बाईपण भारी सांगणाऱ्या अर्थशास्त्राला नोबेल!

Claudia Goldin

अर्थशास्त्रातील सर्वोच्च नोबेल सन्मान मिळवणाऱ्या क्लॉडिया गोल्डीन या विद्यार्थीप्रिय संशोधक, शिक्षिका आहेत. नोबेलचे यशही त्यांनी विद्यार्थ्यांसोबत साजरा केले. त्यांच्या अभ्यासाप्रमाणेच त्यांचे आचरणही आदर्श आहे. कारण समानता नुसती बोलून येत नसते, ती जगण्यात दिसावी लागते हा त्यांचा आग्रह आहे. त्यांचा नोबेलही महिलांना श्रमाच्या बाजारात मिळणाऱ्या असमानता सिद्ध करतो.

अर्थशास्त्रातील सर्वोच्च नोबेल सन्मान हार्वर्ड विद्यापीठातील ७७ वर्षाच्या संशोधक क्लॉडिया गोल्डीन यांना नुकताच जाहीर झाला आहे. हा एक अर्थाने महिला कामगारांच्या आर्थिक शोषणाच्या इतिहासाला, तसेच महिलांच्या वेतनभिन्नतेच्या विश्लेषणाची घेतली गेलेली योग्य दखल आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

दोन शतकाच्या आकडेवारीचा धांडोळा घेत काही वेळा गुप्तहेराप्रमाणे माहितीचे दुवे जोडत स्त्रियांचे आर्थिक योगदान दुय्यमच का राहते? याची मीमांसा क्लॉडिया यांनी संशोधनातून केली. आर्थिक प्रगतीसोबत सामाजिक प्रगती होते असा समज नेहमीच खरा असतो असे नाही याची प्रचिती त्यांच्या संशोधनातून सिद्ध झाली.

स्त्रिया आणि पशु हे पुरूषापेक्षा खालच्या दर्जाचेच असतात हा फक्त मनुस्मृतीपुरताच नियम नसतो, तर प्रगत अमेरिकेचाही तोच व्यवहार आणि विचार असल्याचे कटुसत्य या संशोधनातून आकडेवारीसह स्पष्ट केले गेले. महिलेला श्रम बाजारात नेहमी दुय्यम स्थानावर रेटत असताना तंत्र प्रगती कशाप्रकारे प्रभाव टाकते याचे चित्र त्यांच्या सखोल व विस्तृत संशोधनातून स्पष्ट होते.

संशोधनाचे स्वरुप व महत्त्व

नोबेल पारितोषिक समितीने गोल्डीन यांची निवड करताना स्त्री श्रमशक्तीच्या ज्ञानात महत्त्वाची भर पाडली असे म्हटले आहे. अर्थशास्त्रात १९६९ पासून आतापर्यंत ९२ लोकांना हा नोबेल सन्मान मिळाला असून त्यात २००९ मधे ऑस्ट्रॉम आणि २०१९ मधे डफ्लो या दोनच महिला होत्या. आता २०२३ मधे गोल्डीन यांच्या रुपाने तिसर्‍या महिलेचा गौरव झाला आहे.

श्रम अर्थशास्त्रात महिलांची रोजगारास्थिती, वेतन भिन्नता याबाबत त्यांचे मार्गदर्शक फॉजेल यांच्यापासून प्रेरणा घेऊन महिला श्रम सहभाग दर, त्यावर परिणाम करणारे घटक यांचे विश्लेषण गोल्डीन यांनी केले. पालकत्व, शिक्षण, आईचा रोजगार अनुभव, तंत्रप्रगती या घटकांनी स्त्रियांचे रोजगार व उत्पन्न प्रभावीत होतात. पुरूष-स्त्री यांच्यातील वेतन दरी अद्याप टिकून आहे. त्याचे स्वरूप दोनशे वर्षात यु आकाराप्रमाणे राहिल्याचे त्यांचे संशोधन स्पष्ट करते.

औद्योगिक क्रांती आणि स्त्रियांचा रोजगार

औद्योगिक क्रांतीपूर्व उत्पादन लहान प्रमाणावर आणि कौटुंबिक स्तरावर, कुटीरोद्योग स्वरूपात होते. या व्यवस्थेत स्त्रियांना रोजगार घरीच उपलब्ध असल्याने त्यांच्या सहभाग मोठा होता. परंतु औद्योगिक क्रांतीने हे चित्र बदलले. कारखाना पद्धती उदयास आली.

आता कारखान्यातून, घरापासून दूर रोजगारासाठी जावे लागत असल्याने महिलांचा श्रम सहभाग १९ व्या शतकात घटला. ही घसरण औद्योगिक क्रांतीने स्त्रियांच्यावर लादली. २० व्या शतकात सेवा क्षेत्राचा विकास झाला. स्त्रियांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळाली. यातून आता स्त्रियांचा रोजगार वाढला.

अशा प्रकारे औद्योगिक क्रांतीने घटवलेला स्त्री रोजगार व सहभाग वाढला. तरी पण स्त्रियांना पुरूषापेक्षा कमी वेतन देण्याची पद्धती व मानसिकता तशीच राहिल्याने वेतनदरी मिटलीच नाही. एकूण महिलापैकी फक्त २० टक्के महिलांनाच रोजगार संधी मिळते आणि विवाहीत महिलेबाबत हे प्रमाण पाच टक्के इतकेच आहे. आजही पुरूषापेक्षा २० टक्के वेतन/उत्पन्न महिलेला कमी मिळते असा त्यांचा निष्कर्ष आहे.

लग्न, मूल आणि गर्भनिरोधक गोळी

पालकत्व, लग्न याचा प्रतिकूल परिणाम स्त्रियांना आपल्या रोजगार संधीचा, करीयरचा त्याग करण्यात होतो. स्त्रियांना समान नागरी हक्क, न्याय, वाटा मिळण्यात लग्न आणि मूल ही मोठी अडथळ्याची बाब ठरते. १९७० च्या दशकात गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध झाल्या आणि त्यातून पालकत्व पुढे ढकलणे शक्य झाले.

यातून स्त्रियांना शिक्षणासाठी अधिक वेळ देणे व करीयरसाठी वेळ देणे शक्य झाले. तथापि रोजगारात येताना तिला घरचा अनुभव, आईचा अनुभव महत्त्वाचा ठरला. करीअर हे आईला जसे अडचणीचे ठरले तसेच तोच वारसा मुलीकडेही हस्तांतरीत झाला. हा नकारात्मक वारसा श्रमसहभाग दर घटवणेस, वेतन फरकास सहाय्यभूत ठरला.

श्रमबाजारात भेदात्मक वेतन, रोजगारसंधी केवळ स्त्री-पुरूष या स्वरूपात नाही तर काळे गोरे, स्थानिक-बाहेरचे असाही आहे. भेदात्मक वर्तनाची सुरुवात घरापासून मानसिक जडणघडणीत होते. गृहीणी हे पद सांगणारी महिला जरी कामाचा मोठा भार उचलत असली तरी त्यात सन्मानाऐवजी आपण खालच्या स्तराचे आहोत हेच व्यक्त केले जाते.

समानतेचा संघर्ष अनेक स्तरावर आणि दीर्घकाळ स्त्रीवादी चळवळी करीत आहेत. गोल्डीन यांचे योगदान वेतनदरी स्त्री – पुरूष यात कोणत्या कारणाने घडते, वाढते याचे स्पष्टीकरण करते. त्याआधारे धोरणात्मक निर्णय घेणे हे पुढचे पाऊल धोरणकर्त्यांचे ठरते.

गोल्डीन यांच्या संशोधनाचे भारतीय संदर्भ

जगातील सर्वाधिक मोठ्या आकाराच्या आणि तरूण लोकसंख्येचा अभिमान मिरवणार्‍या, महासत्तेची स्वप्ने पाहणार्‍या भारतास गोल्डीन यांचे संशोधन अनेक अर्थाने मार्गदर्शक ठरते. स्त्रियांना सत्ता व मत्ता यात वाटा देण्यासाठी प्रयत्न होत असले तरी मुळात रोजगारच घटत असेल तर त्याचा प्रथम आघात स्त्री रोजगारावरच होतो.

स्त्रियांना देवत्व देणारे प्रत्यक्षात समानता नाकारणारे असतात, हा अनुभव अनेक स्तरावर येत असल्याने अशा प्रकारचे संशोधन ग्रामीण आणि कृषी केंद्रीत व्यवस्थेत अधिक गुंतागुंतीचे निष्कर्ष देणारे ठरेल. कोरोना कालखंडानंतर एकूण रोजगार प्रमाण आकसलेले असल्याने त्याचे परिणाम स्त्रियांच्या रोजगारावर कसे झाले याचा सखोल अभ्यास मार्गदर्शक ठरेल.

वर्ण आणि जात व्यवस्थेची उतरंड समानतेच्या विरोधातच असते. जेंव्हा प्रतिकूल परिस्थिती, तंत्रबदल होतात तेंव्हा त्याचा भार महिलावर पडतो. यासाठी सजगपणे महिला सक्षमीकरणाचे धोरण राबवणे आवश्यक ठरते. सध्या महाराष्ट्रात बसप्रवासात महिलांना सवलत असून त्यांची गतीशिलता वाढली आहे. रोजगार सुविधा त्यामुळे वाढली आहे. असे सकारात्मक बदल स्त्री-पुरूष वेतन उत्पन्न भिन्नता घटणेस उपयुक्त ठरू शकतात.

बोले तैसे चाले, त्याची वंदावी पाऊले

समानता नुसती थेअरीचा भाग असून चालणार नाही, ती प्रॅक्टीकलमधे जगताही आली पाहिजे, हा क्लाडिया गोल्डीन यांचा विचार आहे. त्यामुळे त्या सतत शिक्षक आणि विद्यार्थी याती अंतर कमी करण्यासाठी धडपडत असतात.

या विद्यार्थीप्रिय, संशोधक, शिक्षिका आहेत. विद्यार्थीच मला ज्ञानकक्षा विस्तारण्यास मदत करतात, प्रवृत्त करतात व त्यांच्यामुळेच मी संशोधन करते असे त्या प्रांजळपणे म्हणतात. नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतरही तो पूर्ण दिवस विद्यार्थ्यांमधेच रममाण झाल्या होत्या.

क्लाडिया यांचे आचरण सामाजिक शास्त्रातील संशोधकास आदर्शवत ठरेल असे आहे. दोन शतकांच्या आधार घेत त्यांनी केलेले संशोधन धोरणात्मक बदलाच्यादृष्टीने अनेक सूचना करते. बाईपणाचे किती भारी असते हेच वेगळ्या अर्थाने दाखवून देते.

0 Shares: