आखाड्यांमधल्या राजकारणामुळे महंत नरेंद्र गिरी यांचा मृत्यू?

महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केली की, त्यांची नियोजनपूर्वक हत्या करण्यात आली हे अजून तरी गुलदस्त्यातच आहे. एक खरं की, या अनपेक्षित आणि काहीशा गूढ घटनेमुळे केवळ उत्तर प्रदेशच नाही तर देश ढवळून निघालाय. धार्मिक जगतसुद्धा सूड आणि आकसाच्या भावनेपासून अलिप्त राहिलेलं नाही हे या घटनेतून स्पष्ट होतं.

२० सप्टेंबरला उत्तर प्रदेशच्या धार्मिक जगतात भूकंप झाला. त्याचं कारण ठरलं ते अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांची कथित आत्महत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि संत समाजातल्या अनेक मान्यवरांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय.

महंत गिरी यांनी आत्महत्या केली की, त्यांची नियोजनपूर्वक हत्या करण्यात आली हे अजून गुलदस्त्यातच आहे. त्याचा तपास सध्या उत्तर प्रदेश पोलिसांचं खास पथक करतंय. एक खरं की, या अनपेक्षित आणि काहीशा गूढ घटनेमुळे केवळ उत्तर प्रदेशच नाही तर सारा देश ढवळून निघाला आहे. अजूनही त्याचे पडसाद उमटत आहेत. धार्मिक जगतसुद्धा सूड आणि आकसाच्या भावनेपासून अलिप्त राहिलेलं नाही हे यातून स्पष्ट होत चाललंय.

हेही वाचा: बुवाबाबा, साधू, महाराजांनाही संत म्हणावं का?

आदित्यनाथ यांच्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा

नरेंद्र गिरी हे प्रयागराज इथल्या बाघंबरी मठाचे महंत म्हणजेच प्रमुख होते. ते प्रयागराजचेच रहिवासी होते. तिथल्या गंगाकिनारी असलेल्या प्रसिद्ध हनुमान मंदिराचे मुख्य पुजारी म्हणूनही ते काम करत होते.
निरंजनी आखाड्याशी संबंधित असलेल्या गिरी यांनी सुरवातीच्या काळात या आखाड्याचं सचिवपद भूषवलं होतं.

एवढी मोठी पदं भूषवत असलेल्या या महनीय व्यक्तीने अचानकपणे स्वतःला संपवण्याचा निर्णय कसा घेतला की तसं करायला त्यांना भाग पाडलं गेलं या प्रश्नांची उत्तरं शोधणं हे मोठं आव्हान म्हटलं पाहिजे. जे कोणी यात दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा निर्वाळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. कारण ते स्वतः गोरखपूर इथल्या गोरखनाथ मंदिराचे महंत. साहजिकच त्यांच्यासाठी या संपूर्ण प्रकरणाचा तपास प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे.

विरोधी पक्षांनी नेहमीप्रमाणे या मुद्द्यावरून योगी सरकारवर निशाणा साधला असून त्यांना याचं राजकारणच करायचं आहे, असं अखिलेश यादव यांच्यासारख्या नेत्यांच्या प्रतिक्रियांवरून जाणवू लागलंय. अर्थात ते स्वाभाविकच.

कोट्यवधी रुपयांची संपत्ती

मुख्य विषय आहे तो कोणत्या परिस्थितीमुळे महंत नरेंद्र गिरी यांच्या जीवनाचा असा शोकात्म शेवट झाला. गिरी यांनी गळफास लावून घेतल्याची माहिती प्रयागराज पोलिसांना देण्यात आली आणि त्यानंतर जेव्हा पोलिस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांना मठातल्या त्यांच्या खोलीचा दरवाजा तोडावा लागला. पण महंत गिरी यांचा देह खाली उतरवला जाईपर्यंतच त्यांनी अंतिम श्वास घेतला होता.

त्यांच्या खोलीत पोलिसांना सुमारे सात ते आठ पानांची एक विस्तृत चिठ्ठी मिळाली असून त्यामधला सगळा तपशील या संपूर्ण तपासातला महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. इथं हेही नमूद केलं पाहिजे की, प्रयागराज इथल्या बाघंबरी मठ आणि गंगेच्या संगमावरच्या हनुमान मंदिर संस्थानकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. एवढंच नाही तर नोएडा भागातही बाघंबरी मठाची काही एकर जमीन असून या भूखंडांची किंमत अब्जावधी रुपये असल्याचं सांगितलं जातं.

नरेंद्र गिरी आणि वाद

तसं पाहिलं तर महंत नरेंद्र गिरी हे अनेकदा वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. २०१२ ला महंत आणि हंडियाचे तत्कालीन आमदार महेश नारायण सिंह यांच्यात कडाक्याचं भांडण काही कारणांवरून झालं होतं. याच महंत यांनी २०१५ ला एका रिअल इस्टेट व्यावसायिकाला महामंडलेश्वर ही उपाधी बहाल केली होती. त्यावेळी तो मोठा आणि वादाचा चर्चेचा विषय ठरला होता.

१७ नोव्हेंबर २०१९ ला निरंजनी अखाड्याचे सचिव महंत आशिष गिरी यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. तेव्हाही महंत नरेंद्र गिरी वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. हे कमी म्हणून की काय, २००४ ला बाघंबरी मठाचे महंत झाल्यानंतर नरेंद्र गिरी यांनी तेव्हाचे एक बडे पोलिस अधिकारी आर. एन. सिंह यांच्याशी संघर्षाची बतावणी केली होती. ते प्रकरण जमीनजुमल्याशी संबंधित होतं.

खुद्द सिंह यांनीच काही दिवस हनुमान मंदिरासमोर धरणं धरलं. शेवटी तेव्हाचे मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी आर. एन. सिंह यांना सेवेतून निलंबित केलं तेव्हा कुठे हा सगळा मामला थंडावला होता.

संत समाजात मोठं वजन

सांगण्याचा मुद्दा असा की, अनेकदा महंत नरेंद्र गिरी हे वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. रामजन्मभूमी आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. संत समाजात त्यांच्या शब्दाला मोठं वजन होतं. लागोपाठ दोन वेळा ते अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष होते.

साधू मंडळींना महामंडलेश्वर आणि इतर ठिकाणी उपाध्या प्रदान करण्याचं काम या परिषदेतर्फे केलं जातं. २०१९ ला जेव्हा प्रयागराज इथं कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता तेव्हा त्यात महंत नरेंद्र गिरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. कुंभमेेळ्याच्या आयोजनात त्यांचं मार्गदर्शन वारंवार घेतलं जात होतं.

हेही वाचा: आम्ही हिंदूही आणि मुसलमानही!

आखाड्यांमधेही मतभिन्नता

महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूनंतर आखाडा हा विषय वारंवार चर्चेत आला. देशात सध्याच्या परिस्थितीत शैव, वैष्णव आणि उदासीन पंथांच्या साधूंचे एकूण १३ आखाडे आहेत. त्यांच्यातही मोठ्या प्रमाणावर मतभिन्नता दिसून येते. आखाड्यांची ही व्यवस्था १९५४ पासून सुरू झाली. पूर्वी आखाड्यांना बेडा म्हणजेच साधूंचा समूह असं म्हटलं जायचं.

आखाडा हा शब्द मुघल काळापासून सुरू झाला असं मानलं जातं. काही जाणकारांच्या मते आखाडा या संकल्पनेचा उगम अलख या शब्दापासून झाला आहे. असं सांगतात की, आदी शंकराचार्यांनी आठव्या शतकात १३ आखाडे तयार केले होते. तेच आजपर्यंत कायम आहेत. उर्वरित कुंभमेळ्यात सर्व आखाडे एकत्र स्नान करतात करतात.

सध्या नाशिकच्या कुंभात वैष्णव आखाडा नाशिकमधे आणि शैव आखाड्याशी संबंधित साधूसंन्यासी त्र्यंबकेश्वरी स्नान करतात. ही व्यवस्था पेशवाईच्या काळात १७७२ पासून अखंड सुरू आहे असं म्हटलं जातं.

शिष्याच्या आरोपांमुळे खळबळ

मूळ मुद्दा असा की, महंत नरेंद्र गिरी यांचा रहस्यमय मृत्यू आणि त्यावरून निर्माण झालेलं वादळ. यात संशयाची तलवार नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी याच्या डोक्यावर टांगलेली आहे. नरेंद्र गिरी आणि आनंद गिरी यांच्यातला वाद गेल्या अनेक दिवसांपासून गाजत होता. नरेंद्र गिरी यांच्यावर आनंद गिरी यांनी गंभीर आरोप केल्यामुळे आखाडा परिषदेत प्रचंड खळबळ माजली होती.

बाघंबरी मठ आणि हनुमान मंदिर अशा दोन्ही ठिकाणी जमा होणार्‍या कोट्यवधींच्या रकमेत नरेंद्र गिरी यांनी फेरफार केल्याचा आरोप आनंद गिरी यांनी केल्यानंतर प्रचंड खळबळ माजली. त्यासाठी आनंद गिरी यांनी दोन वीडियोही प्रसिद्ध केले होते. यातल्या एका वीडियोत, मठ आणि मंदिराशी संबंधित काही मंडळी बारबालांसोबत नृत्य करताना दिसली होती. त्यामुळे गुरू आणि शिष्य यांचं नातं कमालीचं कडवट होत गेलं.

नंतरच्या काळात दोघांमधून विस्तवही जाईना. हे आरोप महंत नरेंद्र गिरी यांच्या जिव्हारी लागले होते. त्यांनी आपल्या सहकार्‍यांकडे आपली याविषयीची वेदना व्यक्त केली होती. अखेर जे अपेक्षित होतं तेच घडलं. महंत नरेंद्र गिरी यांनी आनंद गिरी यांना बाघंबरी मठ आणि हनुमान मंदिरातून हद्दपार केलं. त्यामुळे तर आगीत तेल ओतलं गेलं.

आत्महत्येचे धागेदोरे कुठपर्यंत?

आखाड्याने यात हस्तक्षेप केला. मग आनंद गिरी यांनी महंत नरेंद्र गिरी यांची बिनशर्त माफी मागितली. त्यामुळे काही काळ शांतता निर्माण झाल्याचं चित्र दिसलं. पण ती वादळापूर्वीची शांतता ठरली. आता पोलिसांनी आनंद गिरी याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या समग्र चौकशीतूनच महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणावर साद्यंत प्रकाश पडू शकतो.

त्याचवेळी आनंद गिरी याने आपण निर्दोष असल्याचा दावा केला असून आपल्याला या प्रकरणात हेतूपूर्वक गुंतवलं जात आहे असं म्हटलंय. अर्थात कोणताही संशयित सुरवातीला असंच म्हणत असतो. या प्रकरणात आणखीही काही मंडळी गुंतली असावीत, असा पोलिसांचा कयास आहे.

महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी जी चिठ्ठी लिहून ठेवली, त्यात केवळ नरेंद्र गिरी नाही इतर अनेकांची नावं असल्याचं तपास यंत्रणांनी म्हटलंय. आता जेव्हा या सगळ्यांचीच कसून चौकशी केली जाईल, तेव्हाच या प्रकरणाचं गूढ उलगडेल.

आखाड्यांमधलं राजकारण

एक खरं की, साधू आणि संन्याशांचे आखाडेही राजकारण आणि परस्परांवर कुरघोडी करण्यापासून मुक्त राहिलेले नाहीत हे या प्रकरणामुळे स्पष्ट झालंय. राजकारणातले आखाडे आपण सातत्याने अनुभवत आलो आहोत, पण आखाड्यातल्या राजकारणाची आणि श्रेष्ठत्व गाजवण्याची धग एखाद्या महंताच्या जीवावर उठल्याची भेदक घटना आपण क्वचितच पाहात आहोत.

धर्माचा बाजार मांडणार्‍या भोंदू मंडळींचा अपवाद केला तर साधू, संन्यासी, बैरागी यांच्याकडे समाजात आजही आदरानं पाहिलं जातं. पण, महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणामुळे आखाडा या विषयातला एक काळा अध्याय समोर आला आहे. कालाय तस्मै नमः दुसरं काय!

हेही वाचा: 

कोकणी मुसलमानांचे पूर्वज होते तरी कोण?

स्त्रिया कोर्टाचा अपमान करतात की कोर्ट स्त्रियांचा?

तबलीगने भारतात कोरोना पसरवण्याचा कट केलाय का?

कष्टकऱ्यांच्या पोरापोरींनी आयएएस बनणं कुणाला खुपतंय का?

हिंदू-मुस्लिम नसलेली पत्रकार सांगतेय, दिल्ली दंगलीत काय झालं?

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Rajsthan Election 2023
संपूर्ण लेख

राजस्थानात भाजपमधील बंडाळी काँग्रेसच्या पथ्यावर?

राजस्थानात आजवर कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा सरकार बनविण्याची संधी दिलेली नाही. त्यामुळे यावेळीही काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांच्या…
Toll issue in Maharashtra
संपूर्ण लेख

रस्त्यावरील ‘टोलचा झोल’ किती दिवस चालणार?

सामान्य जनतेला रस्ते असो वा कोणतीही सुविधा असो मोफत नको आहे. पण टोलवसुलीच्या नावे चाललेली जनतेची लूट लोकांना…
संपूर्ण लेख

प्रादेशिक पक्षांना गारवा देतोय कर्नाटकातल्या बंडखोरीच्या वणवा

कर्नाटकात भाजपच्या महत्त्वाकांक्षेला मतभेदाचा आणि बंडखोरीचा फटका बसलाय. तिकीटापासून वंचित असलेल्या अनेक ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांनी वेगवेगळी चूल…
संपूर्ण लेख

Point by Point: खलिस्तानचं मॅटर आणि भारत-कॅनडा पंगा

कॅनडा आणि एकंदरीतच पाश्चिमात्य देशात सुरू असलेल्या खलिस्तानी चळवळीच्या कारवाया आणि भारत आणि कॅनडा या दोन देशांतील ताणलेले…
संपूर्ण लेख

धनगर आरक्षणाच्या आंदोलनाआधी, फडणवीसांना जाब विचारा!

 मराठा आरक्षणाच्या जालन्यामधील लाठीमारापर्यंत गेलेल्या आंदोलनानंतर, ओबीसींनी आंदोलनाचा इशारा दिला. आता धनगरांना भडकवलं जातंय. हे नक्की कशासाठी चाललंय…
संपूर्ण लेख

भागवतांच्या पुरोगामी विधानांमागे दडलंय काय?

आरएसएस ही मातृसंस्था असलेल्या भारतीय जनता पक्षाची सत्ता २०१४ मधे आल्यानंतर वर्षभराच्या अंतरानं, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी…