गांधीजींच्या शेवटच्या माणसाचा शोध घेणारी दोन पुस्तकं!

१९४० च्या दशकात महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह मोहिमेसाठी विनोबा भावे यांची पहिला लढवय्या म्हणून निवड केली. दुसरे होते पंडित जवाहरलाल नेहरू. विनोबा होते अहिंसात्मक परिवर्तनाबद्दल प्रयोग करणाऱ्या चिंतनाचे महामेरू असलेल्या बापूंचे पट्टशिष्य तर जवाहर नव्या भारताचे निर्माण कसे असावे याचा आराखडा अमलात आणू पाहणारे गांधींचे आधुनिक वीर.

विनोबा हे धर्म-अध्यात्म यात खोल बुडी मारून जीवनाबद्दल सखोल अन्वयार्थ काढणारे भाषाप्रभू तर जवाहर हे जगाची मुशाफिरी करून भारतीयत्वाची विकासाच्या यज्ञात जडणघडण करू पाहणारे द्रष्टे नेतृत्त्व.  

शेकडो वर्षांपासूनचा अन्याय दूर करण्यासाठी येथील लोकांना भेटून, संवाद साधून आणि समस्यांच्या गुहेत निर्भयपणे शिरून त्यावर काम करण्यासाठी असाधारण हिम्मत, संयम आणि चिवटपणा लागतो. हे सर्व स्वत:मधे जर आणायचे असेल तर विनोबा आणि नेहरूंच्या स्वप्नांची पेरणी करणारी ही दोन पुस्तके जरूर वाचायला हवी.

विषय वेगळे, पण आशय सत्याग्रहाचाच

‘अवघी भूमी जगदीशाची : भूदान ग्रामदान आंदोलनाची कहाणी’ हे पराग चोळकर यांचे विनोबा यांच्या आयुष्यातील १९५१-१९७४ अशी २४ वर्षांच्या कालखंडावर लिहिलेला उत्कृष्ट ग्रंथ आहे. त्यांच्या मनोगतातून आपल्याला कळते की, सन २००० मधे भूदान आंदोलनाची सुवर्ण जयंती झाली, त्यावेळी या संशोधनावर सुरुवात झाली. 

आधी हिन्दी, इंग्रजी आणि मग मराठी अशी आवृत्ती येत येत २०२२ साल उजाडले. महान आंदोलनाला समजून समाजासमोर सोप्या भाषेत ठेवणे किती कष्टाचे काम असते, हे यावरून आपल्याला कळून येईल. 

दुसऱ्या बाजूला ‘बिजापूर डायरी’ हे डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांचे पुस्तक एका कार्यकर्त्याच्या निष्ठेने पाच वर्षे छत्तीसगड मधील बस्तर भागात काम केलेल्या अनुभवांवर आधारित आहे. सत्याग्रह या सामर्थ्याचा हिमालय असलेल्या विनोबा यांचे चिंतन आजच्या काळातील तरुण पिढीने प्रत्यक्षात अमलात कसे आणावे, याचा सुंदर धडा या पुस्तकातून मांडला आहे. 

दलित भूमिहीन आणि आदिवासी

ही दोन्ही पुस्तके अर्थातच दोन स्वतंत्र परिचय लेख किंवा रसास्वादसाठी अतिशय मोलाची आहेत. पण आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी इतिहासातील निखळलेले दुवे जोडायला हवेत. त्यातून महत्त्वाचे निष्कर्ष काढण्यासाठी या प्रकारच्या पुस्तकांचे एकत्रित वाचन व्हायला हवे. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे झाल्यानंतरच्या काळात, ही दोन्ही पुस्तके वैयक्तिक सत्याग्रहाबद्दलच्या चिंतनाच्या मळलेल्या वाटा परत प्रकाशमान करतात.

आता थोडे पुस्तकातील भारताच्या शोधाबद्दल समजून घेऊ. दोन्ही पुस्तकात भारताचा प्रवास आहे. स्वराज्याचे सुराज्य व्हावे असे स्वप्न घेऊन आपण स्वातंत्र्यानंतर प्रजासत्ताक, संविधानवादी राष्ट्र बनलो. परंतु देशातील, समाजातील दुर्लक्षित असे अनेक घटक आहेत की, त्यांच्याबद्दल भारतीय लोकशाही समोर आज ७५ वर्षांनंतरही प्रचंड आव्हाने आहेत. 

एक आहेत दलित, भूमिहीन नागरिक आणि दुसरे आदिवासी भगिनी-बांधव. विकासाचे अनुशेष पुढील अनेक शतके भरून निघणार नाहीत, एवढे त्यांचे मागासलेपण व्यवस्थेच्या हिंसक दुष्टचक्रात सापडलेल्या आयुष्यामुळे आणखी दाहक बनते. सरकारी योजना, कॉर्पोरेट निधी आणि सामाजिक संस्थांची सेवा या पलीकडे आत्म-उत्थानाची एक नवीन दिशा प्रत्येक व्यक्ती, समूह किंवा गाव-प्रदेश शोधत असतो. त्यांच्या या प्रयत्नात मदत मिळते काही संवेदनशील कार्यकर्ता असलेल्या धडपड्या ध्येयवादाची. 

इसलिये राह संघर्ष की हम चुने

चोळकर यांनी पुस्तकाच्या पार्श्वभूमीमधे नोंदवल्याप्रमाणे : “रचनात्मक कार्य आणि कार्यकर्ते स्वातंत्र्य आंदोलनाशी जुळेलेले असणे अपरिहार्य होते. मात्र ते राजकारणापासून दूर रहावेत असा गांधीजींचा आग्रह होता. विधायक कार्य करणाऱ्या संस्थांच्या समन्वयाची गरज गांधीजींच्या मनात होती”. सर्वोदय आंदोलनाची ही सुरुवात होती. 

अहिंसक परिवर्तनासाठी समन्वय हे या दोन्ही पुस्तकांच्या केंद्रस्थानी आहे. चोळकर यांच्या पुस्तकात संस्था, चळवळी यांचा समन्वय आहे. तर डॉ.ऐश्वर्या यांच्या पुस्तकात व्यक्तींचा, त्यांच्या आपापल्या आवडत्या व्यावसायिक कामाचा समाजाच्या सुखासाठी कसा स्वाहा करता येईल त्याबद्दल सकारात्मक ओढीने केलेली मनांना जोडणारी वेडी पायपीट आहे. 

दोन्ही पुस्तकांत एक गाणं जर रुणझुणत असेल तर ते म्हणजे, अनुप वाशिष्ठ यांचे “इसलिये राह संघर्ष की हम चुने, जिंदगी आसुओ मे नहई न हों… आंसमां में टंगी हो न खुशहालियां, कैद महलोमें सबकी कमाई न हो… इसलिये ~इसलिये!”            

भूदान चळवळीवरील वाचनीय प्रबंध

भूदान आंदोलनावरील पुस्तकात सुरुवातीला भारतातील भूमीसमस्येचा दोन प्रकरणांत सखोल आढावा घेतण्यात आला आहे. त्यानंतर भूदानाची तेलंगणामधून सुरू झालेली यात्रा, बिहारमधील यात्रेवर दोन विस्तृत प्रकरणे, आंध्र आणि तामिळनाडूची यात्रा, केरळ आणि कर्नाटकची यात्रा, मध्यप्रदेशची यात्रा, ईशान्य भारताची यात्रा आणि सर्वात शेवटी जयप्रकाश नारायण यांच्या नवनिर्माण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भूदान-ग्रामदान आंदोलनाची झालेली अखेर असा या पुस्तकाचा प्रवास आहे. 

भूदान-ग्रामदान आंदोलनाच्या यात्रेचा कोणत्याही राज्याचा प्रवास हा एकसूरी नाही. प्रत्येक ठिकाणी अभूतपूर्व माणुसकीचे दर्शन घडवणारे अनेक किस्से, थक्क करून सोडाव्या अशा लोकांच्या त्यागाच्या कहाण्या तसेच गरिबीची मने हलवून सोडणारी वर्णने आहेत. स्वातंत्र्यानंतर आपला देश एक स्वप्नाळू आदर्शवादाने निश्चितच पुढे जात होता परंतु जमिनीवरील परिस्थिती तेवढीच खडतर होती. 

सर्व यात्रांच्या विश्लेषणानंतर चोळकर यांनी स्वत:ची एक छाप सोडणारे संशोधनाच्या पातळीवरील योगदान ‘समीक्षा’ हा संदर्भ विभाग लिहून दिले आहे. यामधे भूदान-जमिनीचे वितरणाचे आणि भूमी सुधारणांचे मूल्यमापन, ग्रामदान आंदोलनातील प्रयोग, या विचारातून पुढे आलेली लोकनीती आणि नेतृत्त्व यावर एक दृष्टिक्षेप अशी विविध प्रकरणे आहेत. परिशिष्टे, संदर्भ आणि विषय-सूची यामुळे याला संशोधन प्रबंधांचा दर्जा आपल्याला अनुभवायला मिळतो. 

मनुष्याची चेतना विद्रोह करून उठेल

चोळकर यांचे पुस्तक जिथे संपते तो निष्कर्ष म्हणून इथे सांगण्यासारखा आहे : “आंतरराष्ट्रीय भांडवलशाही लाटेत जागतिकीकरणाचा रेटा वाढत आहे आणि त्याला पर्याय नाही, असा आभास उभा केला जात आहे. परंतु त्याची मुळे ढिली होत आहेत. आधुनिक विकास टिकणारा नाही, आणि तो आपल्याबरोबर मनुष्यजातीला आणि पृथ्वीग्रहाला घेऊन कोसलेल, हे सत्य स्पष्ट झाले आहे. 

आतंकवाद, हवामान-बदल, शस्त्र-स्पर्धा, करोनासारख्या महासाथी- जिकडे पहावे तिकडे याची लक्षणे दिसत आहेत. आज मनुष्य अक्राळविक्राळ शक्तींच्या समोर एकता, असहाय, लाचार दिसत आहे. परंतु मनुष्याची चेतना कदाचित हे मंजूर करणार नाही. ती विद्रोह करून उठेल. आणि तसे झाले तर भूदान-ग्रामदान आंदोलनाच्या इतिहासातून तिला बरेच काही शिकायला मिळेल; बरेच काही शिकावे लागेल.” 

आता भूदान आंदोलनावरील या पुस्तकाचा ‘बिजापूर डायरी’ शी संबंध जोडणाऱ्या जीवनातील ऑक्सिजन सारख्या मूलभूत अशा नाळेबद्दल बोलायला पाहिजे. ती नाळ आहे माणुसकीचे नाते शोधण्यासाठी भुकेली अशी समर्पित वृत्ती, भारतीय असण्याचा अर्थ माहिती असलेल्या कर्तव्यदक्ष अशा कार्यकर्त्याचा सेवाभाव जागवणारी भावना म्हणजे आस्थेचा, परस्पर संवेदनेचा ओलावा.

जमीन फक्त निमित्त, हृदये जोडणं हे काम

‘प्रेमयात्रा आणि शक्तियात्रा’ या आठव्या प्रकरणात १९५५ मधे जगन्नाथपुरी येथे झालेल्या सातव्या सर्वोदय समाज संमेलनाचा चोळकर यांनी थोडक्यात वृत्तान्त दिला आहे. त्यातील प्रवचनात विनोबा म्हणतात, “आम्हाला केवळ येथील भूमीसमस्याच सोडवायची नाही, तर हिंसा सीमित करण्यास असमर्थ असलेल्या जगातील सगळ्या राज्यसत्ता नष्ट करून जगात अहिंसेची स्थापना करण्यासाठी, विश्वशांतीसाठी आम्ही दान मागत आहोत.” 

याच प्रवचनात विनोबा यांनी, “सत्याग्रहाने उत्तरोत्तर सौम्य होत गेले पाहिजे. सौम्य, सौम्यतर, सौम्यतम ही त्याची दिशा असली पाहिजे”, या सिद्धान्तांची मांडणी केली, असे चोळकर नोंदवतात. भूमिहिन लोकांसाठी विनोबा यांनी त्यांचा सत्याग्रहाचा मार्ग निवडला, ती पद्धती विकसित केली. पण हे करताना त्यांनी प्रेमभाव हेच आपले शस्त्र बनवले. 

पुस्तकाच्या बाराव्या प्रकरणात विनोबा काश्मीरच्या यात्रेत रामकोट येथे (३१ मे, १९५९) प्रवचनात बोलतात: “मी जे काम उचलले आहे, ते जमिनीचे नाही. जमीन तर केवळ एक निमित्त आहे. हृदयाला हृदय जोडणे हे माझे काम आहे. लोक जेव्हा दान देतात, तेव्हा माझे म्हणणे त्यांच्या हृदयाला भिडले असल्याचा पुरावा मिळतो.”

विकासाचा हमरस्ताही सत्याग्रहीच करतात

सत्याग्रह हा अन्यायाच्या विरोधात एक अहिंसक संवाद असतोच. पण सत्याग्रह काही रचनात्मक, सकारात्मक काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुद्धा असतो. या सौम्य, अहिंसक अशा सत्याग्रही भावनेचे मला ‘बिजापूर डायरी’ मधे दर्शन घडले. 

आदिवासी किंवा देशाच्या मागास भागात स्वत:चे ज्ञान, कौशल्य आणि दूरदृष्टीच्या योजना वापरुन अनेक समाजोपयोगी संस्था, व्यक्ती कार्यरत आहेत. त्यातील शिक्षक, डॉक्टर, तंत्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, पोलिस अधिकारी, समाजसेवक, व्यावसायिक, संशोधक हे सुद्धा विकासाच्या पर्यायी हमरस्ता तयार करणारे सत्याग्रही कार्यकर्तेच आहेत. 

त्यामुळेच विनोबा यांचा ‘सौम्य’ बनत जाण्याचा आग्रह कीती दूरदृष्टीचा आहे याची खात्री आपल्याला पटते. छत्तीसगड सारख्या दुर्गम भागात टोकाच्या तीव्र समस्या असताना त्याला ‘सौम्य’ निर्धाराने तोंड कसे द्यावे याचे ‘बिजापूर डायरी’ हे पुस्तक म्हणजे व्यक्ती व्यक्तींच्या सहकार्याची प्रेरणादायी अशी गाथा आहे. 

आदिवासींच्या विकासासाठी वेगवेगळे प्रयोग

एका स्त्रीवादी महिला डॉकटरने अनेकांचा विरोध पत्करून आणि टोमणे स्वीकारून तिथे जाण्याचा निर्णय हा तेथे काम करणाऱ्या soulmates च्या मैत्रभावाशिवाय तडीस जाऊच शकला नसता, हे सुद्धा आवर्जून नोंदवावेसे वाटते. रस्ते, घरे, पाणी, जेवण, वीज, सुरक्षा, आरोग्य सुविधा, दळणवळण या व इतर अनेक प्रकारच्या अनेक पायाभूत सुविधा नसणाऱ्या भागात एक महिला डॉक्टर स्वत:च्या सौम्य सेवाभावाने एखाद्या तालुक्याच्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेने काम करते हे आश्चर्याने थक्क करून जावे असे आहे. 

त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे बिजापूरचे जिल्हाधिकारी, विविध राज्यातून तेथे सेवेस आलेले अनेक तरुण डॉक्टर्स, महाराष्ट्रातून-दुसऱ्या राज्यातून आदिवासी भागाच्या विकासासाठी योगदान देण्यासाठी वर्षानुवर्षे तेथे जाऊन काम करून स्थायिक होणारे आदर्श सेवा-साधक वाटाव्या अशा व्यक्ती, आपापल्या आयुष्यात जगण्याच्या वाटा धुंडाळताना आदिवासींच्या विकासासाठी वेगवेगळे प्रयोग करत तेथे आयुष्य काढणारे अवलिये असे अनेक जण या ‘बिजापूर डायरी’ मधे आपल्याला भेटतात. 

त्यांच्या मार्फत आपण विकासासाठी वेगवेगळ्या पातळीवर काम करणाऱ्या लोकांची जीवनदृष्टी समजून घेऊन, त्यांच्या दृष्टिकोणाशी समरूप होतो. त्यामुळे हे पुस्तक डॉ. ऐश्वर्या यांच्या पाच वर्ष तेथे केलेल्या वास्तव्याच्या चित्रणांच्या पुढे जाऊन या सर्व व्यक्तींबरोबर केलेल्या चिंतनात्मक परिक्रमेचे मनोहारी असे प्रवासवर्णन ठरले आहे. 

आदिवासी पाठी का राहिले?

आदिवासींच्या प्रश्नावर डॉ. ऐश्वर्या म्हणतात, “आदिवासींचे शोषण हा प्रश्न जेव्हा येतो, तेव्हा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने विचार करून, पोटतिडकीने बोलतो. प्रत्येकाची तळमळ अगदी खरीच असते परंतु चुकीचे वाद-प्रतिवाद करून आपण मूळ मुद्यापासूनच भरकटत नाहीत ना, हे सतत तपासत राहिले पाहिजे. 

शोषण तर सर्वत्रच होते, महाराष्ट्रातील खेड्यातही होते. पण तेथील आदिवासी मात्र इतर देशाच्या मानाने पिछाडीवर का पडलेले आहेत? कारण त्यांना संधीच उपलब्ध केल्या गेल्या नाहीत. शासनानेही त्यांच्यापर्यंत शिक्षण, आरोग्य, रोजगार या मूलभूत सुविधा पोचवायला दिरंगाई केली.” (पृ. क्र. १६५)  

अनेक प्रेरणादायी कहाण्या

आज अनेक ध्येयवेडे दुर्गम भागात कसे विकासाची मशागत करत आहेत यांच्याबद्दल प्रेरणादायी कहाण्या या पुस्तकात आल्या आहेत. त्यात ‘जैविक कॅफे’ चालवणारा आकाश बडवे, ‘बचपन बनाओ’ ही गांधींच्या नई तालीम सारखी शिक्षण पद्धत आदिवासींसाठी वापरणारी प्रणित सिम्हा, आपले संपूर्ण वैवाहिक आयुष्य छत्तीसगडच्या सेवेसाठी देणारे गोडबोले दाम्पत्य (डॉ. रामचंद्र व सुनीताताई) अशांच्या कहाण्या आहेत. 

तसंच बिजापूर स्पोर्ट्स अकादमी, नक्षलवादी भागात पोलिस विभागाला मानवी चेहरा देणारे आयपीएस दीव्यंग पटेल, आदिवासींच्या निस्वार्थ सेवेसाठी मुंबईहून आलेला मूळचा सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला ‘स्पार्क’ संस्थेचा मकरंद दीक्षित, बिजापूर जिल्ह्याच्या विकासाचा वसा घेतलेले सहिष्णू आणि प्रयोगशील जिल्हाधिकारी डॉ. अय्याज तांबोळी असे आदिवासींसाठी धडपडणारे रक्ताच्या पलीकडील गणगोत डॉ. ऐश्वर्या आपल्याला भेटवतात.

आरोग्याबद्दलच्या आदिवासींमधील समज-गैरसमज 

आदिवासी भागांतील आरोग्य समस्या अनास्था आणि अंधश्रद्धांमुळे कशा गंभीर होतात, याचे निदान डॉ. ऐश्वर्या करतात : “वाहनखर्चाला, बाहेर राहायला-जेवायला पैसे नसल्याने खेड्यातील रुग्ण (शहराच्या भीतीने) रुग्णालयात जाणेच टाळतात. किंवा पुढे दुसऱ्या दवाखान्यात पाठवले जाईल असे समजून रुग्ण व गर्भवती महिला बिजापूरच्या जिल्हा रुग्णालयात यायला तयार नसायच्या. 

त्यात इथे अंधश्रद्धा, जादूटोणा, जडीबुटी, नकली वैद्य, खोटे डॉक्टर्स याचे प्रमाण जास्त असते. तिकडेही जाऊन रुग्णांचा आजार आणखी गंभीर होतो. तसेच रस्त्यांची दुरावस्था व वाहनांचा अभाव यामुळे घरीच होणाऱ्या बाळंतपणाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे गर्भवती, माता, नवजात शिशु व बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.” (पान क्र. १५) 

दुसऱ्या ठिकाणी त्या म्हणतात, “इथे पाळीत जास्त रक्तस्त्राव होणाऱ्या मुली, स्त्रिया खूप उशिरा उपचार घेण्यासाठी येतात. कारण या भागात समज आहे की, कोणी तरी काळी जादू केली की असे होते. त्यामुळे पाळीच्या समस्यांसाठी मांत्रिकाकडे इलाज करणे, जडी-बुटी असे प्रकार करण्यात वेळ जातो. अनेक दिवस अंगावर काढल्याने सततच्या रक्तस्त्रावाने हिमोग्लोबिन कमी होत जाते.  त्यात जर सिकल सेल आजार असेल, तर समस्या आणखी वाढते.(पृ.क्र.३५) 

स्वकेंद्रित समाजातील आशादायी चित्र

डॉ. ऐश्वर्या पुस्तकात एके ठिकाणी म्हणतात, “अनेक भ्रामक समजूतीमुळे आजार बळावणे, उपचार न घेणे, रुग्ण गंभीर होणे, दगावणे अशा गोष्टी घडतात. अज्ञानामुळे भीती, भीतीपायी घरीच उपचार केले जातात. पौष्टिक आहार, व्यक्तिगत स्वच्छता याच्या माहिती अभावी आरोग्य खालावते. त्यामुळे आरोग्यासोबतच शिक्षण, रोजगार या क्षेत्रांचाही सर्वंकष विकास होणे खूप महत्त्वाचे आहे. (पृ.क्र.१२४)  

अशा समस्या असलेल्या भागात आव्हानांशी संवाद करून त्यावर सुयोग्य उपाय करणारे नेतृत्त्व डॉक्टर अय्याज तांबोळी यांच्या निमित्ताने बिजापूरला मिळाले. डॉ. ऐश्वर्या त्यांच्याबद्दल सांगतात, “एक चांगला लीडर शासकीय यंत्रणा कामास लावून समाजात किती मोठा बदल घडवून आणू शकतो याचे हे उदाहरण आहे. 

समाजाच्या गरजाप्रति संवेदनक्षम राहून आणि प्रामाणिकपणे काम करून बिजापूरसारख्या नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल, स्मार्ट सीटीवाल्या इंडियाने दुर्लक्षिलेल्या भागामधे एक डॉक्टर – आय.ए.एस. अधिकारी इतका मोठा बदल घडवू शकतो, हे आजच्या स्वकेंद्रित समाजात मोठे आशादायी चित्र आहे. (पृ. क्र. २२)

विकास पोहोचायण्यासाठी आधी रस्ते हवेत

एके ठिकाणी असा उल्लेख आहे की, ‘अय्याज सरांनी रस्ते, रोजगार, शिक्षण व आरोग्य या प्राथमिक आणि अत्यंत निकडीच्या गरजांवर लक्ष केंद्रित केले. कारण रस्त्यांचे काम झाल्याशिवाय इतर प्रदेशाशी संपर्क होऊ शकणार नाही. रस्तेच नसतील तर वीज, नेटवर्क, व्यापार, रोजगार, मनुष्यबळ (यात शासकीय लोकांपासून शिक्षक, डॉक्टर्स) हे सर्व इथे पोहोचू शकणार नाही. 

विकास इथे पोहोचायचा असेल तर सर्वात आधी रस्ते हवेत, हे त्यांना पक्के ठाऊक होते. स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देणे आणि सध्या चालू असलेल्या रोजगार साधनांची गुणवत्ता सुधारून उत्पादन व नफा वाढवणे हाही एक विषय त्यांच्या अजेंडयावर होता.” त्यामुळेच आरोग्य ही त्यांच्या सर्वोच्च प्राथमिकता पैकी एक बनली. 

त्यांच्या याबद्दलच्या कामाबद्दल डॉ. ऐश्वर्या नोंदवतात, “सर्व प्रकारच्या रुग्णांना इथे उपचार मिळावेत अशी त्यांची भूमिका आहे; मग यात गर्भवती महिला असेल वा नवजात शिशु असेल किंवा बंदुकीच्या गोळीने जायबंदी झालेला जवान असेल. सर्व सुविधा बिजापूरमधेच उपलब्ध झाल्यास रुग्णाला इथून आणखी शेकडो किलोमीटर दूर दुसऱ्या रुग्णालयात पाठवायची गरज उरणार नाही हा यामागे मुख्य हेतू होता. त्याचबरोबर सुसज्ज यंत्रणा असेल तर तज्ञ डॉक्टर्स इथे काम करायला तयार होतील, असाही विचार केला गेला.” (पृ. क्र. १९)

बंदुकीला उत्तर हे बंदूक नसते

प्रशासनाने केलेल्या सकारात्मक कामाबरोबरच शासकीय यंत्रणांच्या एका मोठ्या अपयशावर सुद्धा डॉ. ऐश्वर्या बोट ठेवतात. त्या म्हणतात, “सलवा जुडूम (मोहीम) अर्थातच शांती अभियान. पण विरोधाभास हा की यात रक्ताचे पाट वाहिले. एक चांगल्या हेतूने सुरू झालेल्या आदिवासी लढ्याला चुकीचे वळण लागून कायमचा कलंक माथी आला. 

यामधे आदिवासी गावांची वाताहत झाली हे जसे एक सत्य आहे, तसेच हा लढा आदिवासीनी स्वयंप्रेरणेने सुरू केला हेही एक सत्यच आहे. परंतु या लढ्याची इतकी मोठी रक्तरंजित किमत आदिवासीना चुकवावी लागली ही प्रशासनाची मोठी हार आहे. प्रत्येकवेळी बंदुकीला उत्तर हे बंदूक नसते हा धडा निदान लक्षात घ्यायला हवा.” (पृ.क्र. ९४) 

गर्भवतीच्या वाटेला वेदनांचा डोंगर

आदिवासी, जंगल परिसरातील खडतर आयुष्य आणि त्याबरोबर येणाऱ्या वेदना यांचा डोळ्यात पाणी यावे असा डॉ. ऐश्वर्या वेध घेतात: “अतिदुर्गम गावात रस्ते खराब असल्याने, चारचाकी वाहने ये-जा करू शकत नसल्याने अनेक स्त्रिया घरीच बाळंत होतात. इथे दाई प्रसव करवतात. तसेच त्यांच्या अनेक अंधश्रद्धा, हानिकारक प्रथा असल्याने दवाखान्यात यायचे प्रमाण खूप कमी आहे. 

जेव्हा एखाद्या स्त्रीचे बाळंतपण लांबते किंवा काही समस्या उद्भवते, तेव्हाच तिला दवाखान्यात आणले जाते. अतिदुर्गम भागात खाट उलटी करून, आडवे लाकूड टाकून, पालखीसारखे ते खांद्यावर उचलले जाते आणि गर्भवतीला त्यात बसवले जाते. अशा प्रकारे काही किलोमीटर अंतर पार करून गर्भवतीला बासागुडाच्या या प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात आणले जाते. 

काही ठिकाणी नद्या नाले आडवे येतात. पावसात ते भरले की, मग तर लोक ते पार करूच शकत नाहीत.” (पृ.क्र. ६२) “पावसाळ्यात येथे मलेरिया, जुलाब, हगवण, न्यूमोनिया याचे रुग्ण रुग्णालयात व्हेंटीलेटरवरही आहे, त्यामुळे गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी प्रयत्न करता येतात.” (पृ. क्र.६७) “इथे बाळांला कपड्यात कसे गुंडाळावे याची लोकांना बिलकुल माहिती नाही. 

आदिवासीना काय हवे, हे कोण ठरवणार?

राऊंडच्या वेळी मी पाहते तेव्हा बाळ अगदीच उघडे ठेवलेले असते. कमी वजनाच्या बाळाला तर असे उघडे ठेवण्यात खूप धोका असतो. बाळाच्या डोक्यातून, तळपायातून उष्णतेचा रहास होऊन, तापमान कमी होऊन बाळाच्या जीवाला धोका निर्माण होतो. इथे कमी वजनाची, कमी दिवसांची बाळे खूप जास्त प्रमाणात दगावतात. मग प्रत्येक महिलेला, तिच्या नवऱ्याला बाळाला कसे गुंडाळायचे ते शिकवावे लागते. त्याच्यासाठी कपडे आणा, टोपी – मोजे घाला, हे सारे सांगावे लागते. (पृ.क्र. ६८)

देश किंवा जागतिक पातळीवर तसेच सरकारी, एनजीओ आणि आंतरराष्ट्रीय विकास संस्थांच्या पातळीवर विकासाच्या प्रारूपाबद्दल अनेक वेगवेगळे मतप्रवाह असतात आणि त्या त्या पद्धतीने विकास घडवून आणण्यासाठी धोरणात्मक पातळीवर प्रयत्न केले जातात. पण या सर्व ठिकाणी जे तेथील स्थानिक आदिवासी नागरिक आहेत त्यांच्याबद्दल विचार केला जातो का? हा खरा प्रश्न आहे.

डॉ. ऐश्वर्या पुढे म्हणतात, “आदिवासीना काय हवे, हे कोण ठरवणार? कसे काय कोणी ठरवू शकणार? त्यांना मदत करणे फक्त आपण करावे. त्यापलीकडे जाऊन त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा कोणालाच अधिकार नसावा –ना शासनाला, ना पोलिसांना, ना आपल्याला की नक्षली लोकांना. त्यांना काय हवे ते त्यांच्यावर सोडायला हवे.” (पृ.क्र. ७५-७६) 

परिवर्तनाचा वसा घेतलेल्या वेड्यांची गोष्ट

डॉ. ऐश्वर्या स्वत:ची गोष्ट सांगता सांगता त्या सगळ्यांच्या आयुष्यात आपल्याला अलगद नेऊन सोडतात. पण या नोंदीच्या मालिकेमधे आपल्या मनाचा ठाव घेतला आहे तो तेथील जीवनातील तीव्र वेदनादायी अनुभवांच्या झोळीत हात घालत आपल्या संगळ्यांशी संवाद साधून उत्कटपणे तिथे राहणाऱ्या लोकांबद्दल हळव्या मनाने गोष्टी सांगण्याच्या लेखिकेच्या हातोटीने! 

