प्राचार्य मदन धनकर नावाचा विदर्भातील कर्ता लेखक

पुरुषोत्तम हरीभाऊ धनकर हे नाव फार लोकांना माहीत नसले, तरी त्यांचं प्राचार्य मदन धनकर हे विदर्भातील सर्वज्ञात असं नाव होतं. चंद्रपूरसह विदर्भातील सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात प्राचार्य धनकर निकोप आणि निरपेक्षवृत्तीने पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत होते. त्यांचा लोकसंपर्क आणि लोकसंग्रह कमालीचा मोठा होता.

याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी. आजवरचा इतिहास पाहिला तर अनेक साहित्य संमेलनांच्या मंडपात गर्दी जमवण्यासाठीचे सर्व प्रयत्न करूनही रिकाम्या खुर्च्यांचेच दर्शन घडते. पण चंद्रपुरात प्राचार्य धनकरांनी आयोजित केलेल्या साहित्य संमेलनांमधे माणसांची संख्या एवढी मोठी होती की, जागा अपुरी पडत असे. अशा या प्राचार्य धनकरांचं जुलै महिन्यात निधन झालं. त्यांची स्मृती जागणवारा हा लेख.

साहित्य संमेलने यशस्वी करणारा माणूस

माणसं हा धनकरांचं सामर्थ्य होतं. लोकसंग्रहाचे समीकरण त्यांना अचुक साधलं होतं. त्याचं कारणही तसंच होतं.  कारण त्यांनी आपल्या लोकसंग्रहाचे रूपांतर त्यांनी कोणाच्याही राजकीय लाभासाठी जमवलेल्या गर्दीत कधी होऊ दिले नाही. उलट आपल्या आवाहनास प्रतिसाद देऊन येणाऱ्या माणसांच्या विधायक कृतिशीलतेचे आणि ज्ञानाभिरुचीचे सजग भान त्यांनी नित्य जोपासले. त्यांच्या या निरपेक्षतेमुळे माणसं त्यांच्याशी जोडलेली राहिली.

निखळ बौद्धिक आनंद देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. मग ते १९७९ चे ५३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असो की २०१२ या वर्षीचे ८५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असो. दोन्ही आयोजनात प्राचार्य धनकरांनी अक्षरशः जीव ओतला होता. तब्बल पाच वेळा चंद्रपुरात विदर्भ साहित्य संघाची विदर्भ साहित्य संमेलने आयोजित करण्यात आली.

या प्रत्येक साहित्य समेलनात अग्रस्थानी असलेलं नाव होतं ते म्हणजे प्राचार्य मदन धनकर. अगदी स्मरणिका संपादनापासून संमेलनातील अभिनव कार्यक्रमांची आखणी आणि ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडण्याची क्षमता त्यांच्या अंगी होती. म्हणूनच साहित्य संस्कृती महोत्सवासारखी आयोजनेही त्यांनी संमेलनांच्या थाटात पार पाडली. 

विदर्भातील अनेक संस्थांचा आधारस्तंभ

सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ‘ स्नेहांकित ‘ या संस्थेचे ते पंचवीस वर्षे अध्यक्ष होते. पंडित भीमसेन जोशी यांचे गाणे, अर्चना जोगळेकर यांचे नृत्य, हेमामालिनी यांच्या नृत्यसंचाचा कार्यक्रम, अष्टपैलू अभिनेते सचिन पिळगावकर यांचा कार्यक्रम अशा अभिनव आयोजनांसह कितीतरी उपक्रम त्यांनी राबविले.

विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीत असतानाही त्यांनी अनेक मौलिक असे उपक्रम राबविले. नागपूर प्रदेश ग्रंथालय संघाचे सात वर्षे ते अध्यक्ष होते. लोकाग्रणी बळवंत राघव उपाख्य बाबासाहेब देशमुख प्रतिष्ठानाचे ते उपाध्यक्ष होते.या संस्थेच्या वतीने ‘चंद्रपूर भूषण’ हा पुरस्कार महनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला सन्मानपूर्वक प्रदान केला जातो. सांस्कृतिक साहित्यिकविषयक कार्य करणाऱ्या संस्थांसह शैक्षणिक कार्य करणाऱ्या संस्थांशीही प्राचार्य धनकर यांचे निकटचे संबंध होते. 

सर्वोदय शिक्षण संस्था आणि सरदार पटेल मेमोरियल सोसायटीया दोन्ही संस्थांच्या जडणघडणीत आणि विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. नागपूर विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य असताना विद्यापीठाच्या वतीने डॉ. वि. भि. कोलते यांच्या ‘अजून चालतोचि वाट’ या आत्मचरित्राचे संपादन-प्रकाशन त्यांनी केले.

समन्वयाचं महत्व कळलेला कार्यकुशल प्रशासक

अशा अनेक पदांवर कार्य करीत असतानाही त्यांच्यातील कार्यकर्तेपण कधी संपले नाही. पदांपेक्षा त्यांनी माणुसकीला प्राधान्य दिले. जिवलग मनःपूर्वकतेने संबंध जोपासताना खुर्चीवरच्या पदांची तमा त्यांनी बाळगली नाही. मानाची पदे पुरस्कार यापेक्षा त्यांना माणसामाणसातील जिव्हाळा कायम ठेवणे जास्त महत्त्वाचे वाटत होते.

प्राचार्य धनकर यांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक पैलू होते. शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, पत्रकार, संपादक, लेखक, प्रकाशक, वक्ता, संघटक या आणि अशा कितीतरी रूपांत ते समाजात वावरत होते. या प्रत्येक रूपात ते लोकप्रिय होते. शांत, समंजस, सुसंस्कृत आणि संयमी असलेले प्राचार्य धनकर क्षमाशील आणि नम्र असलेले विद्याव्यासंगी होते.  म्हणूनच एकाच वेळी अनेक पदांच्या अनेक जवाबदाऱ्या पार पाडणे त्यांना शक्य होत असे. ते जसे मातृहृदयी शिक्षक होते तसेच ते समन्वयवादी पण कार्यकुशल प्रशासकही होते.

लेखणीचा सामर्थ्य जाणणारा पत्रकार, लेखक

प्राचार्य धनकरांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली. पत्रकार आणि नंतर संपादक म्हणून कार्य करीत असताना विधायक अशा सामाजिक कार्यासाठी त्यांनी लेखणीचे सामर्थ्य उपयोगात आणले. जिज्ञासू पत्रकार सजग आणि विनयशील असतो.चतुरस्र संपादक लोकसंग्रही आणि विविध ज्ञानशाखांचा व्यासंगी असतो.हे सारे गुण अंगी असल्याने प्राचार्य धनकरांनी ‘लोकमत’ या वृत्तपत्रांत १९७१ मध्ये वार्ताहर म्हणून काम सुरू केले पुढे ते या वृत्तपत्राचे काही काळ संपादकही होते.

चंद्रपुरात शांताराम पोटदुखे यांच्या ‘भारती’ साप्ताहिकात त्यांनी काम केले. नागपूरला वसंतराव लुले यांच्या ‘चर्चा’ या दिवाळी अंकाचे त्यांनी काही वर्षे संपादन केले. बंधू मोहन धनकर यांच्या ‘हरिवंश’ या साप्ताहिकाचे ते संपादक होते. हरिवंश मध्ये ‘सहवास’ या सदरातून त्यांनी आठशे पेक्षा जास्त व्यक्तिचित्रे लिहिली. विविध वृत्तपत्रांतून १५०० पेक्षा जास्त लेख लिहिले. 

प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी हरिवंश प्रकाशन सुरू केले. मुद्रणदोषरहित अक्षरजुळवणी,  मांडणी, सजावट, छपाई ,मुखपृष्ठ असे सारे काही उत्तम असणाऱ्या हरिवंश प्रकाशनाने संग्रहणीय पुस्तके प्रकाशित केली. प्रकाशन व्यवसायाचे अर्थकारण मात्र सेवाव्रती वृत्तीच्या प्राचार्य धनकरांना साधले नाही. माणसे जोडताना, माणसांची गुणवत्ता जोपासताना अर्थकारण फसले पण सकस साहित्याचे निर्माण आणि जतन मात्र झाले. 

‘दिशादर्शक भाषणे ‘ (आचार्य दादा धर्माधिकारी यांची भाषणे), तारासूक्त (ताराबाई धर्माधिकारी यांच्या जीवन विचार आणि कार्याचा वेध) ”शोध माणसांचा” (न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे लेख), ‘ना.रा.शेंडे व्यक्ती आणि वाङ्मय’, डॉ. द. भि. कुळकर्णी अभिनंदन ग्रंथ या पुस्तकांसह अनेक मौलिक पुस्तके हरिवंश प्रकाशनाने प्रकाशित केली.

विदर्भाच्या कतृत्त्वाचं ‘मंगलतोरण’ लावणारा लेखक

अनेक क्षेत्रांत सतत कार्यरत असणाऱ्या प्राचार्य धनकरांना स्वतःसाठीचे अर्थकारण साधता आले नाही. पण, वाणी आणि लेखणी यांची न संपणारी श्रीमंती त्यांच्याजवळ होती. ‘मंगलतोरण’ हे त्यांचे एक पुस्तक हरिवंश प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. या पुस्तकात परिशिष्टात घेतलेला ‘विदर्भातील कर्ती माणसं’ हा लेखही संदर्भ म्हणून महत्त्वाचा आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , मा. सां. कन्नमवार , वि. वा. जोशी, साहित्यभूषण तु. ना. काटकर, साधनाताई आमटे, ताराबाई धर्माधिकारी, वा. स. अंदनकर, लक्ष्मणदास काळे, प्राचार्य राम शेवाळकर, मनोहर सप्रे, ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर, शांताराम पोटदुखे, सीमारक्षक वैज्ञानिक डॉ. अब्दुल बशीर या तेरा व्यक्तीच्या जीवन, विचार आणि कार्याचा वेध ‘मंगल तोरण’ या पुस्तकात घेतला आहे.

‘मंगल तोरण’ विषयी प्रा. ग. प्र. प्रधान लिहितात की, ‘या व्यक्तिचित्रांमधून प्राचार्य धनकर यांना विविध क्षेत्रातील विदर्भातील मोठ्या माणसांबद्दल कसे प्रेम आहे हे दिसून येते. पश्चिम महाराष्ट्राला ही व्यक्तिचित्रे फार मार्गदर्शक ठरतील असे मला मनापासून वाटते. महाराष्ट्रातील माणसांना विदर्भातील या व्यक्तींचे मोठेपण दाखविणाऱ्या या लेखसंग्रहाबद्दल मी प्राचार्य धनकर यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो’. प्रधान मास्तरांच्या या शब्दांतून या पुस्तकाच्या मौलिकता कळते.

धनकरांनी उमटवलेला कार्याचा ठसा अमीट

समाजकार्य, शैक्षणिक कार्य,वाङ्मयीन कार्य, संस्थात्मक कार्य करीत असताना प्राचार्य धनकरांनी लोकशाही मूल्यांची जपणूक केली.  गुणवत्तेला निखळ दाद देण्यारी निरपेक्ष वृत्ती आणि समर्पणशील सहिष्णुता अंगी असल्याने ते सांस्कृतिक क्षेत्रातील गटतटात आणि राजकीय पक्षांच्या साचेबद्ध चौकटीत कधीच अडकले नाहीत. उलट ते सदासर्वदा सर्वांचे जवळचे होते.

