सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले असे. ‘ब्राह्मणी पत्रे ही पक्षपाती असून, ती आपल्या जातीच्या लोकांविरूद्ध लिहीत नाहीत. ती शूद्रातिशूद्रांचे खरे प्रतिनिधित्व करीत नाहीत’, असा म. फुल्यांचा आक्षेप होता. 

‘निबंधमाला’, ‘विविधज्ञानविस्तार’ या पत्रांनी म. फुले आणि त्यांच्या सत्यशोधक समाजाच्या कार्याचा विपर्यास करून निंदामूलक, गैरसमज पसरविणारी बेताल टीका केली. त्यामुळे सत्यशोधक समाजाच्या विचाराचा प्रचार करण्यासाठी आणि विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी एखादे पत्र असावे, असे सत्यशोधक मंडळींना वाटू लागले. त्यातून बहुजन समाजाच्या ध्येयवादी, प्रबोधनपर, समाजनिष्ठ पत्रकारितेचे नवे पर्व सुरू झाले.

सत्यशोधक पत्रकारितेची परंपरा

सत्यशोधक चळवळीच्या प्रचार-प्रसाराच्या हेतूने १८७७ ते १९३० या काळात सुमारे साठ नियतकालिके निघाली. यातील काही नियतकालिकांची यादी पुढीलप्रमाणे…

> दीनबंधु, (१८७७- कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, वासुदेवराव बिर्जे, तानुबाई बिर्जे)
> सत्सार, (१८८५- म. फुले)
> दीनमित्र, (१८८८ – गणपतराव पाटील)
> राघव भूषण, (१८८८ – गुलाबसिंह कौशल्य)
> अंबालहरी, (१८८९ – कृष्णराव भालेकर)
> शेतकऱ्यांचा कैवारी, (१८९२ – कृष्णराव भालेकर)
> मराठा दीनबंधु, (१९०१ – भास्करराव जाधव)
> दीनमित्र, (१९१०, मुकुंदराव पाटील)
> विश्वबंधू, (१९११ – बळवंतराव पिसाळ)
> जागरूक, (१९१७ – वालचंद कोठारी)
> जागृति, (१९१७ – भगवंतराव पाळेकर)
> डेक्कन रयत, (१९१८ – अण्णासाहेब लठ्ठे)
> विजयी मराठा, (१९१९- श्रीपतराव शिंदे)
> सत्यप्रकाश, (१९१९ – नारायण रामचंद्र विभूते)
> गरिबांचा कैवारी, (१९२० -बाबूराव यादव)
> भगवा झेंडा, (१९२० – दत्ताजीराव कुरणे)
> तरुण मराठा, (१९२० – सखाराम पांडूरंग सावंत)
> राष्ट्रवीर, (१९२१ – शामराव भोसले)
> प्रबोधन, (१९२१ – के. सी. ठाकरे)
> संजीवन, (१९२१- द. भि. रणदिवे)
> सिंध मराठा, (१९२४ – दत्तात्रेय वासुदेव अणावकर)
> हंटर, (१९२५ – खंडेराव बागल)
> मजूर, (१९२५ – रामचंद्र लाड)
> कर्मवीर, (१९२५ – शि. आ. भोसले)
> नवयुग, (१९२६ – बाबासाहेब बोले)
> सत्यवादी, (१९२६ – बाळासाहेब पाटील)
> ब्राह्मणेतर, (१९२६ – व्यंकटराव गोडे)
> कैवारी, (१९२८ – दिनकरराव जवळकर) 

या नियतकालिकांतून समकालीन घटना, घडामोडी, बातम्या, वृत्तसार, अग्रलेख, वैचारिक, स्फुट लेख, कथा, कविता, कादंबरी, नाटक इत्यादी ललित वाङ्मय, सत्याशोधक-ब्राह्मणेतर परिषदांचे वृत्तांत, नेत्यांची भाषणे, समाजजागृतीचे कार्य, विरोधकांचा समाचार, बाजारभाव, जाहिराती वगैरे मजकूर प्रसिद्ध होत असे.

ध्येयवादी संपादकांचं नेतृ्त्व

सत्यशोधकीय नियतकालिकांंनी स्वतःच्या उदरनिर्वाहाच्या साधनांकडे दुर्लक्ष करून, ध्येयवादाने झपाटून नियतकालिकांच्या संपादनात स्वतःला झोकून दिले. 

कृष्णराव भालेकरांनी खुद्द महात्मा फुले यांचा विरोध असताना अनेक अडचणींना तोंड देत सत्यशोधकांचे पहिले नियतकालिक ‘दीनबंधु’ सुरू केले. तानुबाई बिर्जे यांनी पतीच्या निधनानंतर मोठ्या धैर्याने आणि आर्थिक नुकसान सोसूनही ‘दीनबंधु’ चालविला.

मुकुंदराव पाटील यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी ‘दीनमित्र’ सोमठाणे आणि तरवडीसारख्या छोट्याशा खेड्यात सुरू करून ग्रामीण पत्रकारितेचा इतिहास रचला. श्रीपतराव शिंदे यांनी पोलीस सबइन्स्पेक्टरच्या नोकरीचा राजीनामा देऊन ‘विजयी मराठा’ सुरू केले. 

केशव सीताराम ठाकरे यांनी बहुजन समाजाच्या जागृतीच्या कार्यास वाहून घेण्यासाठी सरकारी नोकरीचा त्याग करून ‘प्रबोधन’ सुरू केले. स्वतःच्या सुखासीन जीवनावर पाणी सोडून या ध्येयवादी संपादकांनी समाजपरिवर्तनाच्या कार्यात वाहून घेतले. 

प्रतिकुल परिस्थितीतही पत्रकारिता टिकवली

सत्यशोधकीय नियतकालिके एकखांबी तंबूप्रमाणे होती. कृष्णराव भालेकर, नारायणराव लोखंडे, गणपतराव पाटील, मुकुंदराव पाटील, भगवंतराव पाळेकर, श्रीपतराव शिंदे, शामराव देसाई, बाळासाहेब पाटील आदी संपादक आपल्या नियतकालिकांशी संबंधित सर्व कामे स्वतःच करीत. 

सकाळी छापखाना उघडणे, तो स्वच्छ करणे, पोस्टात जाऊन टपाल आणणे, बातम्यांचे संकलन, संपादन, अग्रलेखांचे लेखन, मुद्रितशोधन, छपाई, अंक पोस्टात टाकणे, वर्गणी वसूल करणे इत्यादी सर्व कामे त्यांनी अत्यंत निष्ठेने साधकाप्रमाणे केली. संपादकांना पगार, भत्ता वगैरे काही नसे. सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी मिशनरी वृत्तीने नियतकालिके चालविली.

नियतकालिकांमधील वैचारिक वाङ्मय

सत्यशोधक नियतकालिकांमधून सामाजिक, धार्मिक, शेतकरी, कामगार, स्त्रिया, अस्पृश्य, शिक्षण, राजकारण, इतिहास वगैरे विषयांवरील वैचारिक वाङ्मय प्रसिद्ध झाले आहे. ग्रामकेंद्रित जनसमूह आणि त्यांच्या समग्र भौतिक विकासाची मांडणी करणारे लेख, अग्रलेख, निबंध वगैरे वैचारिक वाङ्मय प्रकाशित झाले आहे. 

खेडेगावांची निर्मिती, ग्रामरचना, गावगाडा, बलुतेदार-आलुतेदार व्यवस्था, कृषिकेंद्रित ग्रामजीवन, कुळकर्णी-पाटील, वतनदार इत्यादी ग्रामव्यवस्थेशी निगडित बाबींचा साक्षेपी आढावा घेतला आहे. शेतकऱ्यांनी सर्वप्रथम गावे वसविली आणि शेतीच्या गरजेतून कृषिकेंद्रित ग्रामजीवन आणि ग्रामव्यवस्था अस्तित्वात आली. 

कुळकर्णी आणि जोशी या वतनदारांनी अज्ञानी शेतकऱ्यांचे आर्थिक व धार्मिक शोषण केले. लोकांना लुबाडून ते गावाचे निरंकुश सत्ताधीश बनले. म्हणून कुळकर्णी आणि जोशी वतने तत्काळ बंद करण्याची मागणी खंडेराव बागल यांनी केली. सरकारने पुढे ही वतने बंद केली. खेडे आणि शहरे यांचा समतोल विकास करण्याचा महत्त्वपूर्ण विचार व्यंकटराव गोडे यांनी मांडला आहे. 

शहरांमध्ये सोयी-सुविधांची खैरात तर खेडेगावात पायाभूत सुविधांचीही वानवा आहे. विकासाचा हा असमतोल विषमता आणि असंतोष निर्माण करणारा आहे. त्याचे भविष्यात राष्ट्राला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. आज स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या देशासमोर शहरे आणि खेडी यांच्यातील विकासाचा असमतोल हा कळीचा प्रश्न बनला आहे. 

परंपरेरेला आव्हान देण्याचं महान कार्य

पारंपरिक आचारविचारांमध्ये कालानुरूप बदल करण्याचा विचार सत्यशोधकीय साहित्यामध्ये अभिव्यक्त झाला आहे. सत्यशोधकांच्या मते, यात्रा आणि जत्रा ही खेडेगावातील सामाजिक संमेलने आहेत. या प्रसंगी पैशाची वारेमाप उधळपट्टी, अंधश्रद्धा, पशूहत्या, हीन अभिरुची वाढवणारी तमाशासारखी करमणुकीची साधने यांसारख्या अनिष्ट प्रकारांना उधाण आलेले असते. 

त्यांना अटकाव करून लोकशिक्षणाचे कार्य जत्रा-यात्रांतून व्हावे, असा विधायक विचार वैचारिक साहित्यामधून व्यक्त झाला आहे. जत्रेप्रसंगी असणाऱ्या लोकांच्या उत्साहाला विधायक वळण लागावे यासाठी प्रबोधनपर कीर्तने, कुस्त्यांसारखे बलवर्धक खेळ, विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आयोजित कराव्यात. लोकांना बक्षिसे द्यावीत. 

रचनात्मक कार्यक्रमांतून नवसमाजरचनेचा विचार लोकमानसात बिंबवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. समाजातील अनिष्ट चालीरीतींचे निर्मूलन करून आधुनिक मूल्याधिष्ठित, विकासाभिमुख नवीन पुरोगामी पर्याय सुचविले आहेत. मूर्तिपूजा, नवस, सोवळेओवळे, अंगात येणे, दानधर्म, मंत्रतंत्र, श्राद्धविधी वगैरे रूढिपरंपरांची तर्कशुद्ध चिकित्सा करून त्यांची निरर्थकता सिद्ध केली आहे. 

ब्राह्मणांचे हितसंबंध उघडे पाडले

वैज्ञानिक आणि बुद्धिवादी दृष्टिकोनाची गरज व्यक्त केली आहे. सत्यशोधकांनी तीर्थक्षेत्रांच्या शुद्धीकरणावर भर दिला आहे. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असणारी अव्यवस्था, पुरोहितांचे प्राबल्य आणि भ्रष्टाचार यांचे वास्तव चित्रण केले आहे. तीर्थक्षेत्रे म्हणजे बहुजन समाजाला मानसिक गुलाम बनवून त्यांचे शोषण करणारी केंद्रे आहेत, असे प्रतिपादन करून त्यांचे पावित्र्य व माहात्म्य नाकारले आहे.

देवस्थानांच्या ठिकाणी जमा होणारी प्रचंड संपत्ती प्राथमिक शिक्षणासाठी खर्च करण्याची क्रांतिकारी सूचना केली आहे. आजही हा विचार प्रत्यक्षात आणण्याची मानसिकता, धैर्य, शासनाकडेही नाही आणि समाजातही नाही. सत्यनारायण, गणेशोत्सव यांच्यामागील ब्राह्मणांचे हितसंबंध उघड करून बहुजन समाजास सावध केले आहे. 

होळी, विजयादशमी, दिवाळी यांसारख्या सणांतील अनुचित प्रकार बंद करून, नवे समाजोन्नतीकारक पायंडे पाडण्याची गरज व्यक्त केली आहे. बहुजन समाजाच्या लग्नांमधील उधळपट्टी, डामडौल, मानपान यावर कडक टीका करून आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले आहे. कमी खर्चात सत्यशोधकीय पद्धतीने विवाह करण्याचा आग्रह धरला आहे. 

समाजातील अनिष्ठतेवर थेट प्रहार

व्यसनाधीनता, अनारोग्य, भिकारी यांसारख्या समाजस्वास्थ्याशी निगडित बाबींची चर्चा करून उपयुक्त, दिशादर्शक पर्याय सुचविले आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, मानवी प्रतिष्ठा या मूल्यांवर सामाजिक पुनर्रचनेचा विचार मांडला आहे.

सत्यशोधकीय नियतकालिकांमध्ये धर्म आणि जातीविषयक लेखन प्रसिद्ध झाले आहे. पारंपरिक धर्मव्यवस्थेची चिकित्सा करून इहवादी विचारांचे प्रतिपादन केले आहे. ‘नीती व सदाचार म्हणजे खरे धर्माचरण’ असे सत्यशोधकांचे मत होते. त्यांनी व्यक्तीच्या भौतिक विकासाला महत्त्व दिले. 

लाखो देशबांधव अज्ञानांधकारात बुडून पशूतुल्य अवस्थेला पोहोचले असताना, त्यांना माणूसपण आणण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न न करता परदेशात धर्मप्रसार करणार्या उंटावरच्या शहाण्यांना, ‘स्वजनद्रोही कृतघ्नता’ म्हणून वासुदेवराव बिर्जे यांनी फटकारले आहे. 

धर्मसुधारणेसाठी लेखणी झिजवली

‘प्रबोधन’कार केशव सीताराम ठाकरे यांनी देव आणि धर्मव्यवस्था नाकारली आहे. ‘जगात गुलामगिरीचे फॅड जिवंत ठेवणारे नरक म्हणजे धर्म’ असे सडेतोड प्रतिपादन करून त्यांनी धर्माच्या समूळ उच्चाटनावर भर दिला आहे. धर्मामुळे झालेला अनाचार, अत्याचार, रक्तपात व हानीचे ऐतिहासिक दाखले देऊन त्यांनी आपले मत मांडले आहे. 

मनुष्यत्वास बाधा आणणाऱ्या देव आणि धर्म कल्पनेस आव्हान दिलेले आहे. शोषणाधिष्ठित, विषमतामूलक, ग्रंथप्रामाण्यवादी व ब्राह्मण्यकेंद्रित हिंदू धर्म आणि रूढिपरंपरा यांची परखड चिकित्सा केलेली आहे. धर्माचे प्रचलित स्वरूप नाकारून माणूसकेंद्रित, समताधिष्ठित, प्रगतिशील आणि बुद्धिवादी विचारांचे प्रतिपादन केलेले आहे. 

इहवाद आणि मानवी प्रतिष्ठा यांवर भर दिला आहे. मानवजातीचा विकास व सुधारणा या धर्माच्या रूढी आणि शृंखला तोडून झाल्या आहेत. म्हणून धर्माचे कायमचे विसर्जन केल्याशिवाय मानवी ऐक्य होणार नाही, अशी धर्मातीत मानवी समाजाची संकल्पना दिनकरराव जवळकरांनी मांडली आहे. सत्यशोधकांच्या धर्मविषयक विचारांची चर्चा धर्म चिकित्सेपासून धर्मविरहित समाजाच्या संकल्पनेपर्यंत विकसित झाली आहे, हे लक्षणीय आहे.

लोकांना लुटणाऱ्या भिक्षुकशाहीवर चौफेर हल्ले

धर्मग्रंथ आणि पोथ्यापुराणांची परखड चिकित्सा करणारे लेखनही मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झालेले आहे. धार्मिक ग्रंथांचे ब्राह्मणी स्वरूप आणि त्यामधील विषमता व शोषणकारी व्यवस्था बळकट करणारा आशय यावर प्रकाश टाकला आहे. वेदासारख्या ज्या ग्रंथांचे श्रवणही ब्राह्मणेतरांना वर्ज्य होते, त्यांचे अध्ययन आणि परिशीलन करून वेदांच्या अपौरुषेय निर्मितीच्या सिद्धांताला आव्हान दिले आहे. 

पोथ्या-पुराणांचे ब्राह्मणी स्वरूप आणि त्यांची कालबाह्यता सिद्ध केली आहे. ग्रंथप्रामाण्य आणि शब्दप्रामाण्य मानण्याच्या वृत्तीतून मानसिक गुलामगिरी येते. म्हणून बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कार केला आहे. धर्मग्रंथांच्या दास्यत्वातून मुक्ततेसाठी अध्ययन, चिकित्सकपणा आणि बुद्धिवाद यांचा स्वीकार करण्याचा विचार मांडला आहे.

देव आणि धर्मव्यवस्थेवर ताबा मिळविणाऱ्या भिक्षुकशाहीवर चौफेर हल्ले चढविले आहेत. ब्राह्मणांनी समाजावर स्वतःचे वर्चस्व आणि श्रेष्ठत्व राखण्यासाठी धर्मव्यवस्था निर्माण केली. त्यांची कुटिल कारस्थाने आणि भ्रष्ट आचरण समाजासमोर सप्रमाण मांडून भिक्षुकशाहीच्या उच्चाटनाची मागणी केली आहे. 

वर्णजातविरहित समाजाची संकल्पना

देव आणि भक्त यांच्यामधील ब्राह्मण पुरोहितांची मध्यस्थी नाकारली आहे. पुरोहितशाहीमुळे जनसामान्यांचे आर्थिक शोषण झाले. श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या पायर्या निर्माण झालया. धार्मिक, मानसिक गुलामगिरी लादली गेली. म्हणून धार्मिक क्षेत्रातील समता, समानता, स्वातंत्र्य व शोषणमुक्तीसाठी मध्यस्थांच्या उच्चाटनाचा विचार मांडला गेला आहे.

चातुर्वर्ण्य व्यवस्था हे हिंदू धर्माचे व्यवच्छेदक लक्षण आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेची चिकित्सा करून त्याचे दुष्परिणाम स्पष्ट केले आहेत. वर्णव्यवस्थेमुळे कनिष्ठ वर्णियांची मने गुलाम आणि निःसत्त्व झाली आहेत. समाज मरणाच्या पंथाला लागला आहे. 

जन्मजात उच्चनीचत्वाची अशास्त्रीय कल्पना लादून माणसाला संकुचित केले आहे. म्हणून चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या उच्चाटनासाठी सामाजिक क्रांतीचा मार्ग सांगितला आहे. जातिभेदामुळे देशाचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे सातत्याने प्रतिपादन केले आहे. वर्णजातविरहित समाजाची संकल्पना मांडलेली आहे.

शेतकरी देशाचे मालक असल्याची भावना

सत्यशोधक चळवळीच्या नियतकालिकांतील वैचारिक साहित्याचा शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. महात्मा फुले यांनी ‘शेतकऱ्यांचा असूड’ या ग्रंथामधून शेतकऱ्यांच्या दुःख-दारिद्र्याची मूलगामी मीमांसा करून त्यांच्या उत्थानाच्या उपाययोजना सुचविल्या आहेत. 

कृष्णराव भालेकरांनी ‘शेतकरी मालक देशाचे’ असे महत्त्वपूर्ण विधान केले आहे. भारतीय समाजव्यवस्थेतील शेतकर्यांचे मध्यवर्ती स्थान स्पष्ट करून ‘शेतकर्यांची प्रगती हीच देशाची प्रगती’ हे वास्तव अधोरेखित केले आहे. शेतकर्यांच्या अधोगतीची ही परखड कारणमीमांसा केली आहे. 

अज्ञान, दारिद्र्य, रूढी-परंपरांचा पगडा, दैववाद, देवभोळेपणा, अंधश्रद्धा, उधळपट्टीचा स्वभाव, व्यसने वगैरे दुर्गुणांमुळे शेतकर्यांचा अधःपात झाला आहे. सरकार, नोकरशाही, सावकार, व्यापारी आणि भटजी यांच्याकडून शेतकर्यांचे आर्थिक व मानसिक शोषण केले जाते, याचे अनेक दाखले देऊन तत्कालीन शेतकऱ्याच्या परिस्थितीची वस्तुनिष्ठ मीमांसा केलेली आहे. 

शेती सुधारणेसाठी विविध पर्यायांची चाचपणी

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांची पारंपरिक मानसिकता बदलण्यासाठी आणि शेतीतून उत्पादनवृद्धी होण्यासाठी विविध उपाय सुचविले आहेत. शेतीचे शास्त्रशुद्ध आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शिक्षण देणार्या शेतीशाळा, कृषिमहाविद्यालये सुरू करावीत. 

त्यामधून शेतीच्या सुधारित पद्धतीचे प्रात्यक्षिक शेतकर्यांना दाखवून त्यांना मार्गदर्शन आणि मदत करावी. शेतीविषयक नवीन शोध व आधुनिक शेतीपद्धतीची माहिती शेतकऱ्यांना समजण्यासाठी सरकारने शेतीविषयक मासिक प्रसिद्ध करावे. अधिक उत्पन्न देणाऱ्या बी-बियाणांचा पुरवठा करावा. कृषिप्रदर्शने भरवावीत. 

आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अवजारांची निर्मिती करावी. शेतीचे आधुनिकीकरण करावे. सरकारने शेतीस प्रोत्साहन देऊन उत्पादनवृद्धीसाठी मदतीचे धोरण अवलंबावे, असे प्रतिपादन केलेले आहे. सावकार, व्यापारी, दलाल यांच्या आर्थिक लुटमारीतून मुक्त होण्यासाठी सहकार चळवळीचा क्रांतिकारक मार्ग सुचविला आहे. 

शेतकरी संघटनेसाठी पार्श्वभूमी घडवली

सहकारी पतपेढ्या, सहकारी धान्यपेढ्या, सहकारी दुकाने, सहकारी पाणीपेढ्या, शेतीसंघ अशा सहकारी संस्था स्थापन करण्याची संकल्पना मांडली आहे. सहकाराच्या माध्यमातून आर्थिक सक्षमता आणि समृद्धीचा मार्ग दाखविला आहे. सहकारी पतपेढ्यांनी शेतकर्यांच्या अर्थकारणाचा पाया बदलून त्यांना आत्मनिर्भर, संघटित व सशक्त बनविले. 

सावकारशाहीच्या जोखडातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. सहकार चळवळ ही सत्यशोधक वैचारिक मंथनातून उदयास आली आहे. शेतकर्यांचे प्रश्न संघशक्तीच्या जोरावर सोडविण्यासाठी शेतकरी संघटनेची आवश्यकता सांगितली आहे. 
स्त्रियांच्या अधिकारासाठी आवाज उठवला

सत्यशोधकीय नियतकालिकांमधून स्त्रियांविषयी प्रगमनशील विचार व्यक्त झाले आहेत. भारतीय समाजातील स्त्रियांचे दुय्यम स्थान, धर्मग्रंथांमधील स्त्रियांसंदर्भातील तुच्छतापूर्ण लेखन, पुरुषांची मानसिकता, रूढी परंपरांचा पगडा, शिक्षणाचा अभाव वगैरेंमुळे स्त्रियांची झालेली होरपळ नियतकालिकांमधील साहित्यातून चित्रित झाली आहे. 

स्त्रियांची माणूस म्हणून प्रतिष्ठा, सन्मानपूर्वक जगण्याचा हक्क आणि स्त्रियांचे अधिकार यांचा पुरस्कार केला आहे. बालविवाह आणि जरठकुमारी विवाहातील अमानुषतेचे दर्शन घडवून असे विवाह बंद करण्याची मागणी केली आहे. जोडीदार निवडण्यासाठी स्वयंनिर्णयाच्या तत्त्वास मान्यता दिली आहे. आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहांना पाठिंबा दिला आहे. स्त्री-पुरुष समतेच्या पायावरील वैवाहिक जीवनाचा पुरस्कार केला आहे. 

स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने मालमत्तेत समान अधिकार देण्याचे आवाहन केले आहे. स्त्रियांच्या खऱ्याखुऱ्या उन्नतीसाठी मुलींना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याचा जोरदार आग्रह धरला आहे. ‘राष्ट्राची उन्नती ही स्त्री शिक्षणावर अवलंबून आहे’, असा महत्त्वपूर्ण विचार कमलादेवी जाधव यांनी मांडला आहे. शांताबाई चव्हाण यांनी स्त्रियांच्या प्रश्नासंदर्भात मौलिक लेखन करून त्यांच्या उत्कर्षाच्या वाटा दाखविल्या आहेत.

अस्पृश्यता निर्मुलनासाठी विधायक मांडणी

माणसाचे माणूसपण नष्ट करून, त्याला गुलाम बनवून त्याचे अमानुष शोषण करणाऱ्या अस्पृश्यतेच्या भयंकर प्रथेस नियतकालिकांतील साहित्यामधून कडाडून विरोध केला आहे. ब्राह्मणांनी समाजावर आपले वर्चस्व आणि श्रेष्ठत्व कायम ठेवण्यासाठी वर्णव्यवस्था आणि अस्पृश्यता निर्माण केली. जगाच्या पाठीवर विटाळाचे अवडंबर माजविणारा हिंदू हा एकमेव धर्म आहे, असे वा. चि. भानु यांनी म्हटले आहे. 

निग्रो गुलामांच्यापेक्षा अस्पृश्यांची स्थिती अनेक पटीने भयानक आहे. निग्रोंच्यामधे शिवाशिवीची कल्पना अस्तित्वात नव्हती. विटाळ, दुःख, दारिद्र्य आणि अवहेलना यांमध्ये बुडालेले अत्यंत हीन आणि लाजिरवाणे जगणे अस्पृश्यांच्या वाट्याला आले. ब्राह्मण, मराठे, जैन, लिंगायत, माळी वगैरे जातींनी अस्पृश्यांवर जुलूम केले, असे श्रीपतराव शिंदे यांनी म्हटले आहे. 

अस्पृश्यता निर्मूलनाचा विचार नियतकालिकांमधील साहित्यामधून जोरदारपणे मांडला आहे. अस्पृश्यांना धार्मिक गुलामगिरीत ठेवून ब्रिटिशांपासून राजकीय स्वातंत्र्याची मागणी करण्याचा उच्चवर्णीयांना काय अधिकार आहे? असा प्रश्न सत्यशोधकीय लेखकांनी उपस्थित केला आहे. धार्मिक आणि सामाजिक स्वातंत्र्यानंतर राजकीय स्वातंत्र्याचा विचार त्यांनी मांडला आहे. 

