फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी रचना करत होते. नवा देश घडविण्यासाठी महिलाही चूल आणि मूल यातून बाहेर येऊन, करीअरच्या दिशेने नवी पावले उचलत होत्या. पण ज्यांच्याकडे शिक्षण नव्हतं, त्या महिलांना मात्र स्वयंपाकघरातून बाहेर पडण्याचा कोणाच मार्ग उपलब्ध नव्हता. ही अडचण ओळखली गिरगावातील जसवंतीबेन जमनादास पोपट यांनी. 

घरात आणि देशात समृद्धी आणायची असेल, तर हाताशी पैसे हवेत. शिकल्या-सवरलेल्यांना नोकरी मिळेल. पण, ज्यांच्याकडे शिक्षण नाही, त्यांनीही काहीतरी करायला हवं, अशी तळमळ त्यांना वाटत होती. त्यातूनच एके दिवशी आपल्या सहा मैत्रिणींनी घेऊन त्यांनी पापड लाटण्याचा उद्योग सुरू केला. ही सुरुवात होती ‘लिज्जत’ नावाच्या ब्रँडची.  गिरगावातील चाळीत सुरू झालेले हे पापड आज जगभरात उपलब्ध असून, हजारो महिला यामुळे स्वावलंबी झाल्यात.

कोण होत्या जसवंतीबेन पोपट?

गिरगावातील चिराबाजार परिसरात शंकर बारी लेन नावाची एक चिंचोळी गल्ली आहे. या गल्लीत गुजराती, मारवडी, मराठी अशी संमिश्र वस्ती आहे. या चाळींची अवस्था गेल्या सत्तर वर्षात फारशी काही बदललेली नाही. तिथल्या लोहाणा निवास या चाळीत राहणाऱ्या जसवंतीबेन, हा सर्वसमान्य गृहिणी होत्या. एका टिपिकल गुजराती कुटुंबात जसं असतं तसंच वातावरण त्यांच्याकडेही होतं.

१९५९ मधे त्यांचं वय २७-२८ वर्षाचं होतं. एका मुलाखतीत त्या सांगतात की, त्यावेळी मुलं लहान होती. दुपारी मुलं शाळेत जायची. घरातील पुरुष मंडळी कामधंद्याला जायची. मग हातात मोकळा वेळ असायचा. आम्ही मैत्रिणी गप्पा मारायचो. त्यावेळी काही शिकलेल्या महिला नोकरीला जाऊ लागल्या होत्या. पण आम्ही अशिक्षित होतो. पण आपणही काहीतरी करून चार पैसे हाताशी जोडावे, असे वाटू लागले. 

यातून एक दिवस विचार करताना असं वाटलं की, गुजराती घरात पापड ही रोज लागणारी गोष्ट आहे. आपण पापड बनवून विकले तर. ही कल्पना सगळ्यांना आवडली आणि मग आम्ही पापड बनवायचे ठरवले.  आमच्याकडे शिक्षण नव्हतं, पैसे नव्हते, घराबाहेर काम करावं अशी शक्यता नव्हती. त्यामुळे हाताशी असलेला वेळ आणि पापड लाटण्याची असलेली कला हीच आमची ताकद होती. त्यातून आम्ही पापड लाटायला सुरुवात केली.

८० रुपयांचं कर्ज काढलं आणि…

आम्ही जेव्हा हा उद्योग सुरू करायचं ठरवलं, तेव्हा विक्रीसाठी पापड बनवायचे तर पैसे हातात हवेत. मग आम्ही सर्व्हंट ऑफ इंडियाचे छगनलाल पारेख यांना भेटलो. काही महिला स्वतःहून पुढे येऊन काहीतरी करू पाहताहेत, हे आमचं साहस पाहून ते आनंदी झाले. त्यांनी आम्हाला ८० रुपये उधार दिले आणि आम्ही हा उद्योग सुरू केला.

जसवंतीबेन जमनादास पोपट, पार्वतीबेन रामदास थोडानी, उजमबेन नारनदास कुंडलिया, बानुबेन तन्ना, लागूबेन अमृतलाल गोकाणी, जयाबेन विठलानी अशी या मैत्रिणींची नावं होती. (सातव्या मैत्रीणीचं नाव माहीत नाही.) उडीद डाळ, हिंग, मसाले वगैरे विकत घेतले गेले आणि इमारतीच्या गच्चीवर पापड सुकवायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी हातावर मोजण्याएवढी पापडाची पाकिटे तयार झाली. भुलेश्वर मार्केटमधील एका ओळखीच्या व्यापाऱ्याला हे पापड विकण्यासाठी दिले. 

त्या दुकानदाराकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांना पहिल्या दिवशी बनविलेल्या पापडांपासून पन्नास पैसे नफा झाला, असा उल्लेख एके ठिकाणी आढळतो. पण हळूहळू त्यांच्या पापडांची मागणी वाढू लागली. त्यांच्यासोबत आसपासच्या आणखीही काही महिला येऊ लागल्या. बघताबघता ५० ते ६० जणी झाल्या. आता काम करणाऱ्या महिला वाढल्या, पण धंदा काही फारसा वाढत नव्हता. त्याचवेळी पुरुषोत्तम दामोदर दत्तानी देवासारखे धाऊन आले.

दत्तानी बाप्पांनी धंद्याची गणितं शिकवली

बायका-बायका एकत्र येऊन पापड लाटले जात होत होते, विकलेही जात होते. पण त्यातून फारसे पैसे हाथाशी लागत नव्हते. गणित फारसं काही जमत नव्हतं. त्याचवेळी आपल्यालाही हे काम करता येईल, म्हणून काम मागायला येणाऱ्या परिसरातील बायकाही वाढत होत्या. आता हा व्यवसाय वाढू शकतो, हे कळलं होतं. पण कसा वाढवायचा हे काही नीटसं कळत नव्हतं. त्यावेळी दत्तानी बाप्पांनी या बहिणींना धंदा काय असतो ते शिकवलं.

जसवंतीबेनच्या घरी एक फोटो दिसतो. त्याखाली लिहिलेलं असतं, लिज्जत पापड समूहाचे पितामह, पुरुषोत्तम दामोदर दत्तानी. जसवंतीबेन सांगत की, या माणसानं आम्हाला धंद्यातील ब्रँडिगं, पॅकेजिंग, नेटवर्क, माणसांचं मॅनेजमेंट असल्या बारीकसारीक गोष्टी शिकवल्या. आपल्या बहिणींना चार पैसे मिळावेत आणि त्या आपल्या पायावर उभ्या राहाव्यात,  अशी त्यांची मनापासूनची इच्छा होती. ते आमचे खरे मार्गदर्शक होते. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली धंदा शिकलो.

गिरगावात सकाळी पाच वाजता महापालिकेचे पाणी येते. तिथपासून इथल्या घरात दिवस सुरू होतो. लिज्जतचं कामही सकाळी पाच वाजल्यापासून सुरू व्हायचं. बायका पीठ न्यायला यायच्या. आज त्या पीठ घेऊन जायच्या. उद्या पापड लाटून आणून द्यायच्या. त्यांना लगेच पैसे मिळायचे. नंतर त्यांचे पैसे अकाउंटवर जमा होऊ लागले. 

महिलांची इज्जत वाढवणारी लिज्जत नावाची गोष्ट

सुुरुवातीला या महिलांना प्रशिक्षणही दिलं गेलं. त्यात अगदी केस गळू नये म्हणून डोक्याला रुमाल कसा बांधायचा इथपासून प्रशिक्षण दिलं गेलं. त्यामुळे स्वच्छता आणि दर्जा यात कुठेही तडजोड करायची नाही, हा आमचा ठाम निर्धार होता. या दर्जामुळेच आमचे पापड इतरांपेक्षा उत्तम ठरले आणि लोकांच्या पसंतीच उतरले. दुसरं आम्ही ठरवलं होतं, ते म्हणजे सरकारी मदत घ्यायची नाही. म्हणूनच आम्ही सहकारी तत्वावर काम सुरू केलं, असं जसवंतीबेन आत्मविश्वासानं सांगत.

१९६२ मधे श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड,  हे नाव ठेवण्यात आलं. लिज्जत हे नावही या महिलांनीच ठरवलंय. त्यासाठी नावांच्या चिठ्ठ्या तयार करून स्पर्धा घेतली होती. त्यात धीरजबेन रुपारेल यांनी दिलेलं लिज्जत हे नाव स्वीकरलं गेलं.  ही स्पर्धा जिंकली म्हणून त्यांना पाच रुपयाचं बक्षीसही देण्यात आलं. गुजरातीमधे लिज्जत म्हणजे चविष्ट. लिज्जत की ही इज्जत बढेगी, हा त्यांचा विश्वास होता, जो पुढं सार्थ ठरला.

वयवर्षे १८ पासून वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वांना काम दिलं गेलं. पहिल्या वर्षी ६,१९६ रुपये नफा झाला. हळूहळू सदस्यसंख्या वाढत गेली. १९६२-६३ सालचा संस्थेचा नफा होता एक लाख ८२ हजार रुपये. मग पुढे १९६६ मधे हा उद्योग नोंदणीकृत करण्यात आला. गिरगावातील जागा कमी पडू लागली. मग वडाळा आणि मग हळहळू देशभर अनेक केंद्रे सुरू झाली. बघताबघता ४५ ते ५० हजार महिला या उपक्रमाशी जोडल्या गेल्या.

अडचणी अनेक आल्या, पण हार मानली नाही

संकटं मग घरातली असोत की घराबाहेरची, एखादी स्त्री जेव्हा त्या संकटाशी दोन हात करायला कंबर कसून उभी राहते, तेव्हा ती काय करू शकते याची असंख्य उदाहरणं जगानं पाहिलीत. लिज्जतपुढेही कमी संकटे आली नाही. सर्वात पहिलं संकट आलं ते पावसाळ्याचं. पहिला पावासाळा आला आणि काम ठप्प पडलं. पावसाळ्यात पापड सुकणं अशक्य असल्यानं, चार महिने अवघड गेले.

पण, पुढल्या पावसाळ्यात मात्र पापड सुकवण्याची नवी क्लृप्ती शोधण्यात आली. खोलीमध्ये स्टोव्हच्या आगीच्या उष्णतेने पापड सुकविण्याचा प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. आता पावसाच्या दमटपणावरही मात करण्यात आली. त्यामुळे बाराही महिने कामाचं गणित बांधलं गेलं. काही यंत्रे आणण्यात आली. प्रक्रियांचं स्टॅडर्डायझेशन करण्यात आलं.
 
आटा चक्की, प्रिंटिंग डिव्हिजन, पॅकिंगची मशिन्स आदींसाठी गुंतवणूक केली गेली. पापडातही आणखी काही प्रयोग करता येतील का याचा विचार केला गेला. वेगवेगळ्या चवींचे पापड बाजारात आणले गेले. पापडासोबत खाकरा, मसाले, बेकरी प्रोडक्ट्स आणि अगरबत्तीही तयार करण्याचे प्रयोग केले. यातील काही प्रयोग लोकांना आवडले, काही सपशेल अपयशी ठरले. उदाहरणार्थ अगरबत्तीचा उद्योग नाही जमला. त्यामुळे अगरबत्ती बंद केली गेली. अशा रितीने चुका करत करत या महिला शिकत गेल्या.

रामदास पाध्येंचा बोलका बाहुला आणि ब्रँडिंग

पापडची चव आणि माऊथ पब्लिसिटी ही लिज्जतची सर्वात मोठी जाहिरात स्ट्रॅटेजी होती. पण सत्तर-ऐशीच्या दशकात टीव्ही घराघरात येऊ लागला होता. त्याचवेळी लिज्जतचा कारभार वाढत होता. त्यामुळे टीव्हीवर आपली जाहिरात दिसावी, असं ठरलं. उत्पादनाच्या विक्री वाढावी हा हेतू होताच. पण, इथं काम करणाऱ्या महिलांनाही आपण या कंपनीत काम करतो, याचा अभिमान वाटावा यासाठीही जाहिरात महत्त्वाची होती.

१९७२ मधे मुंबई दूरदर्शनची सुरुवात झाली. त्यावेळी रामदास पाध्येंचा अर्धवटराव हा बोलक्या बाहुल्यांचा खेळ टीव्हीवर लोकप्रिय ठरला होता. असाच बोलक्या बाहुला वापरून लिज्जतची पहिली जाहिरात लिज्जतने केली. ही साधारणतः १९७८-७९ ची गोष्ट असावी. रामदास पाध्येंनी घडविलेल्या या सश्यांच्या बाहुल्यांचं नाव ठरलं बनी. हा बनी पुढे लिज्जतचा ब्रँड अँबेसेडर ठरला.

८०-९० च्या दशकात टीव्हीवरील जाहिरात तुफान गाजली. ‘कुर्रम कुर्रम…मजेदार, लज्जतदार, सात स्वाद मे लिज्जत लिज्जत पापड!’ ही जिंगल लोकांच्या तोंडात बसली. या जाहिरातीमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात लिज्जत हे नाव परिचित झाले. देशभर लागणाऱ्या जत्रांमधे लिज्जतचे स्टॉल लागू लागले. दुकानांवर लिज्जतचा ब्रँड झळकू लागला. आज ऑनलाइन ग्रोसरी स्टोअरवरही हा पापड उपलब्ध आहे. आजही या पापडाच्या पाकिटावरचा बनी तसाच कायम आहे.

पद्मश्री, ग्लोबल ब्रँड आणि करोडोंचा टर्नओव्हर

सात बायका आणि ८० रुपयांपासून सुरू झालेल्या या उद्योगाचा २००२ मधला टर्नओव्हर १० करोडच्यावर होता. १५ मारच २००९ रोजी या उपक्रमानं आपला सुवर्ण महोत्सव साजरा केला. भारतभर ६२ हजाराहून अधिक शाखा आणि ४५ हजाराहून अधिक महिलांना त्यांनी रोजगार दिला होता. इथे काम करणारी प्रत्येक महिला ही बहेन म्हणून ओळखली जाते. 

बहिणींनी एकमेकांना आधार देण्यासाठी उभारलेलं हे रोपटं आज हजारो बहिणींच्या घराचा आधारस्तंभ ठरला. संस्थेतर्फे दरवर्षी या सदस्यांच्या मुलांना स्कॉलरशिप दिली जाते. अडीअडचणीला गॅरेंटीशिवाय आणि कमीत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध केलं जातं. सुरुवातीला महिला ट्रेनने येत, आता त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहनव्यवस्था केली जाते.

यामुळेच या संस्थेला १९९८-९९ मधे सर्वोत्त्तम गृहोद्योग पुरस्कार मिळाला. २००५ मधे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना ब्रँड इक्विटी पुरस्कार देण्यात आला.  असे अनेक पुरस्कार मिळाले. आज हा ब्रँड जगभरातील बाजारात पोहचला आहे. स्वाती पराडकर या अध्यक्ष म्हणून काम पाहताहेत. या उद्योगाचा पाया रचणाऱ्या जसवंतीबेन पोपट यांना २०२१ साठीचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

जसवंतीबेन यांचं कार्य मोठं व्हायला हवं

महिला एकत्र आल्या तर काय क्रांती घडवू शकतात, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लिज्जत उद्योगसमूह. हा समूह ज्यांनी उभारला त्या जसवंतीबेन पोपट यांचं सोमवारी १८ सप्टेंबर रोजी निधन झालं. त्या ९३ वर्षाच्या होत्या. खरं तर त्यांच्या मृत्यूची बातमीही फार मोठी झाली नाही. पण आता तरी त्यांच्या या कार्याचं स्मरण राहील असं स्मारक उभारलं जायला हवं. 

स्मारक हे फक्त दगडमातीचंच असायला हवं, हा आपला गैरसमज आहे. आज देशातील लक्षावधी अशिक्षित महिला अद्यापही चांगल्या रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या अशिक्षित महिलांसाठी जसवंतीबेन यांनी काम उभं केलं, त्यांचा हा आदर्श सरकरानं घ्यायला हवा. अशिक्षित महिलांच्या रोजगारासाठी जसवंतीबेन यांच्या नावे योजना आखणं, हे अधिक चांगले स्मारक ठरू शकेल. 

नुसती योजना आखून काही होत नसतं. त्या योजना अमलात आणण्यासाठी छगनलाल यांच्यासारखं आर्थिक पाठबळ उभं करावं लागेल. दत्तानी बाप्पासारखं मार्गदर्शन करावं लागेल. हे सगळं अंतर्भूत असेलेलं काम उभं करणं, आज काळाची गरज आहे. साठ वर्षापूर्वी ही गरज ओळखून, हजारो महिलांना आत्मसन्मानाचं आयुष्य देणाऱ्या जसवंतीबेन या आज्जीला तीच खरी श्रद्धांजली ठरेल.

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…
संपूर्ण लेख

मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटवू नये

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे काढले. पण त्यात शांततेला कुठं धक्का लावला नाही. पण तोच मराठा बांधव…