हमीद पर उम्मीद : कोरोनाचं औषध सिप्ला शोधेल असं जगाला का वाटतं?

१८ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ८ मिनिटं


'गो कोरोना… कोरोना गो…' असं बोलणारे आठवले आणि विसरलेही. पण कोरोनाचं थैमान सुरूच आहे. अशा वेळी सिप्ला कंपनीचे सर्वेसर्वा डॉ. युसूफ हमीद हे कोरोनावरचं औषध शोधून काढतील आणि ते औषध कोरोनाच्या रुग्णांना अगदी कमी किंमतीत मिळेल, अशी खात्री फक्त भारतीयांनाच नाही, तर जगालाही वाटतेय. सिप्लाने हा विश्वास गेल्या दोन पिढ्यांच्या समर्पणातून कमावलाय.

`युसूफ हमीद हे भारतातले तिसऱ्या क्रमांकाचे सगळ्यात श्रीमंत मुसलमान आहेत. हमीद एचआयवी एड्स आणि अस्थमावर उपचार शोधणारे पहिले शास्त्रज्ञ आहेत. युसूफ हमीद यांची संपत्ती २.७ बिलिअन डॉलरपेक्षा जास्त आहे. त्यांची सिप्ला ही औषध बनवणारी कंपनी देशातल्या ट्रेड्रिंग कंपन्यांच्या यादीत ४२व्या स्थानावर आहे. सगळ्यात विश्वासार्ह कंपनीचा दर्जाही या कंपनीला देण्यात आलाय.`

युसूफ हमीद यांची माहिती देणारा हा वीडियो इंडियन मुस्लिम या यूट्यूब चॅनेलवर २९ मार्चला अपलोड झालाय. आजपर्यंत जवळपास तीन लाख जणांनी तो पाहिलाय. फक्त त्यांनाच नाही तर महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही विश्वास वाटतोय की सिप्ला कंपनी कोरोनावर औषध हुडकून काढलेच.

हेही वाचा : अमेरिकेला हवं असणारं मलेरियाचं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट

अमेरिकेने दिली सिप्लाला परवानगी

बिझनेस स्टॅण्डर्डने २६ मार्चला दिलेल्या बातमीत म्हटल्याप्रमाणे, अमेरिकेने सिप्लाला नवं औषध तयार करण्यासाठी युएसएफडी परवानगी दिलीय. याचा थेट कोरोनाच्या औषधाशी काहीही संबंध नसला, तरीही अर्थाअर्थी तो अजिबातच नाही, असंही म्हणणं घाईचंच ठरेल.

इतक्यातच हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनसाठी अमेरिकेने भारतासोबत कशाप्रकारे संवाद केला, हे तर आपण जाणतोच. त्या तुलनेत या परवानगीकडे पाहायला हवं. अमेरिकेत खरं तर भारताच्या तुलनेत कितीतरी प्रगत, अद्ययावत टेक्नॉलॉजी आहे. तरीही तिला एका भारतीय औषध कंपनीवर विश्वास वाटतो, यामागेही एक कारण आहे.

महत्त्वाचं म्हणजे भारत सरकारनेही कोरोनाचं औषध शोधण्यासाठी सिप्ला या कंपनीसोबतच करार केल्याचं सांगितलं जातं. २२ मार्चला झी बिझनेसने दिलेल्या एका बातमीत म्हटलंय की कोरोना वायरसला मारणारं औषध बनवण्याचा दावा सिप्लाने केलाय. झी बिझनेसच्या अंदाजानुसार येत्या ६ महिन्यात हे औषध तयार होईल.

औषधामागचा विचार महत्त्वाचा

सध्या वॉट्सअपवर सिप्लाच्या स्थापनेचा किस्सा सांगणारा मॅसेज तुफान वायरल होतोय. सिप्लाला यश का मिळालं, हे मात्र अनेकांना माहीतच नाही. तबलिगी जमातच्या मूर्खपणामुळे कोरोना पसरल्याचं निमित्त करून भयंकर महामारीच्या काळातही धार्मिक तेढ आणि वाद चिघळण्याची काळजी काही समाजकंटकांनी घेतली. खोट्या बातम्या, वीडियो आणि आरोप यांचे फॅक्ट चेक होईपर्यंत लोकांच्या मनात विष कालवण्याचं काम केलं होतं.

अशा काळात मुसलमान नावाच्या मालकाचं कौतुक करणारा मॅसेज वायरल होतो, यावर लगेच विश्वास ठेवणं थोडं जड जातंच. त्यानिमित्ताने सिप्लाच्या यशोगाथेचा शोध हिंदू - मुसलमान वादाच्या पलीकडे जात आपण किती टुकार गोष्टींचं भांडवल करत बसलो आहोत, याचा गिल्ट देत राहतो.

सिप्ला थोर होण्यामागची गोष्ट आपल्याला धर्म, जात, प्रेम, दातृत्व, त्याग, विचार, तत्त्व, आवड, धाडस या सगळ्यांचे अर्थ उलगडून सांगत राहते. सिप्लाने कोरोनाचं औषध शोधून काढणं आणि इतर कंपन्यांनी शोधणं, यात मूलभूत फरक आहे. हा फरक अशी औषधं तळागाळातल्या प्रत्येकापर्यंत पोचवण्यासाठी वेळ पडल्यास आपला व्यवसाय बाजूला ठेवण्याचा आहे. त्यामागच्या महान नीतीमूल्यांचा आहे.

हेही वाचा : क्वारंटाईनमधेही लोकांना जातीची माती खाण्याची अक्कल कुठून येते?

बॅरिस्टरकी नको, केमिस्ट्री हवी

डॉ. युसूफ हमीद यांना हा वारसा मिळालाय, त्यांच्या वडलांकडून. सिप्ला ज्यांनी स्थापन केली, त्या माणसाकडून. त्यांचं नाव, केए म्हणजे ख्वाजा अब्दुल हमीद. १८९८मधे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडलांना वाटत होतं की त्यांनी बॅरिस्टर व्हावं. पोराला बॅरिस्टर करण्याचं फॅड त्याकाळी जरा बरं कमावणाऱ्या घरांमधे होतंच. म्हणून १९२४मधे वडलांनी आपल्या मुलाला इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी पाठवण्याचं ठरवलं. तयारीसाठी पैसेही जमवले.

केए हमीद यांना बॅरिस्टर करण्यासाठी त्यांचे वडील घरातून निघाले. मात्र या मुलाला बॅरिस्टर होण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. त्यांना इंटरेस्ट होता केमिस्ट्रीत. रसानयशास्त्र त्यांना खुणावत होतं. वडलांनी इंग्लंडला जाणाऱ्या जहाजात केए हमीद यांना बसवलं खरं, पण या मुलाने ऐनवेळी जहाज बदललं आणि थेट जर्मनीला पोचला.

त्याकाळी जर्मनीचं रसायनशास्त्रात मोठं नाव होतं. केमिस्ट्रीचं उत्तम शिक्षण, संशोधन, त्यातले प्रयोग या सगळ्यात जर्मनी जगात सगळ्यात आघाडीवर होती. केए हमीद यांनी बर्लिनच्या हम्बोल्ट युनिवर्सिटीत प्रवेश मिळवला. डिग्रीदेखील घेतली. फार्मसीची डिग्री मिळवताना ते तिथल्या एका मुलीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी लग्नही केलं. ही मुलगी ज्यू होती आणि कम्युनिस्टही होती.

द्वेषामधेही प्रेम जपायला हवं

त्याच काळात जर्मनीत हिटलरने जर्मनीची सत्ता ताब्यात घेऊन ज्यू आणि कम्युनिस्टांना संपवण्याचा घाट घातला होता. केए हमीद या सगळ्यातून बायको मुलांसह कसेबसे जर्मनीतून पळून भारतात आले. यात हमीद यांचे सासू सासरे मात्र जर्मनीतच अडकले. नाझी छळछावणीतच त्यांचा अंत झाल्याचे उल्लेख काही ठिकाणी सापडतात.

द्वेषाच्या साम्राज्यात प्रेम जपण्याचे संस्कार मिळवलेल्या युसूफ हमीद यांची एक छान आठवण आहे. केनेथ एक्स रॉबन्स यांनी चार वर्षांपूर्वी लिहलेल्या लेखात ही आठवण आहे. `टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकांनी १९९२ मधे युसूफ हमीद यांना फोन केला. त्याकाळी हिंदू मुस्लिम दंगल पेटली होती. सगळीकडे तणाव होता. एक मुस्लिम म्हणून तुमचं यावर मत काय, असा सवाल युसूफ हमीद यांना फोनवरून विचारला. तेव्हा युसूफ यांनी दिलेलं उत्तर फार सुरेख होतं. 'तुम्ही मला माझ्या नावामागे हमीद लागलंय म्हणून असा प्रश्न विचारत आहात. पण माझी आई ज्यू होती. त्यामुळे तुम्ही मला भारतीय ज्यू म्हणून का प्रश्न विचारत नाही?'

हेही वाचा : 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

बाहेरून आणलेलं सामानं वायरस फ्री कसं करावं?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

ग्लोव घातल्याने कोरोना वायरसपासून संपूर्ण संरक्षण होतं?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

प्रेमकहाणीने उभी केली कंपनी

या मुस्लिम-ज्यू प्रेमकहाणीने भारतात एक यशस्वी औषध कंपनी उभारल्याची माहिती देणारा एक खूप सुंदर लेख क्यूझी डॉट कॉम या वेबसाईटवर वाचायला मिळतो. त्यानुसार केए हमीद यांनी भारतात आल्यावर एक कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. फार्मसीची डिग्री घेतलेल्या या माणसानं केमिकल अँड फार्मासिटीकल इंडस्ट्रिअल लॅबोरेटरी म्हणजे सिप्लाची स्थापना केली.

२ लाख रुपयांची गुंतवणूक करत सिप्ला कंपनी स्थापण्यात आली, ते साल होतं १९३५. दोन वर्षात म्हणजे १९३७ मधे त्यांनी स्वतःचा कारखाना टाकून देशात औषधनिर्मिती सुरू केली. गावठी औषधांवर अवलंबून असलेल्या भारतातल्या लोकांना औषधांचं महत्त्व हळूहळू पटू लागलं.

सिप्लामधे जागतिक दर्जाची अत्याधुनिक औषध निर्मिती प्रक्रिया सुरू झाली. औषधशास्त्रातला सगळ्यात हुशार माणूस म्हणून केए हमीद ओळखले जाऊ लागले. मोठमोठ्या युनिवर्सिटीमधे त्यांना गेस्ट लेक्चरर म्हणून बोलावणं येत असे. औषधांसंबंधीच्या अनेक मानाच्या जागतिक समित्यांचं सदस्यत्व त्यांनी भूषवलं. स्वातंत्र्यलढ्याच्या या काळात एका औषधनिर्मिती करणाऱ्या अवलियापासून राजकारण लांब राहिलं नसतं तरच नवलं.

गांधीजींच्या प्रभावामुळे गरिबापर्यंत औषधं

मुस्लिम लीगने केए हमीद यांना अनेक ऑफर दिल्या. पण त्यांनी त्या नाकारल्या. कारण त्यांच्यावर महात्मा गांधींचा विशेष प्रभाव होता. गांधीजींनी त्यांच्या कारखान्याला भेट दिल्याचा एक फोटोदेखील गुगलवर सापडतो. गांधीजींच्या या प्रभावामुळे त्यांनी फक्त नफ्यापेक्षा आपली औषधं गरीबातल्या गरीब रुग्णाला वाजवी दरात मिळावीत, यासाठी विशेष प्रयत्न केले.

धर्माधारीत राजकारण केए हमीद यांना मान्य नव्हतं. त्यामुळे फाळणीनंतर पाकिस्तानला न जाता त्यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. रसायनशास्त्राच्या राष्ट्रीय संशोधनासाठी त्यांनी पुण्यात प्रयोगशाळा उभी करण्यासाठी पुढाकार घेतला. काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च म्हणजे सीएसआयआरची स्थापनाही त्यांनीच केली.

हेही वाचा : जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी

गरीब रुग्णांचे रॉबिनहूड

जसा बाप तसा बेटा. केए हमीद यांचा मुलगा युसूफ हमीद हेदेखील वडलांप्रमाणेच प्रचंड विद्वान म्हणून गाजले. युसूफ यांनी केम्ब्रिज युनिवर्सिटीतून केमिस्ट्रीत पीएचडी केली. बापाची कंपनी पोराचीच असते, असं आपल्याकडे म्हणतात. पण सिप्लामधे लागल्यानंतर तब्बल एका वर्षाने युसूफना त्यांचा पहिला पगार मिळाला, असा उल्लेख लोकमत हिंदीच्या एका लेखात सापडतो. केम्ब्रिज रिटर्न्ड स्कॉलरचा हा पगार होता, फक्त दीड हजार रुपये. ही गोष्ट प्रतीकात्मक असली तरी त्यामागे मुलाला उभं करण्यामागचा दृष्टीकोन स्पष्ट होतो.

कमी वयातच त्यांनी सिप्लाची सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. ही जबाबदारी देताना केए हमीद यांनी युसूफ यांना दिलेला मंत्र फार मोलाचा ठरला, 'युसूफ, आपल्या औषधांचा वापर गोरगरीब जनतेला लुटण्यासाठी नाही तर त्यांना बरं करण्यासाठी करायचा आहे, हे आयुष्यभर लक्षात ठेव.'

हा मंत्र जपल्यामुळेच आज डॉ. युसूफ हमीद हे गरीब रुग्णांसाठी रॉबिनहूड म्हणून ओळखले जातात. अलीकडेच भारत सरकारनंही त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवलंय.

पद्मभूषण का मिळाल याची ५ कारणं

देशाने युसूफ हमीद यांचा गौरव केला कारण त्यांनी पाच जबरदस्त कामं केलीत.

ती कामं अशी आहेत -

१. एड्स, टीबी आणि अस्थमावरच्या औषधांवर उल्लेखनीय संशोधन.

२. भारतीय पेटंट कायद्यात बदल घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका. यासाठी त्यांनी १९६१मधे इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर असोसिएशनीच स्थापना केली. १९७२मधे त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि देशाला गरज असलेल्या औषधांची निर्मिती करण्याचा आणि ती विकण्याचा मार्ग मोकळा झाला.

३. जगभरातल्या तब्बल १७० देशांत सिप्लाची औषधं विकली जातात.

४. सीएफसी फ्री इन्फेलर तयार करणारी अमेरिका आणि युरोपाच्या बाहेर असलेली पहिली कंपनी.

५. ब्रेस्ट कॅन्सरचं रुग्णाला स्पर्श न करता, कोणताही त्रास न होता करता येऊ शकेल असं तंत्रज्ञान विकसित केलं.

हेही वाचा : लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

देशाच्या अडचणीत सिप्ला धावली

२००५ मधे बर्डफ्लूने देशात थैमान घातलं होतं, तेव्हाही सिप्लाने देशाच्या कानाकोपऱ्या वाजवी किंमतीत बर्ड फ्लूचं औषध पुरवण्याचं काम केलं होतं. भारत पाकिस्तान युद्धावेळी सैन्याला मोफत औषध पुरवणारी सिप्ला एकमेव कंपनी होती. एड्स सारख्या दुर्धर रोगावर सिप्ला आजही अत्यंत कमी दरात औषधं पुरवते.

आजही आपल्याला बहुसंख्य औषधांसाठी इतर देशावर अवलंबून राहावं लागत नाही. यात एकट्या सिप्लाचंच योगदान नाही. इतरही औषध कंपन्यांचं योगदान आहेच. पण सिप्लाचा यातला वाटा जास्त महत्त्वाचा आहे. सिप्लाने किती प्रकारची आणि कोणकोणती औषधं शोधून काढली आहेत, याची डिटेल माहिती त्यांच्या वेबसाईटवर आहे. ती प्रत्येक दिवसागणित अपडेटदेखील होत जाते.

आता भविष्यात कोरोनाचं औषध सिप्ला शोधून काढेल की नाही, माहीत नाही. पण ते औषध सिप्लाने शोधून काढलंच, तर ते गरज असलेल्या प्रत्येकाला मिळेलच, याची खात्री मात्र शंभर टक्के देता येते. म्हणूनच सिप्ला ही एका मुसलमानाची औषध कंपनी म्हणून हिणवण्यापेक्षा फार्मा क्षेत्रातल्या एका तरबेज भारतीयाची कंपनी म्हणून अभिमानाने पाहणार नसू, तर आपल्या विचारांना झालेला संसर्ग हा कोरोनापेक्षाही भयंकर आहे, हे मरण्याआधी तरी आपण समजून घेणार आहोत का?

हेही वाचा : 

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोलंबसने नेलेल्या साथरोगांनीच संपवली मूळ अमेरिकी संस्कृती

ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?

बेरोजगारीतंही भारतातल्या मध्यमवर्गानं सांप्रदायिकतेला रोजगार बनवलं

ग्रेट लॉकडाऊन: आत्ताची आर्थिक मंदी १९३०च्या जागतिक महामंदीहून वाईट

(लेखक सिद्धेश सावंत हे तरुण टीवी पत्रकार आहेत.)