ऍमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या ‘तथास्तु’ या नव्या स्टॅण्डअप शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. देशातल्या आघाडीच्या विनोदी कलाकारांपैकी एक असलेल्या झाकीर खानचा हा शो त्याच्या आजवरच्या प्रवासाबद्दल आपल्याला सांगतो. इंदौरच्या गल्लीतून निघून भारताच्या घराघरात पोचलेल्या झाकीरची कहाणी निश्चितच प्रेरणादायक आहे.
‘मन का हो तो अच्छा, ना हो तो और भी अच्छा’
सुप्रसिद्ध हिंदी कवी हरिवंश राय बच्चन यांची ही ओळ कॉमेडीयन झाकीर खानच्या आजवरच्या कारकीर्दीचं सार सांगते, असं त्याला वाटतं. तो आपल्या ‘तथास्तु’मधे त्याच्या कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल सांगताना या ओळीचा आधार घेतो. मागाहून ऐकू येणारा टाळ्यांचा कडकडाट ही ओळ अगदी चपखल असल्याची जाणीव करून देते. अशी ही झाकीरची आजवरची कारकीर्द त्याच्या किश्श्यांइतकीच रंगतदार आहे.
हेही वाचा: सारं काही चांगलं असूनही डिप्रेशन येतंय ना, मग दीपिकाची ही गोष्ट वाचा
सेनिया घराण्यातले नामांकित सारंगीवादक उस्ताद मोइनुद्दीन खान हे झाकीरचे आजोबा. त्यामुळे साहजिकच नातवानेही संगीतक्षेत्रात नाव कमवावं, अशी खानसाहेबांची मनस्वी इच्छा होती. झालं! वयाच्या चौथ्या वर्षीच झाकीरच्या हातात सतार आली. अकराव्या वर्षी झाकीरला ती व्यवस्थित वाजवताही येऊ लागली. आजोबा खुश झाले खरे, पण झाकीरला मात्र या सगळ्यात काडीचाही रस नव्हता.
शाळेत सतत खोड्या काढायच्या. गुंडगिरी करायची. पोरांची टोळी घेऊन फिरायचं हे त्याला जास्त आवडू लागलं होतं. अभ्यासात बऱ्यापैकी चांगला असला तरी त्याच्या अशा टवाळखोर स्वभावामुळे त्याचं नाव नातेवाईकांमधे खराब झालं होतं. उस्तादजींचा नातू म्हणून त्यांची इंदौरमधे असलेली ओळख त्याच्या मध्यमवर्गीय घरच्यांच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनली होती.
झाकीर वाया गेलाय, वाईट संगतीला लागलाय या अफवांनी जेव्हा बातमीचं रूप धारण करायला सुरवात केली, तेव्हा मात्र घरच्यांचं धाबं दणाणलं. सततच्या टोमण्यांना कंटाळून झाकीरनेही मला आजोबांसारखं संगीतक्षेत्रात जायचं नाही हे सांगून टाकलं. आजवर झाकीरचं घर त्याच्याकडे उस्तादजींचा वारस म्हणून बघत होतं. त्यामुळे झाकीरने नकार दिल्यावर सगळेच बुचकळ्यात पडले.
जर संगीतक्षेत्र नाही दुसरं काय? या घरच्यांच्या स्वाभाविक प्रश्नावर बोलघेवड्या झाकीरचं एकच उत्तर होतं, ‘रेडियो जॉकी’! झाकीरची विनोदबुद्धी तल्लख होतीच, तो हजरजबाबीही होता. फावल्या वेळेत कविताही करायचा. त्यामुळे उस्तादजींचं ‘ऑल इंडिया रेडियो’वरचं सादरीकरण अनुभवत मोठ्या झालेल्या झाकीरला रेडियो जॉकी बनण्याचं स्वप्न पडलं नसतं तर नवलच!
झाकीरच्या काकांनी रेडियो जॉकीच्या कोर्ससाठी दिल्ली आणि मुंबई असे दोन पर्याय त्याच्यासमोर ठेवले. दिल्लीत कुणीही नातेवाईक नसल्यामुळे झाकीर मुंबईच निवडणार असंच सगळ्यांना वाटत होतं. पण आत्तापर्यंत एकत्र कुटुंबात वाढलेल्या झाकीरला आता पुन्हा नातेवाईकांचा गराडा अवतीभवती नकोच होता. त्यामुळे झाकीरने दिल्ली निवडली आणि घरच्यांनीही लगेच कोर्ससाठी लागणारी तीन महिन्यांची फीही भरून टाकली.
खरं तर, झाकीरला हवं होतं स्वातंत्र्य. त्यासाठी त्याला घर सोडायचं होतं. पण हे अशारितीने घर सोडणं त्याच्या मनात नव्हतं. घर सोडण्याबद्दल झाकीर म्हणतो, ‘घर सोडणारा माणूस घरापासून कापड फाटतं तसा वेगळा होतो. ते सुटलेले धागे पूर्ववत होत नाहीत. आयुष्यभर ते एक जखम बनून राहतात. आपण विस्थापित असल्याची आठवण करून देतात.’
कोर्स संपल्यावर झाकीरला नोकरी तर मिळेना, पण घरच्यांच्या रोजच्या फोनमुळे तो त्रासून गेला. आपल्याला नोकरी मिळाल्याचं त्याने खोटंच सांगितलं. घरच्यांनीही मग इकडून पैसे पाठवणं बंद केलं. आधीच मंदीमुळे आलेली बेरोजगारी आणि त्यात घरच्यांकडून आर्थिक रसद न आल्याने पदरी पडलेली गरिबी झाकीरला एकवेळ उपाशी राहण्यावर घेऊन आली.
कोर्सनंतरची तीन वर्षं झाकीर दिल्लीत चांगली नोकरी मिळवण्यासाठी झगडतच होता. रेडियोमधे त्याला काम मिळत होतं पण बोलण्याचं नाही; तर जाहिराती लिहण्याचं. पोटापाण्यासाठी लिहणं तर गरजेचं होतं, पण त्याचं मन मात्र बोलण्याकडे धाव घेत होतं. त्यामुळे कुठं कविता सादर कर, कुठं स्टॅण्डअप कर असं झाकीरचं काम सुरूच राहिलं. त्यातही त्याचे स्टॅण्डअप चांगले चालले होते.
हेही वाचा: ओटीटी प्लॅटफॉर्म थेटरचे बाप बनणार का?
अशातच एक दिवस त्याला ‘एआयबी’ या युट्यूब चॅनलकडून फोन आला. एआयबीला हिंदीत स्टॅण्डअप करणारी आणि हिंदीत लिहणारी व्यक्ती हवी होती आणि त्यावेळी या दोन्ही आघाड्या सांभाळणारं एकच नाव चर्चेत होतं. ते म्हणजे झाकीर! या फोननंतर झाकीर मुंबईला गेला आणि त्याच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. महिन्याला तीसहजार कमावणाऱ्या झाकीरला इथं मासिक पगार होता तब्बल दीड लाख रुपये!
२०१२मधे ‘इंडियाज बेस्ट स्टॅण्डअप’चा तो विजेता ठरला. त्यानंतर झाकीरने कधी मागे वळून पाहिलंच नाही. त्याचे एकापाठोपाठ एक स्टॅण्डअप गाजत गेले. मध्यमवर्गीय घरातून येणारं हे पोरगं त्याचं दिसणं, वागणं, बोलणं प्रेक्षकांना आपलंसं वाटू लागलं. त्याच्या स्टॅण्डअपमधल्या ‘सख्त लौंडा’, ‘ये कितनी ऑसम है यार’, ‘पिघलना नही है’सारख्या असंख्य पंचलाईन तरुणाईने उचलून धरल्या.
कॉलेजमधल्या एखाद्या यारदोस्ताने किस्सा सांगावा तसा झाकीर स्टॅण्डअप करतो. त्यामुळे ‘ऍनिक्डोटल कॉमेडी’ हा खऱ्याखोट्या विनोदी किश्श्यांवर आधारित कॉमेडी जॉनर झाकीरचं बलस्थान मानला जातो. त्यामुळेच की काय, ऍमेझॉन प्राईमच्या ‘कॉमिकस्तान’ या रिऍलिटी शोच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वात झाकीरला जज आणि ‘ऍनिक्डोटल कॉमेडी’ जॉनरसाठी मार्गदर्शक अशी दुहेरी कामगिरी बजावण्याची संधी मिळाली.
झाकीर स्टॅण्डअपशिवाय शायरीही करतो. ‘रेख्ता’मधलं त्याचं सादरीकरण असेल किंवा ऍमेझॉन मिनी टीवीवरचा ‘फर्जी मुशायरा’ हा त्याचा नवा शो असेल, त्याच्या ‘शायर ओपी’ असण्यावर कुणीही शंका घेऊ शकत नाही. त्याच्या कविता या एका कॉमेडीयनचं संवेदनशील मन आपल्यासमोर उलगडून दाखवतात.
नुकत्याच आलेल्या ‘तथास्तु’मधे झाकीरने त्याचा हा आजवरचा प्रवास प्रेक्षकांसमोर मांडलाय. हा स्टॅण्डअप बघताना कधी अगदी सहज, खळखळून हसू येतं; तर कधी डोळे भरून येतात. त्याच्या कलाकार पण अहंकारी आजोबांचे किस्से ऐकून सुरवातीला खलनायक, त्रासदायक वाटणारे आजोबा शेवटाला हवेहवेसे वाटू लागतात. एखादा परिपूर्ण स्टॅण्डअप कसा असावा, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘तथास्तु’!
सतारवादक बनता बनता राहिलेला झाकीर आज आपल्या कलेने अनेकांच्या काळजाच्या तारा छेडतोय. गेल्या दशकभरात त्याच्या नावाला एक मोठं वलय प्राप्त झालंय. स्टेजवर प्रवेश केल्याक्षणी प्रेक्षकांचं होऊन जावं किंवा प्रेक्षकांनी आपलंसं करावं, हे फार कमी कलाकारांच्या वाट्याला येतं. झाकीर त्यांच्यापैकीच एक आहे. त्याच्या मनाने तो कॉमेडीयन झाला हे भारी आणि त्याच्या मनाविरुद्ध जाऊन सतारवादक नाही झाला, हे लयच भारी!
हेही वाचा:
सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?
आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा