कोल्हापुरी ‘आमचं ठरलंय’ कॅम्पेनची इनसाईड स्टोरी

lock
नुकतंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना युतीविषयी विचारलं, तेव्हा त्यांनी पत्रकारांना उत्तर दिलं, `आमचं ठरलंय`. लोकसभा निवडणुकीत गाजलेलं हे अस्सल कोल्हापुरी कॅम्पेन आता राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या बोलचालीतला वाक्प्रचार बनलाय. पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या या सुपरहिट कॅम्पेनची जन्मकथा वाचलायलाच हवी अशी. सांगत आहेत या कॅम्पेनमधे मोलाचा वाटा असणारे सोशल मीडिया कन्सल्टंट विनायक पाचलग. 

ही गोष्ट आहे महाराष्ट्रभर गाजलेल्या एका कॅम्पेनची. निवडणुका आल्या की प्रचार आला आणि प्रचाराची एखादी फेमस कॅचलाईन आली. २०१४ ची निवडणूक भाजपच्या ’सब का साथ, सबका विकास', ’अच्छे दिन आयेंगे’ आणि ’अब की बार, मोदी सरकार’ या कॅचलाईनने गाजवली. यंदाच्या निवडणुकीत मात्र देश पातळीवर अशी काही मोठी कॅम्पेन लाईन गाजली नाही. पण आपला महाराष्ट्र मात्र याला अपवाद ठरला.

महाराष्ट्रात दोन वाक्यांनी धुमाकूळ घातला. एक होता राज ठाकरेंचा ‘ए, लाव रे तो वीडियो’ आणि दुसरं वाक्य होतं ‘आमचं ठरलंय’. त्यातल्या 'आमचं ठरलंय'मागची ही इनसाईड स्टोरी.

सोशल मीडियाबाबतीत कन्सल्टन्सी करणं हा माझ्या कामाचा भाग आहे. अशीच कन्सल्टन्सी मी ज्यांना देतो, त्यातलं एक प्रमुख नाव म्हणजे आमदार सतेज पाटील. शिक्षण, उद्योग आणि राजकारण अशा तीन क्षेत्रातलं मोठं नाव. ते स्वतः टेक्नोसॅवी आहेत आणि जगाची उत्तम जाण आहे. इतरांचं नीट ऐकणं, त्यातलं हवं ते समजून घेणं आणि स्वतःचा अभ्यास करून मगच बोलणं हे त्यांचे प्रमुख गुण. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायला वेगळी मजा येते.

कोल्हापुरी राजकारणाची बेरीज वजाबाकी

ही गोष्ट जानेवारी २०१९ मधली. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी नक्की काय करायचं? अशी चर्चा आम्ही करत होतो. आणि काहीतरी भन्नाट करणं गरजेचं होतं. ते का हे समजून घेण्यासाठी कोल्हापुरी राजकारणातली बेरीज वजाबाकी माहीत पाहिजे.

कोल्हापुरात सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे कधीकाळचे मित्र. पण गेल्या १० वर्षांत त्यांची मैत्री राजकीय वैरात बदललीय. पण २०१४ मधे धनंजय महाडिक राष्ट्रवादीच्या तिकिटावरून खासदार झाले. त्यावेळी सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात समझोता झाला. काँग्रेस आघाडीचा भाग म्हणून सतेज पाटलांनी त्यांची ताकद महाडिकांच्या पाठीमागे लावली. पण लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय महाडिकांचे चुलत भाऊ अमल महाडिक हे भाजपच्या तिकीटावर सतेज पाटलांविरोधात लढले. त्यात पाटलांचा धक्कादायक पराभव झाला. यावेळी खासदार महाडिकांनी आपली सारी ताकद भावामागे लावली.

या विश्वासघाताची सल पाटील गटाला सतत सतावत राहिली. म्हणून सतेज पाटील २०१५ मधे स्थानिक स्वराज्य संस्था गटातून विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यात त्यांनी महाडिकांचे काका आणि अमल महाडिक यांचे वडील महादेवराव महाडिक यांचा पराभव केला. विधानसभेत हुकलेली आमदारकी विधान परिषदेतून भरून काढली. या सगळ्या काळात पाटील आणि महाडिक गटातलं वैर दिवसेंदिवस टोकाला गेलं.

हेही वाचा: पीयूष गोयल यांच्याऐवजी निर्मला सीतारामन अर्थमंत्री बनण्याची गोष्ट

आता आघाडीधर्म पाळायचा कसा?

२०१९ मधेही राष्ट्रवादी काँग्रेस महाडिक यांनाच रिंगणात उतरवणार असल्याचं स्पष्ट झालं. गेल्या वेळी आघाडीधर्म म्हणून केलेली मदत यावेळी करायचीच नाही. तसंच पक्षही सोडायचा नाही आणि गेल्या वेळचा हिशोब चुकता करायचा, अशी स्पष्ट भूमिका पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली. पण या सगळ्यात पाटील गटाला शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा थेट प्रचार करता येणार नव्हता.

आचारसंहिता अमलात आल्यावर पब्लिक प्रेझेन्सही ठेवता येणार नव्हता. थोडक्यात त्यांना जे काही बोलायचंय ते सोशल मीडियावरूनच बोलायचं होतं. सोशल मीडिया सल्लागार म्हणून माझ्यासाठी हा एक खूप इंटरेस्टींग पण वेगळं प्रॉब्लेम स्टेटमेंट होतं.

ती मीटिंग संपली आणि मी विचार करू लागलो. चारपाच दिवसांनी म्हणजे १५ जानेवारीला मी त्यांच्या सगळ्या टीमला एक मेल पाठवला. त्यात दोन कॅम्पेनची कन्सेप्ट नोट होती. ‘आमचं ठरलंय’ आणि ‘गंडीवलंय’. यावेळी आम्ही आघाडी धर्माची भूमिका न पाळता गेल्या ५ वर्षातला इतिहास पाहता शिवसेनेच्या उमेदवारासोबत राहणार हा इलेक्शन मूड लोकांमधे पोचवण्यासाठी ‘आमचं ठरलंय’ हा शब्द वापरायचा अशी साधारण योजना होती.

हेही वाचा: भारतात आपण हिंदू, मुस्लिम एकत्र का राहतो?

घात करणाऱ्याला साथ नाही

२० जानेवारीला कोल्हापूरच्या जवाहरनगर भागात त्यांची सभा होती आणि त्याआधी तीनचार दिवस सतेज पाटील नक्की कुणाच्या बाजूने अशी चर्चा मीडियात सुरू होती. पाटलांनी हे ओळखले की अजेंडा सेट करायची ही उत्तम संधी आहे. त्या दिवशी आम्ही भेटणार होतोच. त्या भेटीत ‘आमचं ठरलंय’वर शिक्कामोर्तब झालं. पण नेता आपल्या कार्यकर्त्यांना संबोधतो, तेव्हा आमचं म्हणणं योग्य नाही, असा विचार झाला. पाटील ’आपलं ठरलंय’ असं म्हणतील तर कार्यकर्ते मात्र ‘आमचं ठरलंय’ म्हणतील. अशा अर्थाची मांडणी तयार झाली.

या मांडणीला पुढे ‘घात करणाऱ्याला साथ द्यायची नाही’ अशी जोड सतेज पाटील आणि त्यांचे राजकीय सल्लागार प्रा. महादेव नरके यांनी दिली. त्या दिवशी सभेचा शेवट ‘आमचं ठरलंय, घात करणाऱ्याला साथ नाही’ या वाक्याने झाला. अर्थातच दुसऱ्या दिवशी सर्वांची हेडलाईन हीच होती.

तिथून पुढचे ४५ दिवस सतेज पाटील यांनी एक गोष्ट कटाक्षाने केली. ती म्हणजे जिथं कुठं पोलिटिकल भाषण असेल तिथे ते त्या भाषणाचा शेवट ‘आमचं ठरलंय’ या वाक्याने केली. अशी सहा सात ठिकाणी त्यांनी भाषणं केली. त्यामुळे त्यांच्या तोंडी आमचं ठरलंय याचा अर्थ काय हे त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना एव्हाना स्पष्ट लक्षात आलं. रिपिटेशन बिल्ड रेप्युटेशन असं म्हणतात, त्याचा प्रत्यय यातून येत होता.

हेही वाचा: आंध्र प्रदेशात पाच उपमुख्यमंत्री, पण अधिकार किती?

सतेज पाटील एका स्टेजवर मंडलिकांसोबत

या साऱ्याचा अंतिम टप्पा होता तो म्हणजे ‘गृहिणी महोत्सव’. ९ मार्चला एका टीवी चॅनलच्या कार्यक्रमाचं आयोजन पाटील यांच्या पत्नी प्रतिमा यांनी केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक स्टेजवर होते. समोर वीसेक हजारावर लोक उपस्थित होते. त्यावेळी करायच्या भाषणात त्यांनी ‘संजयराव, आमचं ठरलंय’ असं सांगत थेट आपली दिशा स्पष्ट केली.

इथपर्यंत आम्ही या कॅम्पेनसाठी सोशल मीडियाचा वापर केला नाही. कारण सतेज पाटील स्वतः बोलत होते. पण १० मार्चला आचारसंहिता लागली. या दिवसापासून सोशल मीडियाचा खेळ सुरू होणार होता. कारण आता ते ना कोणत्या स्टेजवर जाणार होते, ना पब्लिक डोमेनेमधे काही बोलणार होते. आता त्यांच्यासाठी बोलणार होता, त्यांचा सोशल मीडिया.

आणि पोस्ट वायरल होऊ लागल्या

सतेज पाटलांच्या अजिंक्यतारा ऑफिसमधली टीम कामाला लागली. त्यांच्या इन हाउस डिझायनरने आमचं ठरलंयची कॅलिग्राफी बनवली. त्यात त्यांच्या कोअर टीमने अगदी चपखलपणे ठरलंयच्या रमधे बाण दाखवला. ज्यामुळे नक्की काय म्हणायचंय याची हिंट त्यातून मिळेल. त्यांचा सोशल मीडिया हँडल करणाऱ्या माणसाने अवघ्या काही मिनिटात लाखो लोकांपर्यत पोचता येईल अशी कार्यकर्त्यांची वॉटरफॉल सिस्टिम आधीच तयार केली होती. आता फक्त त्यातून मेसेज पाठवायचे होते. याची सुरवात झाली ११ मार्चला.

आमचं ठरलंय हे लोकांवर बिंबवणं आणि ते का योग्य आहे हे सांगणाऱ्या इमेजेस आम्ही तयार करत होतो. यासाठी आमच्या एका इंटर्नल वॉट्सअप ग्रुपवर आधी चर्चा व्हायची आणि त्यानंतर डिझाईन तयार केलं जायचं. हळूहळू लोकांना हा कंटेंट आवडू लागला आणि लोक स्वतःहून हा कंटेट फॉरवर्ड करू लागले. यामुळे पोस्ट वायरल होऊ लागल्या.

या सगळ्यात एक महत्वाचा भाग होता तो म्हणजे तत्परतेचा. सोशल मीडियावर सकाळचीं गोष्ट संध्याकाळी शिळी होते. त्यामुळे एखादी घटना घडली की त्यावर लगेचच रिऍक्ट व्हावं लागतं. आणि ती रिऍक्शन जनतेला भिडणारी असेल तर ती आपोआप मनाचा ठाव घेते.

हेही वाचा: वंचित आघाडीने निव्वळ मतं खाल्ली की नवं राजकारण उभं केलं?

घात करणाऱ्यावर आसूड ओढणारच

२८ मार्चला राजू शेट्टी हातकणंगले मतदारसंघातून फॉर्म भरणार होते. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी पार्टी आघाडीचा घटकपक्ष. त्यामुळे सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे दोघंही कोल्हापूरला त्यांच्या रॅलीत असणार हे स्पष्ट होतं. मात्र पाटील हे शेट्टी आणि महाडिकांसोबत बैलगाडीवर न जाता जनतेत सामील झाले.

त्यावेळी कोणा एका कार्यकर्त्याने त्यांच्या हातात आसूड दिला आणि तो त्यांनी ओढला. पुढच्या १५ मिनिटांत आसूड ओढतानाचा फोटो आमच्याकडे आला. त्यावर ग्रुपमधे मी उत्स्फुर्त प्रतिक्रिया दिली ’आमचं ठरलंय, घात करणाऱ्यांवर आसूड ओढणारच.’ पुढच्या अर्ध्या तासात त्यावर डिझाईन तयार झालं आणि ते वायरल झालं. हा मेसेज इतका वायरल झाला की दुसऱ्या दिवशी जवळपास सगळ्याच महत्त्वाच्या पेपरमधे हा फोटो छापून आला.

शरद पवार दोन एप्रिलला कोल्हापुरात आले. पाटील आणि महाडिक यांच्यात पॅचअप करण्यासाठी ते येणार अशी हवा होती. अशावेळी सतेज पाटलांना त्यांची भूमिका स्पष्ट करणं गरजेचं होतं. एक पोस्ट तयार केली. ’साहेब, आमचा विरोध राष्ट्रवादीला नाही, तर लोकल प्रवृत्तीला, म्हणून आमचं ठरलंय.’ आणि पवार साहेब कोल्हापुरात आल्या आल्या ती पोस्ट वायरल झाली. यातून सतेज पाटलांचा स्टँड क्लिअर झालाच, पण तो लोकांमधेही अधिकच स्पष्ट झाला.

हेही वाचा: चला, आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होऊया!

