जागतिक नदी दिन: नद्यांची शोकांतिका कोण समजून घेणार?

आज २६ सप्टेंबर. जागतिक नदी दिन. नद्या ही निसर्गाने दिलेली खूप मोठी देणगी आहे. आपलं सगळं भवितव्य नद्यांवर अवलंबून आहे. पण आपण या नद्यांची काळजी किती घेतो? आज देशातल्या सगळ्याच नद्यांचं प्रदूषण झालंय. या दूषित पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्न बिकट बनलेत.

भारतात महत्त्वाच्या ४०० नद्या आहेत. या नद्यांना अनेक उपनद्या आहेत. यामधे ११ मुख्य नद्या असून त्यांची खोरी मोठी आहेत. गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, मेघना, तापी, गोदावरी, कृष्णा, नर्मदा, कावेरी, महानदी यांचा आणि जम्मू-काश्मीरमधून उगम पावणार्‍या झेलम, चेनाब, सतलज या नद्यांचा समावेश होतो.

महाराष्ट्राचा विचार केला तर आकारमानाच्या दृष्टीने हे देशातलं तिसर्‍या क्रमांकाचं सर्वांत मोठं राज्य आहे.  महाराष्ट्रात कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा आणि कोकणातल्या नद्या या मिळून पाच महत्त्वाची नदी खोरं आहेत.

कृष्णा, गोदावरी, तापी आणि नर्मदा या नदी खोर्‍यांमधून महाराष्ट्राला ५५ टक्के पाणी उपलब्ध होऊ शकतं; तर कोकणातल्या ११ नद्यांमधून जवळपास ४५ टक्के पाणी मिळू शकतं. महाराष्ट्रात मोठ्या आणि मध्यम नद्या जवळपास ११२ आहेत.

हेही वाचा: गोड ऊस तोडणाऱ्या कामगाराचं कटू वास्तव मांडणारं पत्र

नद्यांचा उगम पश्चिम घाटात

धरणांमधे भारत जगात तिसर्‍या क्रमांकावर असून आपल्या देशात एकूण ५२०२ मुख्य धरणं आहेत. जगात सगळ्यात जास्त धरणं ही चीनमधे असून दुसर्‍या क्रमांकावर अमेरिका आहे. महाराष्ट्रात एकूण ११२१ धरणं असून यात मोठ्या आकाराची २८२ धरणं, तर ७५ धरणं ही मध्यम आकाराची आहेत.

भारतात सर्वाधिक धरणं महाराष्ट्रात असून त्याखालोखाल मध्य प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो. भारतीय द्वीपकल्पामधे पाण्याचा मुख्य स्रोत हा नदी असून इथल्या बहुतांश नद्यांचा उगम पश्चिम घाटात होतो. महाराष्ट्रात पश्चिम घाटातला बराचसा भाग येतो.

याच पश्चिम घाटामधे १२० मुख्य नद्यांची उगमस्थानं आहेत. यापैकी कृष्णा, गोदावरी, कावेरी, पूर्णा, पैनगंगा, मुळा, इंद्रावती, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, भीमा, मुळशी, घटप्रभा, मलप्रभा, तुंगभ्रद्रा, हेमावती, मोयर, ताम्रपर्णी या मुख्य नद्या आणि उपनद्या पूर्ववाहिनी असून त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात.

वैतरणा, धामणगंगा, सावित्री, वसिष्ठी, मांडवी, चाप्रा, तालपोना, काळी, गंगावती, शरावती, पांबर, पेरियार, परमबिकुलम या नद्या पश्चिमवाहिनी असूनही शेवटी त्या अरबी समुद्राला मिळतात. त्यामुळे पश्चिम घाट हा भारतीय द्वीपकल्पासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

भारतीय द्वीपकल्पाचा आर्थिक कणा

पश्चिम घाटातील जवळपास सर्व नद्यांवर मिळून २०४३ धरणं बांधली गेलेली आहेत. पश्चिम घाटात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तमिळनाडूचा काही भाग आणि केरळचा भाग येतो. इथं महाराष्ट्र आणि कर्नाटकाचं क्षेत्रफळ जास्त आहे.

पश्चिम घाटातल्या सर्व नद्या आणि उपनद्यांवर जलविद्युत प्रकल्प उभारले गेलेले आहेत. यातून १०२३५ मेगावॅटपेक्षाही अधिक वीजनिर्मिती होते. या नद्या-धरणांमधून मिळणारं पाणी आणि त्यावर उभारण्यात आलेले विद्युत प्रकल्प यांवर आपली कृषी व्यवस्था आणि उद्योगजगत अवलंबून आहे. त्यामुळे पश्चिम घाट हा भारतीय द्वीपकल्पाचा आर्थिक कणा आहे.

हेही वाचा: पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!

नदी प्रदूषण मोठी समस्या

खरं म्हणजे नद्या ही निसर्गाने आपल्याला दिलेली खूप मोठी देणगी आहे. आपलं भवितव्य नद्यांवर अवलंबून आहे. भारतीय संस्कृतीमधे नदीला माता म्हटलं जातं. आपल्या जीवनात नद्यांचं इतकं अनन्यसाधारण महत्त्व असूनही आपण नद्यांची काळजी घेतो का, याचं उत्तर शोधताना निराशा पदरी येते.

आजघडीला देशातल्या सर्वच्या सर्व नद्यांचं प्रदूषण झालेलं आहे. किंबहुना, नदी प्रदूषण ही आजची सर्वांत मोठी समस्या आहे. या प्रदूषणाला अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे, औद्योगिक प्रकल्पांमधे तयार होणारं रसायनमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नद्यांमधे सोडलं जातं.

प्रदूषणाचं कारण आधुनिक शेतीही

वास्तविक राज्या-राज्यात प्रदूषण नियंत्रण मंडळं आहेत, नदी प्रदूषणासंदर्भात नियम-कायदे आहेत; पण ते सगळे धाब्यावर बसवून राजरोसपणाने नद्यांचं प्रदूषण होतंय. धक्कादायक म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती यांच्याकडूनही गावा-शहरांमधलं सांडपाणी कसलीही प्रक्रिया न करता नद्यांमधे सोडलं जातं.

या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी वापरता येणं शक्य आहे. पण त्याबद्दल गांभीर्य दिसून येत नाही. केवळ औद्योगिक प्रकल्प आणि गावा-शहरांमधून जाणार्‍या सांडपाण्यामुळेच नद्यांचं प्रदूषण होत नाही; तर आधुनिक शेतीसुद्धा नदीप्रदूषणाला जबाबदार आहे. कारण या शेतीमधे रासायनिक खतं, कीटकनाशकं, तणनाशकं यांचा बेसुमार वापर केला जातो.

पाण्याचाही अतिरेकी वापर केला जातो. यामुळे आपल्या जमिनी प्रदूषित झाल्या आहेत. शेतांना अवाजवी पाणी दिल्यामुळे ते झिरपून पुन्हा नद्यांकडे जातं. पर्यायाने नद्यांचंही प्रदूषण होतं. कारण आपल्याकडे बहुतांश शेती ही नदीजवळच्या भागातच आहे.

हेही वाचा: प्लास्टिकमुक्त देशाचं स्वप्न जंतू साकार करणार?

आरोग्याचे प्रश्न गंभीर बनलेत

आज नद्यांच्या पाण्यात नायट्रोजनचं प्रमाण यामुळे वाढत चाललं असून त्यातून शेवाळही वाढत चाललं आहे. महाराष्ट्रातल्या सर्व नद्यांचं पाणी पाहिलं तर त्याचा रंग हिरवट दिसून येतो. हे शेवाळ कुजल्यामुळे पाण्याचा कुबट वास येतो आणि ते पिण्यायोग्य उरत नाही.

प्रदूषित पाण्यामधे तणवर्गीय वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर वाढ होते. केंदाळ किंवा जलपर्णीनी व्यापलेल्या नद्या महाराष्ट्राला नव्या नाहीत. देशभरातल्या नद्यांचीही थोड्या फार फरकाने हीच स्थिती आहे. या प्रदूषणाला सर्वस्वी जबाबदार आपण आणि आपली आधुनिक जीवनशैली आहे.

हेच प्रदूषित पाणी आपल्याला वापरावं लागत असल्याने आज आरोग्याचे प्रश्नही गंभीर बनत चालले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातल्या पंचगंगा, मुळा, मुठा या नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. देशातल्या सर्वाधिक प्रदूषित नद्यांमधे पंचगंगेचा समावेश होणं शोभणारं नाही.

