‘झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायजेस’ ही मनोरंजन संस्था नुकतीच ‘सोनी पिक्चर नेटवर्क’मधे विलीन करण्यात आली. या करारानंतर झी-सोनी नेटवर्क हे भारतातलं दुसरं मोठं मनोरंजन नेटवर्क बनलंय. फक्त टीवी चॅनलच नाही तर या कंपन्यांचे ओटीटी प्लॅटफॉर्मही आता खांद्याला खांदा लावून काम करताना दिसणार आहेत. या एकीकरणामुळे भारतीय प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची नवी दालनं खुली होणार आहेत.
भारतीय प्रेक्षकांची मनोरंजनाची भूक मोठी आहे. भारतीय प्रेक्षक जितक्या आवडीनं सिनेमे आणि नाटकांसाठी थिएटरमधे गर्दी करतात, तितक्याच आवडीनं ते टीवी आणि ओटीटीवर मिळणारा कंटेंटही बघतात. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थिएटरमधल्या प्रेक्षकसंख्येवर आता मर्यादा आलीय. त्यामुळे प्रेक्षकांची भूक मिटवण्याचा भार अर्थातच टीवी चॅनल आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर येऊन पडलाय.
प्रेक्षकांचं मन राखण्यासाठी सगळे चॅनल आणि ओटीटी प्लॅटफॉर्म कंबर कसून तयार आहेत. नवनव्या कल्पनांच्या आधारे ते आपला प्रेक्षकवर्ग टिकवू आणि वाढवू पाहतायत. भारताच्या कानाकोपऱ्यात आपल्या चॅनलचं जाळं विणलेल्या ‘झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायजेस लिमिटेड’ अर्थात झीलनं नुकतीच ‘सोनी पिक्चर्स नेटवर्क’शी हातमिळवणी केलीय. झी आणि सोनीच्या या करारामुळे मनोरंजन क्षेत्रावर दूरगामी परिणाम होणार आहेत.
२०१९पासून झीलच्या कॉर्पोरेट विश्वात बरीच खळबळ उडाली होती. कंपनीच्या शेअर्सची किंमत झपाट्याने कमी होत होती. २०१९पासून झीलच्या शेअर्समधे आजतागायत लक्षणीय वाढ झालेली दिसून येत नाही. त्यातच झीलची सगळ्यात मोठी भागधारक कंपनी ‘इन्व्हेस्को’ने झीचे सध्याचे संचालक पुनीत गोयंका यांना संचालकपदावरून काढून टाकण्यासाठी प्रयत्न केले होते. अशावेळी संचालक बदलण्याऐवजी भागीदारच बदलणं झीसाठी अधिक सोयीचं वाटलं.
दुसरीकडे, सोनीकडे केबीसी, आयपीएल, इंडियन आयडॉलसारखे हंगामी कार्यक्रम सोडले तर प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा कंटेंट बराच कमी होता. त्यामानाने आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रावर सोनीची चांगली पकड असली तरी भारतात तिच्यापुढे डिज्नीच्या ‘स्टार इंडिया’चं तगडं आव्हान आहे. २०१७मधे झीच्या मालकीचं ‘टेन स्पोर्ट्स’ आपल्या ताब्यात घेत सोनीने भारतीय क्रीडाक्षेत्रात दमदार पाऊल टाकलं होतं.
आता या एकीकरणामुळे फक्त क्रीडाच नव्हे तर मनोरंजनक्षेत्रातही झी आणि सोनीचा दबदबा वाढताना दिसणार आहे. आता त्या दोघांचंही एकत्रित नेटवर्क भारतातलं स्टारनंतरचं दुसरं मोठं नेटवर्क बनलंय. आतातरी सोनीला भारतीय प्रेक्षकांच्या मनात जागा मिळेल आणि झीमागची आर्थिक साडेसाती संपेल अशी आशा आहे.
हेही वाचा: बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?
झीचा भागधारक असलेल्या ‘एस्सेल ग्रुप’ने २०१९मधे या चॅनलमधली आपली भागीदारी सोडत असल्याचं जाहीर केलं. यावेळी ‘अॅपल’, ‘कॉमकास्ट-अटायरोस’ आणि ‘रिलायन्स ग्रुप’सोबतच ‘सोनी पिक्चर्स एंटरटेन्मेंट’ अर्थात एसपीईही झीमधे भागीदारी मिळावी यासाठी उत्सुक होती. गेली दोन वर्षं जंग जंग पछाडल्यानंतर सोनी इतर स्पर्धकांना मागे टाकण्यात यशस्वी ठरली आहे.
या नव्या करारानुसार, विलीनीकरणानंतर सोनीकडे अधिक म्हणजेच ५१% शेअर्स असणार आहेत. तर उर्वरित शेअर्सवर झी आणि ‘एस्सेल ग्रुप’ची मालकी असेल. या एकीकरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी नऊ सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. यातले पाच सदस्य सोनीचे पदाधिकारी असणार आहेत.