म्हणून ही केवळ वैयक्तिक आठवणींची रोजनिशी न बनता, विविध प्रेरणा आणि विकासदृष्टीने जग बदलू पाहणाऱ्या वेड्या लोकांशी मैत्र रुजवून परिवर्तनाच्या आकाशाला मिठीत घेऊ पाहणाऱ्या एका वेड्या तरुणीची संघर्ष करणाऱ्या आणि व्यक्ती-संस्थांच्या साक्षीने लिहिलेली लघु-आत्मकथा वाटते. बिजापूर डायरी ही माणुसकीवर प्रेम करणाऱ्यांचा युवा-मेळा वाटतो.

हा साहसी मेळा हा म्हणजे स्वत:ला सुखी-समृद्ध आयुष्य भोगण्याची हमी असूनसुद्धा करुणा आणि श्रमदान या दोन मूल्यांवर आधारित आपल्या आयुष्याची काही वर्षे छत्तीसगडसाठी देण्याचा वसा घेऊन आलेल्या लोकांची गोष्ट आहे. 

स्वतःत बदल घडविण्याची प्रेरणा देणारी पुस्तकं

विनोबा यांच्या भूदान-ग्रामदान आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेल्या हृदयाला ह्रदय जोडण्याचा मानवतावादी अथांग ध्येयवाद ‘बिजापूर डायरी’मधे पानोपानी भेटतो. शाश्वत आणि सामूहिक अशा न्याय विकासाच्या ओढीने पूर्ण करण्यासाठी संवाद सुरू करण्याचे बळ या दोन्ही पुस्तकांच्या वाचनाने आपल्या मिळते. 

त्याचबरोवर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण स्व-परिवर्तनाची पायवाट सुरू करतो हे मात्र नक्की. म्हणूनच म्हणावेसे वाटते : “सर्वोदय ते अंत्योदय : एक दुजे के लिए” !

(लेखक मुक्त पत्रकार आणि कार्यकर्ता आहे.)

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

पर्यंटकांच्या गर्दीला युरोप नाही म्हणतंय, भारताचं काय?

कधी कधी स्वत:वर, तर कधी परिस्थितीवर रडावसं वाटतं. ज्या ठिकाणी आपण आनंद घेण्यासाठी जातो त्या सर्व ठिकाणांची आजची…
संपूर्ण लेख

शाहरुखचा ‘जवान’ हिट का झाला?

२०१७ मधे शाहरुखचा ‘रईस’ रिलीज झाला. एक चांगला ऍक्शन सिनेमा असूनही पायरसीचा फटका बसल्याने ‘रईस’ला म्हणावा तसा नफा…
संपूर्ण लेख

भारतांनं चंद्रमोहिमेतून नक्की काय साधलं?

भारताचं चांद्रयान-३ ठरलेल्या दिवशी, नियोजित वेळी आणि निश्चित केलेल्या जागी चंद्राच्या भूमीवर उतरलं आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं…
संपूर्ण लेख

आशा भोसले : फक्त ९० वर्षांचा हिरवागार स्वरऋतू!

कल्पना करा, तुम्ही कोणत्या तरी कारणानं अत्यंत अस्वस्थ आहात, बैचेन आहात. मन लागत नाही आणि तितक्यात एक गाणं…
संपूर्ण लेख

‘एआय’मुळे फेक कंटेंटवाल्यांचा बाजार जोरात!

जगभरातील माणसं काय विचार करतात हे त्यांना काय माहिती मिळते, त्यावर ठरतं. ते जो विचार करतात तशी खरेदी…
संपूर्ण लेख

अंतराळातल्या मानवी कचऱ्यावर ‘इस्रो’चा उतारा

जगभरातील अंतराळ संशोधक, शास्त्रज्ञ सध्या अवकाशात फिरणाऱ्या कचर्‍याच्या समस्येबाबत चिंतेत आहेत. उपग्रह अणि रॉकेटसूचे निरुपयोगी सुटे भाग अंतराळात…