जनतेचं ठरलंय चाललंच नाही

या आणि अशा बातम्यांमुळे हे कॅम्पेन सोशल मीडिया न वापरणाऱ्यांनाही समजलं. या सगळ्यांमधे ऑनलाइन पोर्टलनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. जिल्हाभरात राजकीय बातम्या देणारी खूप सारी पोर्टल सुरू झालीत. एखादा मेसेज व्हायरल झाला की या पोर्टल्सना पटकन त्याची न्यूज वॅल्यू समजायची आणि त्याची बातमी व्हायची. यामुळे दिलेला मेसेज हातोहात लोकांपर्यंत पोचायचा.

अजून एक लक्षात आलेली गोष्ट म्हणजे सोशल मीडियामुळे आता खऱ्या अर्थाने भावनांचं लोकशाहीकरण झालंय. सोशल मीडियावर पहिल्या १० दिवसांतच हे कॅम्पेन एवढं एस्टॅब्लिश झालं की नंतर कार्यकर्तेच वेगवेगळे मेसेज बनवून फिरवू लागले. यातलं एक डिझाईन असं होतं की ज्याच्यात धनुष्यबाणाच्या टोकाला हात दाखवला होता. आणि खाली लिहिलेलं ’आता आमचं ठरलंय’. कुणी अनामिक डिझायनरने तयार केलेलं हे डिझाईन एवढं गाजलं की बाप रे बाप.

अशावेळेस खरी गरज असते ती काउंटर कॅम्पेनची. मैं भी चौकीदार हे काउंटर कॅम्पेनचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. त्याने आधीचा नरेटीव ब्रेक केला आणि पूर्ण वेगळा नरेटीव सेट झाला. अशा काही प्रत्युत्तराची अपेक्षा खरंतर मला आणि सगळ्यांनाच होती. पण समोरच्या टीमने लाँच केलेलं कॅम्पेन होतं, जनतेचं ठरलंय. आता गंमत अशी की हे कॅम्पेन आमचं ठरलंयच्या विरुद्ध कसं उभं राहिल हे लक्षात न आल्याने त्याचा फायदा उलट ‘आमचं ठरलंय’लाच झाला.

हेही वाचा: ट्रम्पतात्यांचा दोस्त नरेंद्र मोदींना शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी झटका

मी बी ध्यानात ठेवलंय

याच कालावधीत १२ एप्रिलला सतेज पाटील यांचा वाढदिवस होता. त्यांच्या कार्यकर्त्यांना आमचं ठरलंय हे आपल्या नेत्याला सांगायची याहून उत्तम संधी कोणती असणार? त्यामुळे मग कुणी आमचं ठरलंयची स्टिकर काढली तर कुणी टोप्या, पेपरमधे जाहिरात देतानाही सर्वांनी आमचं ठरलंयची कॅलिग्राफी वापरली आणि जिल्ह्यातल्या आबालवृद्धाला आमचं काय ठरलंय ते समजलं.

त्याच दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात राजू शेट्टींच्या प्रचारासाठी शरद पवार आले होते. त्यांनी या कॅम्पेनचा उल्लेख करत ‘मी बी ध्यानात ठेवलंय’ असं उत्तर दिलं. त्याचं झालं असं की यामुळे फक्त कोल्हापुरात गाजणारी ही लाईन एका फटक्यात महाराष्ट्रात वायरल झाली. सगळ्या टीवी चॅनलनीही या कॅम्पेनला वेळ दिला. एवढंच नाही तर पुढच्या १० दिवसांत महाराष्ट्रामधे जवळपास २० ठिकाणी ही कॅम्पेन लाईन वापरली गेली.

हेही वाचा: निर्मला सीतारामन देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत, खरंच?

राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी ठरलंय

युती आणि आघाडीतल्या एकमेकांच्या विरोधकांना समोरच्यावर निशाणा साधण्यासाठी आमचं ठरलंय हे कॅम्पेन देवासारखं धावून आलं. सातारा, शिरूर, बारामती, पुणे, उस्मानाबाद, कल्याण, भिवंडी, सांगली, ईशान्य मुंबई या मतदारसंघात या कॅम्पेनचा वापर झाल्याचं दिसतं.

१२ एप्रिलनंतरचे चार दिवस हे कॅम्पेन टॉपला होतं. कोल्हापुरातल्या लोकल विरोधकांनी शरद पवारांनी दिलेली लाईन चालवली. पण त्यामुळे उलट सतेज पाटलांच्या कार्यकर्त्यांना अधिकच स्फुरण चढलं. पण प्रश्न असा होता की मतदान २३ एप्रिलला होतं आणि तोपर्यंत ही हवा टिकवणं गरजेचं होतं. कारण हवा उतरायला आठवडासुद्धा पुरेसा असतो. अशा वेळी प्रख्यात डिझायनर अनंत खासबागदार मदतीला आले. त्यांनी पोस्ट कार्डवरती ‘आपलं ठरलंय’ असं लिहून २०० पत्रं कोल्हापुरात पाठवली.

शिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाणात आमचं ठरलंय असं लिहिलेलं एक भन्नाट डिझाईन करून दिलं. या सगळ्याचा परिणाम म्हणून शेवटच्या दिवसापर्यंत ही हवा कायम राहिली. इलेक्शनच्या दिवशी ‘जसं ठरलं तसंच केलंय’ या लाईनने मग या कॅम्पेनने अर्धविराम घेतला.

सोशल मीडिया लोकांचं माध्यम

मागं वळून पाहताना काही गोष्टी लक्षात आल्या. सोशल मीडिया हे खरंखुर लोकशाही माध्यम आहे. इथं जनताच ठरवते की काय चालतं आणि काय नाही. आम्ही याचं कालावधीत गंडीवलंय आणि गुलाल हीच भेट अशाही कॅम्पेन काढल्या. पण त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. उलट आमचं ठरलंय एका लिमिटनंतर सोशल मीडिया टीमच्या हातातून निसटून जनतेच्या हातात गेलं.

दुसरा महत्वाचा धडा म्हणजे, मला एकाने सांगितलं होतं. नेता लाट बनवत नाही, लाट जनता स्वतः बनवते. उत्तम नेता त्यावर स्वार होतो. हेच काहीसं सोशल मीडियाबाबत आहे. जनतेच्या मनात लोकल इक्वेशन्स, त्या त्या उमेदवाराबाबत नाराजी असे घटक होते आणि या सगळ्याला आमचं ठरलंयने फक्त आवाज दिला. असे सुप्त मुद्दे ओळखून त्यावर काम करणं हे विजनरी लीडरचं, त्याच्या सोशल मीडियाचं काम आहे. 

सोशल मीडियाने भावना भडकतात, त्याचा दुरुपयोग होतो हे मान्यच. पण एखादी इनोवेटिव संकल्पना राबवली तर सोशल मीडिया खऱ्या अर्थाने जनमानस घडवू शकतं. याच्या लाईव पाहिलेल्या आणि जगलेल्या उदाहरणाची नोंद राहावी म्हणून ही लिखापढी.

हेही वाचा: नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाची पाच वैशिष्ट्यं

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Rajsthan Election 2023
संपूर्ण लेख

राजस्थानात भाजपमधील बंडाळी काँग्रेसच्या पथ्यावर?

राजस्थानात आजवर कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा सरकार बनविण्याची संधी दिलेली नाही. त्यामुळे यावेळीही काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांच्या…
Toll issue in Maharashtra
संपूर्ण लेख

रस्त्यावरील ‘टोलचा झोल’ किती दिवस चालणार?

सामान्य जनतेला रस्ते असो वा कोणतीही सुविधा असो मोफत नको आहे. पण टोलवसुलीच्या नावे चाललेली जनतेची लूट लोकांना…
संपूर्ण लेख

प्रादेशिक पक्षांना गारवा देतोय कर्नाटकातल्या बंडखोरीच्या वणवा

कर्नाटकात भाजपच्या महत्त्वाकांक्षेला मतभेदाचा आणि बंडखोरीचा फटका बसलाय. तिकीटापासून वंचित असलेल्या अनेक ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांनी वेगवेगळी चूल…
संपूर्ण लेख

Point by Point: खलिस्तानचं मॅटर आणि भारत-कॅनडा पंगा

कॅनडा आणि एकंदरीतच पाश्चिमात्य देशात सुरू असलेल्या खलिस्तानी चळवळीच्या कारवाया आणि भारत आणि कॅनडा या दोन देशांतील ताणलेले…
संपूर्ण लेख

धनगर आरक्षणाच्या आंदोलनाआधी, फडणवीसांना जाब विचारा!

 मराठा आरक्षणाच्या जालन्यामधील लाठीमारापर्यंत गेलेल्या आंदोलनानंतर, ओबीसींनी आंदोलनाचा इशारा दिला. आता धनगरांना भडकवलं जातंय. हे नक्की कशासाठी चाललंय…
संपूर्ण लेख

भागवतांच्या पुरोगामी विधानांमागे दडलंय काय?

आरएसएस ही मातृसंस्था असलेल्या भारतीय जनता पक्षाची सत्ता २०१४ मधे आल्यानंतर वर्षभराच्या अंतरानं, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी…