झुम्कुळा : सशक्त अनुभवविश्वाची आश्वासक कथा

०७ मे २०२१

वाचन वेळ : ८ मिनिटं


'झुम्कुळा' या २०१९ च्या पहिल्याच कथासंग्रहातून वसीमबार्री मणेर यांच्या बारा कथा आपल्या भेटीस येतात. वैविध्यपूर्ण अनुभवविश्व आणि आशावादाने भरलेल्या या सशक्त कथा मराठी साहित्य विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याच्या क्षमतेच्या आहेत. यातल्या माणसांचे परस्परांशी असणारे नातेसंबंध सहकार्याचे, सहजीवनाचे आहेत. जाती-धर्माच्या तटबंद्या या लोकांना विभाजित करत नाहीत. त्याचं सुंदर दर्शन या कथासंग्रहातून घडतं.

मानवी जीवनातल्या असंख्य चढ-उतारांचं लघुदर्शन घडवणारा लोकप्रिय वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. मराठी कथेची एक दीर्घ परंपरा आहे. 'काळ तर मोठा कठीण आला' अशी कथा लिहिणाऱ्या हरिभाऊ आपटेंपासून 'श्रीलिपी' लिहिणाऱ्या किरण गुरवांपर्यंत अनेक प्रवृत्तीच्या लेखकांनी मराठी कथेचा पैस समृद्ध केलाय. समाजाच्या सगळ्या स्तरांना मराठी कथेनं कवेत घेतलंय. त्यामुळेच कथा वाङ्मय जास्त लोकप्रिय दिसतं. लोकांपर्यंत पोचलेलं दिसतं.

साधारणत: मराठीत समृद्ध अनुभवविश्वाची वानवा आहे. अनेक लेखक स्वतःच्या धर्म, जात, व्यवसायनिष्ठ अनुभवविश्वात गुरफटलेले दिसतात. त्यापलीकडे जाऊन जगण्याचा संघर्ष पेलणाऱ्या सामान्य माणसांचा प्रयास शब्दांत पकडणारे लेखक कमी आहेत. मराठीत आश्वासक, आशावादी कथा तुलनेने कमी लिहिली जाते.

माणसाच्या जगण्यात अनेक विसंगती असतात. अनेक प्रकारच्या समस्या, अभावग्रस्तता, अन्याय वाट्याला येत असतो. त्यामुळे बहुसंख्य कथा या शोकात्म किंवा शोकांतिक होतात. पण त्याही पलीकडे जीवनाची सकारात्मक बाजू माणसाला उमेद देत असते. आशावाद पेरत असते. ते टिपणारा वसीमबार्री मणेर हा नव्या पिढीतला सकारात्मक भूमिकेचा लेखक आहे.

हेही वाचा: ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

वर्तमानाचा सशक्त पर्याय

'झुम्कुळा' या २०१९ च्या पहिल्याच कथासंग्रहातून वसीमबार्री मणेर यांच्या बारा कथा आपल्या भेटीला येतात. वैविध्यपूर्ण अनुभवविश्व आणि आशावादाने भरलेल्या या सशक्त कथा मराठी साहित्य विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याच्या क्षमतेच्या आहेत. या सगळ्या कथा साधारणतः दहिवडी, फलटण या परिसरातल्या आहेत. म्हणजेच थोडासा दुष्काळी भाग, थोडा माणदेश या कथांमधे येतो. या परिसरातलं लोकांचं जगणं तसं कष्टप्रद आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे माणसांचे परस्परांशी असणारे नातेसंबंध सहकार्याचे, सहजीवनाचे आहेत. जाती-धर्माच्या तटबंद्या इथल्या लोकांना विभाजित करत नाहीत. त्याचं सुंदर दर्शन या कथासंग्रहातून घडतं.

त्याबरोबरच समकालीन समाज वास्तवाचं चित्रणही साहित्यात अभिप्रेत असतं. आजच्या काळाचे प्रश्न साहित्यातून अधोरेखित करणं, त्यावर भाष्य करणं आणि सशक्त पर्याय देणं हे लेखकाचं काम असतं. वसीमबार्री मणेर यांच्या कथेमधून हेच झालंय. आजचा काळ हा धार्मिक विद्वेषाचा आहे. राजकारणासाठी जाणीवपूर्वक दोन धर्मांमधे, दोन समूहांमधे तेढ निर्माण केली जातेय. अविश्वासाचं आणि विसंवादाचं वातावरण निर्माण केलं जातंय. अशा काळात मानवतेची वीण उसवली जाणार नाही, याची काळजी घेत लेखन करणं लेखकाची जबाबदारी आहे.

वसीम मणेर यांनी आपल्या अनेक कथांमधून सामान्य माणसांनी टिकवलेल्या सामाजिक एकजिनसीपणाचं आणि समाजाच्या अस्सल सहिष्णुतेचं, एकतेचं दर्शन घडवलंय. हे करतानाही त्यांनी ओढून ताणून किंवा प्रचारकी थाटाने ते केलं नाही. समाजाचं अस्सल चित्र त्यांनी सहजपणे रंगवलंय. त्यात सामान्य माणूस जाती-धर्माच्या पलीकडे विचार करतो, एकमेकांना मदत करतो. एकमेकांची सुख दुःख समजून घेतो. याचं दर्शन या कथांमधून घडते.

मानवतेची पाठराखण करणाऱ्या कथा

यादृष्टीने 'मैमुनाचा मालक' ही कथा आवर्जून पहावी लागेल. मनमोकळ्या स्वभावाची मैमुना नवर्‍याने टाकलेली. तिला पै-पाहुणे कामापुरती वापरून घेतात. पण तिला खरा आधार देतात ते तिच्या वडलांचे मित्र असणारे गावातले पाटील आणि पाटलीण बाई. बाकी इतर मुस्लीम समाज 'तिला रीतभात नाही', असं समजतो. मशिदीत अजान देणारा बांगीसाबही गैरसमजातून तिला दोष देतो. तिचं जेवण नाकारतो. त्यामुळे ती आत्महत्या करते.

'खारी' या कथेत पावसाळ्यामुळे खारी विक्री न झाल्याने अगतिक झालेल्या लियाकतची गोष्ट येते. खरंतर पावसाळी वातावरणात त्याची खारी विक्री होण्याची तीळमात्र शक्यता नसते. पण सुरेंद्र पाटील हा कॉलेजमधे शिकणारा मुलगा खारीत भावनिक दृष्ट्या गुंततो. त्याची सगळी खारी विकत घेतली जाते. आणि सुरेंद्र खारीवाल्या लियाकतला ‘मामा’ म्हणून हाक मारतो. त्याला आग्रहाने चहा खारी खायला लावतो. इथं धर्माच्या भिंती कोसळून पडतात आणि निखळ मानवता पुढे येते.

याशिवाय 'घरभरवनी' कथेत मुस्लिम भाडेकरूची काळजी घेणारा हिंदू मालक येतो. 'सुगंधी शुटर' कथेत गवती चहा विकून २-२ रुपये मिळविणाऱ्या म्हातारीला कमी किमतीत स्वेटर विकून तिच्यामधे स्वतःची आई पाहणारा एजाज शेठ येतो. 'आंबटचुका' कथेत वसंतराव या मित्राच्या परसातली भाजी चोरल्याबद्दल असिफ आणि जमीर या तरुणांना मारायला पाठी लागलेला रियाजभाई येतो. या सगळ्या कथा धर्माची पाठराखण करत नाहीत, तर मानवतेची पाठराखण करतात, हे अत्यंत महत्त्वाचं आहे.

दुसऱ्या बाजूला सामान्य माणसांचा जगण्याचा संघर्ष अनेक कथांमधून चित्रित झालेला आढळतो. 'मल्हारी' कथेतला पोरकेपणा घेऊन जगणारा मल्हारी, 'ऑपरेशन' कथेतला नव्याने जनावराचा डॉक्टर झालेला सामान्य शेतकरी कुटुंबातला तुकाराम, 'खारी' कथेतला लियाकत, 'सत्कार' कथेतला नरेश किंवा 'घरभरवनी' कथेतला युसुफ बांगडीवाला, दस्तगीर आचारी या सगळ्यांचे रोजच्या जगण्याचे संघर्ष लेखकाने टिपलेत. त्याबरोबरच मुस्लीम स्त्रीच्या वाट्याला येणारं टाकलेपण, परित्यक्ता असणं हे 'बैदा' आणि 'मैमुनाचा मालक' या दोन कथेत आलंय.

हेही वाचा: सत्यशोधकीय नियतकालिकेः वाङ्मयेतिहासात मोलाची भर घालणारा संदर्भ ग्रंथ

आंबटचुक्याचं नाट्य

'आंबटचुका' या पहिल्याच कथेत रियाजभाई आणि वसंतराव बोरावके या पन्नाशीच्या पुढे असणाऱ्या मित्रांच्या आत्मीयतेची पार्श्वभूमी येते. मुंबईत स्वतःचा उद्योग करणारी दोन मुलं असणारे रियाजभाई पत्नीच्या आग्रहाने आणि मित्राच्या प्रेरणेने 'आत्तार मण्यार तांबोळी समाजाचा विवाह सोहळा' आयोजित करतात. पण कार्यक्रमाची जोडणी करताना येणाऱ्या अडचणीतून काही पेच तयार होतात.

ऐनवेळी मशिदीत परगावची जमात येते, म्हणून कार्यक्रमाला जागा मिळत नाही. मित्र वसंतराव बोरावके यांचं मंगल कार्यालय घ्यायचं ठरतं. पण जेवणात कमीत कमी 'दालचा' पाहिजे आणि त्यासाठी आंबटचुक्याची भाजी पाहिजे. इथं गाडी अडते. बाजारात कुठेही आंबटचुका मिळत नाही. परंतु नेमका वसंतरावांच्या पत्नीने तो घरामागे लावलेला असतो. कार्यकर्ते असणारे असिफ, जमीर ही मुले तो उपटून आणतात आणि नवेच नाट्य निर्माण होते. याचं खुमासदार वर्णन कथेत येतं.

रस्किन बाँडच्या कथांची आठवण

'मल्हारी' या कथेत जातिग्रस्त मानसिकता कशी काही माणसांना वेढून असते, ते व्यक्त होतं. विशेषतः जी माणसं स्वतः चुकीचं वागतात, सामाजिक अपराध करतात, त्यांना इतरांना दोष देण्याची सवय असते. या कथेत कोळेकर, टिंगरे आणि मल्हारी हे तीन मित्र येतात. वेगवेगळ्या समाज स्तरातले हे मित्र आहेत.

त्यातला मल्हारी आई-वडलांच्या आधाराशिवाय वाढलाय. म्हणूनच हॉटेलमधे पडेल ते काम करून जगणारा आहे. तर दुसऱ्या बाजूला टिंगरे हा स्वतः लफडेबाज असताना दुसऱ्याला दोष देणारा उच्चजाती अभिमानी आहे. तो सामाजिक पार्श्वभूमी लक्षात न घेता मल्हारीला दोष देताना दिसतो. लहानपणी 'मैं रावण हूँ।' असं म्हणून खदाखदा हसणारा मल्हारी नेक माणूस आहे. उलटपक्षी स्वतःला उच्च समजणारा टिंगरे चारित्र्यहीन आहे, असं या कथेत दिसतं.

संग्रहातल्या 'बैदा', 'किल्ला' आणि 'घरभरवनी' या तीन कथांमधून बालमानस चित्रित झालंय. या कथा वाचताना रस्किन बाँडच्या कथांची आठवण येते. बैदा म्हणजे अंडं. कोंबडी अंडं कसं घालते, याचं कुतूहल असणारी दोन मुलं, वेगवेगळ्या कोंबड्यांना त्यांनी ठेवलेली नावं, त्यांना कोंबड्यांच्या अंडी घालण्याबद्दलचं असणारं अपुरं ज्ञान यातून गंमतशीरपणे ही कथा पुढे जाते. तर 'किल्ला' कथेत गुटगुटीत गोऱ्या गोमट्या मुलाबरोबर खेळता खेळता अचानक लैंगिक चाळे करणारा पौगंडावस्थेतला मुलगा येतो. त्यामुळे  खेळ अर्धा टाकून छोटा पिंकू घरी परततो.

हेही वाचा: एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता

बैलाचं प्रत्ययकारी ऑपरेशन

'ऑपरेशन' ही या संग्रहातील अत्यंत दर्जेदार कथा आहे. तुकाराम आबाजी गायकवाड हा नवखा जनावरांचा डॉक्टर, गरीब शेतकरी तरुण. लोणंद भागातील एका गावातला हा साधा पण होतकरू तरुण बी. वी. एस्सी. पदवी घेऊन जनावरांचा डॉक्टर झालाय. पण त्याला काम मिळत नाही. अचानक लोणंदच्या बस स्टँडवर त्याला एका बैलाच्या आजारपणाची बातमी कळते. तो प्रत्यक्ष जाऊन पाहतो.

कॅन्सर झाल्यामुळे त्या बैलाचे वृषण प्रचंड वाढले असतात. त्या परिसरातले नामांकित डॉ. देशपांडे या आजारावर उपचार नाही, असं म्हणतात. डॉ. पठाण, डॉ.पिंगळे, डॉ.शिंत्रे असे सगळेच उपचार टाळतात. त्याचं एक कारण सामाजिक असते. कारण तो बैल दगडू नाना कांबळे यांचा असतो. बैल दगावला तर त्रास नको, या भावनेने उपचारच टाळले जातात.

या उलट स्वतःजवळ ऑपरेशनची कसलीच साधनं नसताना तुकाराम हे आव्हान स्वीकारतो. लागणाऱ्या साहित्याची कशीबशी जुळणी करतो आणि ऑपरेशन यशस्वी करतो. अत्यंत रोमांचक खिळवून ठेवणारी कथा वाचावयला मिळते. ही कथा जनावरांचं दुखणं, त्यावरील उपचार यावर प्रकाश टाकतं. पण त्याचबरोबर समाजातलं जात वास्तवही नेमकेपणाने टिपते. म्हणून ही कथा प्रत्ययकारी वाटते.

नागांच्या शक्तीप्रदर्शनाची गंमत

'झुम्कुळा' ही कथासंग्रहाची शीर्षक कथा थोडी हलकीफुलकी आणि विनोदाचा स्पर्श असणारी आहे. कथानायक म्हादा रणवरे हा पैलवान आहे. सरपंचाचा मुलगा. तालेवार आहे. तसंच तो सर्पमित्रही आहे. त्याचं लग्न ठरलंय. पण आजोबाच्या मृत्यूनंतर एका वर्षात लग्न करणं शक्य न झाल्यामुळे लग्न तीन वर्ष पुढं लांबलंय. त्याची भावी पत्नी रूपाली मोबाईलवरून वेगवेगळे संदेश पाठवते. चॅटिंग करते. पण मोबाईल वापराबाबत सराईत नसलेला म्हादा तिला काय उत्तर द्यायचं या संभ्रमात असतो.

याच दरम्यान माळावर धामिणीचा झुम्कुळा आढळतो. ते बघायला लोकांची तोबा गर्दी उसळते. म्हादा तिथं जातो. तर दोन धामण नर शक्तिप्रदर्शन करत असतात. त्यांच्या शक्ती प्रदर्शनाचं चित्रीकरण तो शिवाजी या मित्राच्या सांगण्यावरून रूपालीला पाठवतो आणि गंमत निर्माण होते. याचं अत्यंत चित्रमय दर्शन लेखकानं घडवलंय. विविध भावनांचे बारकावे, क्रिया प्रतिक्रिया, तरुण मुलींची मानसिकता, पहिलवान असणाऱ्या तरुणांची मानसिकता लेखकाने नेमकेपणाने टिपलीय.

हेही वाचा: अनुराधा पाटील म्हणजे कवितेपलिकडे जाणाऱ्या कवयित्री

माणूसकीच्या नात्याचं दर्शन

'सुगंधी शुटर' ही या कथासंग्रहातील काळजाला स्पर्श करणारी कथा. आईच्या मृत्यूमुळे दुःखात असणारे एजाज शेठ महिना उलटला तरी आपल्या कपड्याच्या दुकानात नियमितपणे येत नाहीत. एके दिवशी संध्याकाळी ते दुकानात आलेले असताना, एक गरीब दुबळी म्हातारी स्वेटर विकत घेण्यासाठी येते. ती काही स्वेटर पाहून एक पसंत करते. एजाज शेठ तिच्या ऐपतीचा अंदाज घेऊन तो स्वेटर तिला खरेदीपेक्षा कमी किमतीत विकतात. आणि आनंदाने चेहरा फुललेली ती म्हातारी स्वेटर घालूनच बाहेर पडते. आईच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या एजाज शेठना आनंद होतो. अशी माणुसकीच्या नात्याची दर्शन घडवणारी ही कथा आहे.

याशिवाय 'सत्कार' या कथेत तीन चाकी डुगडुगी चालवणाऱ्या भीमनगरमधल्या नरेशची कहाणी येते. गाडीवर छत नाही आणि पावसाचे दिवस आहेत, या विवंचनेत असणाऱ्या नरेशला त्याचा मित्र विज्या सुनामी याच्यामुळे मदत होते, याचं तपशीलवार आणि प्रत्ययकारी चित्रण या कथेत येतं.

'घरभरवनी' आणि 'मैमुनाचा मालक' या दोन कथांमधे मुस्लीम जीवनाचा परिघ चित्रित झाला आहे. दोन खोल्यांचं घर बांधून त्याचा गृहप्रवेश करण्याच्या प्रयत्नात असणारा युसूफ, त्याला मदत करणारा मेव्हणा दस्तगीर हे गृहप्रवेशाचे नियोजन करत असतात. त्याच वेळी रियाज हा छोटा मुलगा मामू आल्यामुळे आनंदात असतो. त्याच्या गाडीत बसून खेळत असतो. तो तिथंच आपण मोठे झालो आहोत, मामू सारखे आचारी झालो आहोत, अशी स्वप्नं रंगवत असतो.

त्याच दिवशी नेमकी महापुरुषाच्या विडंबनेमुळे सगळीकडे दंगल सुरू होते. त्यामुळे छोटा रियाज आणि आब्बा यांचे स्वप्न विरून जातं. त्यांना आपला कार्यक्रमच रद्द करावा लागतो. सामान्य कष्टकरी मुस्लीम माणूस कशाप्रकारे आपल्या जगण्याचं सूत्र जुळवू पाहतो, ते इथं पहायला मिळतं.

मराठी साहित्यात नवी भर

'फळकुट' आणि 'किल्ला' या दोन कथा सोडल्या तर इतर सगळ्या कथा मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत. लेखकाची भाषाशैली हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. दहिवडी, फलटण परिसरात बोलली जाणारी बोली लेखकाला आत्मसात आहेच, मात्र त्यासोबतच या परिसरातली मुस्लीम मराठी माणसांची दखनी भाषा लेखकाने नेमकेपणाने टिपलीय. त्यामुळे एकूण मराठीच्या भाषा वैभवात मोठी भर घालण्याचं काम लेखकाने केलंय.

वसीमबार्री मणेर यांच्या कथांमधून येणाऱ्या मुस्लीम व्यक्तिरेखा जे बोलतात ते अस्सल दखनी आहे. मराठी हिंदी इंग्रजी शब्दांचा वापर करत त्यांचा संवाद सुरू होतो. त्यातही माणदेशी बोलीचा स्पर्श या संवादाला आलेला दिसतो. उदाहरणार्थ,  बैदा कथेतला टिल्लू आपल्या भावाला म्हणतो, ‘उप्परशे मैने सुन्याय आरीपभाई कू बोलताना...तलंगा बैदा नै देते.’ तर 'आंबटचुका' कथेतलe आसिफ म्हणतो, ‘जाधव साहेबका गेट बटाताय, थांबो वळंबा करके फोन करताव.’

सुगंधी शूटर कथेतील एजाज शेठ म्हणतो, ‘अम्मी ले तो क्या तबी...भवानी हुंदे तेरे हातशे.’ मैमुनाचा मालक कथेतील बशीर म्हणतो, ‘क्या बी मुकु आयींगा सो बुलू नक्को वाज्या! या सगळ्या वाक्यांवर मराठीचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो. मराठीची भाषिक समृद्धता वाढविण्यास हा कथासंग्रह हातभारच लावेल.

सहजता, सूक्ष्म तपशील, नैसर्गिक साधेपणा, मानवी स्वभावाचे विविध कंगोरे या सगळ्यांचं दर्शन ही कथा घडवते. अंगभूत साधेपणा हेच या कथेचे वैशिष्ट्य आहे. योगायोग, नाट्यमयता, उपदेश, कल्पनारम्यता याला कथेत कुठेच स्थान नसल्यामुळे ही कथा सच्ची, टोकदार आणि गोळीबंद झालीय. वसीमबार्री मणेर यांचा दुसरा कथासंग्रह लवकरच येतोय. व्यवसायाने चलचित्रकार, चित्रपट दिग्दर्शक असणारा हा लेखक मराठी कथेमधे मोलाची भर घालणार, हे नक्की.

पुस्तकाचं नाव -  झुम्कुळा
लेखक - वसीमबार्री मणेर
प्रकाशक - दवात ए दक्कन प्रकाशन, फलटण
पहिली आवृत्ती - ऑगस्ट २०१९
पानं – १४२
किंमत – २५० रुपये

हेही वाचा: 

तरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक

साहित्य संमेलनात आहात, तर तेरला जाऊन याच! 

टेस्ट मॅचेस चार दिवसांच्या, पण यात नक्की फायदा कुणाचा?

मराठीतलं ऐतिहासिक ललित लेखन म्हणजे फॅन फिक्शन: नंदा खरे

संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंच्या भाषणाचं सारः लेखक हुजऱ्या नसतो