रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका उडालाय. त्याचा परिणाम थेट पेट्रोल, डिझेलच्या किंमतींवर होतोय. अशावेळी कचऱ्यातून पेट्रोल, डिझेल बनवणाऱ्या आफ्रिकेतल्या झांबिया देशाची फार चर्चा होतेय. देशातल्या एका कंपनीनं पेट्रोलियम पदार्थांमधे झांबियाला स्वयंपूर्ण बनवायचा चंग बांधलाय. त्यामुळे जगही या प्रोजेक्टकडे आशेनं पाहतंय.
झांबिया हा आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडचा एक देश. चारही बाजूंनी जमिनीने वेढलेल्या झांबियाला १९६४ला स्वातंत्र्य मिळालं. या देशाची लोकसंख्या जेमतेम पावणे दोन कोटी आहे. बाहेरून होत असलेल्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर झांबिया अवलंबून आहे. पण तिथल्याच एका कंपनीनं पेट्रोल, डिझेलमधे देशाला स्वयंपूर्ण बनवायचा चंग बांधलाय.
'सेंट्रल आफ्रिकन रिन्यूएबल एनर्जी कॉर्पोरेशन' ही झांबियातली एक कंपनी आहे. कचऱ्यापासून पेट्रोल, डिझेल बनवायची कल्पना या कंपनीला सुचली आणि ती प्रत्यक्षातही आलीय. कंपनी दररोज दीड टन कचऱ्यातून ६०० ते ७०० लिटर पेट्रोल आणि डिझेल बनवतेय. सध्या प्रायोगिक तत्वावर हे काम चालू आहे.
या प्रोजेक्टमधून झांबियाची २० ते ३० टक्के इंधनाची गरज पूर्ण करू असा विश्वास कंपनीचे मुख्य व्यवस्थापक मुलेंगा यांनी रॉयटर न्यूज एजन्सीशी बोलताना म्हटलंय. झांबिया प्रत्येक वर्षी इंधनाच्या आयातीवर १.४ अरब डॉलर खर्च करतो. त्यामुळे हा प्रोजेक्ट झांबियासाठी महत्वाचा आहे.
यासाठी ६ कोटी डॉलरच्या गुंतवणुकीची गरज आहे. हे झालं तर दर दिवशी या प्रोजेक्टमधून झांबियाला ४०० टन डिझेल, १२५ टन पेट्रोल आणि ३ टन एलपीजीचं उत्पादन घेता येईल. त्यातून झांबियाची पेट्रोलियम पदार्थांची ५० टक्के मागणी देशातूनच पूर्ण होऊ शकेल.
हेही वाचा: आहे रे, नाही रे, हीच डिजिटल युगाचीही भाषा
सध्या कंपनी या प्रोजेक्टवर युद्धपातळीवर काम करतेय. त्यासाठी प्लास्टिक, रबर, टायर असा कचरा एकत्र केला जातोय. भट्टीत टाकून तो ठराविक तापमानाला जाळला जातो. शेवटी त्यावर उत्प्रेरण नावाची रासायनिक प्रक्रिया केली जाते. पुढे त्यातून पेट्रोलियम इंधन बनतं.
जगभर या प्रोजेक्टची चर्चा आहे. शिवाय इको फ्रेंडली असल्यामुळे पर्यावरण पूरक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. कचऱ्यातून इंधन बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जाही लागते. सध्यातरी जगभरातून या तंत्रज्ञानाची मागणी आणि त्यातल्या गुंतवणुकीचा विचार केला जातोय.
एकाच वेळी टाकाऊ कचऱ्याचा योग्य पद्धतीने वापर आणि त्यातून किंमतीचा भडका उडवणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांच्या गरजा पूर्ण करण्याच्या दिशेनं प्रयत्न असं दुहेरी काम यातून होतंय. त्यामुळे एकाच फटक्यात दोन गोष्टींवर नेम धरून लक्ष्य साध्य केलं जातंय.
नेहमीचं इंधन मग ते पेट्रोल, डिझेल असो की गॅस त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होतं. कार्बन उत्सर्जन झाल्यामुळे दिवसेंदिवस जागतिक तापमानातही वाढ होतेय. मागच्या दशकभरात पूर्ण जग दिवसाला ९ कोटी बॅरल पेक्षाही अधिक कच्चं तेल वापरतंय. जमीन किंवा समुद्रातून कच्चं तेल काढणं ते आयात, निर्यात यादरम्यानच्या काळात मोठया प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत असल्याचं 'डाउन टू अर्थ' या पर्यावरणविषयक साईटवरच्या एका रिपोर्टमधे म्हटलंय.
सौदी अरेबियानंतर रशिया जगातला सगळ्यात मोठा कच्च्या तेलाचं उत्पादन घेणारा देश आहे. सध्या रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका उडालाय. कच्चं तेल प्रति बॅरल १०० डॉलरवर पोचलंय. त्याचा थेट परिणाम इंधनाच्या किंमतीवर होईल आणि पर्यायाने जगभरातल्या अर्थव्यवस्थेवरही. अमेरिकेसारख्या देशांचे हात रशियातल्या कच्च्या तेलाच्या आयातीमुळे बांधले गेलेत. त्याचा वापर रशिया दबावतंत्रासाठी करू पाहतोय.
भारतही आज जगातला तिसऱ्या क्रमांकाचा तेल आयात करणारा देश आहे. अशावेळी इंधनाची पर्यायी व्यवस्था उभी राहणं गरजेचं आहे. त्यामुळे झांबियाच्या या प्रोजेक्टकडे जग आशेनं पाहतंय. अर्थात त्याला काही मर्यादाही आहेत. पण सध्यातरी पर्यावरणाचा विचार करून कचऱ्यातून इंधन बनवायची कल्पना वेगळी, महत्वाची आणि आवश्यक म्हणायला हवी.
हेही वाचा:
लोकांनी सध्या गाड्या विकत घेणं का थांबवलंय?
ई-सिगारेटवर बंदी व्यसन रोखण्यासाठी की तंबाखू लॉबीमुळे?
इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट