लोकसंख्या समस्या नाही तर देशाला विकसित करण्याची संधी आहे

११ जुलै २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिन. वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं म्हणून युएनने हा दिवस सुरु केला. पण जगातल्या सर्व सरकारनी बेबी बुमर्सला पाठिंबा दिल्यामुळे ही लोकसंख्या वाढल्याचं नेहमी सांगितलं जातं. आता लोकसंख्या वाढलीय, समस्या उद्भवल्यात. मग आता आपण याकडे सकारात्मक नजरेने बघून जर या समस्येला संधी म्हणून बघितलं तर?

आपण वर्षभरात मदर्स डे, हास्य दिन असे बरेच दिवस साजरे करतो. पण काही दिवस हे साजरे करण्यासाठी नसतात. ते दिवस आपल्याला त्या विषयाची जाणीव करून देणारे असतात की आपल्याला यावर उपाययोजना करायच्या आहेत, याची जनजागृती करायची आहे. असे दिवस कोणते आहेत? कर्करोग दिन, हृद्यविकार दिन, मधुमेह दिन,व्याघ्र दिन इत्यादी. असाच आज ११ जुलैला लोकसंख्या दिन आहे.

वाढत्या जागतिक लोकसंख्येवर जनजागृती करण्यासाठी लोकसंख्या दिन हा वार्षिक दिन म्हणून नेमण्यात आला. युनायटेड नेशन डेवल्पमेंट प्रोग्रॅमने ११ जुलै १९८९ ला जागतिक लोकसंख्या दिन हा वार्षिक दिन म्हणून घोषित केला. आणखी एक गोष्ट म्हणजे याच दिवशी १९८७ ला जगाची एकूण लोकसंख्या ५ अब्जांच्या घरात गेली.

१२ महिने पाणी कपात

आज जगाची लोकसंख्या साधारण ७०० कोटींपेक्षा जास्त आहे. असं म्हटलं जातं ही लोकसंख्या दरवर्षाला ११ टक्क्यांनी वाढत आहे. आपण वाढती लोकसंख्या या विषयावर लहानपणापासून ऐकत आहोत. काहींनी तर लोकसंख्या शाप की वरदान हा निबंधसुद्धा खूपदा लिहिला असेल. भूगोलाच्या प्रत्येक वर्षीच्या पुस्तकात लोकसंख्येवर काहीना काही असायचंच. पण आपण सगळे लोकसंख्येला एवढे का घाबरतो हे जाणून घ्यायला हवं.

समाजशास्त्रामधे लोकसंख्या वाढीचे नकारात्मक परिणाम सांगणाऱ्या काही घटकांची चर्चा केलीय. त्यापैकीच एक घटक म्हणजे जमिनीवरचा भार. आपण मस्करीत लठ्ठ माणसांना किंवा कामचूकार माणसांना जमिनीवरचा भार म्हणून चिडवलं असेल. पण हे खरंच आहे देशाच्या क्षेत्रफळात कार्यालये, कारखाने, शेती करायचं की राहण्याची घरं? असा प्रश्न पडतो. मुंबईसारख्या शहरांमधे इंचा इंचाच्या जागेचा वापर कौशल्याने करतात असं आपण कौतुक करतो पण जागा कमी पडत असल्यावर हे सगळं करावंच लागतं.

लोकसंख्या वाढल्यामुळे आपल्याला राहण्यासाठी, आपल्या उपयोगी वस्तू बनवण्यासाठी जंगलं तोडावी लागतात, नैसर्गिक संपत्तीचा अधिकाधिक वापर होतो. त्यामुळे कार्बन डाय ऑक्साइड, मोनॉक्साइड, नायट्रस ऑक्साइड वाढतं. आणि या सगळ्यामुळेच आज आपण ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करत आहोत. अशावेळी वातावरणात बदल झाल्याने पावसावर परिणाम होतो. मग काय? शेतीचं नुकसाना, पाणी टंचाई इत्यादींना तोंड द्याव लागतं. महाराष्ट्रात तर कित्येक गावांमधे १२ महिने पाणी कपात असतं.

हेही वाचा: जगभर लोकशाहीची जागा टोळीवाद घेतोय

न संपणाऱ्या समस्या

मूलभूत सुविधा सगळ्यांपर्यंत पोचत नाहीत.  वैद्यकीय सोयी, अन्नधान्यांचा तुटवडा यासगळ्यांमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. एकतर कुटुंबाचं उत्पन्न आणि उदरनिर्वाहाचा खर्च यांचा मेळ बसत नाही. शेतीवर परिणाम झाला की त्याचा फटका सगळ्याच गोष्टींना बसतो मग महागाई वाढते. आणि ही वाढलेली लोकसंख्या महागाईत होरपळून जाते.

याचा फार मोठा परिणाम शिक्षणावर होतो. भारतातल्या प्रत्येक नागरिकाला समान दर्जाचं शिक्षण मिळत नाही, शिक्षण मिळालं तरी नोकरी नाही. भारताच्या लोकसंख्येच्या हिशेबाने नोकऱ्यांची निर्मिती होत नाही. बोजगारी वाढत जाते. त्यात जगाची अर्थव्यवस्था तितकीशी बरी नसल्याने फॉरेन फंडींग, कंपन्या, प्रोजक्ट येत नाहीयत. आणि बिझनेस करावा म्हटलं तरी अजून तितकसं वातावरण बनलेलं नाही. आज स्टार्टअप्स मोठ्या प्रमाणात येत असले तरी त्यापैकी किती कंपन्या तग धरतायत हा मोठा प्रश्नच आहे.

शहरांमधे किमान सोयी सुविधांचा तुटवडा पण गावांमधे तर त्या सोयी पोचलेल्याच नाहीत. त्यात शिक्षण आणि नोकऱ्यांची संधी नाही. म्हणून लोक शहराकडे वळतात. त्यामुळे आज गावंच्या गावं ओसाड पडलीयत. आणि मुंबईसारख्या शहरांची परिस्थिती आपल्यापासून लपलेली नाही. अनधिकृत झोपट्ट्यांचं साम्राजच उभं राहिलंय. आणि याला धरून अनेक न संपणाऱ्या समस्याला उद्भवल्यात.

हेही वाचा: काकडधरा गावानं वॉटरकप स्पर्धा जिंकली पण

बेबी बुमर्समुळे वाढली लोकसंख्या

पण आपल्याला माहिती आहे का? दुसऱ्या महायुद्धात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या औद्योगिक क्रांतीला लागलेला ब्रेक लागला. पण त्यानंतर अनेक अशा गोष्टी आल्या ज्यामुळे माणसाचं जीवन सुकर झालं. अनेक औषध, उपचार आल्यामुळे मृत्यूदर घटला. त्यामुळे उद्योग, संशोधन आणि लोकसंख्येत बॅलन्स आणण्यासाठी बेबी बुमर्सला सर्व देशांनी पाठिंबा दिला.

तर दुसरीकडे महायुद्धाचा लोकांवर झालेला परिणाम काही कमी होत नव्हता. ते डिप्रेशनमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते यासाठी कुटुंब वाढवण्याचा विचार केला गेला. तसंच युद्धानंतर राहिलेली लग्न मोठ्या प्रमाणात झाली. आणि  युद्धात मनुष्य हानी मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्यामुळे तरुणांची संख्या घटली. लोकसंख्येत असामानता आली इत्यादी कारणांमुळे बेबी बुमर्स जनरेशन आलं. हे जनरेशन १९४६ ते १९६४ दरम्यान जन्माला आलेली पिढी. यामुळे जगाच्या एकूण लोकसंख्येत ४० टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या मागे बेबी बुमर हे मूळ कारण सांगितलं जातं, ही माहिती हिस्ट्री टीवीच्या संपादकीय विभागाने २०१० मधे प्रसिद्ध केली होती.

हेही वाचा: वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन

लोकसंख्या आपली ताकत बनू शकते

आता लोकसंख्या वाढ ही समस्या असली तरी ही समस्या आपल्या फायद्याचीही ठरू शकते. कारण प्रत्येक गोष्टीचे तोटे असतात तसे फायदेही असतातच. प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्या या गंभीर समस्येला चांगल्या संधीमधे बदलता येऊ शकतं. आपल्या देशात ५०% पेक्षा जास्त लोक हे तरुण आहेत. म्हणूनच तर आपण यंग इंडिया असं सारखं म्हणत असतो. जपान आणि काही युरोपिअन विकसित देशांमध्ये तरुण लोकांचीच कमी आहे. कुठलाही देश चालवण्यासाठी तरुण कामगार, नोकरवर्ग, प्रशासन अधिकाऱ्यांची गरज असते. मग तरुण कमी असणाऱ्या अश्या प्रगत देशांना दुसऱ्या देशातून मनुष्यबळ आणावं लागतं.

पण भारताकडे अशा तरुणांची कमी नाही. पण त्यांना योग्य प्रशिक्षण दिलं पाहिजे. तर आपल्या देशात ते चांगल्या नोकऱ्या मिळवू शकतात, स्वत: नोकऱ्या निर्माण करू शकतात. सर्व क्षेत्रांत गरज आहे तिथे काम करू शकतात. इतर देशांमधे जाऊनही नोकऱ्या मिळवू शकतात. या मधल्या काळात भारतीयांनी इतर देशांमधे जाऊन खूप चांगलं काम केल्यामुळे भारतात परदेशी गुंतवणूक वाढली, इतर देशांनी संबंध प्रस्थापित व्हायला सुरवात झाली. त्यामुळे देशाच्या विकासाला गती आली.

यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्यांनी ‘स्किल इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ सारख्या योजना आणल्यात. यातूनच जास्तीत जास्त नोकऱ्या आणि व्यवसायाच्या संध्या उपलब्ध करून देण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. भारतामधील खूप सारी लोकसंख्या मध्यम वर्गात मोडते. हे मध्यम वर्गीय लोक मूलभूत आणि विशेष वस्तू आणि सेवांचा उपभोग करतात. जेवढा जास्त आर्थिक व्यवहार होतो तेवढी जीडीपीत वाढ होते. म्हणूनच विकसित देश भारताकडे १३० करोड उपभोक्त्यां अशी एक मोठी बाजारपेठ म्हणून बघतात. म्हणून भारतात आपली कंपनी आणण्यासाठी परदेशी लोक आतुर असतात त्याचा फायदा म्हणजे भारतीयांना नोकरीची मोठी संधी मिळते.

वाढत्या लोकसंख्येमुळे भारतासमोर खूप अचडणी असल्या तरी आपण याला अडचण, समस्या न मानता या लोकसंख्येकडे एक संधी म्हणून पाहावे लागेल. शिक्षण आणि प्रशिक्षणाने आपण स्किल्ड लोकसंख्या बनवली तर ही लोकसंख्या आपली ताकत बनेल.

हेही वाचा: 

बुवाबाबा, साधू, महाराजांनाही संत म्हणावं का?

झोपाळू रोहित शर्मा आळस झटकून जगातला टॉप बॅट्समन बनला

मोदींमुळे ५ ट्रिलियन हा शब्द ट्रेंड झालाय, पण ट्रिलियन म्हणजे एकावर किती शून्य?