विदेशी तणांची घुसखोरी, देशी तणांवर भारी!

विदेशी वनस्पतींचा होणारा विस्तार भीतीदायक आहे. प्रामुख्याने टिथोनिया किंवा मेक्सिकन सनफ्लॉवर, कॉस्मॉस, रानमोडी किंवा जंगलमोडी आणि घाणेरी या चार वनस्पतींचा विस्तार इतक्या झपाट्याने होतो की, त्या भागातली जैवविविधताच धोक्यात येते. या वनस्पतींचा प्रसार वेगाने होतोच; पण या सहजीवी न राहता इतर वनस्पतींचं अस्तित्व संपवतात.

चाळीसेक वर्षांपूर्वी महाराष्ट्रात पांढरी, बारीक, चांदणीच्या आकाराची फुलं असणारं गवत सगळीकडे डोकेदुखी बनलं होतं. मुळात विदेशी असणार्‍या या गवताला ‘गाजर गवत’ हे नाव आपण दिलं. या गवताचं बीज १९७२च्या दुष्काळात आयात केलेल्या धान्याबरोबर आलं, असं मानतात.

सुरवातीला या गवताला गायीसारखी जनावरं तोंडही लावायची नाहीत. अनेक वर्षांनी जनावरं खाऊ लागली. पण, हे गवत खाणार्‍या जनावरांचं दूध कडू व्हायचं. शेतकर्‍यांची डोकेदुखी बनलेलं हे गवत, नष्ट करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. शेतात ज्या भागात ते वाढायचं, त्या भागातलं उत्पन्न घटायचं. आज हे गवत पूर्णत: नामशेष झालं नसलं, तरी बरंच कमी झालंय. त्याचवेळी अनेक विदेशी वाणांच्या वनस्पतींची वाढही होतेय.

विदेशी वनस्पतींचा होणारा विस्तार भीतीदायक आहे. प्रामुख्याने टिथोनिया किंवा मेक्सिकन सनफ्लॉवर, कॉस्मॉस, रानमोडी किंवा जंगलमोडी आणि घाणेरी या चार वनस्पतींचा विस्तार इतक्या झपाट्याने होतो की, त्या भागातली जैवविविधताच धोक्यात येते. या वनस्पतींचा प्रसार वेगाने होतोच; पण या सहजीवी न राहता इतर वनस्पतींचं अस्तित्व संपवतात. काही वर्षांनी केवळ त्यांचंच अस्तित्व राहतं. या वनस्पती पूर्वी ज्या भागात दिसत नसायच्या, अशा ठिकाणी दिसू लागल्या आहेत.

आकर्षक दिसणार्‍या घातक वनस्पती

वेगाने विस्तारणार्‍या या वनस्पतींचं मूळ विदेशात आहे. विशेषत:, मेक्सिको देशातल्या या वनस्पती आहेत. त्या आता भारतात, विशेषत: महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. सह्याद्रीच्या रांगांमधेही त्यांचा प्रसार झाला आहे. सुरवातीला एखाद-दुसर्‍या आकर्षक दिसणार्‍या वनस्पतीचा पुढे असा काही विस्तार होतो की, त्या भागातल्या गवत, वनस्पती दिसेनाशा होतात. स्थानिक गवत, वनस्पती लुप्त पावताच त्यांच्यावर अवलंबून असणारे जीव स्थलांतरित होतात. त्याचा त्या-त्या भागातल्या पर्यावरणावर मोठा अनिष्ट परिणाम होतो.

पूर्वी केरळपासून कर्नाटकपर्यंतच्या जंगलांमधे राहणारे हत्ती आता महाराष्ट्रात कोल्हापूरपर्यंत आले आहेत. ते या भागातल्या शेतीचं तर नुकसान करतातच; पण आता नागरी वस्तीतही शिरू लागले आहेत. निसर्गातल्या विविध घटकांनी नागरी वस्त्यांमधे शिरण्यामागे जंगलांचं घटणारं प्रमाण कारणीभूत आहेच; पण आहे त्या जंगलांमधेही त्यांना चारा आणि पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे ते नागरी वस्तीत येतात, हे लक्षात घेणं आवश्यक आहे.

पशू-पक्षी आपलं स्थान बदलू शकतात. अन्न आणि पाणी मिळेल त्या भागात ते स्थलांतरित होतात, फिरत राहतात. मात्र, वनस्पतींना स्थलांतर करता येत नाही. विदेशी वाणांचं अतिक्रमण झालं आणि जगण्यायोग्य वातावरणच राहिलं नाही, तर स्थानिक वनस्पती अशा आक्रमणात संपतात. आक्रमणकर्त्या वनस्पतींना पशू, पक्षी, कीटक सरावलेले नसतात. त्याला अनेक वर्षांचा काळ जातो.

हेही वाचा: आयोडीनयुक्त मिठामुळे आपण आजारी पडतोय का?

मूळ वनस्पती नामशेष

टिथोनियाच्या बिया, तीस वर्षांच्या सहवासानंतर पोपट खाताना दिसू लागले आहेत. खारुताईही त्याच्या हिरव्या बिया खाताना आढळून आल्या. मात्र, ही सवय व्हायला काही दशकांपासून शतकांपर्यंतचा काळ जातो. गुलमोहोर शेकडो वर्षांपासून भारतात फुलत असूनही त्यावर मधमाश्यांचं पोळं आढळत नाही.

पोपट वगळता, इतर पक्षीही गुलमोहोराकडे फिरकत नाहीत. मात्र, यांची स्थानिक वाणांच्या तुलनेत कितीतरी जास्त प्रमाणात रोपं तयार होतात आणि पसरतातही. याचं लाकूड, पानं, शेंगा आणि इतर घटकांचे उपयोग आपल्याला माहीत नाहीत. मात्र, केवळ ते उन्हाळ्यात आकर्षक फुलतात म्हणून आपण लावतो. याचे उपयोग माहीत होईपर्यंत मूळ वनस्पती नामशेष होण्याची शक्यता असते.

पुणे-कोल्हापूर प्रवास करताना पुण्याच्या बाहेर पडताच अगदी सातार्‍यापर्यंत, रस्त्याच्या दोन्ही बाजूला कॉस्मॉसच्या पिवळ्या, भगव्या किंवा केशरी आणि क्वचित गुलाबी फुलांचे ताटवे खुलून दिसायचे. पाहत राहावीत अशी फुलं. यावेळीही प्रवास करताना मी ही फुलं शोधत होतो. काही दिवसांपूर्वी त्या फुलांचे ताटवे शेताच्या बांधावर आणि दूर टेकड्यांपर्यंत फुललेले दिसले.

घातक कॉस्मॉसचं मूळ मेक्सिकोत

नेहमी मन प्रसन्न करणारी ही फुलं आता विषण्ण करतात. पूर्वी निव्वळ रस्त्याकडेला दिसणारी फुलं आज खूप दूरवर पसरली आहेत. या वनस्पतीचं मूळ मेक्सिकोत आहे. चार ते बारा फुटांपर्यंत कॉस्मॉस वाढतं. यावर कोणतीही फुलपाखरं, मधमाश्या, भुंगे दिसत नाहीत. कदाचित याचं स्वयंफलन होत असावं. एका रोपापासून दरवर्षी हजारो रोपांची भर पडते. अगदी गवतालासुद्धा नामशेष करत ही वनस्पती पसरत जाते. मखमल किंवा झेंडूसारखी पानं असल्याने याला ‘गावठी झेंडू’ असं नाव मिळालं. मात्र, हे खूप घातक तण आहे.

कॉस्मॉसइतकंच किंवा त्याहून भयानक वेगाने वाढणारी विदेशी वनस्पती म्हणजे टिथोनिया किंवा मेक्सिकन सनफ्लॉवर. याची पानं खूप मोठी आणि पसरट असतात. सर्व सूर्यप्रकाश अडवल्यामुळे खाली गवत किंवा इतर वनस्पती वाढत नाहीत. याचा प्रादुर्भाव झालेल्या भागात काही वर्षांत केवळ याचीच रोपं दिसू लागतात.

खूप विचित्र पद्धतीने आणि वेगाने वाढणार्‍या या वनस्पतीला लाल आणि पिवळ्या रंगाची फुलं येतात. फुलं खूप आकर्षक असतात. त्यामुळे अनेकजण आवर्जून याची लागवड बागेत करतात. ही वनस्पतीही स्थानिक वनस्पतींना नष्ट करत आपलं साम्राज्य पसरवते.

हेही वाचा: वेगन म्हणजे वेजिटेरीअन नाही, त्यापेक्षा बरंच काही

वनस्पतींचा प्रसार वेगाने

रानमोडी नावाचं तण आता शेतामधे, बांधावरच नाही, तर अगदी सह्याद्रीच्या डोंगररांगांमधेही मोठ्या प्रमाणात आढळून येतंय. याचा प्रसारही वेगाने होतो. ही वनस्पती झाडाझुडपांच्या जवळ उगवली, तर अगदी वीस फूट उंची गाठते. जांभळ्या रंगाची छोटी फुलं येतात. बियांना कुस असते आणि वार्‍याबरोबर उडून दूर जात यांचा प्रसार झपाट्याने होत जातो.

त्यांच्या पानांचा आकार गुलबक्षीसारखा असतो. पानं गडद हिरवी असतात. या तिन्ही वनस्पतींच्या फुलांना आणि पानांना कोणताही विशेष वास नाही. फुलं आकर्षक असली, तरी त्यांच्यावर कीटकांचा वावर आढळून येत नाही. जनावरं या वनस्पतींना खात नाहीत. आपण या वनस्पतींचा प्रसार रोखला पाहिजे.

घाणेरीही असंच परदेशी तण आहे. घाणेरीला आपण अनेक वर्ष पाहत आहोत. बालपणी या फुलांच्या देठाजवळचा मध अनेकांनी चाखला असेल. मात्र, घाणेरीचं निरीक्षण केलं, तर याचेही तोटे लक्षात येतील. घाणेरीचाही प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. आजही होत आहे. त्यामुळे जंगलातल्या प्राण्यांना आवश्यक खाद्य उपलब्ध होत नाही. घाणेरीच्या पानांना आणि फुलांना वास असला आणि कीटक त्यावर येत असले, तरी जनावरं खात नाहीत.

संपन्न जैवविविधता वाचवण्यासाठी

घाणेरी आणि रानमोडी वर्षभर जगतात. कॉस्मॉस आणि टिथोनिया पावसाळ्यात उगवून उन्हाळ्यात वाळून जातात. त्यांना जनावरं खात नसल्याने त्या भागात आग लागली, तर नियंत्रणात आणणं कठीण होतं. त्यामुळे त्या भागातल्या वृक्षसंपदेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं.  काही स्वयंसेवी संस्था आणि संशोधक या वनस्पतींच्या धोक्याकडे लक्ष वेधत आहेत. मात्र, अजूनही यांचा धोका ओळखून त्यांचा बीमोड करण्यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. यांच्या निर्मूलनासाठी व्यापक जनचळवळीची गरज आहे.

शिवाजी विद्यापीठ परिसरातल्या कॉस्मॉसचं प्रमाण कमी करण्यासाठी मागच्या चार वर्षांपासून मोहीम राबवली जातेय. पण अजूनही पूर्ण निर्मूलन झालेलं नाही. या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहिलं नाही, तर आपली अवस्था ग्रीक कथेतल्या हात लावेल त्या वस्तूचं सोनं होणार्‍या मिडास राजासारखी होईल. या वाणांची रोपवाटिकांतून होणारी विक्री तातडीने थांबवण्याची गरज आहे. या घातक तणांना केवळ आकर्षकतेपायी पसरू दिलं. तर स्थानिक वनस्पती आणि गवत नष्ट होऊन जनावरांना पर्यायाने आपल्यालाही उपाशी राहण्याची वेळ येईल. म्हणून वेळीच सावध होऊन त्यांचा बीमोड करूया. संपन्न जैवविविधता वाचवूया!

हेही वाचा: 

हवामान बदल हे मानवजातीच्या अस्तित्वासमोरचं मोठं आव्हान

अमेझॉनचं जंगल कसं आहे? आणि तिथले आदिवासी कसे राहतात?

जगात पर्यावरण आणीबाणी घोषित करा सांगणाऱ्या ग्रेटा ताईची गोष्ट

आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!

इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…