प्रादेशिक पक्षांना गारवा देतोय कर्नाटकातल्या बंडखोरीच्या वणवा

कर्नाटकात भाजपच्या महत्त्वाकांक्षेला मतभेदाचा आणि बंडखोरीचा फटका बसलाय. तिकीटापासून वंचित असलेल्या अनेक ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांनी वेगवेगळी चूल मांडलीय. दुसर्‍या बाजूने काँग्रेसमधेही विश्वासाचं वातावरण राहिलेलं नाही. अनेक नेत्यांनी भाजपमधे प्रवेश केलाय. तर दोन्ही राष्ट्रीय पक्षांमधल्या बंडखोरीमुळे निजदला काही ठिकाणी नवी ताकद मिळालीय.

कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी होणार्‍या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलंय. याचं प्रमुख कारण म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीची दिशा स्पष्ट करणारी ही निवडणूक असेल. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका झाल्याझाल्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणासह अनेक राज्यांमधे विधानसभा निवडणुका होतायत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कर्नाटक विधानसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केलीय.

देशभरात गेल्या काही वर्षांत सातत्याने होत असलेला पराभव धुवून काढण्यासाठी काँग्रेसने कंबर कसलीय. त्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे स्वत: मैदानात उतरले आहेत. तर पुढच्या लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांचं महत्त्व दाखवून देण्यासाठी निजद कर्नाटकात विजयासाठी कसोशीने प्रयत्न करतोय. भाजपने तर कर्नाटक विधानसभा जिंकून आगामी लोकसभा निवडणुकीच्या विजयाची पूर्वतयारी करण्याचा प्रयत्न सुरु केलाय.

अंतर्गत गटबाजीचा फटका

भाजपला सत्तेचं स्वप्न पडलं तरी या महत्त्वाकांक्षेला मतभेदाचा आणि बंडखोरीचा फटका बसल्याने मोठं आव्हान उभं राहिलंय. तिकीटापासून वंचित असलेल्या ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांनी वेगवेगळी चूल मांडलीय. मुख्य म्हणजे उमेदवारांची यादी बाहेर येताच भाजपमधे बंडखोरीचा वणवा पसरू लागला.

या निवडणुकीसाठी पक्षाने काही नवीन चेहर्‍यांची निवड केली असली तरी, आजपर्यंत कोणताही वाद ओढवून न घेेता पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या मंत्री अंगार, जगदीश शेट्टर, रामदास यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना डावलण्यात आल्याने खळबळ उडालीय.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी.एल. संतोष यांची यामधे महत्त्वाची भूमिका बजावली, हे उघड आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या प्रल्हाद जोशी यांनी आपल्या महत्त्वाकांक्षेच्या आड येणार्‍या भाजपच्या निवडक मंत्र्यांना आपल्या वाटेपासून दूर नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपच्या गोटातून होतोय.

हेही वाचा: बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती

कल्याण कर्नाटकातली बंडखोरी

कल्याण कर्नाटक म्हणजेच पूर्वीचा हैदराबाद-कर्नाटक प्रदेश. हा भाजपचा बालेकिल्ला. गेल्या तीन निवडणुकांमधे भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आणून या भागाने लक्ष वेधून घेतलंय. या प्रदेशात भाजपला एवढ्या मोठ्या प्रमाणात बंडखोरीचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

२०१८च्या निवडणुकीत कित्तूर कर्नाटकातल्या ३० मतदारसंघांवर भाजपचं वर्चस्व होतं. यावेळी जवळपास ३५ ते ४० मतदारसंघात झेंडा फडकवायचा होता, मात्र बंडखोरीमुळे त्याला अडथळा निर्माण झाला. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, माजी उपमुख्यमंत्री सवदी, आमदार नेहरू ओलेकार, खासदार एम पी कुमारस्वामी, विधान परिषद सदस्य आर. शंकर आणि इतर अनेकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिलीय.

सौंदत्ती, रामदुर्ग, कित्तूर आणि हुक्केरीमधे भाजपच्या उमेदवारांना बंडखोर उमेदवारांचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या हावेरीमधे भाजप बंडखोर पक्षाचा विजयाचा रथ रोखण्याची शक्यता आहे. हावेरी राखीव मतदारसंघाचे विद्यमान आमदार नेहरू ओलेकर यांनी तिकीट गमावलं असून ते निजदकडून रिंगणात उतरलेत.

राणेबेन्नूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून विधान परिषद सदस्य आर. शंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. धारवाडच्या कलघटगीमधे विद्यमान आमदार चिक्कनगौडा यांनी बंडाचा झेंडा फडकावलाय. बसवन बागेवाडी मतदारसंघात सोमण गौडा पाटील हे बंडखोर उमेदवार आहेत. कल्याण कर्नाटकात बाबुराव चिंचनसूर, डॉ. मलाकारेड्डी, गुरु पाटील शिरवाला यांनी भाजपला रामराम ठोकलाय.

रोड शोपेक्षा बंडखोरी प्रबळ?

माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांनी नवा पक्ष काढला आणि त्यांनी भाजपविरोधात बळ्ळारी, कोप्पळ, रायचूर आणि यादगिरीमधे उमेदवार जाहीर करून भाजपला मोठा धक्का दिलाय. किनारपट्टी भाग हा भाजपला हमखास विजय मिळवून देणारा भाग मानला जातो. पण, या भागातही भाजप बंडखोरीने उग्र रूप धारण केलंय.

पुत्तूरमधे भाजपच्या तिकिटापासून वंचित राहिलेले हिंदुत्ववादी नेते अरुण पुट्टीला हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले, तर शिमोगा येथे विधान परिषद सदस्य डॉ. अयानूर मंजुनाथ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि काही मोठे नेते राज्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघांत प्रचार करतायत.

रोड शो करून भाजप समर्थक लाट निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. अशा प्रकारच्या प्रयत्नातून भाजपच्या थिंक टँकने आपल्या पारंपरिक व्होटबँकेव्यतिरिक्त चार ते सहा टक्के अतिरिक्त मतं मिळवून सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेता येतील, असा अंदाज व्यक्त केलाय. पण, तो कितपत यशस्वी होणार हे निकालानंतर आकडेच सांगतील.

हेही वाचा: राजकारणाची भाषा आणि भाषेचं राजकारण

काँग्रेसमधेही अविश्वास वाढलाय

कर्नाटकातून अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वराज्यात एकहाती सत्ता आणण्यासाठी कंबर कसली असली तरी नेत्यांच्या अंतर्गत लाथाळ्यांचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. राज्यात सत्ताविरोधी लाट काँग्रेससाठी वरदान ठरू शकते.

विशेषत: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने इच्छुक काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास तयार होते. ज्यामुळे कर्नाटकमधे पक्षाचं मनोबल वाढलं. पण, डी.के.शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे काँग्रेसमधेही विश्वासाचं वातावरण राहिलेलं नाही.

माजी नेत्यांची बंडखोरी

हैदराबाद-कर्नाटक हा पूर्वीपासून काँग्रेसला जास्त जागा देणारा प्रदेश आहे. पण, रायचूरमधे माजी खासदार बी.वी. नाईक यांनी पक्ष सोडून भाजपमधे प्रवेश केलाय. हा काँग्रेसला मोठा धक्का. रायचूरमधल्या लिंगसुगुर मतदारसंघातून विद्यमान आमदार डी. एस. हुलगेरी यांना तिकीट दिल्याने एच. बी. मुरारी यांनी बंडखोरी केली. गुलबर्गातल्या काँग्रेसचे नेते कृष्णाजी कुलकर्णी यांच्या बंडखोरीमुळे डोकेदुखी वाढलीय.

माजी आमदार अनिल लाड यांना बळ्ळारीमधे डावलून भरत रेड्डी यांना तिकीट दिलंय. इक्बाल अन्सारी यांना गंगावतीत तिकीट दिल्याने एच. आर. श्रीनाथ नाराज आहेत. चेन्नरेड्डी पाटील तुन्नूर यांना यादगिरीमधे तिकीट देण्यात आलंय. त्यामुळे अब्दुल जलील आणि एस. बी. कोणारेड्डीसारखे इच्छुक नाराज झालेत.

हेही वाचा: राजकारणातल्यापेक्षाही इतिहासातली चौकीदारी जास्त इंटरेस्टिंग

नाराज नेत्यांची वेगळी चूल

कित्तूर कर्नाटकातल्या अनेक बंडखोरींनी काँग्रेस नेत्यांना चिंतेत टाकलंय. सौंदत्ती यल्लम्मा विधानसभा मतदारसंघात सौरभ चोप्रा, पंचनगौडा दयमन गौडा यांनी बंडाचा झेंडा फडकावलाय. गोकाकमधे अशोक पुजारी यांना तिकीट न दिल्याने त्यांच्या समर्थकांमधे नाराजी आहे. कित्तूरमधे बाबासाहेब पाटील यांना तिकीट देण्यात आलं असून माजी मंत्री डी.बी.इनामदार नाराज आहेत.

रायबागमधे महावीर मोहिते यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे शंभू कल्लोळकर आणि प्रदीप माळगी नाराज आहेत. सौंदत्तीतले सौरभ चोप्रा काँग्रेसच्या विजयात अडथळा ठरण्याची शक्यता आहे. धारवाड ग्रामीण मतदारसंघाचे इच्छुक इस्माईल तमटगार यांनी बंडाचा झेंडा उचलला असून कलघटगीत काँग्रेसच्या तिकीटापासून वंचित नागराज छब्बी यांनी काँग्रेसला अलविदा करून भाजपचं तिकीट मिळवलंय.

चित्रदुर्गात रघु आचार यांनी काँग्रेसचं तिकीट गमावल्याने निजदमधे प्रवेश केला, तर चिक्कमंगळूरमधल्या कदूरचे वाय. एस. वी. दत्ता निजदमधे सामील झाले. गोपीकृष्ण हे तरिकेरेमधे बंडखोर उमेदवार म्हणून उभे ठाकले आहेत. लिंगायत समाजातले पारंपरिक चेहरे जसे शामनूर शिवशंकरप्पा, एम. बी. पाटील, ईश्वरा खंड्रे यांना यंदा जगदीश शेट्टर, लक्ष्मण सवदी यांच्यासह अनेकांची मदत मिळेल.

या नेत्यांच्या आगमनाने काँग्रेसला अतिरिक्त मतं मिळतील, अशी शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे, या घडामोडींमुळे कित्तूर-कर्नाटक प्रदेशात काँग्रेसला काही प्रमाणात बळ मिळालं असलं तरी जुन्या म्हैसूर भागातल्या बंडखोर उमेदवारांच्या विजयात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

निजदला पुन्हा लॉटरीची अपेक्षा

केवळ प्रादेशिक पक्षच कर्नाटकच्या हिताचं रक्षण करू शकतात, असा युक्तिवाद करताना पंचरत्न यात्रेच्या माध्यमातून लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करणार्‍या निजदने आता काँग्रेस आणि भाजपमधल्या मतभेदांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केलाय. निजदने दोन्ही पक्षांमधल्या तिकीट न मिळालेल्या प्रभावी राजकारण्यांच्या स्वागताला लाल गालिचा अंथरला. भाजप आणि काँग्रेसच्या तुलनेत, निजदला बंडखोरीचा फटका बसला नाही.

हासन आणि मंड्या या त्यांच्या बालेकिल्ल्यांमधे काही मतभेद असले तरी, त्यास यशस्वीपणे सामोरे जाण्याचे प्रयत्न केले गेलेत. तिकीट वाटपापूर्वी पक्ष कौटुंबिक भांडणात अडकला. हासन मतदारसंघातल्या उमेदवार निवडीवरून माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि त्यांचे बंधू रेवन्ना यांच्यातली लढत हे भांडणाचं कारण होतं. पाच दशकांच्या राजकारणात अशा अनेक समस्यांना तोंड देणारे आणि सोडवणारे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी अखेरीस संकट यशस्वीपणे हाताळलं.