जबाबदारी नेमकी कुणाची?

पाणी प्रदूषणाबद्दल नागरिकांमधे गांभीर्य दिसून येत नाही, त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे राज्यकर्त्यांचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. याचं उत्तम उदाहरण म्हणून पंचगंगा नदी प्रदूषणाचं घेता येईल. या नदीच्या पाणी प्रदूषणाबद्दल नागरिकांनी आंदोलनं सुरू केली.

राज्यकर्त्यांनी नदी प्रदूषणमुक्त करण्याचा विचार करण्याऐवजी या लोकांना थेट धरणातून पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन दिलं आणि त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून योजनाही आखली. यातून नागरिकांना शुद्ध-स्वच्छ पाणी मिळेलही; पण त्याचा दुसरा अर्थ की, पंचगंगा नदी ही अशीच प्रदूषित राहू द्यायची असा होतो.

हेही वाचा: कॅगने दाखवलंय जलयुक्तमधलं झोलयुक्त शिवार (भाग १)

नद्या प्रवाही नसायचं कारण

आज शहरा-महानगरांमधून नद्यांमधे मैलामिश्रित पाणी सोडलं जातं. मग त्या नद्यांच्या काठांवरच्या गावांनी हेच पाणी प्यायचं का, असा प्रश्न उपस्थित होतो. प्रदूषित पाण्यामुळे आरोग्याचं होणारं नुकसान खूप मोठं आहे. या दूषित पाण्यातून वेगवेगळे आजार पसरत आहेत. पण याचं कुणालाही गांभीर्य वाटत नाही.

नद्यांचं पाणी प्रवाही राहिलं तर नैसर्गिकरीत्या ते आपोआप प्रदूषणमुक्त होतं. पण आपल्या नद्यांवर ठिकठिकाणी बंधारे बांधले गेल्यामुळे हे पाणी प्रवाहित राहातच नाही. दुसरीकडे शेती, कारखाने आणि औद्योगिक प्रकल्प हे नदीपात्रापासून दूर असणं आवश्यक आहे.

पूर्वी नदीच्या उगमापासून आणि नदीच्या पात्रापासून पाच किलोमीटर अंतरावर कोणत्याही प्रकल्पाला मान्यता दिली जात नव्हती. पण आपला देश शेतीप्रधान असल्याने शेतीला परवानगी दिली गेली. औद्योगिक प्रकल्पांसाठीही हा नियम शिथिल करून ५०० मीटर ही सीमा ठरवण्यात आली. परिणामी आज अनेक औद्योगिक प्रकल्प नदीकिनारी उभे राहिलेले दिसतात.

नद्यांमधला गाळ धोक्याचा

नद्यांसंदर्भातला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गाळाचा भरणा. आज राज्यातली, देशातली बहुतांश नद्या, धरणं गाळाने भरू लागली आहेत. याचं एक कारण म्हणजे बहुतांश नद्यांचे उगम हे डोंगराळ भागात आहेत. पण या नद्यांच्या आजूबाजूला असणार्‍या डोंगरपर्वतांवरची जंगलं नष्ट करून टाकण्यात आली आहेत. त्यामुळे या डोंगरांवरच्या जमिनीची, सुपीक मातीची धूप होण्याचं प्रमाण वाढून नद्यांमधला गाळ वाढलाय.

गेल्या काही वर्षांत पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे डोंगर उतारावरून वाहून येणार्‍या गाळाचं प्रमाण प्रचंड वाढलंय. नद्यांची नैसर्गिक पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. म्हणूनच अलीकडच्या काळात थोडासा जरी पाऊस पडला तरी पूर येण्याच्या घटना घडताना दिसतात. दुसरीकडे नद्यांमधून होणारं वाळू उपशाचं प्रमाण आजही पूर्णपणे थांबलेलं नाही. नद्यांमधे कचरा, निर्माल्य, मूर्ती विसर्जन हे थांबवलं पाहिजे.

हेही वाचा: 

एका झाडाची किंमत शोधली कशी?

‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?

डळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग १)

रात्रभर झाडांचे खून होत राहिले, रात्रभर जागणारी मुंबई झोपून राहिली

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…