लोकशाहीच्या मागणीचा हुंकार

भारतासारख्या बहुजातीय देशात सामाजिक लोकशाहीची स्थापना आणि समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीनंतरच खर्या अर्थाने राष्ट्र उभारणीचे कार्य होऊ शकते, असा महत्त्वपूर्ण विचार प्रतिपादन केला आहे. अस्पृश्यता निर्मूलनावर देशाचे स्वातंत्र्य, सुधारणा, प्रगती अवलंबून आहे. धार्मिक, सामाजिक व आर्थिक विषमता कायम ठेवून मिळालेले स्वातंत्र्य टिकाऊ होणार नाही, असे मत शिवराम जानबा कांबळे यांनी ‘दीनबंधु’ मध्ये १९०७ साली व्यक्त केले होते. 

वर्णजातिव्यवस्थेचे मूलाधार असणारे धर्मग्रंथ आमि शास्त्रपुराणे नष्ट करून नव्या समतामूलक समाजरचनेचा ओनामा करावा. अस्पृश्यता कायद्याने नष्ट करावी. अस्पृश्यांना शिक्षणासाठी सरकारी नोकऱ्यांमधे सवलती द्याव्यात, असा अस्पृश्योद्धाराचा कार्यक्रम नियतकालिकांमधील लेखांतून सुचविला आहे. 

अस्पृश्यता मानणारा समाज हा मानवतेवरील कलंक असून केवळ सैतानी राज्ये आणि हृदयेच अस्पृश्यता स्वीकारतील. गुलामी लादणारा धर्म अव्हेरण्याचा हक्क प्रत्येकाला आहे, असा धर्मांतराचा जहाल मार्गही सुचविला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील दलितांच्या लढ्याची वैचारिक आणि सामाजिक पार्श्वभूमी तयार करण्याचे काम या साहित्याने केले. 

शिक्षणाचं महत्व बहुजनांना पटवून दिलं

नियतकालिकांमध्ये शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे साधन संबोधले जाते. शिक्षणाचे महत्त्व प्रतिपादन करून शिक्षणप्रसाराच्या आवश्यकतेवर भर दिला आहे. बहुजन समाजाच्या अधोगतीचे मूळ शिक्षणाच्या अभावात म्हणजे अज्ञानात असल्याचे प्रतिपादन केले आहे. 

‘शिक्षणाअभावी बहुजन समाज केवळ दोन पायाची जनावरे बनला आहे. आग लागलेल्या घरावर पाणी ओतणे जसे महत्त्वाचे आहे, तसेच अज्ञानी समाजावर शिक्षणाचा वर्षाव करणे महत्त्वाचे आहे.’ अशी बहुजन समाजाची दारूण अवस्था मुकुंदराव पाटील यांनी निदर्शनास आणली आहे. शिक्षणाचा प्रसार करणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. 

सरकारने सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण द्यावे. शेतकरी व बहिष्कृत वर्गासाठी शिक्षण हेच स्वराज्य आहे, असा शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा जोरदार आग्रह धरला आहे. सरकारने शेतकऱ्यांकडून लोकल फंड व शेतसार्याच्या रूपाने घेतलेला सर्व पैसा शेतकर्यांच्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करावा.

नोकरशाहीच्या वाढत्या पगारात कपात, मोठे जमीनदार व व्यापाऱ्यांवर कर आणि देवस्थानांतील मिळकत शिक्षणप्रसारासाठी वळवून शिक्षणासाठी निधी उभारण्याचे मार्ग सुचविले आहेत. सध्या भारत सरकारने ‘सर्व शिक्षा अभियाना’साठी शिक्षणकर लावला आहे. अशा उपायांचे सूतोवाच नियतकालिकांलील लेखनातून केलेले आहे. 

शाळेच्या पलिकडे जाऊन विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न

सर्वंकष शिक्षणप्रसारासाठी लोकसहभागातून व्यापक चळवळ सुरू करण्याची गरज व्यक्त केली आहे. अशा चळवळीचे स्वरूप आणि दिशाही सूचित केली आहे. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृहे सुरू करावीत, अशी मागणी १८९५ मधे नारायण मेघाजी लोखंडे यांनी ‘बोर्डिंग स्कूलची कितीतरी आवश्यकता आहे’ या ‘दीनबंधु’मधील लेखात केली आहे.

नियतकालिकांमधील लेखांतून वसतिगृहांच्या स्थापनेची मागणी सातत्याने केली आहे. शिक्षणाच्या महत्त्वाबाबत लोकजागृती करण्यात आली. यातूनच ‘मराठा शिक्षण परिषद’, ‘रयत शिक्षण संस्था’ यांसारख्या बहुजन समाजाच्या अनेक शिक्षणसंस्था स्थापन झाल्या. त्यांनी वसतिगृहे सुरू करून ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा पाया घातला. 

राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरला अनेक वसतिगृहे सुरू केली. महाराष्ट्रातील विद्यार्थी वसतिगृह चळवळीचा पाया घालण्यामध्ये नियतकालिकांतील शिक्षणविषयक विचारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. प्रस्थापितांची तत्कालीन मराठी नियतकालिके उच्च शिक्षणाचे गोडवे गात असताना सत्यशोधक चळवळीच्या नियतकालिकांनी तळागाळातील कनिष्ठ वर्गासाठी मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा विचार सातत्याने मांडला. 

बहुजनांच्या शिक्षणात मोठा वाटा

शिक्षणावरच बहुजन समाजाचे आणि देशाचे भवितव्य अवलंबून असल्याचे प्रमेय मांडून बहुजनांच्या शिक्षणाचे महत्त्व आणि आवश्यकता अधोरेखित केली. ‘सक्तीच्या शिक्षणाचे धरण बांधून शेतकर्यांचे मेंदू सुपीक झाल्यास शेतकर्यांचे उत्पन्न वाढणार आहे’, असा शिक्षणाचा संबंध शेतकर्यांच्या बौद्धिक विकासाशी व मानसिकता बदलाशी जोडला. 

शिक्षणामुळे शेती व शेतकर्यांचे आधुनिकीकरण झाल्यास उत्पादनवृद्धी होईल, अशी सत्यशोधकीय लेखकांची धारणा होती. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय राज्यघटनेमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्यात आले. त्यापूर्वी सत्तर वर्षे या प्रश्नांवर सत्यशोधक चळवळीने व नियतकालिकांनी रान उठवून वातावरणनिर्मिती केली होती. 

प्रस्थापितांपेक्षा वेगळी राजकीय भूमिका

राजकीय विषयावर सत्यशोधकीय नियतकालिकांनी प्रस्थापितांहून भिन्न भूमिका घेतलेली आढळते. राष्ट्रीय सभेचे उद्देश, स्वरूप, कार्य व राष्ट्रीय सभेचे नेते याबाबत नियतकालिकांतील लेखनांमध्ये गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. राष्ट्रीय सभेचे नाव जरी राष्ट्रीय असले तरी राष्ट्रीय सभेमध्ये कोट्यवधी शूद्रातिशूद्र शेतकरी-कष्टकरी जनसमुदायाचे किती प्रतिनिधी आहेत? 

ब्रिटिशांकडून राजकीय स्वातंत्र्याची मागणी करणारी राष्ट्रीय सभेची उच्चवर्णीय मंडळी, त्यांनी बहुजन समाजावर लादलेली धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरी का नष्ट करीत नाहीत? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे राष्ट्रीय सभेकडे नव्हती. राष्ट्रीय सभेचे उच्चवर्णीय नेतृत्व, त्यांची हितसंबंधी धोरणे, डावपेच व मर्यादा ओळखून बहुजन समाजाचे हितरक्षण करणारी भूमिका नियतकालिकांतील राजकीय विषयावरील साहित्यातून मांडलेली आहे. 

ब्रिटिशांशी राजनिष्ठ राहून आपला सामाजिक, राजकीय आणि आर्थिक उत्कर्ष करण्याचे मत लेखकांनी नोंदविले आहे. मानवाला धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक वगैरे सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त करणारी स्वातंत्र्याची अत्यंत व्यापक संकल्पना त्यांनी मांडली आहे. सामाजिक लोकशाहीचे स्वप्न त्यांनी पाहिले आहे. 

बहुजन राजकारणाची वैचारिक पायाभरणी 

राजकीय सत्तेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी ब्राह्मणेतर पक्षाची स्थापना करण्यात आली होती. ब्राह्मणेतर पक्षाची भूमिका, उद्देश आणि कार्यक्रमांचा प्रचार-प्रसार नियतकालिकांनी केला. बहुजन समाजात राजकीय जाणिवांची जागृती व राजकीय विचारांची पेरणी करण्याचे कार्य नियतकालिकांतील साहित्याने केले. 

सत्यशोधक-ब्राह्मणेतर चळवळीच्या राजकीय पर्वाचे वैचारिक नेतृत्व नियतकालिकांनी केले आहे. आज महाराष्ट्रात बहुजन समाजाने राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधिमंडळापर्यंत जे राजकीय वर्चस्व प्राप्त केले आहे, त्याची वैचारिक पायाभरणी सत्यशोधक चळवळ आणि नियतकालकांनी केली आहे.

एकांगी आणि विखारी इतिहासलेखनाला प्रत्युत्तर

ऐतिहासिक आणि चरित्रात्मक लेखनातून सत्यशोधकीय लेखकांनी कृषिजन परंपरेचा वारसा आणि अस्मितेचा शोध घेतला आहे. गौतम बुद्ध, बळीराजा, महावीर, बसवेश्वर, तुकाराम, राजर्षी शाहू महाराज आदींच्या जीवनकार्याचा व विचारांचा वेध घेतला आहे. या महापुरुषांनी वैदिक धर्म, भिक्षुकशाही, वर्ण-जातिव्यवस्था, कर्मकांडे यांच्या विरोधात विद्रोह पुकारला. 

सामाजिक समता आणि मानवमुक्तीसाठी आपले आयुष्य त्यांनी खर्ची घातले. या महापुरुषांच्या परंपरेशी सत्यशोधक चळवळीने आपले नाते जोडले आहे. बुकर-टी-वॉशिंग्टन यांनी पोपशाहीविरुद्ध पुकारलेल्या धर्मसुधारणा चळवळींशी सत्यशोधकांनी आपले वैचारिक नाते जोडून आपल्या विचारकार्याला एक वैश्विक परिमाण प्राप्त करून दिले. 

ब्राह्मण इतिहासकारांच्या एकांगी, पक्षपाती इतिहासलेखनाची कठोर चिकित्सा करून त्या संदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. वि. का. राजवाडे यांनी ‘राधामाधवविलासचंपू’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत मराठे, जैन, बौद्ध यांच्यासंदर्भात विपर्यस्त स्वरूपात केलेल्या लेखनाला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अभ्यासपूर्ण उत्तर दिले आहे. 

शोषणमुक्त आधुनिक समाजरचनेचा विचार

सत्यशोधकीय जाणिवांतून आलेल्या आत्मभानामुळे बहुजन समाजाच्या इतिहासाच्या पुनर्लेखनाची आवश्यकता व्यक्त होऊ लागली. त्या संदर्भातील वैचारिक मांडणी नियतकालिकांमधील साहित्यातून केली आहे. आजही परिवर्तनवादी चळवळीतील लेखक, संशोधक बहुजन समाजाच्या इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अस्मिताशोध आणि सत्यशोधनाच्या प्रेरणेतून हे प्रयत्न होत आहेत.

नियतकालिकांमधील वैचारिक वाङ्मयातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, मानवता, सहिष्णुता ही श्रेष्ठ मूल्ये प्रकट झाली आहेत. शोषणमुक्त आधुनिक समाजरचनेचा विचार या वाङ्मयाच्या केंद्रस्थानी आहे. 

शेतकरी, कष्टकरी, दलित या प्रचंड जनसमुदायाच्या दुःखदैन्याची कारणमीमांसा केली आहे. त्यांच्या सर्वंकष उत्थानासाठी विविध उपायांची मांडणी केली आहे. या साहित्याने मराठी वैचारिक वाङ्मयामध्ये गुणात्मक व मूल्यात्मकदृष्ट्या मोठी भर टाकली आहे.

नियतकालिकांमधील ललित वाङ्मय

सत्यशोधकीय नियतकालिकांमधून प्रबोधनपर वैचारिक वाङ्मयाबरोबरच कादंबरी, कथा, कविता, नाटक हे सामाजिक आशयप्रधान ललित वाङ्मयही प्रकाशित झाले आहे.  कृष्णराव भालेकर यांच्या ‘बळीबा पाटील’ या कादंबरीचे पहिले चार भाग ‘दीनमित्र’मधून एप्रिल १८८८ ते जुलै १८८८ या कालावधीत क्रमशः प्रसिद्ध झाले आहेत. 

भालेकरांनी खेडेगाव, तेथील लोकजीवन, शेती, शेतकरी, त्यांचे कष्ट, दारिद्र्य, पाटलांची कर्तव्ये यांचे वास्तव चित्रण केले आहे. याचबरोबर मानवी जीवनाविषयी काही एक गंभीर वैचारिक चिंतन मांडले आहे. समकालीन मराठी कादंबरीपेक्षा विषय व आशय या अनुषंगाने ‘बळीबा पाटील’ची गुणात्मक उंची मोठी आहे. 

तत्कालीन पार्श्वभूमीवर ‘बळीबा पाटील’चा विचार केल्यास ग्रामजीवनाचे दर्शन घडविणारी ती मराठीतील पहिली तत्त्वचिंतनात्मक ग्रामीण कादंबरी ठरते.

कादंबरीतून धार्मिक कर्मठपणावर ताशेरे

मुकुंदराव पाटील यांच्या पाच कादंबऱ्या ‘दीनमित्र’मधून प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘होळीची पोळी’ (१९१०-१९१२) या कादंबरीतून ग्रामीण भागातील पाटीलकीच्या वतनाचा संघर्ष मांडला आहे. ‘चंद्रलोकीची विलक्षण रूढी अथवा दादासाहेबांची फजिती’ (१९११) या कादंबरीतून स्त्रीजीवनाच्या व्यथा-वेदनांचे चित्रण केले आहे. ‘ढढ्ढाशास्त्री परान्ने’ (१९१५) या कादंबरीतून धार्मिक कर्मठपणा आणि सामाजिक सुधारणांचा विषय विनोदी शैलीतून मांडला आहे. 

हिंदू-मुस्लिम संघर्षावरील ‘तोबातोबा’ (१९२४-१९२६) ही कादंबरी धार्मिक सद्भावना आणि मानवी ऐक्याचा विचार मांडते. खेड्यांची सुधारणा हा विषय ‘राष्ट्रीय तारुण्य’ (१९२८-१९२९) या कादंबरीमध्ये येतो. मुकुंदराव पाटील यांच्या कादंबऱ्या सामाजिक आशयप्रधान आहेत. 

समाजातील ज्वलंत, संवेदनशील विषयांचे वास्तव चित्रण त्यांच्या कादंबऱ्यातून येते. वाचकांचे कुतुहल आणि उत्कंठा जागृत करून त्यांना वर्ण्य विषयांत गुंतविण्यासाठी अद्भुतरम्यता, रहस्यमयता, वेषांतर इत्यादी वास्तववादी कादंबरीत न बसणाऱ्या तंत्राचा वापरही त्यांनी केला आहे. भाषा साधी, सोपी, प्रवाही आहे. ग्रामजीवनाचे हुबेहूब व चित्रस्पर्शी वर्णन ते करतात. 

विनोदातूनही सत्यशोधनाची परंपरा जपली

‘ढढ्ढाशास्त्री परान्ने’ ही कादंबरी आशय व अभिव्यक्तीच्या अंगाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. समाजसुधारणेसारखा संवेदनशील विषय त्यांनी निर्मळ, निखळ, विनोदी शैलीतून हाताळला आहे. विषय, आशय, अभिव्यक्ती, भाषाशैली वगैरे अंगाने ‘अस्सल देशी कलाकृती’ म्हणून ‘ढढ्ढाशास्त्री परान्ने’ या कादंबरीची नोंद करावी लागेल.

१९१० ते १९३० या काळातील मराठी कादंबरीमध्ये मध्यमवर्गीय जाणिवेतून पांढरपेशी जीवनाचे चित्रण होत असे. या पार्श्वभूमीवर मुकुंदराव पाटील यांच्या कादंबर्यांतील विषय व आशयाचे वेगळेपण जाणवते. समाजनिष्ठ जाणिवेचा कादंबरीकार, असा मुकुंदराव पाटील यांचा उल्लेख करता येईल. 

सत्यशोधकीय नियतकालिकांतील कथांमध्ये सामाजिक आशयावर भर आहे. खेडेगावातील अज्ञानी, शेतकरी-कष्टकरी जनसमूहांचे ब्राह्मण, भटजी व सावकारांकडून होणारे शोषण हे कथांचे मुख्य आशयसूत्र आहे. शेतकर्यांचे दारिद्र्य, कर्जबाजारीपण, आत्महत्या, सावकारशाहीचे निरंकुश रूप, धार्मिक शोषण, पारंपरिक मानसिकता, मागासलेपण अशा शेतकरी-कष्टकरी जनसमुदायाच्या जीवनाशी निगडित प्रश्नांचे सूक्ष्म आणि वास्तव चित्रण कथांमधून येते.

सत्यशोधकीय कवितांचं सामाजिक भान

ब्राह्मणांची वर्णवर्चस्ववादी मनोवृत्ती, कामगारांचे तसेच विधवांचे दुःखदैन्य अशा बहुविध सामाजिक प्रश्नांचे चित्रण नियतकालिकांमधील कथांतून केले आहे. प्रेमभावनेची विविध रूपे तसेच आंतरजातीय विवाहाचे चित्रण काही कथांतून येते. सामाजिक प्रश्नांचे चित्रण आणि समाजसुधारणेची मूल्यदृष्टी हे नियतकालिकांमधील कथावाङ्मयाचे वैशिष्ट्य आहे. 

सत्यशोधकीय कवितांतून शेतकऱ्यांचे अज्ञान, दारिद्र्य, कर्ज, धर्मभोळेपणा, व्रतवैकल्ये, तीर्थक्षेत्रे, ब्राह्मण, भटजी, सावकार अशी शेतकरी जीवनाशी संबंधित आशयसूत्रे आली आहेत. कृष्णराव भालेकरांचे पोवाडे, उपदेशपर लावण्या व श्रीखंड यांमधून शेतकऱ्यांच्या शोषणाचे विदारक दर्शन घडते. सरकार, नोकरशाही, पोलीस, दलाल, कुळकर्णी यांचेकडून शेतकऱ्यांचे होणारे शोषण, सावकारांच्याकडून होणारी लूटमार, अनिष्ट चालीरीतीमुळे होणारा आत्मघात वगैरे आशयसूत्रे भालेकरांच्या कवितेतून येतात. 

‘दक्षिणेतील १८७७ चा भयंकर दुष्काळ’ या पोवाड्यातून दुष्काळाच्या अस्मानी सुलतानी आपत्तीचे हृदयभेदक वर्णन भालेकरांनी केले आहे. धर्म, जात, ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व, देव आणि भक्त यांच्यामधील मध्यस्थ, अस्पृश्यता, कर्मकांडे, बुवाबाजी यांसारख्या विषयांवर पं. धोंडीराम नामदेव कुंभार, गोपाळबाबा वलंगकर, ज्ञानगिरी महाराज वगैरेंनी काव्यलेखन केले आहे. ‘अभंग’ या पारंपरिक देशी रचनाबंधामध्ये सामाजिक आशय ओतून लोकमनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

शेटजी-भटजींच्या शोषणाचं वर्णन

मुकुंदराव पाटील यांची ‘कुळकर्णीलीलामृत’ (१९१२), ‘शेटजी प्रताप’ (१९१८) ही दोन खंडकाव्ये ‘दीनमित्र’मधून क्रमशः प्रसिद्ध झाली आहेत. या खंडकाव्यांमधून कुळकर्णी आणि शेट सावकारांच्याकडून शेतकऱ्यांचे होणारे शोषण चित्रित झाले आहे. महाराष्ट्रामध्ये १९१० च्या सुमारास कुळकर्णी हा खेडेगावातील सरकारी अधिकारी आणि एक प्रकारे निरंकुश सत्ताधीश होता. 

त्याच्या लेखणी आणि लीलांनी खेडेगावातील अज्ञानी, गरीब शेतकर्यांचे कसे अमर्याद शोषण होत होते, याचे भेदक चित्रण ‘कुळकर्णीलीलामृत’ मध्ये येते. शेतकर्यांच्या दारिद्र्य आणि अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन शेट-सावकार कर्जाच्या नावाखाली त्यांना कसे देशोधडीस लावीत होते, याचे वास्तव ‘शेटजी प्रताप’ या खंडकाव्यातून वर्णन केले आहे. 

मुकुंदराव पाटलांनी ओवीबद्ध आख्यानकाव्यसदृश्य खंडकाव्याची बहारदार रचना केली आहे. समाजातील वास्तव कथानके, लोकजीवनातील व्यक्तिरेखा, दैनंदिन जीवनातील प्रसंग-घटना, ग्रामीण वातावरण, पौराणिक आख्यानकाव्याच्या धर्तीवर ओवीबद्ध रचना त्यात आढळतात. उपमा, दृष्टांत, स्वभावोक्ती, अनुप्रासादी अलंकारांची रेलचेल, उपहास, उपरोध, वक्रोक्ती या शब्दशस्त्रांचा मर्मभेदी वापर, म्हणी आणि वाक्प्रचारांची चपखल योजना त्यांनी केली आहे. 

रसरशीत, उत्कट, ओघवते निवेदन आणि शैलीदार भाषा इत्यादी गुणवैशिष्ट्यांनी सजलेली ‘कुळकर्णीलीलामृत’ व ‘शेटजी प्रताप’ ही खंडकाव्ये मराठीमध्ये अजोड आहेत. ज्वलंत सामाजिक समस्यांचे कलात्मक चित्रण करणारी ‘कुळकर्णीलीलामृत’ व ‘शेटजी प्रताप’ ही मराठीतील पहिली सामाजिक खंडकाव्ये आहेत.

नाटकामधून लोकांच्या प्रश्नांशी साधलेला संवाद

१९२० ते १९३० या काळात नियतकालिकांमधून अनेक कवींच्या स्फुट कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. धर्माचे स्वरूप, देव आणि भक्तांमधील मध्यस्थांचे उच्चाटन, जातिभेद निर्मूलन, शेतकऱ्यांचे कष्टमय जीवन, दारिद्र्य, कर्जबाजारीपण, रूढी-परंपरांचे उच्चाटन, शिक्षणाची आवश्यकता, व्यसनांचे दुष्परिणाम अशा अनेकविध विषयांचे चित्रण या कवितांमधून येते. 

शेतकरी-कष्टकरी जनसमूह केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या शोषणाची व उत्थानाची मांडणी सत्यशोधकीय कवितेतून येते. मुकुंदराव पाटील यांचे ‘राक्षसगण’ हे अपूर्ण नाटक आणि काही प्रबोधनपर संवाद नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. 

‘राक्षसगण’ या नाटकात ब्राह्मण लोक आपले वर्चस्व कायम राहावे, या स्वार्थी हेतूने बहुजन समाजाची दिशाभूल करून सत्यशोधक कार्यकर्त्यांच्या समाजप्रबोधनात कसे अडथळे आणतात, हे दाखवून दिले आहे. प्रबोधनपर संवादातून सामाजिक प्रश्नांवर उद्बोधन केलेले आहे. 

सत्यशोधक लेखनातील मर्यादा

नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या वाङ्मयाच्या काही मर्यादा आहेत. अनेकदा मांडणीमध्ये एकारलेपण, विचारांची पुनरावृत्ती, आवेश, अभिनिवेश आणि प्रचारकी उथळपणाचा दोष आढळतो. विविध वाङ्मयप्रकारांमध्ये समान विषय व समान आशयसूत्रे आल्याने मोठ्या प्रमाणात पुनरुक्ती झाली आहे. वाङ्मयीन नियतकालिकांशी तुलना करता सत्यशोधकीय नियतकालिकांतून ललित वाङ्मयास कमी स्थान मिळाले आहे. 

नियतकालिकांतील लेखक बहुजन समाजातून आलेले, वाङ्मयीन संस्कृतीशी फारसा परिचय नसलेले होते. लेखकांनी प्रबोधनाच्या प्रेरणेतून वाङ्मयनिर्मिती केली. त्यामुळे कलात्मकतेकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही.  त्यांनी कलेपेक्षा जीवननिष्ठा, समाजनिष्ठा आणि मूल्यात्मकता महत्त्वाची मानली आहे.

नियतकालिकांचा वाचक वर्ग ग्रामीण भागातील, वाचन व वाङ्मयाची फारशी अभिरुची नसलेला आणि जेमतेम साक्षर होता. त्यामुळे वाचकांच्यास्तराचा व अभिरुचीचा विचार करून त्याला समजेल, आवडेल अशा भाषेत वाङ्मय प्रकाशित करणे आवश्यक होते. त्यामुळे कलात्मकतेचा, लालित्याचा मोह टाळून साध्या, सोप्या भाषेत विषय विवेचन करण्यावर भर आढळतो.

नियतकालिकांचे तुटपुंजे अर्थकारण

आर्थिक अडचण हा सत्यशोधकीय नियतकालिकांच्या अस्तित्वाला आव्हान देणारा सर्वांत मोठा प्रश्न होता. त्यांच्या कारणांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. बहुजन समाजात त्या काळात साक्षरतेचे प्रमाण नगण्य होते. शिक्षणाची गोडी आणि वाचनाची अभिरुची नव्हती. त्यामुळे वाचक आणि वर्गणीदारांची अत्यल्प संख्या ही सत्यशोधक नियतकालिकांची मुख्य आर्थिक समस्या होती. 

१८७७ साली ‘दीनबंधु’ काढणे किती अवघड होते, हे सांगताना भालेकरांचे सहकारी सीताराम तारकुंडे यांनी लिहिले आहे, “त्या वेळेस महाराष्ट्र देशात ब्राह्मणांशिवाय इतर जातींतील फारच थोडे लोक शिकलेले होते. पण जे अगदी थोडे शिकलेले लोक होते, त्यांना वाचनाची बिलकूल अभिरुची नव्हती. वर्तमानपत्रात लेख लिहिण्यास चांगले विद्वान व बहु

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटवू नये

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे काढले. पण त्यात शांततेला कुठं धक्का लावला नाही. पण तोच मराठा बांधव…