अंतराळातल्या मानवी कचऱ्यावर ‘इस्रो’चा उतारा

जगभरातील अंतराळ संशोधक, शास्त्रज्ञ सध्या अवकाशात फिरणाऱ्या कचर्‍याच्या समस्येबाबत चिंतेत आहेत. उपग्रह अणि रॉकेटसूचे निरुपयोगी सुटे भाग अंतराळात कचरा निर्माण करण्यास हातभार लावताहेत. अंतराळातील कचरा स्वच्छ करण्यासाठी अनेक देशांतील शास्त्रज्ञही ‘काम करत आहेत. त्यासाठी विविध देश विविध पर्यायांचा विचार करत आहेत. 

यादृष्टीने भारतीय अवकाश संशोधकांनीही दमदार यश मिळवले आहे. काम झाल्यानंतर रॉकेटच्या निरुपयोगी भागांना ३०० किलोमीटरपर्यंत खालच्या कक्षेत आणण्यात ‘इस्रो’ला यश आले. हा पर्याय जर आणखी प्रभावी करता आला, तर अंतराळातील कचरा कमी होऊ शकतो. अवकाशातील कचऱ्याच्या संकटानं उग्र रूप धारण करण्यापूर्वीच, अशी पावले वेळेत उचलणे महत्त्वाचे आहे.

अंतराळातील डोकेदुखी कमी करण्यात भारताला यश

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यासाठी जगातील बहुतांश देशांकडून अवकाशात उपग्रह सोडले जात आहेत; पण एखाद्या उपग्रहाने कालावधी पूर्ण केल्यानंतर त्या उपग्रहाचे पुढे काय होते, याबाबत अनेकांना माहिती नसते. पृथ्वीवरच्या वाढत्या कचऱ्यामुळे प्रदूषणाला आणि पर्यावरणाला हानी निर्माण होत असताना, अंतराळातील कचरा ही डोकेदुखी ठरत आहे. 

प्रत्यक्षात एक तर हे उपग्रह अंतराळात भरकटत राहतात किंवा समुद्रात येऊन पडतात. अशा उपग्रहांची विल्हेवाट लावण्यासाठी जगभरातील अनेक नामांकित अंतराळ संस्था अहोरात्र प्रयत्न करत असून यात भारतही मागे नाही. 

काही दिवसांपूर्वीच अंतराळातील वाढता कचरा कमी करण्याच्या दृष्टीने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांनी यशस्वी प्रयत्न केले. ‘इस्रो’ने उपग्रह प्रक्षेपण यानाला (पीएसएलव्ही-सी ५६) प्रक्षेपित करून सिंगापूरच्या सात उपग्रहांना अवकाशातील वरच्या कक्षेत स्थापन केले. हे उपग्रह स्थापित झाल्यानंतर त्याबरोबरच्या रॉकेटच्या निरुपयोगी भागांना ३०० किलोमीटरपर्यंत खालच्या कक्षेत आणण्यात ‘इस्रो’ला यश आले. 

स्पेस जंक कमी करणं, ही सर्वांचीच जबाबदारी

इस्रोच्या या यशामुळे स्पेस जंक कमी करण्याच्या दृष्टीने मोठी मदत होणार आहे. तसेच अंतराळातील कचऱ्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे उपग्रहांच्या कार्यातील अडथळेही दूर होणार असल्याने त्यांची कार्यक्षमताही वाढण्यास हातभार लागणार आहे.

‘पीएसएलव्ही चार भागांत विभागलेले रॉकेट असून त्यात पहिले तीन भाग लक्ष्य साधल्यानंतर समुद्रात पडतात आणि शेवटचा भाग पीएस- ४ हा उपग्रहास अंतराळाच्या कक्षेत स्थापित केल्यानंतर स्वत: कचऱ्यात परावर्तित होतो. त्यानंतर तो अवकाशात वरच्या भागात प्रदक्षिणा करत राहतो. या कामात ‘इस्रो’ने नवा प्रयोग केला. 

या नव्या प्रयोगानुसार रॉकेटचा हा भाग खालच्या कक्षेत जातो आणि याप्रमाणे तो वरच्या भागातील उपग्रहांच्या मार्गात येत नाही. अंतराळातील कचरा नैसर्गिक रूपाने कमी करण्याचा हा एक अनोखा मार्ग आहे. या यशासह भारताने अंतराळातील कचरा कमी करण्याची जबाबदारी बिनचूकपणे पाडली.

अंतराळातील कचऱ्याचा पृथ्वीलाही धोका

पृथ्वीच्या चोहोबाजूंनी सध्या दोन हजार उपग्रह प्रदक्षिणा घालत आहेत. त्याचवेळी तीन हजारांपेक्षा अधिक निष्क्रिय उपग्रह हे कचरा वाढविण्यास आणि नव्याने प्रक्षेपित होणार्‍या उपग्रहाच्या कामात अडथळा आणत आहेत. परिणामी, त्यांची टक्कर होण्याचीच भीती अधिक आहे. 

अवकाशातील हा कचरा म्हणजे सुमारे ३४ हजार असे तुकडे आहेत, ज्यांचा आकार दहा सेंटिमीटरपेक्षा अधिक आहे. या व्यतिरिक्त लाखो छोटे तुकडे हवेत तरंगत आहेत आणि ते एखाद्या वस्तूला धडकले, तर मोठी हानीदेखील होऊ शकते. 

अलिकडेच ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनार्‍यावर स्पेस रॉकेटचा कचरा आढळून आला. तो भारतीय रॉकेटचा निरुपयोगी सुट्टा भाग असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच अवकाशातील उपग्रहांचा कचरा हा कालांतराने जगासाठी संकट निर्माण करू शकतो. ते कोणत्याही क्षणी पृथ्वीवर कोसळू शकतात. 

अद्याप नुकसान झालं नाही, तरीही…

२०१६ मधे सहा टन वजनाचा यूआरए उपग्रह पृथ्वीवर पडला. १९८९ मध्ये शंभर टन वजनाचा स्कायलॅब उपग्रह हिंद महासागरात पडला. २००१ मध्ये रशियाचे अंतराळस्थानक मीर दक्षिण प्रशांत महासागरात पडले. 

अर्थात, अंतराळातील अभियानाचा इतिहास पाहिला, तर आतापर्यंत जेवढे तुकडे आदळले, त्यातून कोणतीही जीवितहानी झालेली नाही; पण भविष्यात जीवित आणि वित्तहानीची शक्‍यता नाकारता येत नाही. यादृष्टीने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने कालावधी पूर्ण केलेल्या उपग्रहांना परत आणण्याचे अभियान सुरू केले आहे. 

इस्रोनं घडवला इतिहास

या क्रमवारीत शास्त्रज्ञांनी उपग्रह मेघा-ट्रापिक्स-१ चे (एमटी) अवघड अभियान पूर्ण करत त्यास पृथ्वीच्या खालच्या कक्षेत आणत प्रशांत महासागरात पाडले. या यशाबाबत ‘इस्नो’ने म्हटले की, या उपग्रहाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला आणि त्याचे हिंद प्रशांत महासगारावर विघटन केले. याशिवाय भारताने उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची (ए-सॅट) निर्मिती आणि यशस्वी चाचणी केली आहे. 

या चाचणीत एका निकामी उपग्रहाला नष्ट केले, अंतराळात मोठ्या संख्येने रॉकेट, उपग्रहांची उपकरणे, सुटे भाग कचर्‍याच्या रूपात फिरत आहेत. त्याची संख्या सुमारे ९ लाख आहे. सरासरी २५ ते २८ हजार किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने निष्क्रिय उपग्रह, उपकरणे, तुकडे पृथ्वीच्या कक्षेत (एलईओ)
फेऱ्या मारत आहेत. 

अर्थात, वातावरणात प्रवेश केल्यानंतर हे तुकडे पूर्णपणे जळून जाणे अपेक्षित आहे. त्यांना केवळ क्षेपणास्त्राद्वारेच नष्ट करता येणे शक्‍य आहे. मानवनिर्मित कचरा साफ करण्यासाठी जपानची ‘जाक्सा’ आणि अमेरिकेच्या ‘नासा’सारख्या कंपन्या काम करत आहेत. अनेक देशांच्या खासगी कंपन्या या क्षेत्राकडे भविष्यातील व्यवसाय म्हणून पाहत आहेत. भारताने या दृष्टीने आघाडी घेत एमटी-१ नष्ट करून इतिहास घडविला.

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

पर्यंटकांच्या गर्दीला युरोप नाही म्हणतंय, भारताचं काय?

कधी कधी स्वत:वर, तर कधी परिस्थितीवर रडावसं वाटतं. ज्या ठिकाणी आपण आनंद घेण्यासाठी जातो त्या सर्व ठिकाणांची आजची…
संपूर्ण लेख

शाहरुखचा ‘जवान’ हिट का झाला?

२०१७ मधे शाहरुखचा ‘रईस’ रिलीज झाला. एक चांगला ऍक्शन सिनेमा असूनही पायरसीचा फटका बसल्याने ‘रईस’ला म्हणावा तसा नफा…
संपूर्ण लेख

भारतांनं चंद्रमोहिमेतून नक्की काय साधलं?

भारताचं चांद्रयान-३ ठरलेल्या दिवशी, नियोजित वेळी आणि निश्चित केलेल्या जागी चंद्राच्या भूमीवर उतरलं आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं…
संपूर्ण लेख

आशा भोसले : फक्त ९० वर्षांचा हिरवागार स्वरऋतू!

कल्पना करा, तुम्ही कोणत्या तरी कारणानं अत्यंत अस्वस्थ आहात, बैचेन आहात. मन लागत नाही आणि तितक्यात एक गाणं…
संपूर्ण लेख

‘एआय’मुळे फेक कंटेंटवाल्यांचा बाजार जोरात!

जगभरातील माणसं काय विचार करतात हे त्यांना काय माहिती मिळते, त्यावर ठरतं. ते जो विचार करतात तशी खरेदी…
संपूर्ण लेख

गांधीजींच्या शेवटच्या माणसाचा शोध घेणारी दोन पुस्तकं!

१९४० च्या दशकात महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह मोहिमेसाठी विनोबा भावे यांची पहिला लढवय्या म्हणून निवड केली. दुसरे…