यात एसपीईचे सर्वेसर्वा टोनी विन्सीक्वेरा, कार्यकारी उपाध्यक्ष एरिक मोरीनो आणि एसपीई कॉर्पोरेट समूहाचे अध्यक्ष रवी आहुजा यांचा समावेश आहे. शेअर्स आणि नियंत्रण समितीमधे वरवर सोनीचं वर्चस्व दिसत असलं तरीही या एकीकरणाचं अध्यक्षपद मात्र पुन्हा एकदा झीचे संस्थापक-अध्यक्ष पुनीत गोयंका यांच्याकडे देण्यात आलंय. पुढच्या पाच वर्षांसाठी तेच संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
या विलीनीकरणाबद्दल बोलताना सिनेपत्रकार अमोल परचुरे म्हणतात, ‘आता झीसाठी सोनीच्या माध्यमातून आणखी दर्जेदार कंटेंट उपलब्ध होणार आहे. सोनीकडे नव्या-जुन्या उत्तम प्रादेशिक सिनेमांचा मोठा खजिना आहे. त्यामुळे प्रेक्षकवर्गाची प्रादेशिक सिनेमांची भूक भागवण्यात झीला सोनीची मोठी मदत होणार आहे. भारतात सोनीचं न्यूज चॅनेल नाही तर झीला क्रीडाक्षेत्रात विशेष यश मिळालेलं नाही. दोघांमधे एकमेकांची कसर भरून काढण्यासाठी ही उत्तम संधी आहे.’
१९९१च्या शेवटाला स्थापन झालेल्या झीने प्रस्थापित केलेल्या नेटवर्कसमोर सोनीसारख्या विदेशी कंपनीचं नेटवर्क तुलनेनं लहान ठरतं. गेल्या २६ वर्षांत ‘सोनी पिक्चर्स नेटवर्क’ने २०हून अधिक वाहिन्या आणि ‘सोनीलीव’सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्ममधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. ओटीटी वापरकर्त्यांच्या शर्यतीत ‘सोनीलीव’चं पारडं ‘झी५’च्या तुलनेत जड असलं तरी नेटवर्कच्या मर्यादेमुळे सोनीचा कंटेंट झीच्या तुलनेत काहीसा उपेक्षितच राहिला आहे.
‘सोनीचं आंतरराष्ट्रीय नेटवर्क वाखाणण्याजोगं असलं तरी भारतात मात्र त्यांना फारसा वाव मिळालेला नाही. विदेशात स्वतःची मोठी निर्मितीसंस्था असूनही भारतात मालिका, सिनेमा आणि रिऍलिटी शोसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधांची सोनीकडे कमतरता आहे. या विलीनीकरणामुळे विशेषतः निर्मिती आणि मार्केटिंगसाठी सोनीला झीच्या खेडोपाडी पसरलेल्या नेटवर्कचा फायदा घेता येणार आहे.’ असं मत परचुरे यांनी कोलाजशी बोलताना व्यक्त केलं.
हेही वाचा: पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे
भारतीय ओटीटी विश्वात सध्या नेटफ्लिक्स, हॉटस्टार-डिज्नी आणि अॅमेझोन प्राईम या नामांकित ओटीटी प्लॅटफॉर्मचा दबदबा आहे. तिन्ही प्लॅटफॉर्मची वेगवेगळी वैशिष्ट्यं आहेत. कुणाला डिजिटल चॅनेलचा, कुणाला प्रादेशिक सिनेमांचा तर कुणाला जागतिक कंटेंटचा आधार आहे. साहजिकच भारतीय प्रेक्षकांचा ओढा या तिन्ही विदेशी प्लॅटफॉर्मकडे अधिक आहे. त्या तुलनेत भारताच्या मातीतला कंटेंट देऊनही झीफाईव आणि सोनीलिवला प्रेक्षक मिळवण्यात अडचणी आल्या आहेत.
परचुरे यांच्या मते, झीकडे मास अपील असलेला कंटेंट जास्त आहे. तर सोनीकडे क्लास कंटेंटचा भरणा आहे. या दोन्हींच्या एकीकरणामुळे प्रेक्षकांना एकत्रितपणे क्लास आणि मास कंटेंटचा आस्वाद घेणं सहज शक्य होणार आहे. हे दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्म एकत्रितपणे डिजिटल वाहिन्यांची भलीमोठी यादी उभारतील. उत्तमोत्तम जागतिक आणि प्रादेशिक सिनेमांचाही मोठा संग्रह या निमित्ताने भारतीय प्रेक्षकांसाठी खुला होणार आहे.
झीची सर्वात मोठी ताकद ही त्यांच्या प्रादेशिक वाहिन्यांमधे लपलीय. मालिकेचा बाज ‘होणार सून मी या घरची’सारखा शहरी असो वा ‘तुझ्यात जीव रंगला’सारखा ग्रामीण, महिला प्रेक्षकवर्गाला खिळवून ठेवण्यात झीला कायमच यश आलंय. सोनीकडे शहरी मध्यमवर्गाला आवडेल असं मनोरंजन पुरवण्याची ताकद आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’सारखी सोनी सब टीवीवरची मालिका याचं उत्तम उदाहरण आहे.
झी फाईव आणि सोनीलिवने याआधीही आपल्या ‘ग्रहण’, ‘सनफ्लॉवर’, ‘गुल्लक’, ‘रंगबाज’, ‘तब्बर’, ‘काळे धंदे’ अश्या वेबसिरीज आणि ‘वेलकम होम’, ‘बस्ता’, ‘का पै रणसिंघम’ ‘भोसले’ अश्या सिनेमांमधून अस्सल भारतीय कंटेंट देण्याची त्यांची क्षमता सिद्ध करून दाखवलीय. यामुळे आता भारतीय प्रेक्षकांना विदेशी ओटीटी प्लॅटफॉर्मपेक्षाही कमी दरात निखळ मनोरंजनाचा आनंद घेणं शक्य होणार आहे.
हेही वाचा:
अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी
सैरंध्री : पहिल्या मेड इन इंडिया सिनेमाची शंभरी
ज्ञानदा कदमः वायरल होणारी मराठी न्यूज अँकर