आज जागतिक जल दिवस. मानवी हस्तक्षेप आणि पर्यावरणीय संकटांमुळे आपली भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्याचं जागतिक हवामान संघटनेनं म्हटलंय. आज पृथ्वीवरच्या गोड्या पाण्यापैकी ९९ टक्के वाटा भूजलाचा आहे. त्यामुळे हे भूजल साठे वाचवायला हवेत. तोच संदेश देणारी यावर्षीची 'जागतिक जल दिवसा'ची थीम महत्वाची ठरतेय.
गेल्यावर्षी जागतिक हवामान संघटनेनं 'स्टेट ऑफ क्लायमेट सर्विसेस' या नावाने एक रिपोर्ट प्रकाशित केला होता. जगभरात आधीच पाणी टंचाईचं संकट उभं राहतंय. या रिपोर्टनं २००२ ते २०२१ या २० वर्षांमधे भूजल पातळीत १ सेंटीमीटरनं घट झाल्याचं म्हटलं होतं. तर भारतातली ही घट प्रतिवर्षी ३ सेंटीमीटरची आहे. त्यामुळे भूजल साठ्यांचं महत्व कितीय हे सांगणारी यावेळच्या 'जागतिक जल दिवसा'ची थीम महत्वाची आहे.
१९९२ला ब्राझीलच्या 'रिओ दि जानेरो' या शहरात पर्यावरण आणि विकास या विषयावर संयुक्त राष्ट्रानं एका संमेलनाचं आयोजन केलं होतं. त्याच वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं पाण्याचं महत्व जगभर पोचावं म्हणून एक प्रस्ताव आणला. २२ मार्च हा जगभर 'जागतिक जल दिवस' म्हणून साजरा करायचा हा प्रस्ताव होता.
१९९३पासून २२ मार्च जागतिक जल दिवस साजरा करायला सुरवात झाली. पाण्याचं महत्व लोकांना पटावं म्हणून या दिवशी जगभरात सार्वजनिक पातळीवर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. हा विचार अधिक व्यापकपणे जगभर पोचावा म्हणून इतरही उपक्रमांशी याला जोडलं गेलंय.
२०१३ हे जल क्षेत्राच्या मदतीसाठी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं होतं. स्वच्छ पाणी हा संयुक्त राष्ट्राच्या 'शाश्वत विकास उद्दिष्टां'चा एक भाग झालाय. या कार्यपूर्तीचा एक भाग म्हणून २०१८ ते २०२८ ही वर्ष निश्चित करण्यात आली आहेत.
हेही वाचा: जगात पर्यावरण आणीबाणी घोषित करा सांगणाऱ्या ग्रेटा ताईची गोष्ट
आपल्या पाण्याचे स्रोत ही जमिनीमधे असतात. हे पाणी झरे, नद्या, सरोवरं या मार्गाने पाणथळ जागा आणि समुद्रात वाहून जातं. पाण्याचे स्रोत शाबूत ठेवणारी भूजल पातळी दिवसेंदिवस ढासळत चाललीय. त्यामुळे त्यांना पुन्हा जैसे थे स्थितीत आणणं आणि 'भूजल पातळी पुन्हा कार्यान्वित करणं' २०२२च्या जागतिक जल दिवसाची थीम आहे.
वाढत्या प्रदूषणामुळे भूजल साठे संकटात आहेत. मागच्या वर्षी डिसेंबरमधे भारताच्या संसदेतही याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी केंद्रीय जलशक्ती खात्याचे मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी भूजल पातळी घटल्याचं म्हटलं होतं. आज जगभरातले अनेक दुष्काळी भाग पाण्यासाठी भूजल साठ्यांवर अवलंबून असतात. हेच साठे पिण्याचं पाणी, औद्योगिक क्षेत्र, स्वच्छता, खाद्य उत्पादनं यासाठी लागणारी पाण्याची मोठी गरज भागवत असतात.
भूजल साठे पाण्याचा अदृश्य स्रोत आहे. या भूजल साठ्यांमुळे झरे, नद्या, सरोवरं ही साखळी पुढं जातेय. हे पाणी पंप किंवा विहिरींमुळे आपल्यापर्यंत पोचतं. त्यामुळे हे पाण्याचे साठे सुरक्षित राहणं काळाची गरज बनलीय. त्यांच्यावर आलेलं संकट आपल्या हिताचं नाही. त्यामुळेच याचा समावेश संयुक्त राष्ट्राने 'शाश्वत विकास उद्दिष्टां'मधे केला. २०३०पर्यंत स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणं हा त्याचा महत्वाचा उद्देश आहे.
संयुक्त राष्ट्राच्या एका रिपोर्ट नुसार, जगातल्या सगळ्यात ताज्या आणि गोड पाण्याचा स्रोत भूजल साठे आहेत. सिंचनासाठी वापरलं जाणारं ४० टक्के पाणी भूजल स्रोतांमधून येतं. आजच्या घडीला आशिया आणि पॅसिफिक या भागात पाण्याची उपलब्धता जगभरच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे या भागातला भूजल साठा २०५०पर्यंत ३० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाजही या रिपोर्टमधे वर्तवण्यात आलाय.
भूजल साठ्यांवरचं संकट वाढायला प्रदूषणही कारण ठरतंय. उत्तर अमेरिका, युरोपमधे खतांमधे वापरलं जाणारं नायट्रेट, कीटकनाशकं भूजल साठ्यांसाठी मोठं संकट आहे. त्यामुळेच संयुक्त राष्ट्राने त्यादृष्टीने पावलं उचललीत. जल दिवसाचं निमित्त साधत भूजल साठ्यांचा मुद्दा जगभर पोचावा यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय.
युनेस्कोनं ९ व्या जागतिक जल परिषदेत संयुक्त राष्ट्राचा 'जागतिक जल विकास अहवाल' प्रकाशित केलाय. अनेकवेळा नैसर्गिक संसाधनं आपल्या मालकीची समजून त्याचा वापर केला जातो. त्यामुळे या अहवालातून भूजलाची प्रचंड क्षमता आणि त्याचं शाश्वत व्यवस्थापन दुर्लक्षित करता येणार नसल्याचा मुद्दा अधोरेखित केलाय.
हेही वाचा:
शुद्ध हवेसाठी, हॅशटॅग ‘शुद्ध हवा हक हमारा’ कॅम्पेन
‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?
पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!
नव्या वर्षात यूएनने ‘झाडं जगवा, जीव वाचवा’ असा नारा का दिलाय?
आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!