पैठणीसाठी दीन होणाऱ्या आया-बायांना महिला दिनाचं काय सांगणार?

राजकीय मंडळींनी स्वत:च्या राजकीय अजेंड्यासाठी पैठणीच्या कार्यक्रमाचा फंडा आणलाय. शिकल्या-सवरलेल्या आया-मावश्या, मम्म्या, मॅडमपण या गर्दीत सहभागी होतात. जे लोक फुकटात पैठण्या वाटायचे कार्यक्रम करतात त्यांचे हेतू, व्यवहार तपासले, अभ्यासले तर वास्तव लक्षात आल्याशिवाय रहात नाही. राजकारण्यांनी गुलाम बनवण्याच्या या फंड्यात शिकलेल्या महिलाही अडकल्यात ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे.

अलिकडे पैठणींच्या कार्यक्रमाचं प्रचंड पेव फुटलंय. गावोगाव, खेडो-पाड्यात पैठणीच्या कार्यक्रमांचा धुमाकूळ चालू आहे. या कार्यक्रमाला महिला मंडळही तोबा गर्दी करताना दिसतं. प्रचंड गर्दीत, उत्साहात हे कार्यक्रम संपन्न होत आहेत.

राजकीय मंडळी स्वत:च्या राजकीय अजेंड्यासाठी आणि महत्वाकांक्षेसाठी पैठणी नावाच्या शंभर दिडशे रूपयाच्या बोगस साड्या आणतात, महिलांची गर्दी गोळा करतात. साड्या वाटतात आणि निवडणूकीचं राजकारण सोपं करतात. त्यांचा हा पैठणीचा फंडा सध्या सगळीकडे धुमाकूळ घालतोय.

शिकल्या-सवरलेल्या आया-मावश्या, मम्म्या, मॅडमपण या गर्दीत सहभागी होतात. पैठणीसाठी रांगेत उभं राहतात. स्टेजवर जाऊन नाचतात. कुठला तर भावोजी येतो, या आया-बायांना नाचवतो. त्याही नाचतात. विजेत्या रणरागिणी घोषित केल्या जातात. सरतेशेवटी पैठण्या वाटल्या जातात.

आपण फार मोठा पराक्रम केल्याच्या, मोठं युद्ध जिंकून आल्याच्या थाटात पैठणी घेवून या आया-बाया घरी येतात. हे चित्र गावोगाव आहे. पैठणीसाठी दीन होणाऱ्या या आया-बायांना महिला दिनाचं काय सांगावं?

आपण नेमकं कुठं निघालोय?

गावोगाव, शहरो-शहरात जथ्थेच्या जथ्थे पैठणीसाठी गोळा होताना दिसत आहेत. महिला वर्गाला गोळा करण्याचा हा फंडा चांगलाच यशस्वी ठरलाय. बऱ्यापैकी सर्व थरातल्या महिला गर्दी करताना दिसतायत. हा एकूण प्रकार पाहून अस्वस्थ झाल्याशिवाय रहात नाही. एका पैठणीसाठी तीन तीन तास जाऊन बसणाऱ्या, रांगेत उभं राहणाऱ्या, तिथला भावोजी नाच म्हणेल तस नाचणाऱ्या या आया-बायांना पाहिल्यावर अस्वस्थ होतं.

या महिलांच्या डोक्यात आत्मसन्मानाचा विचार का येत नाही? एका पैठणीसाठी जावं, रांगेत उभं रहावं, कुणाच्याही तालावर नाचावं इतपत या महिला निसुक झाल्या काय? त्यांना स्वत:च्या स्वाभिमानाची, आत्मसन्मानाची याद का येत नाही? फुकटात मिळणाऱ्या एका साडीसाठी इतकी झुंबड महिलांनी का करावी? याचं आश्चर्य वाटतं.

जिथं गरिबी टोकाची आहे अशा आदिवासी पाड्यातल्या महिलाही एका साडीसाठी अशा उथळ आणि लाचार झालेल्या पाहिल्या नाहीत. त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे, बिकट आहे तरीही त्या त्यांच्या आत्मसन्मानाची आणि स्वाभिमानाची तडजोड करत नाहीत. कुठं निघालोय आपण?

हेही वाचा: महिला दिन विशेष : आईंना हमे देखके हैरान सा क्यूँ हैं?

शिकलेल्या महिलाही इवेंटच्या वेडात

‘अडाणी आई आणि घर वाया जाई!’ असं सांगितलं जात होतं. आता या शिकलेल्या मम्म्यांनी असं वागावं, असं वाया जावं? याचं आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. फुकटात साड्या वाटणारे लोक धर्मकार्य किंवा समाजकार्य म्हणून साड्या वाटत नाहीत. त्यांच्या नमकहरामीचे आणि पापाचे पैसे ते राजकीय गुंतवणूक म्हणून अशा पद्धतीने खर्च करतात. मतांसाठी फुकटात साड्या वाटतात.

या लोकांच्या नमकहरामीचं, पापाच्या पैशाचं वस्त्र या महिला अंगावर कशा काय नेसतात? ते नेसून अभिमानाने कशा काय मिरवतात? जे लोक फुकटात पैठण्या वाटायचे कार्यक्रम करतात त्यांचे हेतू, व्यवहार तपासले, अभ्यासले तर वास्तव लक्षात आल्याशिवाय रहात नाही. या शिकलेल्या महिलांनी इतकं वेडं व्हावं?याचं आश्चर्य वाटतं.

