पर्यावरणपूरक विसर्जन हाच योग्य पर्याय

पावसाळ्यात निसर्गानं सर्वत्र हिरवीगार उधळण केलेली असताना, निसर्गातील दुर्वा-फुलांनी, त्याच निसर्गातील मातीच्या गणपतीची पूजा करणं, म्हणजे गणेशोत्सव. त्यातही खरं तर ही गौराईची पूजा. गौराई म्हणजेही खरं तर पृथ्वीचीच पूजा. म्हणून कुठं खड्याच्या गौरी तर कुठं तेरड्याच्या. पण शेवटी हा उत्सव म्हणजे निसर्गाबद्दलच्या कृतज्ञतेचा उत्सव.

निसर्ग आपल्याला भरभरून देतो. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यातील चैतन्याला सगुणरूप देऊन घरी आणायचं. जमेल तशी त्याची पूजा करायची आणि पुन्हा हे सगळं निसर्गातच अर्पण करायचं. पण सध्या आपण तसं करतोय का? आजच्या बाजारूपणाच्या आणि दिखाऊगिरीच्या जगात, आपण गणेशोत्सव करतोय की गणपतीचा अपमान? किमान गणेशमूर्तीबद्दल काय करता येईल, याचा विचार प्रत्येकानं करायला हवा.

गणेशमूर्ती मातीची की पीओपीची?

गणेशमूर्ती पार्थिव असावी, असं शास्त्रात सांगितलेलं आहे. पार्थिव म्हणजे पृथ्वीतत्वापासून बनलेली. माती हा पृथ्वीवरील सृजनशील भाग. मातीतून सगळं उगवतं आणि पुन्हा त्याची मातीच होते. निसर्गाच्या या चक्राचं महत्व कळावं, यासाठीच गणेशमूर्ती पार्थिव असावी अशी या उत्सवाची संकल्पना. पण आता बाजारात मिळते ती गणेशमूर्ती एकतर शाडू मातीची असते किंवा पीओपीची. 

शाडू मातीची मूर्ती पर्यावरणपूरक आणि पीओपी पर्यावरणास घातक, अशी मांडणी गेली कित्येक वर्षे केली जात आहे. पण वैज्ञानिक कसोट्या वापरून पाहिलं तर शाडू माती आणि पीओपी हे दोन्हीही पर्यावरणाला घातक आहेत. पुण्यातील काही नागरिकांनी ‘पुनरावर्तन’ नावानं गणेशमूर्तींबद्दल जागृती करण्याची मोहीम सुरू केलीय. त्यातील ‘जीवित नदी’ या संस्थेच्या शैलजा देशपांडे यांनी यावर संशोधनपर लेखनही केलंय.

त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘प्लॅस्टर ऑफ पॅरीस हे नैसर्गिक नाही असं सांगितलं जातं. पण ते चुकीचं आहे. पीओपी हे देखील नैसर्गिकरित्याच बनतं. गणेशमूर्तीसाठी वापरलं जाणारी शाडू माती ही साधारणतः गुजरातवरून आणली जाणारी चिकणमाती असते. ही दोन्हीही माध्यमे नदीत, तलावात किंवा समुद्रात साचून पर्यावरणाला हानी पोहचवतात. त्यामुळेच विसर्जनाचे नवे पर्याय स्वीकारायला हवेत.’

निसर्गाचं चक्र समजून घ्या

गणेशमू्र्तींबददल असं काही सांगितलं की लोक लगेच विचारतात, पूर्वीपासून गणेशोत्सव होतोय तेव्हा नाही का झाली पर्यावरणाची हानी? खरं तर गेल्या काही वर्षात वाढलेल्या गणेशमूर्तींची संख्या पाहिली तरी याचं उत्तर मिळतं. पण त्यातूनही आणखी एक उत्तर म्हणजे, पूर्वी गावातल्या शेतातील किंवा नदीकिनाऱ्यावरील मातीपासून गणेशमूर्ती बनविली जायची. नैसर्गिक रंगांनी रंगविली जायची.

अशा तिथल्या मातीनं बनलेल्या गावतल्या गणेशमूर्ती तिथल्या नदीपात्रात किंवा जलस्रोतात विरघळून जायच्या आणि निसर्गचक्र पूर्ण व्हायचं. पण गणेशोत्सवाचं स्वरुपच बदलल्यानं, आता सगळं व्यावसायिक झालंय. त्यामुळे आता गावातील कुंभारही शाडू माती किंवा पीओपी वापरतात. जी तिथल्या जलस्रोतांमधे साचून राहते. त्यामुळे तिथल्या माशांची, पाण्यातील वनस्पतींची त्यामुळे अपरिमित हानी होती.  त्यातील घातक रंगातील रसायनांमुळे प्रदुषित पाणी पुन्हा आपल्या अन्नसाखळीतही येतं.

आपण साधी गणपतीच्या जन्माची गोष्टही विसरून गेलोय. गणपती हा पार्वतीनं आपल्या मळापासून तयार केला आणि त्यात प्राण फुंकले,  अशी परंपरेतील गोष्ट आहे. पार्वती म्हणजे धरती आणि तिच्या मळातून म्हणजे चिखलातून किंवा मातीतून बनलेला गणपती. म्हणून गावतल्या मातीचा गणपती बनवून त्याची पूजा करणं आणि ती माती पुन्हा निसर्गात जायला हवी. 

पण हे शास्त्र विसरून आपण मात्र त्याचा सातत्यानं अपमान करतोय. ज्या पाण्यात आपण गणेशमूर्ती विसर्जित करतो, ते पाणी एवढं दुषित असतं की, ते आपण वापरूही शकत नाही. अशा पाण्यात आपण एवढे दिवस पूजा केलेल्या गणेशमूर्तीचं विसर्जन करणं, हे कसं चुकीचं आहे हे लोकांना पटवून द्ययला हवं. त्यामुळेच गणेशमूर्ती आणि त्याच्या विसर्जनाबद्दल जागृती आवश्यक आहे.

कसं होईल पर्यावरणपूरक विसर्जन

गणेशमूर्ती शाडू मातीची असो किंवा पीओपीची ती जलस्रोतामध्ये जाऊन लगेच विरघळत नाही. शाडू मातीची मूर्ती विरघळल्यानंतरही तीची चिकट माती जलस्रोतांमधील नैसर्गिक छिद्रांमधे अडकून बसते. खरंतर शास्रानुसार, गणेशमूर्तीवर अक्षता सोडून ‘पुनरागमनाय च’ किंवा ‘पुढल्या वर्षी लवकर या’ असं म्हणून मूर्ती हलवल्यानंतर तिच्यातील प्रतिष्ठापित देवत्वाचं विसर्जन होतं, असं म्हटलं आहे. 

तरीही आपण जी गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेतो, त्यात आपल्या श्रद्धा गुंतलेल्या असतात. गणेश विसर्जनाच्या वेळी, लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेकजण ओक्साबोक्शी रडतात. त्यामुळे लोकांच्या श्रद्धा समजून घ्यायला हव्यात. गणेश विसर्जनाचे पर्याय हे सोपे आणि आपलेसे करावे असे असायला हवेत.

तीन वेळा पाण्यात मूर्ती बुडविल्याने अनेकांना गणेश विसर्जनाचे समाधान मिळते. त्यामुळे गणेशमूर्ती कृत्रिम कुंडात तीन वेळा बुडवावी आणि नंतर ती तेथील कार्यकर्त्यांकडे सोपवावी. हल्ली विसर्जन कुंडातच  स्वयंसेवक असतात. तेही अशा पद्धतीने विसर्जित मूर्ती पुन्हा एकत्र करून पुनर्वापरासाठी पाठवू शकतात.

पुनर्वापर हेच खरे विसर्जन

निसर्गातील वस्तू जी घेतली तिथे परत जाणं म्हणजे विसर्जन. त्यामुळे जर मूर्ती शाडू मातीची असेल तर ती शाडू माती पुन्हा मूर्तिकारांकडे जायला हवी. पुण्यातील पुनरावर्तन या संस्थेने अशी शेकडो किलो माती गेल्या वर्षी मूर्तिकारांना परत दिली. त्यातील अनेकांनी आमचा मोठा खर्च वाचला अशी प्रतिक्रिया दिली असल्याचे, शैलजा देशपांडे अभिमानाने सांगतात. 

जर मूर्ती पीओपीची असेल, तर तिचे तीन वेळा बुडवून विसर्जन झाल्यानंतर स्वतंत्र वर्गीकरण केले जायला हवं. त्यानंतर ही पीओपीची माती इमारतीच्या कामासाठी आणि बांधकाम साहित्य म्हणून वापरली जाऊ शकते. आज किंमतीच्या दृष्टीने पीओपीची मूर्ती परवडत असल्याने, या मूर्तींचाही पुनर्वापर करण्याची पद्धत विकसित करणं गरजेचे आहे.

याहून आणखी एक चांगला पर्याय म्हणजे, गणेशमूर्तीचाच पुनर्वापर. खरं तर आपण गणपती म्हणून सुपारीची पूजा करतो. तसं शास्त्र म्हणून सुपारीचं विसर्जन करून गणेशमूर्ती पुन्हा पुढल्या वर्षी वापरता येऊ शकते.  पुण्यात अनेक गणपती हे विसर्जित केले जात नाहीत. ते दरवर्षी रंगवून पुन्हा वापरले जातात. ही पद्धत सर्वमान्य झाल्यास मोठ्या प्रमाणात पर्यावरण सुरक्षित राहू शकते.

धातूची मूर्ती हाही नवा पर्याय आता स्वीकारला जाऊ लागलाय. धातू हा सुद्धा पृथ्वीतत्वाचाच एक भाग आहे. त्यामुळे धातूही पार्थिव असतो. त्यामुळे धातूची मूर्ती गणेशोत्सवासाठी वापरण्याची पद्धत काही जणांनी आपलीशी केलीय. विसर्जनाच्या वेळी सुपारीचं विसर्जन करून किंवा दोन-तीन इंचाच्या मातीच्या मूर्तीचं विसर्जन करता येतं.

लोकचळवळीला हवी समाजमान्यता

आज पर्यावरणाबद्दल जागृती वाढते आहे. त्यामुळे अनेकांनी पर्यावरणपूरक विसर्जनाचा पर्याय निवडला आहे. कोल्हापूरात ऐशीच्या दशकात रंकाळा तलावाच्या स्वच्छतेबद्दल मोठी मोहीम झाली होती. त्यातून रंकाळ्यात गणेश विसर्जन होऊ नये, अशी लोकचळवळ झाली. त्याला सुरुवातीला थोडा विरोध झाला. पण नंतर लोकांनी ते आनंदानं स्वीकारलं, अशी आठवण पर्यावरण कार्यकर्ते उदय कुलकर्णी सांगतात.

ते म्हणतात की, त्यावेळी आम्ही करवीर पीठाच्या शंकाराचार्यांनाही भेटलो.  शास्त्रार्थानुसार प्रवाही पाण्यात विसर्जन कसं व्हायला हवं. ते निसर्गाला हानीकारक नसावं, त्यामुळे गणेशमूर्ती विसर्जनाची नवी पद्धत कशी असू शकते,  यासंदर्भात त्यांनीही आम्हाला पाठिंबा दिला. त्यामुळे आमच्या लोकचळवळीला हळूहळू समाजमान्यता मिळू लागली.

गणेशोत्सव पर्यावरणपुरक करणे हे मोठं आव्हान आहे. गणेशमूर्ती विसर्जन पर्यावरणपुरक करणं, हे त्याचं पहिलं पाऊल आहे. त्यासाठी लोकांनी पुढे येऊन विज्ञान, पर्यावरण समजून घ्यायला हवं. त्यानुसार आपल्या धार्मिक धारणांमधे बदल करायला हवेत. असे बदल याआधीही कायमच झाले आहेत. ते स्वीकारणं म्हणजेच खरा गणेशोत्सव साजरा करणं होय.

बदल होतोय, पण वेग वाढायला हवा

गणेशमूर्तीच्या माध्यमावरून दरवर्षी होणारा वाद टाळण्यासाठी गणेश विसर्जनाची पद्धत बदलणं हाच उत्तम पर्याय आहे. यावर्षीही राज्य सरकारनं समिती नेमून, पीओपीला पर्याय सुचविण्यास सांगितलं आहे. गणेशोत्सव हा जिव्हाळ्याचा विषय असल्यानं, कोणीच राज्यकर्ते लोकांच्या भावनांच्या विरोधात जाऊ इच्छित नाहीत. त्यामुळे विसर्जनाची पद्धत बदलण्याचं आवाहन करणं, अधिक सोपं आहे.

कोणताही बदल हा एका रात्रीत होत नसतो. त्यासाठी वर्षानुवर्षे थोडंथोडं बदलायला लागतं. गणेशोत्सवही आता बदलू लागलाय. गेली कित्येक वर्षे राज्यभर अनेक ठिकाणी गणेश विसर्जनासाठी नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम कुंडांचा वापर केला जातोय. ही एक आश्वासक सुरुवात आहे. पण अद्यापही नदी, तलाव, समुद्र येथील विसर्जन खूप मोठ्या प्रमाणात आहे. एकट्या मुंबईत गेल्या वर्षी फक्त अनंत चतुर्दशीला ३८ हजाराहून अधिक मूर्तींचे विसर्जन झाले. त्यातील हजारो मूर्ती या दहा-वीस फुटांहून अधिक होत्या.

हे भयानक पद्धतीनं होणारं नैसर्गिक जलस्रोतांमधील विसर्जन बंद व्हायला हवं. गणेशमूर्तींची आकार हा छोटा असायला हवा. हे सगळं तातडीनं होणं अशक्य आहे. कारण या सगळ्यामागे हितसंबंधांचं अर्थकारण आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. पण हळूहळू बदल होताहेत. हेच बदल हे अर्थकारणही बदलू शकतील. कारण निसर्ग हा कोणत्याही अर्थकारणापेक्षा खूप मोठा आहे.

गेल्या काही वर्षात अनेकांनी पर्यावरणपुरक बदल स्वीकारलेत. अनेकांनी लाल मातीचे गणपती आणण्यास सुरुवात केलीय. अनेकजण घरगुती पद्धतीनं बादलीत विसर्जन करू लागलेत. काहींनी धातूच्या मूर्ती घरी प्रतिष्ठापित केल्या आहेत. काही मंडळांनीही कायमस्वरूपी गणेशमूर्ती आणल्या आहेत. हे सगळे बदल स्वागतार्ह आहेत. पण हा वेग आणखी वाढायला हवा आणि संपूर्ण गणेशोत्सव हा पुन्हा एकदा निसर्गोत्सव व्हायला हवा.

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

जुन्या संसद भवनाचा इतिहास जपला गेला पाहिजे!

प्रतिष्ठित, ऐतिहासिक आणि अनेक घडामोडींचा साक्षीदार असलेल्या संसद भवनातील कामकाज नव्या भवनात स्थानांतरित करताना माझ्या मनात भावनांची गर्दी…
संपूर्ण लेख

प्राचार्य मदन धनकर नावाचा विदर्भातील कर्ता लेखक

पुरुषोत्तम हरीभाऊ धनकर हे नाव फार लोकांना माहीत नसले, तरी त्यांचं प्राचार्य मदन धनकर हे विदर्भातील सर्वज्ञात असं…
संपूर्ण लेख

ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दप्रतिभेचा गणपती बाप्पा

‘ॐ नमो जी आद्या। वेदप्रतिपाद्या।  जयजय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।’ अशा प्रकारे ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीत ज्ञानदेवांनी आद्य अशा…
संपूर्ण लेख

नारायण सुर्वे यांच्या घामेजलेल्या कवितेची गोष्ट

नारायण सुर्वे यांचे जे कवितासंग्रह आहेत, ते आपल्याला माहिती आहेत. ‘ऐसा गा मी ब्रह्म’ (१९६२) अभिनव प्रकाशनचे वा.…
संपूर्ण लेख

नव्या पिढीनं संतांकडं कसं पाहावं? हे शिकवणारं रिंगण

रिंगण नावाचं एक वारकरी संतांवर निघणारं वार्षिक आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात प्रकाशित होत असतं.  पत्रकार सचिन परब…
संपूर्ण लेख

ना.धों.महानोर : शेतकऱ्यांचा शब्द पेरणारा कार्यकर्ता

पोराबाळांच्या डोळ्यात, आर्त आसू रूखे सुखे दुखान्तात गणगोत, पार झालेले पारखे खेडोपाडी मोडलेल्या, कुणब्यांना गर्भवास तुका उडून जाताना,…