उत्तर कर्नाटकात रायचूर, यादगिरी आणि गुलबर्गामधे पक्षाची काहीशी ताकद असली, तरी कल्याण कर्नाटकातल्या बहुतांश भागात निजदकडे उमेदवारांची ताकद नाही. त्यामुळे काही ठिकाणी उमेदवार शोधण्याची स्थिती निर्माण झाली होती. गुलबर्गामधे नेहरू ओलेकार, शिमोगामधे डॉ. मलाकारेड्डी, बळ्ळारीत डॉ. अयानुर मंजुनाथ, अरसेकेरेमधे अनिल लाड, हासनमधे येडियुरप्पा यांचे नातू संतोष निजदमधे दाखल झाले आहेत, त्यामुळे त्या पक्षाच्या विजयाची शक्यता वाढलीय.

काँग्रेस आणि भाजपमधले तिकीट न मिळालेले प्रभावी उमेदवार हे निजदचं मुख्य भांडवल आहे. राष्ट्रीय पक्षांमधल्या बंडखोरीमुळे निजदला नवी ताकद मिळालीय. विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला सरकार स्थापनेसाठी पुरेसं बहुमत मिळालं नाही, तर निजदच पुन्हा एकदा किंगमेकर ठरेल. त्यामुळे यंदा ही लॉटरी पुन्हा निजदला लागणार का, याचं उत्तर मतपेटीतूनच मिळेल.

हेही वाचा:

दिल्ली विधानसभा निकालाचे सरळ सोपे पाच अर्थ

महिलांना उमेदवारी देतानाही घराणेशाहीचंच कार्ड

आदिवासीबहुल झारखंडमधे ओबीसी राजकारणाला अच्छे दिन

संघर्ष करायचा की शरणागती पत्करायची, हे ठाकरे कुटुंबाला ठरवावं लागेल

(साभार : बहार पुरवणी – दैनिक पुढारी)

0 Shares:
You May Also Like
Rajsthan Election 2023
संपूर्ण लेख

राजस्थानात भाजपमधील बंडाळी काँग्रेसच्या पथ्यावर?

राजस्थानात आजवर कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा सरकार बनविण्याची संधी दिलेली नाही. त्यामुळे यावेळीही काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांच्या…
Toll issue in Maharashtra
संपूर्ण लेख

रस्त्यावरील ‘टोलचा झोल’ किती दिवस चालणार?

सामान्य जनतेला रस्ते असो वा कोणतीही सुविधा असो मोफत नको आहे. पण टोलवसुलीच्या नावे चाललेली जनतेची लूट लोकांना…
संपूर्ण लेख

Point by Point: खलिस्तानचं मॅटर आणि भारत-कॅनडा पंगा

कॅनडा आणि एकंदरीतच पाश्चिमात्य देशात सुरू असलेल्या खलिस्तानी चळवळीच्या कारवाया आणि भारत आणि कॅनडा या दोन देशांतील ताणलेले…
संपूर्ण लेख

धनगर आरक्षणाच्या आंदोलनाआधी, फडणवीसांना जाब विचारा!

 मराठा आरक्षणाच्या जालन्यामधील लाठीमारापर्यंत गेलेल्या आंदोलनानंतर, ओबीसींनी आंदोलनाचा इशारा दिला. आता धनगरांना भडकवलं जातंय. हे नक्की कशासाठी चाललंय…
संपूर्ण लेख

भागवतांच्या पुरोगामी विधानांमागे दडलंय काय?

आरएसएस ही मातृसंस्था असलेल्या भारतीय जनता पक्षाची सत्ता २०१४ मधे आल्यानंतर वर्षभराच्या अंतरानं, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी…
संपूर्ण लेख

भाजपचं मराठा राजकारण विरोधकांना कधी उमगेल?

गेम ऑफ थ्रोन्स या गाजलेल्या वेबसिरीजमधील पीटर बेलीश नावाच्या एका अत्यंत धूर्त पात्राच्या तोंडी एक संवाद आहे. तो…