हिनदीन आणि लाचारीचं जगणं

महिलांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे जरूर जगावे तो त्यांचा हक्क आहे. त्यांनी साडी नेसावी, चुडीदार घालावा का आणि काय घालावं. हाही त्यांचा हक्क आहे. त्यांनी गाणं म्हणावं, नाचावं, त्यांची कला जोपासावी हाही त्यांचा हक्क आहे. त्याबद्दल आमचा आक्षेपच नाही. त्यांनी काय करावं? साडी नेसावी की नाही, नाचावं की नाही? याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही. तो त्यांचा व्यक्तीगत विषय आहे. पण एका एका साडीसाठी लाचारीचं जे टुकार प्रदर्शन सुरू आहे त्यावर आमचा आक्षेप आहे.

एका पैठणीसाठी घरची कामं-उद्योग सोडून ताटकळत रांगा लावणाऱ्या या महिला पाहिल्यावर चिंता वाटते. कसं व्हायचं या समाजाचं? हा प्रश्न अस्वस्थ करतो. ज्या महिलांना स्वत:चं मूल्य नाही, स्वाभिमान, आत्मसन्मान नाही त्या महिलांच्या घरातली कार्टी दारूच्या बाटलीवर कुणाचाही प्रचार करायला बाहेर पडणार? ढाब्याचं कुपन दिलं, मटनाची पिशवी दिली की कुणाचाही जिंदाबाद करायला बाहेर पडणार.

ज्या आईला, बहिणीलाच जर स्वाभिमानाची जाण नसेल तर त्यांच्या पिढीकडून काय अपेक्षा ठेवणार? लाचार आया-मायांच्या घरात शिवाजी महाराज, संभाजीराजे, डॉ बाबासाहेब आंबेडकर कसे निर्माण होणार? एका फुकटातल्या साडीसाठी तासंतास रांगेत उभं राहणाऱ्या महिलांच्या घरातले पुरूष इतके दळभद्री आणि कर्मदरिद्री आहेत का की ते एक साडीही घेवू शकत नाहीत? मनाचं हे दीनपण या आया-मायांना का खटकत नाही. त्या का अशा हिनदीन आणि लाचार होताना दिसतायत?

हेही वाचा: गोझी ओकोन्जो : आर्थिक सत्तेच्या चाव्यांनी विकासाची दारं उघडणाऱ्या ‘आजीबाई’

आया-मायांनी विचार करण्याची गरज

बायका शिकाव्यात म्हणून दगड-गोटे झेलणाऱ्या सावित्रीमायचा जीवघेणा संघर्ष, डॉ बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकायला गेल्यावर रमाई मातेनं कसेकसे दिवस काढले? कसा कसा संघर्ष केला ते एकदा या मम्म्यांनी मुळापासून वाचावं.

नवरा मुख्यमंत्री असताना किराणा दुकानाची उधारीही नीट न भागवता न येणाऱ्या यशवंतराव चव्हाणांच्या पत्नीचा संघर्षही वाचावा. किती प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी दिवस काढले याचा विचार करावा. रमाई आंबेडकरांचा संघर्ष तर डोळ्यात पाणी आणणारा आहे. या शिकलेल्या आया-मायांनी गांभीर्याने विचार करावा.

मोगलाईच्या काळात फुकटातल्या पैठणीसाठी जिजाऊ रांगेत उभी राहिली असती तर स्वराज्य उभं राहिलं असतं का? शिवबा घडला असता का? शिवबाचा छत्रपती शिवाजी राजा घडला असता का? हा ही विचार करावा.

राजकारण्यांचे गुलाम करायचे फंडे

आया-मायांनी या लाचारीला झुगारून द्यावं. आपल्या अंगावर फाटकं कापड असलं तरी चालेल पण ते आपल्या कष्टाचं, आपल्या मेहनतीचंच असलं पाहिजे. कुणाच्या पापाच्या पैशाची, नमकहरामीची पैठणी आपल्या अंगावर का आणि कशासाठी? हा प्रश्न का पडत नाही या महिलांना?

बरं फुकटात साड्या वाटणारे राजा हरिश्चंद्र नाहीत. हे लोक फुकटात देतात ते त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी. तुम्हाला लाचार करायला, गुलाम करायला ते हे फंडे वापरतात. एका पैठणीत तुम्ही तुमचं स्वातंत्र्य गहाण टाकता, एका पैठणीसाठी तुम्ही तुमचा विकासाचा कार्यक्रम गहाण टाकता, तुमचा सत्याचा आवाज गहाण टाकता.

दीड-दोनशे रूपयेच्या टुकार पैठणीसाठी खुप काही मौल्यवान गोष्टी गमावता. खुप किमती गोष्टींचा सौदा खुप स्वस्तात करता आहात. आया-मायांनो तुमचा आत्मसन्मान आणि स्वाभिमान जीवंत असेल तर जरूर विचार करावा ही विनंती.

हेही वाचा:

अपर्णाताई, आता दिवस स्त्री पुरूष समतेचे आहेत!

बायकांच्या सणात पुरुषी विचारांची लुडबूड कशाला?

प्रिया रमानी खटला : बाईचा सन्मान जपणारं कोर्टाचं जजमेंट

चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया

बायका आंदोलक बनून रस्त्यावर उतरतात, त्याचा अर्थ पुरुष कसा लावणार?

0 Shares:
You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…