केवळ प्रशंसक न राहता चांगल्या म्हणजे विधायक उपक्रमांत ते सक्रिय सहभागी झाले तर लोकशाही मूल्यांचा जागर करीत सजग सकस लेखनाला, विचारांना त्यांनी निखळ दाद दिली. जमेल तसे लेखन केले आणि उत्तम लेखन जतन, संवर्धन करण्यासाठी प्रकाशन संस्थाही चालवली. चंद्रपूरला राहूनही संपूर्ण महाराष्ट्रासाठी मराठी भाषा आणि साहित्यासाठी निष्ठेने कार्य केले.

पाच दशकांहून अधिक काळ सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक ,वाङ्मयीन आणि संस्थात्मक चळवळीत सक्रिय असताना निंदा, प्रतिकूल टीका, द्वेष, मत्सर, आरोप अशा अनेक गोष्टींचा सामना त्यांना करावा लागला. पण, सर्वप्रकारच्या विरोधाचा सामना त्यांनी स्वार्थरहित विधायक कार्याने आणि अविचल सहिष्णुतेच्या निखळ वैचारिकतेने केला. 

विरोधकांच्या गुणवत्तेला दाद देण्याची प्रगल्भता असल्याने विरोधाच्या आणि द्वेषाच्या आगीतही प्राचार्य धनकरांच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे वावन्नकशी सोने उजळून निघाले. आज प्राचार्य मदन धनकर यांच्यासारखी सोज्वळ, सुसंस्कृत ज्ञानी आणि सेवाव्रती ज्येष्ठ माणसे दुर्मिळ झाली आहेत. चंद्रपूरसह पूर्व विदर्भातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वाङमयीन, आणि संस्थात्मक चळवळींवर प्राचार्य मदन धनकर यांच्या विचारांचा कार्यकुशलतेचा आणि निरपेक्ष सेवाभावी वृत्तीचा अमीट ठसा उमटला आहे.

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

जुन्या संसद भवनाचा इतिहास जपला गेला पाहिजे!

प्रतिष्ठित, ऐतिहासिक आणि अनेक घडामोडींचा साक्षीदार असलेल्या संसद भवनातील कामकाज नव्या भवनात स्थानांतरित करताना माझ्या मनात भावनांची गर्दी…
संपूर्ण लेख

ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दप्रतिभेचा गणपती बाप्पा

‘ॐ नमो जी आद्या। वेदप्रतिपाद्या।  जयजय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।’ अशा प्रकारे ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीत ज्ञानदेवांनी आद्य अशा…
संपूर्ण लेख

पर्यावरणपूरक विसर्जन हाच योग्य पर्याय

पावसाळ्यात निसर्गानं सर्वत्र हिरवीगार उधळण केलेली असताना, निसर्गातील दुर्वा-फुलांनी, त्याच निसर्गातील मातीच्या गणपतीची पूजा करणं, म्हणजे गणेशोत्सव. त्यातही…
संपूर्ण लेख

नारायण सुर्वे यांच्या घामेजलेल्या कवितेची गोष्ट

नारायण सुर्वे यांचे जे कवितासंग्रह आहेत, ते आपल्याला माहिती आहेत. ‘ऐसा गा मी ब्रह्म’ (१९६२) अभिनव प्रकाशनचे वा.…
संपूर्ण लेख

नव्या पिढीनं संतांकडं कसं पाहावं? हे शिकवणारं रिंगण

रिंगण नावाचं एक वारकरी संतांवर निघणारं वार्षिक आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात प्रकाशित होत असतं.  पत्रकार सचिन परब…
संपूर्ण लेख

ना.धों.महानोर : शेतकऱ्यांचा शब्द पेरणारा कार्यकर्ता

पोराबाळांच्या डोळ्यात, आर्त आसू रूखे सुखे दुखान्तात गणगोत, पार झालेले पारखे खेडोपाडी मोडलेल्या, कुणब्यांना गर्भवास तुका उडून जाताना,…