैराश्यग्रस्त आहेत. जागतिक मानसिक आरोग्य सर्वेक्षणाच्या १७ देशांमधील केल्या गेलेल्या अभ्यास संशोधनात सर्वसाधारणपणे दर २० जणांमधे एक जण नैराश्याच्या आजारानं ग्रस्त आढळला आहे. त्यामुळे नैराश्याच्या आजाराबाबत जनजागृती आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्याची आता आवश्यकता आहे, असं डब्लूएचओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन सांगतं.

हेही वाचा : आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!

मानसिक आजार हाही इतर आजारांसारखाच

मनोविकारांवर उपचार उपलब्ध असूनही रुग्णांमधे याबाबत अनभिज्ञता दिसते. औषधोपचार, मानसोपचार, समुपदेशन, वर्तन उपचार, संमोहन अशा उपचार पद्धती मनोरुग्णांसाठी उपलब्ध असतात. अनेक मनोविकार योग्य वेळी उपचार घेतल्यावर त्यातून आपण बरे होऊन बाहेर पडू शकतो. पण उपचारांबाबतच्या अज्ञानामुळे रुग्णांमधे उपचार घेण्यासाठी तत्परता दिसत नाही.

मनोविकार आणि मानसोपचार याबाबत लोकजागृती आवश्यक आहे. पूर्वी अशा आजारांचं निदान लवकर आणि सहज होत नव्हतं. मानसिक आजार असणं हा मोठा कलंक समजला जात होता. एखादा माणूस वेडा असेल तरच त्याला मानसोपचार तज्ञांकडे नेलं जातं असा समज होता.

त्यामुळे मानसिक ताण, नैराश्य, मनातील इतर नकारात्मक भावना अशा गोष्टींसाठी मानसोपचारांची मदत घेणं म्हणजे आपण वेडे झालो आहोत असा समज होता. पण आता हे चित्र बदलतंय. इतर आजारांप्रमाणेच मानसिक आजार हाही एक आजार आहे, असा समज आता दृढ होऊ लागलाय. ही एक सकारात्मक गोष्ट म्हणावी लागेल.

मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष नको 

जोकरसारखे आपल्या आजूबाजूला असे अनेक 'आर्थर' नोकरीतल्या डेडलाईन्सपासून ते नोकरी न मिळण्यापर्यंत आणि घरगुती भांडणापासून ते एकटेपणापर्यंत अनेक टप्प्यावर मानसिक अस्थैर्याशी झगडत असतात.

अनेकदा एन्झायटी, डिप्रेशन यांनी ते ग्रस्त आहेत हे त्यांनाही कळत नाही आणि आपल्यालाही. मानसिक आरोग्याबाबत उदासीनता हे यामागचं मुख्य कारण आहे. येत्या काळात ही उदासीनता दुर करण्याकडे आणि यासाठी व्यापक जनजागृती करण्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायची गरज आहे.

निदा फाजलींच्या शब्दांत सांगायचं तर,

हर तरफ़ हर जगह बेशुमार आदमी
फिर भी तनहाईयों का शिकार आदमी

अशी अवस्था झालेली असताना मानसिक आजारांकडे दुर्लक्ष करणं आपल्याला अजिबात परवडणारं नाही.

हेही वाचा :

मराठी गरबा का बंद झाला?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार या पाच मुद्द्यांभोवती फिरणार

भाजपचा अश्वमेध रोखण्यासाठी विरोधकांना कांशीरामांकडे जावंच लागेल!