पावसाचे निसर्ग संकेत चकवा का देतायत?

साधारण पन्नास वर्षांपूर्वी सात जूनला पाऊस येणार, असं ठरलेलं असायचं. आज पाऊस पडतो. पूर्वीइतकाच पडतो. पण तो कुठं, किती आणि केव्हा पडणार, हे नेमकं सांगता येणं कठीण झालंय. माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं दुरावलेलं आहे. झाडं, पशू, पक्षी यांनी ते आजही घट्ट जपलंय. त्यामुळे निसर्गातल्या बदलांबद्दल हे घटक माणसापेक्षा जास्त संवेदनशील असतात. त्याप्रमाणे ते व्यक्त होतात. माणसाला ते समजून येत नाही.

यंदा पाऊस वेळेवर येणार आणि सरासरीपेक्षा जास्त येणार, अशी बातमी आली. शेतकर्‍याला निदान पाण्यासाठी त्रासावं लागणार नाही. लातूरला रेल्वेने पाणी पाठवावं लागणार नाही, या विचारात असतानाच निसर्गातल्या पर्जन्याबद्दल संकेत देणार्‍या घटकांचं चित्र नजरेसमोर आलं आणि अंदाजाबद्दल साशंकता निर्माण झाली. अर्थात या अभ्यासाला शास्त्रीय अभ्यासाची जोड नाही. प्रयोगातून काढलेले नेमके निष्कर्ष नाहीत. तरीही, आज निसर्ग संकेतांनुसारच घडताना दिसतंय.

निसर्गातल्या पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि वनस्पती या सर्वांकडून पावसाचे संकेत मिळतात. हे संकेत निसर्गातल्या अनेक घटकांना ओळखता येतात. बरेच संकेत आजही ज्येष्ठांच्या मुखातून नव्या पिढीला कळतात. ‘सहदेव भाडळी’ या ग्रंथात याबद्दल काही संकेत आढळतात. संस्कृत ग्रंथांतही काही उल्लेख आढळतात. एकविसाव्या शतकातही मेंढ्यांच्या पोषणासाठी फिरणारे मेंढपाळ, भटकणारा बंजारा समाज यांच्याकडून पावसाचं प्रमाण आणि निसर्ग संकेतांबद्दल ऐकायला मिळतं.

पावसाचे संकेत देणारे पक्षी

पावसाचा संकेत सर्वात चांगला देतो, तो म्हणजे कावळा. कावळ्याचं घरटं तो तीन फांद्यांच्या बेचक्यात आणि काटक्यांच्या साहाय्याने बांधतो. त्याचं घरटं जर झाडाच्या उंच टोकाला असेल, तर पावसाचं प्रमाण कमी असतं. कावळ्याचं घरटं मध्यभागी असेल, तर पाऊस नेहमीसारखा आणि पिकांना उपयुक्त पडतो.

कावळ्याचं घरटं खालच्या बाजूला असेल, तर अतिवृष्टी किंवा पाऊस जास्त पडतो. कावळ्याचं घरटं झाडाच्या कोणत्या दिशेला आहे, यावरूनही पावसाचं अनुमान समजतं. घरटं पश्चिमेला असेल तर सरासरीएवढा, पूर्वेला असेल तर जास्त आणि दक्षिण किंवा उत्तरेला असेल तर कमी पाऊस, असा अंदाज असतो.

टिटवीचं घरटं माळरानावर असतं. तिचं घरटं छोट्या दगडांच्या साहाय्याने बनवलेलं असतं. पावसाळ्यापूर्वी ती अंडी घालते. अंड्यांच्या संख्येवरून किती महिने पाऊस पडणार, याचं सूचन होतं असं मानलं जातं. चार अंडी असतील तर भरपूर पाऊस, तीन अंडी असतील तर सरासरीइतका आणि त्यापेक्षा कमी अंडी असल्यास अवर्षणाचं वर्ष, असा अंदाज असतो.

तित्तर पक्षी मोठमोठ्याने आवाज करू लागला की लवकरच पाऊस पडणार, असं ओळखून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागतात. तसंच पावशाचंही आहे. ‘पेर्ते वा’ असा संदेश देत पावशा ओरडू लागला की लवकरच पाऊस येणार, असा अंदाज बांधला जातो.

हेही वाचा: पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!

कीटकांच्या हालचालींवरून अंदाज

पावसाळा जवळ आला आहे, याचे संकेत आफ्रिकेतून भारतात येणारे चातक पक्षीही देतात. चातकांची गर्दी लवकर दिसू लागली तर पाऊस लवकर येणार, हे ठरलेलं. त्याचं येणं लांबलं तर पावसाळा उशिरा सुरू होतो. पाऊस कमी येणार असेल, तर त्या वर्षी हरण पिल्लांना जन्म देत नाहीत. वाघीणसुद्धा दुष्काळ पडणार असेल, तर पिल्लांना जन्म देत नाही. समुद्रात आढळणारा वादळी पक्षी किनार्‍यावर येतो आणि कोळी बांधवांना वादळाची पूर्वकल्पना देतो.

समुद्रकिनारी राहणारे लोक खेकडे आणि मासे यांच्या प्रवासाच्या दिशेवरून आणि काळावरून पावसाचा अंदाज बांधतात. काळ्या मुंग्यांचा समूह तोंडात अंडी घेऊन स्थलांतर करत असला तर लवकरच मोठा पाऊस येणार असल्याचा संकेत मिळतो. वाळवीला पंख फुटून ती हवेत उडू लागली तर लवकरच पाऊस पडतो. तसंच पाऊस जोरात येणार असेल, तर सरपटणारे प्राणी सुरक्षित जागी जाण्याचा प्रयत्न करतात. चिमण्या धुळीमधे अंग घुसळू लागल्या की, दोन-तीन दिवसांत पाऊस पडतो.

झाडंही देतात पावसाचे संकेत

निसर्गातली झाडं पावसाच्या प्रमाणाबद्दल आणि पावसाच्या काळाबद्दल अचूक संकेत देतात, असं अनेक अभ्यासकांनी नोंदवलंय. त्यातला बहावा हा महत्त्वाचा वृक्ष मानला जातो. बहावाच्या झाडांनी फुलायला सुरवात केली की, चार महिन्यांच्या आत पाऊस पडायला सुरवात होते.

चिंचेच्या झाडांना फुलोरा जास्त आला तर पाऊस अधिक पडतो आणि कमी आला तर पाऊस कमी पडतो. जास्त पावसामुळे फुलं आणि कोवळी फळं गळून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे चिंचेच्या झाडाने ही केलेली सोय असावी.

बिबा, खैर आणि शमीची झाडं जास्तच फुलली की कमी पाऊस पडतो. या झाडांना पाणी कमी मिळाल्यामुळे त्यांच्या फुलांची गळ जास्त होते. ज्या वर्षी आंबे मोठ्या प्रमाणात आलेले असतात, त्यानंतर येणारा पावसाळा हा कमी पावसाचा असतो.

हेही वाचा: दोन वर्षांत महाराष्ट्र अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्या : वसंतराव नाईक

अंदाज लावणं कठीण झालंय

निसर्गातल्या पावसाचे संकेत देणारे सर्व घटक तसेच कार्यरत आहेत; पण त्यांचं वागणं बदललंय. कालिदासाच्या ‘मेघदूत’ या सुप्रसिद्ध काव्याची सुरवात ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ अशी होते. मेघदूतामधे ढगांचं आणि पावसाचं सुंदर वर्णन आहे. यावरून साधारण सोळाशे वर्षांपूर्वी पाऊस आजच्यासारखा येत होता.

पन्नासेक वर्षांपूर्वी सात जूनला पाऊस येणार, असं ठरलेलं असायचं. आज पाऊस पडतो. पूर्वीइतकाच पडतो. पण तो कुठं, किती आणि केव्हा पडणार, हे नेमकं सांगता येणं कठीण झालंय. पूर्वीपेक्षा ढगफुटीचं प्रमाण आणि ठिकाणं मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत.

पूर्वी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणीयोग्य पाऊस पडायचा. पिकं रुजण्यासाठी तो विश्रांती द्यायचा. त्यानंतर जुलै-ऑगस्टमधे मोठा पाऊस यायचा. पिकं भरात आली, पक्व होऊ लागली की, सप्टेंबरपासून पावसाचं प्रमाण कमी व्हायचं. रब्बीची पिकं पेरून झाली की, पुन्हा दोन-तीनवेळा पाऊस येई. पण रानातून क्वचितच पाणी बाहेर यायचं.

निसर्ग देतोय बदलाचे संकेत

जागतिक तापमान वाढीमुळे निसर्गातल्या जलचक्रावर मोठा परिणाम झालाय. हवामान खात्याच्या अभ्यासातून मागच्या काही वर्षात अचूक अंदाज येऊ लागले होते. पण सूक्ष्मरूपात हे अंदाज चुकतात. अर्थात, जागतिक पातळीवर पर्यावरणाचे अभ्यासक याबद्दल मागच्या काही वर्षांपासून भीती व्यक्त करतायत.

‘इंटरगवर्मेंटल पॅनेल फॉर क्लायमेट चेंज’ या संशोधकांच्या गटाने आपल्या सहाव्या अहवालामधे याबद्दल सविस्तर माहिती दिलीय. या अहवालात त्यांनी पर्जन्यचक्रामधे अनपेक्षित आणि मोठे बदल होणार असल्याचं २०२१ मधेच जाहीर केलंय. त्यानुसार कमी काळामधे जास्त प्रमाणात पाऊस पडेल. काही ठिकाणी अवर्षण, तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका आहे. यामुळे अतिवृष्टीच्या भागात मोठ्या प्रमाणात पूर येणार आहेत. पूर आणि अवर्षण दोन्ही ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान होईल.

यावर्षी मेपासून हवामान विभागाने पूर्व अभ्यास आणि सध्याच्या वातावरणात होणारे बदल यावरून अंदाज व्यक्त केले. सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त पावसाचे अंदाज व्यक्त केले. हवामान खात्याने व्यक्त केलेले अंदाज पावसाच्या प्रमाणाबाबत अचूक निघणार याबद्दल शंका नाही; पण निसर्गातल्या संकेतांनुसार पावसाच्या वेळा बदलतील, असं दिसतं.

हेही वाचा: मराठवाड्याच्या मागासलेपणात पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचं गुपित

पाऊस उशिराने येणार

निष्पर्ण गुलमोहोर ऐन उन्हाळ्यात लालजर्द फुलांनी फुललेला आढळतो. उन्हामुळे बेजार मनाला तोच फुलवत ठेवायचा. यावर्षी गुलमोहोर जूनच्या मध्यावरही अगदी छान फुललेला आहे. हिरवीगार पानं आणि त्यांच्या टोकाला लाल फुलांचे गुच्छ पाऊस उशिरा येणार असल्याचेच संकेत देत आहेत.

बहाव्याची झाडं अजूनही भरभरून फुललेली आहेत. बहाव्याला जूनच्या मध्यावर पानं आणि फुलं लगडलेली दिसतात. बहाव्याच्या झाडाकडूनही दीर्घ काळ पाऊस पडत राहणार असल्याचे संकेत येतात. धामण आणि पांढरफळी या झाडांची अवस्थाही तशीच आहे.

दरवर्षी पंधरा दिवसांत सर्व पांढरफळीची झाडं फुलत. यावर्षी पांढरफळीची काही झाडं फुलून त्यांना फळं आलेली आहेत, तर काही झाडांना जून संपत आल्यावर फुलोरा आलेला आहे. धामणीची झाडं पाऊस येण्याअगोदर एक महिना फुलतात. मात्र यावर्षी अजूनही झाडं फुलत आहेत. दुसरीकडे, कावळ्यांची घरटी टोकाला नाहीत. याचा अर्थ पाऊस येणार, भरपूर येणार; पण तो उशिराने येणार, याचेच संकेत निसर्ग देत आहे.

निसर्गाशी नातं जोडायला हवं

माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं आज दुरावलेलं आहे. झाडं, पशू, पक्षी यांनी मात्र ते आजही घट्ट जपलंय. त्यामुळे निसर्गातल्या बदलांबाबत हे घटक माणसापेक्षा जास्त संवेदनशील असतात आणि त्याप्रमाणे ते व्यक्तही होतात. माणसाला मात्र ते समजून येत नाही.

माणसाने पुन्हा निसर्गाशी नातं जोडायला हवं. निसर्गाचा आपला संबंध पुनर्प्रस्थापित करायला हवा. त्यासाठी झाडं लावायला आणि जगवायला हवीत. यातून जल-जंगल-जमीन यातला समतोल राखला जाईल. झाडांबरोबर पाणी टिकून राहील. पशू, पक्षी येतील आणि त्यांनी दिलेले निसर्ग संकेत आपल्याला समजू लागतील.

हेही वाचा: 

एका झाडाची किंमत शोधली कशी?

८९ व्या वर्षी अरण्यऋषी चितमपल्लींनी मांडलाय नवा डाव 

‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?

डळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग १)

रात्रभर झाडांचे खून होत राहिले, रात्रभर जागणारी मुंबई झोपून राहिली

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

पर्यंटकांच्या गर्दीला युरोप नाही म्हणतंय, भारताचं काय?

कधी कधी स्वत:वर, तर कधी परिस्थितीवर रडावसं वाटतं. ज्या ठिकाणी आपण आनंद घेण्यासाठी जातो त्या सर्व ठिकाणांची आजची…
संपूर्ण लेख

शाहरुखचा ‘जवान’ हिट का झाला?

२०१७ मधे शाहरुखचा ‘रईस’ रिलीज झाला. एक चांगला ऍक्शन सिनेमा असूनही पायरसीचा फटका बसल्याने ‘रईस’ला म्हणावा तसा नफा…
संपूर्ण लेख

भारतांनं चंद्रमोहिमेतून नक्की काय साधलं?

भारताचं चांद्रयान-३ ठरलेल्या दिवशी, नियोजित वेळी आणि निश्चित केलेल्या जागी चंद्राच्या भूमीवर उतरलं आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं…
संपूर्ण लेख

आशा भोसले : फक्त ९० वर्षांचा हिरवागार स्वरऋतू!

कल्पना करा, तुम्ही कोणत्या तरी कारणानं अत्यंत अस्वस्थ आहात, बैचेन आहात. मन लागत नाही आणि तितक्यात एक गाणं…
संपूर्ण लेख

‘एआय’मुळे फेक कंटेंटवाल्यांचा बाजार जोरात!

जगभरातील माणसं काय विचार करतात हे त्यांना काय माहिती मिळते, त्यावर ठरतं. ते जो विचार करतात तशी खरेदी…
संपूर्ण लेख

गांधीजींच्या शेवटच्या माणसाचा शोध घेणारी दोन पुस्तकं!

१९४० च्या दशकात महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह मोहिमेसाठी विनोबा भावे यांची पहिला लढवय्या म्हणून निवड केली. दुसरे…